Goa Congress : फोंडा नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून तीन दिवस उलटले असले तरी अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत. नूतन नगराध्यक्ष कोण, यापेक्षा हे अनुत्तरी प्रश्नच राजकीय जाणकारांना आव्हान देत आहेत. यातील महत्वाचा प्रश्न आहे तो काँग्रेसचा.
साखळी पालिका निवडणुकीत सर्व जागा लढविणारा काँग्रेस पक्ष फोड्यात काही जागांपुरताच मर्यादित का राहिला? हा त्यापैकी महत्त्वाचा प्रश्न होय. फोड्यात यावेळी काँग्रेसने ‘नक्की’ किती जागा लढविल्या हे कळायला मार्ग नाही. याचे कारण म्हणजे या पक्षाने यावेळी आपले पॅनलच जाहीर केले नव्हते.
तरीसुद्धा प्रभाग 6, 11 व 12 मध्ये काँग्रेस पुरस्कृत उमेदवार होते. इतर प्रभागांत काँग्रेसचे उमेदवार होते की नाहीत, हे सांगणे कठीण आहे. यातील प्रभाग 11 व 12 मध्ये काँग्रेसने जास्त लक्ष केंद्रित केले होते. मात्र अनेक प्रभागांत काँग्रेसचे उमेदवार नव्हते ही वस्तुस्थिती नाकरता येणार नाही.
फोंडा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून गणला जात असे. गेल्या विधानसभा निवडणुकीतही या पक्षाचे उमेदवार राजेश वेरेकर यांना 6860 मते प्राप्त झाली होती. अजूनही फोंड्यात काँग्रेसचे अनेक मतदार आहेत. विधानसभा निवडणुकीत अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विजयासाठी घाम गाळला होता.
पण पालिका निवडणुकीत वेगळेच चित्र दिसले. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला फोंड्यासारख्या शहरात पालिका निवडणुकीसाठी 15 उमेदवार मिळू नयेत याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काँग्रेसची मते कोणाला मिळाली, हा प्रश्नही सध्या चर्चेत आहे.
पालिका निवडणूक रिंगणात उतरू शकतील असे उमेदवार काँग्रेस पक्षाकडे नसावेत याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रभाग 11 व12 मधील उमेदवार तर आयात केलेले होते. अनपेक्षित आरक्षणामुळे आमचे नियोजन हलले असे एका काँग्रेस पदाधिकाऱ्याने सांगितले. पण हे विधान न पटण्यासारखे आहे. ‘
तू नही तो और सही’ असे काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाचे धोरण असायला हवे. अनेक पर्याय उपलब्ध ठेवायला हवेत. पण तसे झालेले दिसले नाही. त्यामुळे सध्या फोंड्यातील काँग्रेसची स्थिती ‘ना घरका ना घाटका’ अशी झालेली आहे.
ज्या दोन प्रभागांवर काँग्रेसने लक्ष केंद्रित केले होते, तिथेही अपयश आल. फोडा गटाध्यक्ष विलियम्स आगियार यांच्या पत्नी लिविया यांना प्रभाग सहामध्ये दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भविष्याचा विचार करून फोंडा काँग्रेसने रणनीती बदलायला हवी, अन्यथा या मतदारसंघात पक्षाचे भविष्य धूसर होऊ शकते.
‘त्या’ रहस्याबाबत नेते अजूनही गप्पच
फोंड्यात काँग्रेस पक्षाची स्वत:ची शेकडो मते आहेत. ती मते कोणाला मिळाली, याचा शोध हा पक्ष घेत आहे. पण ज्या प्रभागात काँग्रेसला चांगली मते मिळाली, त्या अकरा व बारामध्ये भाजपला तिसरा क्रमांक मिळाला आहे. अकरा हा प्रभाग तर नगराध्यक्षांचा होता. तरीसुद्धा भाजपच्या प्रियांका पारकर या तिसऱ्या क्रमांकवर फेकल्या गेल्या आणि ज्या प्रभागांत काँग्रेसचे उमेदवार नव्हते तिथे भाजपची ‘चांदी’ झालेली दिसली.
या ‘रहस्याचा’ उलगडा होत नसून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर वा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही याबाबत अजून ‘ब्र’ काढलेला नाही. पण मतदानाचे आकडे वेगळेच चित्र दर्शवत असल्यामुळे काँग्रेस हितचिंतकांची ‘गोंधळात गोंधळ’ अशी स्थिती झालेली दिसते आहे, हेच खरे.
पहिल्यांदाच दिसले नाही पूर्ण पॅनल
फोंडा पालिका निवडणुकीत काँग्रेसचे पूर्ण पॅनल नसणे हे प्रथमच घडले. 2013 साली विधानसभा निवडणुकीत रवी नाईक यांचा पराभव होऊनही काँग्रेसच्या फोंडा विकास समितीने चौदाही जागा लढविल्या होत्या. 2018 साली रवी नाईक सत्तेवर नसतानासुद्धा काँग्रेसने पंधराच्या पंधरा जागा लढविल्या होत्या. विपरित परिस्थिती असूनही त्यावेळी काँग्रेसने ‘फायटिंग स्पिरिट’ दाखविले होते. पण यावेळी हे ‘स्पिरिट’ लोप पावलेले दिसतेय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.