खरी कुजबुज: ‘जेन-झी’ची कमाल

Khari Kujbuj Political Satire: ‘जेन-झी’ची सध्या कमाल आहे. आदिवासी समाजाच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त फर्मागुढीत या समाजातर्फे युवा कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

सरकार जबाबदारी घेणार?

राज्यात अपघात किती होतात, कितीजणांचा जीव जातो आणि कितीजण जखमी होऊन इस्पितळात उपचारासाठी दाखल होतात, याची आकडेवारी सरकारकडे नक्कीच असेल; पण प्रत्येक अपघातासाठी चालकाच्या चुकीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून सरकारची जबाबदारी संपते का? असा प्रश्‍न आता नागरिक करत आहेत; कारण रस्त्यावरील खड्डेही अपघाताला निमंत्रण देत असतील, तर त्याची जबाबदारी कोणाची? सरकारने कधी एखाद्या खड्ड्यासाठी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे का? की खड्डा पडला की तो जनतेच्या नशिबाचा भाग आणि अपघात झाला की चालकाचा दोष, एवढेच सरकारी गणित? त्यामुळे सरकारने एकदा तरी स्वतःची जबाबदारी स्वीकारून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून दाखवावी. मगच ‘सरकार जबाबदार आहे’ यावर जनतेचा विश्वास बसेल, असेही लोक म्हणू लागले आहेत. ∙∙∙

एकदा रस्त्यांचा दौरा करा!

राज्यात सध्या सरकार लोकांना शिस्त लावायला निघाले आहे. गाडी कशी चालवायची, नियम कसे पाळायचे, यासाठी कॅमेरे लावले व आणखी लावण्याची तयारी सुरू आहे; पण हेच कॅमेरे जर रस्त्यांवरील खड्डे शोधण्यासाठी लावले, तर सरकारचीच मोठी पंचाईत होईल की काय, अशी चर्चा रंगली आहे! कारण दुसऱ्यांच्या चुका कॅमेऱ्यात टिपताना स्वतःच्या विभागातील खड्डे दिसू नयेत, यासाठी कॅमेऱ्याला डोळेच बंद करावे लागतील, अशी मिश्कील चर्चा होत आहे. त्यामुळे मंत्री माविन गुदिन्हो यांनी एकदा आपल्या विभागातील रस्त्यांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करावी. निदान खड्डे तरी सरकारच्या नजरेत येतील आणि लोकांनाही वाटेल, ‘सरकार आमच्यासाठी काहीतरी करतेय!’ ∙∙∙खरी कुजबुज

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: प्रश्नांपुढे आमदारांची माघार!

विजय सरदेसाईंना ‘ते’ दोष का देतात?

विजय सरदेसाई हे फातोर्ड्याचे आमदार असून दवंडे हा भाग फातोर्डा मतदारसंघातच मोडतो. तिथे एक मोठा गृह प्रकल्प प्रस्तावित आहे व त्याला स्थानिकांचा विरोध आहे. जेव्हापासून या प्रकल्पाचा प्रश्न उपस्थित झाला, तेव्हापासून विजयबाब आपला या प्रकल्पाकडे कसलाही संबंध नाही, असे सांगतात. मागे ते ती जमीनही पाहून आले. दवंडेतील मोकळी जागा ‘एनडीझेड’खाली आणावी, अशी मागणीही विजयनी सरकारकडे केली आहे. मग हे आंदोलक विजयनाच दोष का देतात? हा प्रश्न कोणालाही पडणे स्वाभाविक आहे. मध्यंतरी हा प्रश्न थंडावला होता; पण एका महिला वकिलाने हा प्रश्न परत एकदा उपस्थित केला आहे. स्थानिकांना हाताशी धरून ती महिला वकील नगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर व स्थानिक आमदारावर अप्रत्यक्षपणे दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे बोलले जाते. ही महिला वकील मागे विधानसभा निवडणुकीत उमेदवार होती. आता परत एकदा ती एकतर विधानसभा निवडणूक लढण्याची स्वप्ने पाहात असावी किंवा नगरपालिका निवडणूक तरी लढण्याची तिची इच्छा असावी. विजय सांगतात त्याप्रमाणे, ती वकील महिला मंत्री कामत किंवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यावर का दबाव आणत नाही? याबद्दल मात्र लोक आता शंका व्यक्त करू लागले आहेत. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

