खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांची खिलाडू वृत्ती

Khari Kujbuj Political Satire: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांच्याकडे असलेली खिलाडू वृत्ती. यामुळेच ते कोणत्याही प्रसंगाला तोंड देऊ शकतात.
Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुजDainik Gomantak
Published on
Updated on

मुख्यमंत्र्यांची खिलाडू वृत्ती

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांच्याकडे असलेली खिलाडू वृत्ती. यामुळेच ते कोणत्याही प्रसंगाला तोंड देऊ शकतात. बुधवारी फोंडा येथे भरलेल्या त्यांच्या जनता दरबारात याचा प्रत्यय आला. लोकांच्या अनेक किचकट प्रश्नांना त्यांनी समाधानकारक आणि मुख्य म्हणजे हसतमुखाने उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. आता यातील किती प्रश्न सुटतील हा भाग वेगळा असला, तरी त्यांची खिलाडू वृत्ती मात्र ठायीठायी प्रत्ययाला येत होती. एकाने तर त्यांना, ‘तुम्ही आला की आम्हाला धीर येतो. यामुळे दर आठवड्याला तुम्ही फोंड्याला या,’ अशी सूचनाही केली. त्यावर त्यांनीही मी नक्की येणार असे म्हटले. सध्या फोंड्याला आमदार नसल्यामुळे त्या नागरिकाची सूचना तशी व्यवहार्यच होती म्हणा. आता बघूया, मुख्यमंत्री ही सूचना किती गांभीर्याने घेतात ते. पण काही का असेना, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे राजीव गांधी कला मंदिरातील वातावरण दोन-अडीच तासांकरिता प्रसन्न झाले होते, एवढे मात्र निश्चित. ∙∙∙

संस्थांची आणि पुरस्कारांची पत

मडगावच्या एका संस्थेने पुरस्कारांसाठी अर्ज व चार पुस्तके पाठवा, असे आवाहन केले. डिचोलीचा एक कोंकणी लेखक म्हणतो, आपल्या पुस्तकाची किंमत सातशे रुपये. चार प्रती म्हणजे दोन हजार आठशे रुपये. ते पाठवले आणि पुस्तकाला पुरस्कार मिळाला नाही, तर ते पाण्यात. पुरस्कार मिळाला, तरी हाती काहीच नाही. डिचोलीहून मडगावला पुरस्कार घेण्यासाठी येणं म्हणजे टॅक्सीचा भुर्दंड. बार्रेटो, फुर्तादो यांच्या नावे पुरस्कार. याचाच अर्थ बार्रेटोंनी काही निधी संस्थेला दिला असेल. त्याचं व्याज म्हणून तरी चिमूटभर रोख रक्कम पुरस्कारार्थींना द्यायला नको का? हा खेळ मांडण्याचं प्रयोजन कळत नाही. मडगाव, मडगावकार हा विषय अनुकरणीय मानला जातो. कला अकादमीसारख्या सरकारी संस्थेनेसुद्धा मडगावच्याच संस्थेचा आदर्श गिरवून शाल, मानचिन्ह इतक्याच स्वरूपात सत्कार नावाचे सोपस्कार सुरू केले आहेत. नीरक्षीर वृत्तीने चांगले ते घ्यावे, काणकोणकारांचे असो की बार्देशकरांचे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: "सासष्टीत कोणालाही गृहीत धरु नका!" भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसचा 'मास्टर प्लॅन' तयार; नवनियुक्त कार्याध्यक्षांनी दिले मोठे संकेत

