राजेंद्र सुब्राय नायक
ज्या देशातील व्यक्ती ‘शरणागती’ नाही तर ‘शहादत’ देण्यासाठी तयार असतात, तो देश सदैव जिवंत रहातो. म्हणूनच इराणची ३५०० वर्षांची सभ्यता जिवंत आहे. काल परवाची अमेरिकन महासत्ता त्यांना एका रात्रीत मिटवू शकत नाही. इस्लाममध्ये विशेष करून शिया धर्मियांत ‘शहादत’ या शब्दाला विशेष महत्व आहे. आज शस्त्रसंधीनंतर ही जे छोटे मोठे हल्ले होत आहेत, तिथे इराण आक्रमक अवस्थेत आहे. तर दुसऱ्या बाजूला अमेरिका व इस्त्राइल बचावात्मक पवित्र्यात आहेत.
संपूर्ण विश्वात चाललेल्या युद्धांमुळे आजपर्यंत चालत आलेली वैश्विक समीकरणे बदलली. आधी रशिया-युक्रेन व नंतर इराण-इस्त्रायल-अमेरिका अशी दोन प्रमुख युद्धे यातील इराण-अमेरिका युद्धबंदी करार झाला आहे. अधिकृत युद्ध थांबले असले तरी इराणच्या अणु कार्यक्रमावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ६० दिवसांची बोलणी सुरू आहेत. त्यामुळे सध्या या भागात ‘ना पूर्ण युद्ध, ना पूर्ण शांतता’ अशी स्थिती आहे.
इराण आणि इस्त्रायल या दोन देशांचे शत्रुत्व आपण समजू शकतो. कारण, तो त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. इराणने अणुबाँब बनवला तर तो इस्त्रायलसाठी काळ बनेल. आज इराणकडे ६०% संवर्धित युरेनियम आहे. या युरेनियमचा वापर करून इराण किमान ५० अणुबॉम्ब तयार करू शकतो. याला ‘टॅक्टीकल न्यूक्लीयर वेपन’ किंवा ‘डर्टी बॉम्ब’ म्हणतात. यांची दाहक क्षमता व क्षेत्रव्याप्ती कमी असते. कमी क्षमतेचे किंवा संपूर्ण क्षमतेचे अणुबाँब यांची उपयुक्तता एक सारखी असते. अणुबाँब हा एक ‘डिटरंट फॉर्स’ असतो.
त्याचा किधीही वापर होत नसतो. अमेरिका या युद्धात का उतरली? हा सर्वांना पडलेला यक्षप्रश्न आहे. कोणतेही कारण नसताना हजारो किमी दूर असलेल्या इराणवर अचानक संयुक्त हल्ला करून, त्यांचे सर्वोच्च धर्मगुरू आयातुल्लाह अली खोमेनी यांची हत्या करून अमेरिकने काय साधले? याचे उत्तर खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही माहीत नाही. विशेष म्हणजे अमेरिकेने इराणवर कधीही हल्ला करण्याचे दुःसाहस करू नये, असा सल्ला पँटागॉनने चाळीस वर्षांपूर्वी तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष रॉनाल्ड रिगन यांना दिला होता; कारण चहूबाजूंनी वेढलेल्या पर्वतरांगांनी इराणला अभेद्य किल्ला बनवले आहे.
आणि त्यांनी बनवलेली मॉर्सेक डॉक्ट्रीन तर इराणला अजिंक्य बनवते. इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही हे अमेरिकेला उशिरा कळले. मडुरोला उचलून आणले, तसे इराणमधील ६०% संवर्धित युरेनियम उचलून आणू अशी त्यांची अपेक्षा होती. हवाईमार्गे हजारो कमांडो उतरवून तिथे खोदकाम करायचे व नंतर पाचशे मीटर खाली ठेवलेला युरेनियम साठा जप्त करायचा, असा हा डाव होता. अशा या आत्मघातकी कारवाईत कमीत कमी एक हजार उच्च प्रशिक्षित कमांडो कामी आले असते, आणि त्यांच्या शवपेट्या जेव्हा अमेरिकेत पोहोचल्या असत्या, तेव्हा अमेरिकेच्या जनतेची प्रतिक्रिया काय होईल. हे अमेरिकेचे संयमी उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वेन्स यांना माहीत होते.
म्हणूनच त्यांनी या सर्व प्रकरणात संयमी भूमिका घेतली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे सर्वेसर्वा शी जीन पिंग, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू व उत्तर कोरियाचे किम जोंग ऊन या पाच व्यक्तिंनी आपल्या राक्षसी महत्वाकांक्षेपोटी संपूर्ण विश्वाला वेठीस धरले आहे. एका अनधिकृत बातमीनुसार दीड महिने आधी ट्रम्प साहेबांनी तेहरानवर अणुबॉम्ब टाकावा, असा आदेश दिला होता.
पण तिथे (कंट्रोल रूम)मध्ये बसलेल्या संयुक्त सेनाप्रमुख, उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वेन्स व इतर यांनी हा आदेश पाळण्यास नकार दिला तेव्हा ट्रम्पसाहेब आक्रमक झाले असे कळते. अशा राष्ट्राध्यक्षांच्या हाती पाच हजार अणुबॉम्बची नियंत्रण यंत्रणा आहे. एका रात्रीत एक संस्कृती नष्ट करू, असा धमकी युक्त इशारा त्यांनी अनेकवेळा दिला आहे. या सर्व घडामोडीमुळे सर्व राष्ट्रांची किंवा राष्ट्र समुहांची समीकरणे बिघडली आहेत. ‘नाटो’ ही एक रक्षात्मक संघटना आहे. त्यांच्या संविधानानुसार कोणत्याही ‘नाटो’ सदस्य देशावर हल्ला झाला तर तो संपूर्ण नाटो समूहावर हल्ला आहे, असे मानण्यात येते.