डेंग्यू आला अंगणी

पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना डासांना दोष देण्यापेक्षा त्यांची पैदास होण्यासाठी आपणच केलेली ‘व्यवस्था’ आधी बंद करण्याची वेळ आली आहे. स्वच्छ साचलेल्या पाण्यातही डेंग्यूचे डास वाढतात. कुंड्या, बाटल्या, टायर किंवा घराभोवती साचलेले थोडेसे पाणीही त्यांच्यासाठी पुरेसे आहे. डेंग्यूवर विशिष्ट उपचार नसल्याने प्रतिबंध आणि वेळीच निदान हाच प्रभावी उपाय आहे. मात्र, आपण निष्काळजीपणा करायचा आणि नंतर रुग्णालये भरली की प्रशासनाला दोष द्यायचा, हा नेहमीचा खेळ कधी थांबणार? ∙∙∙

‘जेन-झी’ची कमाल

‘जेन-झी’ची सध्या कमाल आहे. आदिवासी समाजाच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त फर्मागुढीत या समाजातर्फे युवा कार्यकर्त्यांकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात युवकांनी सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली. विशेष म्हणजे या युवांच्या मेळ्यात माजी मंत्री तथा विद्यमान आमदार गोविंद गावडे यांची कन्याही होती. तिने भाषण खूप चांगले केले. पोटतिडकीने मुद्दा मांडला. त्यात आपले वडील जरी सरकारात असले तरी सरकार आपला बाप नाही, असे सांगत आदिवासींच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, असा आग्रह धरला. इतर युवकांचाही तोच सूर होता. जेन-झी आक्रमक झाल्यानंतर नेमका काय फरक पडतो, त्याचा अनुभव हल्लीच भाजप सरकारने दिल्लीत घेतला आहे, त्यामुळे ‘जरा सबुरीने’ असे म्हणण्याची वेळ सरकारवर तर आली नाही ना? ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: आमदारकीची स्वप्ने!

धनगर समाजाची ‘दिल्लीवारी’ची तयारी!

धनगर समाजाने अनुसूचित जमातीचा दर्जा लवकर मिळावा यासाठी आता थेट केंद्राची दारे ठोठावण्याची तयारी केली असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनीच केंद्राकडे शिष्टमंडळाचे नेतृत्व करावे, अशी मागणी केली आहे. म्हणजे प्रश्न समाजाचा असला तरी दिल्लीची वाट दाखवण्याची जबाबदारी मात्र पक्षाध्यक्षांच्या खांद्यावर! आता नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ दिल्लीला गेले, तर केंद्र सरकारकडून ‘लवकरच विचार करू’ एवढेच उत्तर मिळते की खरोखरच धनगर समाजाच्या मागणीला हिरवा कंदील मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिल्लीवारीची तयारी झाली आहे. आता फक्त निमंत्रणाची आणि निर्णयाची प्रतीक्षा! ∙∙∙

इंदोर दौरा फायद्याचा ठरेल का?