मडगावचे वादी, प्रतिवादी

अना म्हांबरो या विनोदी कोंकणी लेखकाने ‘एका लेखकाचा अस्त’ असा उपहासात्मक निबंध लिहिला. पणजीतील लेखक अखेरचा श्वास घेतो. मित्र, मैत्रिणी, हितचिंतक, नातेवाईक येऊन ‘मेलेल्या म्हशीला बारा शेर दूध, या न्यायाने रडत गुणगायन सुरू करतात. मडगावचे दुकानदार लेखक फोंड्याहून पणजीचा मार्ग पसंत करतात. वाटेत फोंड्याला आयशा थिएटरांत एक पिक्चर पाहतात. पणजीत पोचेपर्यंत सगळं झालेलं असतं. त्याची पर्वा कशाला? घरच्यांना पाचारण करतात आणि परत झुवारी मार्गे घरी. वरवरची कहाणी नव्हे ही. मनोरंजनाचा भागही उरकून काढू. अंत्ययात्रेच्या प्रवासातही ही पसरकारी वृत्ती. सध्या मडगावला जो कोंकणीवाद्यांचा वाद निर्माण झालाय, त्यात वादी, प्रतिवादी त्याच गावातले. शहाण्या मनुष्याने या भानगडीत पडू नये, कारण तीन महिन्यांत ‘शीत आनी रोस एक जालो, दोणो वाऱ्यार’ या न्यायाने मध्यस्थाला कडिपत्त्यासारखे फेकून देतील, असे पणजीकर सुरस वादाचा आनंद घेत बोलत होते. ∙∙∙

कुंकळ्ळी येथील ‘फ्री स्टाईल’

कुंकळ्ळी मतदारसंघात काँग्रेसचा आमदार असतानाही काँग्रेस पक्षातील अन्य एक नेते एल्विस गोम्स यांनी कुंकळकरांचा स्वाभिमान जागवत या उमेदवारीवर दावा केला. युरी आलेमाव हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असताना तुम्हाला काँग्रेसची उमेदवारी कशी मिळेल, असा प्रश्न एल्विस यांना केल्यास ते म्हणतात, ‘जर काँग्रेस आपला प्रदेशाध्यक्ष बदलू शकते, मग उमेदवार का नाही?’ दुसऱ्या बाजूने ज्यांचा बाहेरचा म्हणून उल्लेख केला जातो, ते युरी आलेमाव म्हणतात, "मी कुंकळीतून निवडणूक लढवली तर मी बाहेरचा आणि एल्विसने पणजीतून निवडणूक लढवली, तर तो त्यावेळी आतला होता का?" ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: शिंदेसेना गोव्यात तग धरू शकेल?

‘दारू दुकानात दरोडा की व्यवस्थेचाच घोटाळा?’

कळंगुटमधील गुड्डू वाईनवरील हल्ल्यानंतर आता केवळ गुन्हेगारांवरच नव्हे, तर अबकारी खात्याच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गोवा लिकर ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी थेट सवाल उपस्थित करत पंजाबच्या गुरदासपूरचा रहिवासी असलेला व्यक्ती गोव्यात वाईन शॉप कोणत्या परवान्यावर चालवत होता, असा मुद्दा उपस्थित केला. परवाना त्याच्या नावावर असेल, तर नियम काय म्हणतात? आणि नसेल, तर दुकान चालवण्यास मुभा कोणी दिली? असा खोचक सवाल त्यांनी केला. एकीकडे भरदिवसा दुकानात घुसून तोडफोड व लाखोंच्या दारूची लूट होते, तर दुसरीकडे परवान्यांबाबतच संशय निर्माण होतो. त्यामुळे हा प्रकार केवळ कायदा-सुव्यवस्थेच्या अपयशापुरता मर्यादित नसून, अबकारी खात्याच्या देखरेखीवरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे, असा बोचरा टोला नाईक यांनी लगावला. ∙∙∙

अन् कोलवा पोलिस पडले तोंडघशी...