पण याच्या उलट जी स्थिती आहे ती अगदी वेगळी आहे. जर कोणत्याही ‘नाटो’ सदस्य देशाने दुसऱ्या देशावर आक्रमण केले तर ‘नाटो’ सदस्य देशांनी त्याला साथ द्यावी, अशी सक्ती नाही. हीच अमेरिकेची मोठी चूक होती. म्हणूनच फ्रान्स, ब्रिटन, इटली व इतर ‘नाटो’ राष्ट्रांनी या युद्धात सहभागी होण्यास नकार दिला. पंचवीस वर्षापूर्वी अमेरिका, ब्रिटन व इतर राष्ट्रांनी मिळून इराकवर हल्ला चढवला होता व राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांना पदच्युत केले होते. तेव्हा इराकमध्ये रासायनिक शस्त्रे सापडली नव्हती.
नंतर ब्रिटनचे तेव्हाचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी ही आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती, हे मान्य करून माफीही मागितली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे प्रत्येकवेळी आपली आपली भाषा बदलतात. यामुळे ‘शेअर मार्केट मॅनिपुलेशन’ होत असते. या बदलत्या परिस्थितीचा फायदा, डोनाल्ड ट्रम्प व त्यांचे कुटुंबीय एका रात्रीत करोडो डॉलर कमाई करतात, असा गंभीर आरोप ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने केला आहे.
‘हम तो डुबेंगे सनम, आपको भी ले डुबेंगे’ अशी इराणची भावना आहे. ज्या देशातील व्यक्ती ‘शरणागती’ नाही तर ‘शहादत’ देण्यासाठी तयार असतात, तो देश सदैव जिवंत रहातो. म्हणूनच इराणची ३,५०० वर्षांची सभ्यता जिवंत आहे. काल परवाची अमेरिकन महासत्ता त्यांना एका रात्रीत मिटवू शकत नाही. इस्लाममध्ये विशेष करून शिया धर्मियांत ‘शहादत’ या शब्दाला विशेष महत्व आहे. आज शस्त्रसंधीनंतर ही जें छोटे मोठे हल्ले होत आहेत तिथे इराण मारण्याच्या आक्रमक अवस्थेत आहे. तर दुसऱ्या बाजूला अमेरिका व इस्त्राइल बचावात्मक पवित्र्यात आहेत.
त्यांच्याजवळ पॅट्रीयॉट थाड, आयन डोम, डेविड स्लींग ॲरॉ यात वापरण्यात येणारी क्षेपणास्त्रे नाहीत. याचा परिणाम काय झाला? गेली अनेक वर्षे पेट्रो डॉलर देऊन आखाती देशांनी आपली जमीन देऊन स्वसंरक्षणार्थ लष्करी (अमेरिकेचे) तळ उभारले होते. त्यांना आता अमेरिकेचा विश्वास वाटत नाही. आता स्वतःचे संरक्षण आपल्या यंत्रणेमार्फत होणार, याची खबरदारी हे देश घेतील, असे वाटते. यानंतर तैवान, दक्षिण कोरिया, जपान या देशांचे संरक्षण कोण करणार? १९४५ नंतर जपानच्या शरणागतीनंतर त्यांच्या संविधानात एक कलम जोडण्यात आले.
जपान हा देश शस्त्रनिर्मिती व अणुबॉम्ब निर्मिती या क्षेत्रात उतरणार नाही, अशी ही व्यवस्था होती. पण जपानने हा पवित्रा बदलून समर्थ लष्करी शक्ती होण्याकडे पावले टाकली आहेत. ‘नाटो’ म्हणजे अमेरिका व अमेरिकेचे तळ असे समीकरण गेली कित्येक वर्षे होते. ते यापुढे रहाणार नाही. कारण यापुढे युरोपच्या संरक्षणार्थ अमेरिकेचा जो पैसा खर्च होत होता तो आता होणार नाही. ‘नाटो’मधून अमेरिका बाहेर पडणार हे आता निश्चित झाले आहे. मग संपूर्ण युरोपला आपली दूसरी नाटो संघटना उभी करावी लागेल.
याचा परिणाम युरोपच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. आजवर सर्व युरोपीय देश, देशाच्या ‘जीडीपी’च्या २% ते ३% खर्च संरक्षण क्षेत्रावर करत होते, तो वाढून ५% ते ७% होण्याची शक्यता आणि संभाव्यता दोन्हीही आहेत. म्हणजे इथल्या समाजव्यवस्थेत ज्या फुकट शिक्षण, स्वास्थ्य सेवा उपलब्ध होत्या, त्यात आता काटछाट करावी लागेल. आज होर्मुझ खाडी बंद आहे. उद्या हूती व हिजबुल्लाह यांनी या युद्धात आक्रमक पवित्रा घेतला, तर ‘बाब अल मंदेब’ खाडीही बंद होऊ शकते.
मग भारतासारख्या कच्चे तेल आयात करणाऱ्या देशांवर आर्थिक संकट ओढवणार हे निश्चित. भारतात चार महिन्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे कित्येक लाख कोटी रुपये बुडाले. भारताने जूनच्या सुरवातीच्या पंधरा दिवसांत बारा अणुबॉम्ब ‘रेडी टू फ्रायर’ मोडमध्ये ठेवले. पण या सर्व वैश्विक घडामोडीत भारताने घेतलेली ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ ही भूमिका खूपच खटकत होती, कारण योग्यवेळी, योग्यकाळी जो घणाघात करतो तोच यशस्वी ठरतो. तो मग व्यक्ती असो वा देश.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.