उत्तर गोवा जिल्हा पंचायत सदस्यांनी नुकताच इंदोरचा दौरा केला. तेथील जिल्हा पंचायतीला भेट देऊन अध्यक्षा रिना मालवीय यांच्याशी स्थानिक विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली. स्थानिक स्वराज्य संस्था, प्रभावी प्रशासन आणि विकासाच्या विविध पैलूंवर विचारांची देवाणघेवाण झाली. या अभ्यासभेटीमुळे विविध विकासात्मक उपक्रमांची माहिती घेण्याबरोबरच स्थानिक पातळीवर प्रभावी प्रशासनासाठी अवलंबिल्या जाणाऱ्या विविध पद्धती समजून घेण्याची आणि परस्पर अनुभवांची देवाणघेवाण करण्याची महत्त्वपूर्ण संधी उत्तर गोवा जिल्हा पंचायत सदस्यांना मिळाली. जिल्हा पंचायतीचे मुख्याधिकारी दामोदर मोरजकर, उपाध्यक्ष- नामदेव चारी, सदस्या- गौरी कामत व इतर सदस्यांचा या दौऱ्यात समावेश होता. या अभ्यास दौऱ्याचा उत्तर गोवा जिल्हा पंचायत कारभारात किती उपयोग होणार आहे, ते पुढे कळेलच.∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांची खिलाडू वृत्ती

पाहूया काय होते ते!

येणारे दिवस हे निवडणुकीचे आहेत, त्यामुळे राज्यात आंदोलने सभा आणि इतर बरेच काही होणार आहे. सत्ताधाऱ्यांना येन-केन-प्रकारेन जेरीस आणायचे आणि मागण्या मान्य करून घ्यायच्या, हा प्रकार निवडणुकीच्या दिवसांत होतोच. त्यात नवीन असे काहीच नाही. मात्र, अशा आंदोलनांना कसा आणि किती प्रतिसाद द्यायचा, हे सर्वस्वी सरकारच्या हाती असते. सध्या तरी मराठी राजभाषा, आदिवासी राजकीय आरक्षण, कारापूर प्रकल्प प्रश्‍न अशा अनेक प्रश्‍नांच्या तलवारी सरकारच्या डोक्यावर टांगल्या गेल्या आहेत. आदिवासी समाजाने यावेळेला राजकीय आरक्षण मिळायलाच हवे, मराठीला राजभाषेचा दर्जा मिळायलाच हवा आणि कारापुरातील प्रकल्प रद्द व्हावा, असा हट्ट आंदोलकांनी धरला असून कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेवली आहे. त्यामुळेच तर बंडाची ठिणगी पडू नये यासाठी सरकारची धडपड सुरू आहे. पाहूया काय होते ते..! ∙∙∙

कराओके गायक व लेखक

साठीकडे पोहोचलेले, एक ग्रुप करून कराओके सादर करतात. संगीताचे इंटरल्यूड सुंदर गोड वाटतात. मधूनच गायिका किंकाळी फोडल्यासारखी अशी तान(?) घेते की, स्वरांच्या उंच झोपाळ्यावरून खाली पडून जखमी व्हावे तशी स्वरांना घायाळ करते. बेसूरपणाला हद्द असावी. स्वर कुसकरू नयेत. सुरेल गायन व रसमय साहित्य म्हणजे पोरांचा खेळ नव्हे, अशी ही अकादमी. आत फक्त मी मी... असे यमक जुळवले म्हणून कविता होत नाही. अशा सुमार कवितांना अकादम्यांनी पुरस्कार दिले. कराओके गायकांच्या स्पर्धा होतात. बेसूरबाब, बेसूरबाय असे पुरस्कार द्यावे. एकताल किती मात्रांचा, केदार, भूप हे काय याची जाण नको का? बेबी गाते, लोलो लिहितो, अप्रतिष्ठा झाल्याने कला विव्हळून रडतात. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांची खिलाडू वृत्ती

‘पुष्पाचे प्राक्तन’

या नावाचा दीर्घांक पुण्यात सुरू आहे. नाटक की अभिवाचन की वाद्यांविना संगीत हे कळत नाही. पार्श्वसंगीत मानवी कंठातून. अभिनय विलक्षण. हे सादरीकरण १२ कलाकार अतिसुंदर पद्धतीने करतात. १२ कलाकारांनी एका सुरात दीड तास स्टेजवर राहून सादर करणे कठीण. १०० दिवस तालीम केली होती त्यांनी. लेखक मिलिंद शिंत्रे यांचे कौतुक होत आहे. गोमंतकीय शिक्षकांनी, कलाकारांनी हे नवप्रयोग पाहावे. कॉपी न मारता मातीतील नवकल्पनांची, नवसंहितेची बांधणी, सादरीकरणाचे नवे कंगोरे समजून घेण्यासाठी. साधू चोराला सुधारायला घेऊन गेला. झोपले तेव्हा चोराला नेहमीचा धंदा आठवला. फायदा नसलेले कमंडलू चोरून पळाला. काहींचे प्राक्तन असे. कितीही चांगले द्या, त्यांना नाट्यलेखनात उष्टे, खरकटे चोरून खायलाच आवडते. ∙∙∙