कोलवा पोलिस ठाण्यात धीरयोबाबत ‘सेटिंग’ होत असल्याचे याच स्तंभातून सोमवारी प्रसिद्ध झाले होते. अन् दुसऱ्याच दिवशी बाणावली येथे धीरयोत एक बैल उधळून जीवाच्या आकांताने समुद्रात पळाला व त्याचा बुडून मृत्यू झाला. आमच्या ठाण्यात धीरयो होत नसल्याचा आव येथील साहेबलोक करीत होते. मात्र, मंगळवारच्या घटनेमुळे ते तोंडघशी पडले. या ठाण्यातील एक पोलिस धीरयोंचे ‘सेटिंग’ बघतो. ‘कामावर कमी व कलेक्शनचे काम जास्त’ अशी त्याची पद्धत... मंगळवारी आयोजित धीरयोचे सर्व सेटिंग त्यानेच केले होते, अशी आतील खबर. बैल बुडून मृत पावल्याची घटना घडल्यानंतर कोलवा पोलिसांनी धीरयोचे आयोजन केलेल्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे पोलिस रुटीनवर्क पार पाडलेही व नंतर ते नामनिराळेही झाले. यापूर्वीही याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत धीरयोच्या वेळी बैलाने शिंग भोसकल्याने युवकाचा मृत्यू झाला होता. हफ्ता मिळाला की झाले. तुमच्यासाठी रान मोकळे, अशी या पोलिसांची एकूण कार्यपद्धती होऊन गेली आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: खरी कुजबुज; अमित पालेकर कोणता झेंडा घेणार?

प्रवेश परीक्षेच्या अटीमुळे भावी शिक्षक मुकले बीएडला!

‘अज्ञान हे अपयशाचे सबब ठरू शकत नाही,’ असे म्हणतात. आपल्या राज्यात नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या इंटिग्रेटेड बीएड अभ्यासक्रमात (एकात्मिक अभ्यासक्रम) प्रवेश घेण्यासाठी आता राष्ट्रीय समान प्रवेश परीक्षा (एनसीएटी) ही प्रवेश चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. मात्र, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षेची माहिती नसल्यामुळे सुमारे दीडशे विद्यार्थी इंटिग्रेटेड बीएड अभ्यासक्रमाला मुकले. राज्यातील केवळ पन्नास विद्यार्थ्यांनीच ही परीक्षा दिल्यामुळे गोव्यात स्थापन झालेल्या दोन महाविद्यालयांतील दीडशे जागा खाली राहिल्या आहेत. आता याला जबाबदार कोण? विद्यार्थी, बीएड महाविद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालये की आपले उच्च शिक्षण खात्याचे अधिकारी? जर एनसीएटी प्रवेश परीक्षा सक्तीची केली होती, तर त्या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागृती घडवून आणणे गरजेचे होते. याचा दोष आम्ही विद्यार्थ्यांना देणे योग्य नाही. आपल्या शिक्षण व्यवस्थेचे व उच्च शिक्षण खात्याचे हे अपयश, असेच म्हणावे लागेल.

अभाविपला टाकले मागे

राज्यात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी संघटनांपैकी ‘एनएसयूआय’ आणि ‘गोवा फॉरवर्ड’ची विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन प्रशासनाला जाब विचारताना दिसत आहे. ‘एनएसयूआय’च्या अध्यक्षाचे पद रिक्त असतानादेखील कायदा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्यात एनएसयूआयला यश आले आहे, तर विद्यार्थ्यांना भेडसावणारा वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी युवा फॉरवर्डने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नांना देखील सकारात्मक यश मिळत आहे. एरव्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन सदोदित अभाविप आक्रमक होत असे. विरोधकांची जागाही स्वतःच्या ताब्यात ठेवली होती. परंतु, आता अभाविप कार्यकर्त्यांना मागे टाकत एनएसयूआय आणि युवा फॉरवर्ड पुढे सरकत आहेत. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: 'गोव्यातील जनतेच्या हितासाठी ठोस भूमिका घ्या'! LOP युरींचे प्रतिपादन; काँग्रेस आमदारांतर्फे राज्यपालांना निवेदन

कारापूरवासीयांची दिल्लीकडे कूच

मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाविरोधात दीर्घकाळ आंदोलन करूनही सरकारकडून म्हणावी तशी दखल घेतली गेली नसल्याने आता कारापूरवासीय दिल्लीकडे कूच करणार आहेत. दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन केले, तर राष्ट्रीय पातळीवर हा प्रश्न पोहोचेल, असे त्यांना वाटते. ग्रामस्थ त्यासाठी आज-उद्या रेल्वेने दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यांचे समर्थन करणारे बिगर सरकारी संस्थांचे प्रतिनिधी व राजकीय नेते नंतर हवाईमार्गे दिल्लीत दाखल होणार आहेत. १३ जुलै रोजी दिल्लीत आंदोलन करण्याचे नियोजन सध्या आहे. ∙∙∙

स्मार्ट मीटर की बिले?

