

Israel Air Strikes on Lebanon: अमेरिका आणि इराण यांच्यात ऐतिहासिक दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीची घोषणा होऊन 24 तास उलटत नाहीत तोच, पश्चिम आशियातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला. इस्रायलने लेबनॉनमध्ये केलेल्या भीषण हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'होर्मुझ सामुद्रधुनी' पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेतला. 'असोसिएटेड प्रेस'ने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने हे वृत्त दिले असून यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली.
बुधवारी पहाटे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीची घोषणा केली. या कराराचा मुख्य भाग म्हणून इराणने होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याचे आणि अमेरिकेसह या प्रदेशातील देशांवरील हल्ले थांबवण्याचे मान्य केले. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. इस्रायलने लेबनॉनमध्ये अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरात 100 हून अधिक हवाई हल्ले केले. या भीषण हल्ल्यांमध्ये सुमारे 250 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात असून हिजबुल्लाच्या विरोधातील या मोहिमेत मोठी जीवितहानी झाली.
इस्रायलचे (Israel) पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्या इराणसोबतच्या शस्त्रसंधीच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला असला, तरी त्यांनी एक महत्त्वाची अट घातली. "इस्रायल ट्रम्प यांच्या निर्णयाचे समर्थन करतो, मात्र या दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीत लेबनॉनचा समावेश नाही," असे नेतन्याहू यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्ट केले. त्यांच्या मते, इराणने अटींचे पालन करणे अनिवार्य आहे, पण इस्रायल लेबनॉनमधील हिजबुल्ला विरुद्धची आपली मोहीम सुरुच ठेवणार आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही या भूमिकेचे समर्थन करताना म्हटले की, "हिजबुल्ला या कराराचा भाग नव्हता आणि ही एक वेगळी चकमक आहे."
इराणने (Iran) याला तीव्र विरोध दर्शवत शस्त्रसंधीच्या अंमलबजावणीला केराची टोपली दाखवली. लेबनॉनमधील रक्तपातामुळे इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जागतिक तेल बाजारपेठेवर पुन्हा एकदा संकटाचे ढग जमा झाले आहेत. यावर व्हाईट हाऊसने आक्रमक पवित्रा घेत इराणने ही सामुद्रधुनी "त्वरीत आणि सुरक्षितपणे" खुली करावी, अशी मागणी केली. "होर्मुझ सामुद्रधुनी बंद करणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही," असा इशारा प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी दिला. शांतता प्रक्रियेचा हा प्रयत्न इस्रायल आणि इराणमधील थेट संघर्षाच्या नव्या वळणावर येऊन थांबला असून आगामी काही तास संपूर्ण जगासाठी निर्णायक ठरणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.