कुशावतीचे पहिले झेंडावंदन!

स्थानिक लोकवेदांत ज्या केपे नगराला ‘कुस्मण’ म्हणजे ‘कुशबन’ म्हणजे रामायणातील राम पुत्र कुशने निर्माण केलेले वन, असे म्हटले गेले आहे. त्या नगरात यंदा कुशावतीच्या तीरावर उभारलेल्या शासकीय क्रीडा संकुलात कुशावती जिल्ह्याचे पहिले झेंडावंदन भारताच्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला होणार आहे. याप्रसंगी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना कुशावती जिल्ह्याचे पहिले झेंडावंदन करण्याचा मान मिळणार आहे. कुशावती जिल्ह्याचे पहिले पूर्णवेळ जिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांनी पाहिले झेंडावंदन दर्जेदार करण्यासाठी खास टीम गठित केली आहे. जिल्ह्यातील पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदनाला काणकोण, सांगे, केपे, धाराबांदोडा या तालुक्यांतील विद्यार्थी, सरकारी अधिकारी व आम जनता निश्चित उपस्थिती लावणार, यात शंका नाही. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी?

आता ‘मीच उमेदवार’!

भाजपचे आमंत्रण येईल, या आशेने माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर अजूनही दाराकडे डोळे लावून बसले असावेत! मांद्रेतून निवडणूक लढवणार असल्याची त्यांची नवी घोषणा ऐकली की, कालपर्यंतचे राजकीय गणितही आठवते. दयानंद सोपटे किंवा पार्सेकर यापैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तरी दोघेही एकत्र राहू, असे सांगितले जात होते. आता मात्र ‘मीच लढणार’, असा सूर लागला आहे. सोपटे भाजपचे प्रदेश चिटणीस म्हणून पक्षाच्या घरातच आहेत, तर पार्सेकर बाहेर उभे राहून निमंत्रणाची वाट पाहत आहेत. तिकीट मिळाले तर एकत्र, नाही मिळाले तर ‘मीच’-राजकारणात भूमिका बदलायला वेळ किती लागतो, याचे मांद्रे पुन्हा एकदा साक्षीदार ठरणार! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबूज: काँग्रेस विचार बदलणार?

रेबेका - क्लासिक कलाकृती

‘रेबेका’ हे पेद्रूच्या पत्नीचे नाव नव्हे. जगप्रसिद्ध इंग्रजी कादंबरी ती. त्यावर चित्रपट आला. नाटक आले. गाजले. अजरामर क्लासिक कलाकृती. कोकणीवाद्यांचे लक्ष ‘रेबेका’कडे गेले नसावे. अन्यथा ढापून, रेबड करून टाकले असते. इंग्रजीवर प्रभुत्व हवे. जागतिक रंगभूमी म्हणजे ‘शिंयाचो कुडकुडो, जात्रेक गडगडो’ अशी विनोदी नाटके नव्हे. नाटक म्हणजे काय? ही समज असायला हवी. नाट्यविश्व समजायला वैश्विक नाटकाच्या अंतरिक्षात उडावे. जमत नसेल तर ‘रेबेका’सारख्या कलाकृती मुखोद्गत असलेल्या विद्वान, ज्येष्ठ, अनुभवी, बुजुर्ग नाटककारांसमोर नम्रतेने कसे वागावे हे शिकावे. ∙∙∙