गोव्यातील स्मार्ट मीटर आता नेमके वीज वापर मोजत आहेत की ग्राहकांच्या संयमाची परीक्षा घेत आहेत, असा सवाल एक ग्राहक प्रसाद पवार यांनी फेसबुक पोस्टमधून उपस्थित केला. ‘युनिट्स जवळपास तेवढेच, पण बिल मात्र गणितातील पदव्युत्तर प्रबंधासारखे गुंतागुंतीचे!’ असा बोचरा टोला लगावत त्यांनी वीज खात्याकडे पारदर्शकतेची मागणी केली. स्मार्ट मीटरमुळे सेवा अधिक स्मार्ट होईल, अशी अपेक्षा असताना अनेक ग्राहकांच्या मते मात्र बिलांनीच ‘स्मार्टनेस’ची नवी उंची गाठली आहे. तंत्रज्ञानाचे स्वागतच आहे; पण ते ग्राहकांचे खिसे अधिक वेगाने रिकामे करण्यासाठी नव्हे, तर अचूक आणि समजण्यास सोपे बिल देण्यासाठी असावे, अशी भावना या पोस्टमधून व्यक्त होत असून, हा प्रश्न आता एका ग्राहकापुरता मर्यादित राहिलेला नाही. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa politics: काँग्रेसचा 'पिग्मॅलिअन' कोण?

कारस्‍थान वीरेशचे!

रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स पक्षातील (आरजी) वाद शिगेला पोहोचलेला असतानाच आता काहीच दिवसांपूर्वी निलंबित केलेल्‍या दहापैकी काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे सरचिटणीस विश्‍‍वेश नाईक आणि खजिनदार अजय खोलकर यांच्‍याविरोधात बुधवारी पणजी पोलिस स्‍थानकात अब्रुनुकसानी आणि पक्षाच्‍या निधीत गैरव्‍यवहार झाल्‍याची तक्रार दाखल केली. खजिनदार अजय खोलकर यांनी मंगळवारी घेतलेली माजी अध्‍यक्ष मनोज परब यांची भेट आणि सोशल मीडियावर झळकलेले खोलकर–नाईक यांच्‍यातील व्‍हॉट्सॲप चॅट बघूनच निलंबितांनी थेट पोलिस स्‍थानकात धाव घेतली. परंतु, त्‍यांना पोलिस स्‍थानकापर्यंत पोहोचवण्‍याचे कारस्‍थान आमदार वीरेश बोरकर यांचेच असल्‍याचे बोलले जात आहे. ∙∙∙

आणि त्याचे दुकान आता फुलणार!

राजकारणात जो स्वहित साधतो तोच खरा राजकारणी. स्वहित साधण्यासाठी केवळ नेतेच पुढे असतात, असे नव्हे; काही कार्यकर्तेही यात माहिर असतात. मसूर व तूर डाळीत फरक न समजणारे हे कार्यकर्ते आपला स्वार्थ साधण्यात मात्र अग्रेसर असतात. साष्टीतील काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात असाच एक कार्यकर्ता सध्या चर्चेत आहे. दुकानदार असलेला हा सर्वपक्षीय कार्यकर्ता निवडणूक येताच सक्रिय होतो. अल्पसंख्याक कार्डचा वापर करून नेत्याकडून आपले दुकान भरून घेतो. जो उमेदवार त्याचे दुकान सामानाने भरतो, त्याचे ते गुणगान गातो. स्वतः टोपी घालणारा हा राजकीय कार्यकर्ता राजकीय नेत्यांना टोपी घालण्यात माहीर आहे. प्रत्येक निवडणुकीत तो नवा पक्ष निवडतो. आता त्या कार्यकर्त्याने भाजप सोडून काँग्रेसची वाट धरली आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: निवडणुकीपूर्वीच प्रतिमा विरुद्ध वालंका सामना? नावेलीत उमेदवारीवरून चुरस; सिप्रू कार्दोझ यांच्या नावाचीही चर्चा

मान्सूनपूर्व कामे झाली कुठे?

