खरी कुजबुज: प्रश्नांपुढे आमदारांची माघार!

Khari Kujbuj Political Satire: पेडण्याच्या राजकारणावर पणजीतील पत्रकारांनी थेट प्रश्नांची सरबत्ती सुरू करताच आमदार प्रवीण आर्लेकर यांची बोलतीच बंद झाली.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

प्रश्नांपुढे आमदारांची माघार!

पेडण्याच्या राजकारणावर पणजीतील पत्रकारांनी थेट प्रश्नांची सरबत्ती सुरू करताच आमदार प्रवीण आर्लेकर यांची बोलतीच बंद झाली. एरव्ही प्रत्येक विषयावर ठाम भूमिका मांडणारे आमदार यावेळी मात्र एकाच वाक्याचा आधार घेत राहिले- ‘नो कमेंट्स!’ पेडणेच्या राजकारणावर मत व्यक्त करण्याऐवजी ‘नो कमेंट्स’च्या कवचात सुरक्षित आश्रय घेत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांमधून सुटका करून घेतली. प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले आणि उत्तरांपेक्षा मौनच अधिक बोलके ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली.

वरिष्ठांची अजब नीती...

मोरजीतील वकिलावरील हल्ला प्रकरण गंभीर खरेच; पण आपल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची कामवाटपाची गणिते त्याहून भारी आहेत! एक पोलिस ठाणे आधीच डोक्यावर असलेल्या कार्यक्षम निरीक्षकावरच पुन्हा हा नवा भार. उद्या यांच्या स्वतःच्या ठाण्यात एखादी मोठी भानगड घडली, तर तिकडे कोणी पाहायचे? दररोजचा कारभार सांभाळायचा की या असल्या हाय-प्रोफाइल केसेसचा तपास करायचा? पोलिस खात्यात टेबलवर बसून केवळ पगार मोजणारे, ज्यांना नीट पेनही चालवता येत नाही, असे अनेक महाभाग आरामात ठाण्यात बसले आहेत. क्राईम ब्रँच किंवा मुख्यालयात रिकामे बसलेले निरीक्षक तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसतच नाहीत. मग काय, जे प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने काम करतात, त्यांनाच रोज पिळायचे! त्यामुळे सध्या ज्याचे वजन भारी, त्याची खुर्ची घट्ट, अशी चर्चा रंगली आहे.

पायाखालची वाळू सरकली!

‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्‍थापक अभिजीत दीपके आणि काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत सुरू केलेल्‍या आंदोलनाला देशभरातून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या निवासस्‍थानासमोर आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी यांना पोलिसांनी मंगळवारी अटक केल्‍यानंतर प्रदेश काँग्रेसने राज्‍यात तीव्र आंदोलन छेडले. त्‍याला प्रत्‍युत्तर म्‍हणून भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी काही मंत्री आणि आमदारांना सोबत घेत भर पावसात पणजीतील काँग्रेस भवनावर मोर्चा काढला. शिवाय राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. परंतु, विद्यार्थ्यांशी निगडित असलेल्‍या या विषयावरून प्रदेश भाजपने बुधवारी जे राजकारण करण्‍याचा प्रयत्‍न केला, त्‍यातून या आंदोलनामुळे भाजपच्‍या पायाखालची वाळू सरकल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून आल्‍याची चर्चा जनतेत आहे.

Khari Kujbuj Political Satire
Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

जनाभाई जोरात!

जना भंडारी, अर्चित नाईक आदी काँग्रेस नेते सध्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या लॉबीतील सदस्य. गोव्यात काँग्रेस पक्षाची सूत्रे अमित पाटकर यांच्याकडे गेल्यानंतर अर्चित पक्षाच्या कामात सक्रिय असले तरी जना जरा दूर पडले होते; पण आता गिरीशरावांनी पक्षाची सूत्रे हातात घेतल्यावर जना पुन्हा पक्षकार्यात सक्रिय झाल्याचे दिसतात. काही दिवसांपूर्वी जनाभाईंनी काणकोण येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या कामाचा पुढील आराखडा तयार केला. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस कार्यकर्ते लोकभवनावर मोर्चा घेऊन गेले त्यावेळीही जना आघाडीवर होते. अगदी आक्रमक होऊन त्यांनी घोषणा दिल्या. गिरीश चोडणकर हे अध्यक्ष झाल्यावर जनाभाईंना कसला ‘ऑक्सिजन’ मिळाला आहे ते माहित नाही; पण ते ‘जोमात’ आहेत, एवढे खरे!

घर वाचले असते तर...!