प्रकाश वेळीपना उभारी

गोव्‍यात ‘एसटी’ना राजकीय आरक्षण मिळण्‍याची शक्‍यता निर्माण झाल्‍याने आणि राखीव मतदारसंघामध्‍ये केपे मतदारसंघाचाही समावेश असणार, अशी बोलणी सुरू झाल्‍याने सर्वांत उमेद आणि उभारी जर कुणाला आली असेल तर ते केपेचे माजी आमदार आणि माजी मंत्री प्रकाश वेळीप यांना. प्रकाश वेळीप हे केपे मतदारसंघाचे तीनवेळा आमदार म्‍हणून निवडून आले. मात्र, २००२ च्‍या निवडणुकीत त्‍यांना बाबू कवळेकर यांच्‍याकडून पराभव स्‍वीकारावा लागला आणि त्‍यानंतर ते कधीच निवडून येऊ शकले नाहीत. आता तब्‍बल २४ वर्षांनी आरक्षण मिळाल्‍यास त्‍यांना आमदार होण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्‍यामुळे ते आणि त्‍यांच्‍या कार्यकर्त्यांमध्‍ये उमेदीचे वातावरण असणे, हे योगाने आलेच. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबूज: गेले नगरसेवक कुणीकडे?

झाले बहु वायंगणे इतिहासकार

पोर्तुगीज काळात ‘त्रिबुनाल’ म्हणजे कोर्टांत काही निरुद्योगी लोक उगाच जाऊन बसायचे. दिवस तिकडे सारायचा. कालांतराने लोक त्यांना ‘दोतोर’ म्हणजे वकील म्हणून हाक मारू लागले. दुर्दैव! गोव्यात वार्तांकनासारखे जे लिहितात त्यांना साहित्यिक संबोधतात. हल्ली बाबी, शाबी, आदू, गोदू सगळीच मंडळी इतिहासकार बिरूद लावत आहेत. भूतकाळातील घटना डोळ्यांनी चक्क पाहिल्यासारखे हे लेखन असते. ए-आय कॅमेऱ्यापेक्षाही सरस नेत्रांनी हे टिपल्यासारखे. इतिहास लिहिण्याची एक मेथॉडॉलॉजी असते. आर.एस. शर्मा, रोमिला थापर, यदुनाथ सरकार, डी.डी. कोसंबी वगैरे विद्यावंतांना इतिहासकार गणले जाते, ते अभ्यासूनी, समजूनी घ्यावे. इतिहासातील मोठमोठे नेते, स्वातंत्र्यसैनिक, विद्वान हे संध्याकाळी चहाला यांच्याकडे गप्पा मारायला येतात की काय असे वाटते. झाले बहु हे वायंगणे. गायनॅकॉलॉजी, नेफ्रोलॉजी या विषयांवर पुस्तके लिहायचे बाकी आहेत. दुर्दैव!! ∙∙∙

दीपगृहाची महसुली वाट

आग्वादचा दीपगृह देशातील ७५ ऐतिहासिक दीपगृहांच्या पर्यटन यादीत दाखल झाले आहे. म्हणजे आतापर्यंत समुद्रात जहाजांना दिशा दाखवणारा हा दीप आता पर्यटकांनाही ‘कुठे फिरायला जायचे’ याची दिशा दाखवणार आहे! केंद्राच्या दीपगृह पर्यटन उपक्रमांतर्गत येथे उपाहारगृहे, बागा, बैठक व्यवस्था, रंगमंच, मुलांसाठी खेळण्याची जागा, स्वच्छतागृहे आणि प्रकाश-ध्वनी कार्यक्रम अशा सोयी उभारल्या जाणार आहेत. देशाचा सागरी वारसा जपण्याच्या नावाखाली जुन्या दीपगृहाला पर्यटनाचा नवा प्रकाश मिळणार असला, तरी पर्यटकांनी एवढेच लक्षात ठेवावे की समुद्राकडे वाट दाखवणाऱ्या या दीपगृहामुळे आता पर्यटन खात्याला महसुलाची वाटही सापडते का, हे पाहणे बाकी आहे!∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com