

Urvashi Rautela Kuwait Tension: इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाने सध्या संपूर्ण पश्चिम आशियामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा फटका कलाविश्वालाही बसत असून नुकतीच अभिनेत्री उर्वशी रौतेला कुवेतमध्ये एका व्यावसायिक कामासाठी गेली असताना तेथील बिघडलेल्या परिस्थितीमुळे तिला मोठा मानसिक धक्का बसला.
भारतात (India) परतण्यासाठी विमानात बसल्यानंतर उर्वशीला अचानक भीतीचा तीव्र झटका (Panic Attack) आला. तिने सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी नोट आणि व्हिडिओ शेअर करत आपल्या मनातील भीती आणि अगतिकता चाहत्यांसमोर मांडली. या व्हिडिओमध्ये उर्वशी डोळ्यांतील अश्रू पुसताना दिसत असून ती प्रचंड अस्वस्थ असल्याचे जाणवत आहे.
उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ती विमानात चढेपर्यंत पूर्णपणे ठीक होती. मात्र, एकदा का ती आपल्या सीटवर बसली, त्यानंतर तिच्या मनात भीतीची एक प्रचंड लाट उसळली. तिने लिहिले, "मी विमानात बसेपर्यंत सगळं काही सुरळीत होतं. पण जशी मी माझ्या सीटवर बसले, तशी अचानक माझ्या हृदयात धडधड वाढली आणि मला अनामिक भीती वाटू लागली. मला कळत नाहीये असं का होत आहे, पण मी सध्या खूप अस्वस्थ आणि असुरक्षित अनुभवत आहे." उर्वशीने आपल्या चाहत्यांना विनंती केली की, तिच्या सुरक्षित प्रवासासाठी त्यांनी प्रार्थना करावी. तिने चाहत्यांची माफीही मागितली की तिला अशा प्रकारे भावनिक पाहून जर कोणी काळजीत पडले असेल, तर ती दिलगीर आहे, पण मनातली भीती व्यक्त केल्याने तिला थोडे हलके वाटले.
सुदैवाने, उर्वशी रौतेला आता मुंबईत (Mumbai) सुखरुप परतली. तिने कारमधून प्रवास करतानाचा एक छोटा व्हिडिओ शेअर करुन ती सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. पश्चिम आशियातील तणावामुळे अडकलेली उर्वशी ही पहिलीच अभिनेत्री नाही. गेल्या आठवड्यात अभिनेत्री ईशा गुप्ता हिने देखील तिचा थरारक अनुभव शेअर केला होता. ईशा 28 फेब्रुवारीपासून दुबई आणि अबू धाबीमध्ये अडकून पडली होती. भारतात परतणे तिच्यासाठी कठीण झाले होते, मात्र भारत आणि यूएई सरकारच्या जलद हालचालींमुळे ती सुखरुप मायदेशी परतली. ईशाप्रमाणेच अभिनेत्री सोनल चौहान हिलादेखील दुबईतील तणावाचा सामना करावा लागला होता आणि तिनेही सुरक्षित परतल्यावर प्रशासनाचे आभार मानले होते.
युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता आणि विमान प्रवासातील अडथळे यामुळे या अभिनेत्रींना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. उर्वशीने तिच्या पोस्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे अशा संकटाच्या वेळी चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंबा हेच तिचे सर्वात मोठे बळ ठरले. सध्या उर्वशी मुंबईत आपल्या घरी असून तिच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.