Durand Cup 2023: धडाकेबाज एफसी गोवाचा 'गोल सिक्सर'; शिलाँग लाजाँगचा धुव्वा

गुवाहाटी येथे झालेल्या या एकतर्फी लढतीत एफसी गोवाचा मोरोक्कन खेळाडू नोआ सदोई याने हॅटट्रिक साधली.
Durand Cup 2023
Durand Cup 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Durand Cup 2023: एफसी गोवाने मोसमातील पहिल्याच स्पर्धात्मक लढतीत धडाका प्रदर्शित करताना तब्बल सहा गोलने एकतर्फी विजय संपादन केला. 132 व्या ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेच्या ड गटात त्यांनी मंगळवारी शिलाँग लाजाँग एफसीचा 6-0 फरकाने धुव्वा उडविला.

गुवाहाटी येथे झालेल्या या एकतर्फी लढतीत एफसी गोवाचा मोरोक्कन खेळाडू नोआ सदोई याने हॅटट्रिक साधली. त्याने अनुक्रमे 20, 27 व 86 व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. रॉलिन बोर्जिसने 15 व्या मिनिटास एफसी गोवाला आघाडी मिळवून दिली.

बदली खेळाडू या नात्याने मैदानात उतरलेली स्पॅनिश दुकली व्हिक्टर रॉड्रिगेझ व कार्लोस मार्टिनेझ यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविताना अनुक्रमे 68 व 83 व्या मिनिटास अचूक नेम साधला. पूर्वार्धातील पहिल्या अर्धा तासाच्या तीन गोल स्वीकारल्यानंतर शिलाँग लाजाँग एफसीला प्रतिकार करणे शक्य झालेच नाही. संपूर्ण सामन्यात एफसी गोवाने गोलनेटच्या दिशेने 12 फटके मारले, तुलनेत शिलाँग लाजाँगने एकच फटका मारला.

सदोईची आश्वासक फॉर्म

गतमोसमात एफसी गोवातर्फे सफल कामगिरी नोंदविताना नोआ सदोईने 23 सामन्यांत 11 गोल व 09 असिस्ट अशी शानदार कामगिरी केली होती. तोच आश्वासक फॉर्म मोरोक्कोच्या आंतरराष्ट्रीय मध्यरक्षकाने मंगळवारी गुवाहाटी येथे नव्या मोसमाच्या प्रारंभी प्रदर्शित केला. आक्रमणात त्याने देवेंद्र मुरगावकर याच्या साथीत सुरेख खेळ केला.

कर्णधार ब्रँडन फर्नांडिसच्या फ्रीकिकवर देवेंद्रच्या असिस्टवर रॉलिनने एफसी गोवातर्फे पहिला गोल केला.

पाच मिनिटानंतर देवेंद्रच्या असिस्टवर सदोईने शिलाँग लाजाँगचा गोलरक्षक रजत पॉल याला लीलया चकवा दिला. त्यानंतर ब्रँडनच्या पासवर सदोईने सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल केला. त्यामुळे विश्रांतीला गोव्यातील संघ तीन गोलने आघाडीवर होता.

Durand Cup 2023
'गोवा 'ती' अ‍ॅसिड टेस्ट पास झाला', ... म्हणून आमदार सरदेसाईंनी गोंयकाराच्या एकीचे केले कौतुक

नव्या चेहऱ्यांची चमक

एफसी गोवा संघातील नव्या परदेशी खेळाडूंनी मंगळवारी चमक दाखविली. गतमोसमातील शेवटच्या लढतीत एफसी गोवाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांना रेड कार्ड मिळाले होते, त्यामुळे शिलाँग लाजाँगविरुद्ध ते डग-आऊटमधून संघाला मार्गदर्शन करू शकले नाहीत. साहाय्यक प्रशिक्षक बेनिटो माँटेल्व्हो यांनी प्रशिक्षणाची धुरा सांभाळली.

नवे स्पॅनिश खेळाडू व्हिक्टर रॉड्रिगेझ व कार्लोस मार्टिनेझ उत्तरार्धात लक्षवेधक ठरले. तासाभराच्या खेळानंतर आणखी एक बदली खेळाडू सॅनसन परेराच्या पासवर रॉड्रिगेझने अगदी जवळून संघाची आघाडी 4-0 अशी भक्कम केली.

अखेरच्या टप्प्यात एफसी गोवाने तीन मिनिटांत आणखी दोन गोल केले. मार्टिनेझ याने मोसमातील पहिला गोल केल्यानंतर सदोई याने एफसी गोवातर्फे यंदा पहिल्या हॅटट्रिकचा मान मिळविला.

पुढील लढत नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध

एफसी गोवाचा ड्युरँड कप स्पर्धेतील पुढील सामना शनिवारी (ता. 12) आयएसएल स्पर्धेतील प्रतिस्पर्धी नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध होईल. नॉर्थईस्टने स्पर्धेतील पहिल्या लढतीत शिलाँग लाजाँगलाच 4-0 असे हरविले होते.

दोन लढतीतून दहा गोल स्वीकारलेल्या शिलाँग येथील संघाचा फक्त एक सामना बाकी असून त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. काश्मीरचा डाऊनटाऊन हिरोज हा गटातील चौथा संघ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com