मोरजी येथे न्यायालयाच्या आदेशानुसार आणि ‘जीसीझेडएमए’च्या निर्णयानुसार पाडकामाची कारवाई सुरू आहे. यंत्रणा आपले काम करत असली, तरी गावात वेगळीच चर्चा रंगली आहे. अनेकांच्या मते, ‘बाकीचे जाऊ द्या, निदान राहते घर जरी वाचले असते तरी बरे झाले असते.’ सध्या संबंधितांनी राहते घर वाचविण्यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले असल्याने आता पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंतिम निर्णय न्यायालयच देणार असले, तरी अशा कारवायांमध्ये राहते घरही पाडले गेले की मन हेलावल्याशिवाय राहत नाही, अशी भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे न्यायालय काय भूमिका घेते, याची उत्सुकता कायम आहे.

उल्हास तुयेकरांचा स्वभाव!

‘स्लो अँड स्टेडी व्हिन्स दी रेस’ असे एक बोधवाक्य आहे. नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर हे असेच शांत स्वभावाचे राजकारणी. कधी कोणावर राग करणार नाहीत व कोणावर टीका ही करणार नाहीत. आपले काम शांतपणे करणारे. आपल्याला अमुकच हवे, अमुकच आपला हक्क आहे, असे म्हणून कधी मंत्र्यांकडे मागणीही करणार नाहीत. पदरात पडले पवित्र झाले, असे मानणारे. खरे म्हणजे सासष्टी तालुक्यात भाजपचे एकमेव आमदार म्हणून उल्हास निवडून आले होते. त्यापूर्वी दोनवेळा ते भाजपच्या कमळावर ‘झेडपी’ निवडून आले होते. आता उल्हास यांनी आपले आसन आणखी भक्कम केले असून नावेली मतदारसंघात त्यांचे वजन वाढले असल्याची चर्चा आहे.

नाक दाबल्याशिवाय ...

राज्यातील पदवीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनादेखील समस्या भेडसावत आहे. त्यांचा निकाल जाहीर झाला. मात्र, महाविद्यालयांनी तो निकाल चुकीच्या प्रारूपात गोवा विद्यापीठाला पाठविल्याने गुणपत्रिका आणि पदवी प्रशस्तिपत्र देण्यास विलंब होत आहे. कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. गोवा विद्यापीठाची परीक्षा विभागाची यंत्रणा गुणपत्रिका देण्यासाठी सज्ज आहे; परंतु सुधारित योग्य प्रारूपात निकाल पाठवायला महाविद्यालयेच उशीर करत असल्याची माहिती असून आता विद्यार्थ्यांना आपली गुणपत्रिका मिळविण्यासाठीदेखील आंदोलन करावे लागणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शिक्षणव्यवस्थेचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, अशी थट्टा आता लोकांतून उडविली जात आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

‘एसटी’ नेत्‍यांची भक्‍कम एकी

एक काळ असा होता की, गोव्‍यातील ‘एसटी’ चळवळीतील तीन नेत्‍यांची तोंडे तीनकडे होती. त्‍यामुळे गोव्‍यात ‘एसटी’ समाज हा राजकीयदृष्‍ट्या महत्त्वाचा समाज असूनही या समाजात एकी नाही, अशातऱ्हेचा संदेश लोकमानसात रुजला होता. मात्र, त्‍यानंतर रमेश तवडकर, गणेश गावकर, गोविंद गावडे आणि प्रकाश वेळीप या चारही नेत्‍यांनी एकत्र येऊन सर्वांना एकत्र आणण्‍यासाठी प्रयत्‍न केले आणि यंदाच्‍या ‘प्रेरणादिनी’ पहिल्‍यांदाच हे सर्व नेते आपापसांतील मतभेद विसरून एका मंचावर आले. काल उतोर्डा येथेही ‘आदिवासी डॉक्‍युमेंट कॉन्क्‍लेव्‍ह’च्‍यावेळी हे सर्व नेते पुन्‍हा एकदा एकत्र दिसले. आम्‍ही एकत्र आल्‍यास आम्‍हाला कुणीही फोडू शकत नाही, असाच संदेश या एकीतून देण्‍याचा हा प्रयत्‍न हाेता. राजकीय आरक्षण मिळायचे असेल तर ‘एसटी’मध्‍ये दुफळी असता कामा नये, असे यावेळी सभापती गणेश गावकर यांनी बोलूनही दाखविले.

डेंग्यूचा फटका

ज्यांच्या खांद्यावर आगीशी दोन हात करून नागरिकांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी आहे, त्या पर्वरी अग्निशमन केंद्रालाच डेंग्यूने अक्षरशः घेरल्याचे चित्र समोर आले आहे. २२ पैकी तब्बल १० कर्मचारी आजारी, त्यापैकी सातजण डेंग्यूबाधित, तर आणखी तिघांचे अहवाल प्रलंबित! डेंग्यूविरोधी उपाययोजनांचे दावे आणि फवारणीचा गाजावाजा सुरू असताना सरकारी यंत्रणाच डासांच्या विळख्यात सापडत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांची अवस्था काय असेल? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. आग लागल्यावर धावणाऱ्या जवानांनाच आता तापाने खाट पकडावी लागत असेल, तर डेंग्यूविरोधी मोहिमेचे यश नेमके कुठे दिसते, असा बोचरा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com