जूनमध्ये पावसाने दडी मारल्याने पंचायती अन् पालिकांचे प्रशासनही अगदी सुशेगाद होते. एरवी मे महिन्यामध्ये मॉन्सूनपूर्व कामे सुरू केल्याचा डांगोरा पिटला जायचा. ठिकठिकाणची धोकादायक झाडे हटवली जायची. धोकादायक फांद्या छाटल्या जायच्या. पण प्रत्यक्ष पावसाला सुरुवात झाल्यावरच मॉन्सूनपूर्व कामांची परीक्षा होत असते. अन् बऱ्याच ठिकाणी झालेल्या पडझडीतून मॉन्सूनपूर्व कामे झाली कुठे? असा प्रश्न विचारला जात आहे. ∙∙∙

चर्चिलचे कन्याप्रेम

राजकारणी म्हणे मरेपर्यंत निवृत्त होत नाहीत. अर्धी हाडे मसणात गेली तरी अशा राजकारण्याची निवडणूक लढवण्याची खुमखुमी काही केल्या कमी होत नाही. चर्चिल आलेमाव हेही त्यातलेच. कालपर्यंत ते आपण बाणावलीतून निवडणूक लढवणारच, असा हट्ट धरून बसले होते. मात्र, आता त्यांनी आपली लाडकी लक्ष्मी वालांका आलेमाव हिच्यासाठी त्याग करायचे ठरवले आहे. जर वालांका हिला काँग्रेसने नावेलीची उमेदवारी दिली, तर आपण बाणावलीवरील दावा मागे घेऊ, असे काल चर्चिल यांनी सांगितले आहे. आपल्या कन्येच्या प्रेमापोटी चर्चिल केवढा मोठा त्याग करण्यासाठी तयार झाले आहेत, ते पहा! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: राजकारणात खळबळ! सासष्टीतील मतं फोडण्यासाठी भाजपकडून 100 कोटींची तरतूद; गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप

‘एसटी’ समाजबांधवांना आश्वासनाचे गाजर

‘एसटी’ समाजबांधवांना सध्या भाजपने येत्या निवडणुकीपूर्वी राजकीय आरक्षण मिळेल, अशी आशा दाखवली आहे. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना हे भाजप सरकारचे वेळकाढू धोरण वाटते आहे. त्यांनी, "आपण या निवडणुकीपूर्वी आरक्षण मिळवून देऊ," असे न सांगता, "आपले सरकार आले, तर एसटी समाजाला राजकीय आरक्षण लगेच देऊ," असे आश्वासन देऊन टाकले. याचाच अर्थ भाजप टोलवत आहे, अन् काँग्रेसही निवडणुकीनंतरच आरक्षण देणार. म्हणजे, एसटी समाजबांधवांच्या नशिबी केवळ आश्वासनांचे गाजरच नाही का? तुम्हीच सांगा... ∙∙∙

भाटीकरांची आठवण झालीच...

मुख्यमंत्र्यांनी फोंड्यात जनता दरबार भरवला खरा, पण या दरबारात एका व्यक्तीची प्रकर्षाने आठवण उपस्थितांना झाली, ती म्हणजे केतन भाटीकर यांची. गेल्या जनता दरबारमध्ये केतन भाटीकर यांनी फोंड्यातील विविध समस्यांबरोबरच रेती माफियांचा प्रश्नही उपस्थित करून मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी उत्तर द्यावे, असा आग्रह धरला होता. यावेळच्या दरबारात तसा आक्रमकपणा दिसला नाही. मुख्यमंत्र्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात नागरिकांच्या समस्यांना हात घातला. पण, केतन भाटीकर हे एखाद्या समस्येच्या मूळापर्यंत जायचे आणि उत्तर शोधून काढायचे. कुणीही कितीही रात्री-अपरात्री फोन केला, तर तो लगेच उचलायचे, ही भाटीकर यांची खासियत होती. त्यामुळेच ते आजही फोंडावासीयांच्या आठवणीत आहेत. दरबारातही त्यांची आठवण अनेकांनी काढली. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com