खरी कुजबुज: दोन पंच गेले कुणीकडे?

Khari Kujbuj Political Satire: कुर्टी-खांडेपार पंचायतीच्या सरपंचपदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली. अपेक्षेप्रमाणे भाजपचे मनीष नाईक बिनविरोध निवडून आले.
Khari Kujbuj Political Satire
Khari KujbujDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

दोन पंच गेले कुणीकडे?

कुर्टी-खांडेपार पंचायतीच्या सरपंचपदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली. अपेक्षेप्रमाणे भाजपचे मनीष नाईक बिनविरोध निवडून आले. पण मुद्दा तो नाही! भाजपचे आठ पंच असताना निवडणुकीवेळी फक्त सहाच पंच उपस्थित कसे, हा खरा चर्चेचा विषय ठरला. नूतन सरपंचाचे अभिनंदन करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासोबतही सहाच पंच दिसल्याने खांडेपारमध्ये ‘गेले दोन पंच कुणीकडे?’ अशीच विचारणा सुरू होती. या दोन पंचांच्या अनुपस्थितीमुळे भाजपच्या गोटात चर्चा रंगली असली, तरी फोंड्यातील काँग्रेसच्या गोटात मात्र उत्साहाचे वातावरण दिसत होते, एवढे नक्की!

सांगेत एल्टन दिसलेच नाहीत?

‘गोवा राखण यात्रा’ गुरुवारी सांगेत पोहोचली. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कार्यकारी अध्यक्ष सुनील कवठणकर व इतर नेते होते. परंतु, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता मात्र सांगेत नजरेस पडले नाहीत. भाजपचे सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई हे एल्टनचे जुने दोस्त. गेल्या विधानसभा निवडणुकीत दोघांनी एकमेकांना मदत केली होती, हे काही लपून राहिले नाही. त्या उपकाराची परतफेड करण्यासाठीच एल्टन यात्रेत आले नाहीत. आता, एसटी आरक्षण झाल्यास सुभाषराव कुंकळ्ळी मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. त्यावेळी एल्टन सुभाष फळदेसाईंसोबत राहतात की आपले नवीन मित्र युरी आलेमावना पाठिंबा देतात, यावर भाजप व काँग्रेसवाले आत्तापासूनच लक्ष ठेवून आहेत.

Khari Kujbuj Political Satire
Goa Cricket Association: 50 कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी जीसीएचा इशारा; आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई

महानगरपालिका कर्मचाऱ्याची तत्परता!

पणजी महानगरपालिकेतील हारूण या सुपरवायझरला शहरातील गटारांची खडान्‌खडा माहिती! कोणते गटार कुठे जोडले आहे, कुठे उंची कमी-जास्त आहे, हे त्याला चांगले ठाऊक. गटार तुंबले की अधिकारी सर्वप्रथम त्यालाच संपर्क साधतात. प्रसंगी स्वतः गटारात उतरून साफसफाई करण्यासही तो मागेपुढे पाहत नाही. आत्माराम बाेरकर मार्गालगत एका महाभागाने गटारात कचऱ्याची पिशवी टाकली. हारूणच्या कानावर ही गोष्ट जाताच त्याने स्वतः येऊन पिशवी बाहेर काढली आणि जागा स्वच्छ केल्याचे छायाचित्रही पाठवले. आता एका बाजूला गटारात कचरा टाकणारे महाभाग, तर दुसरीकडे कर्तव्य तत्परतेने बजावणारे हारूणसारखे कर्मचारी! सीसीपीमध्ये असे कर्मचारी आहेत, हीच पणजीकरांसाठी दिलासादायक बाब!

सेंटरस्टेजवर श्रीजा!

काँग्रेसच्या ‘गोय राखण यात्रे’मुळे गोवेकरांची मतं किती बदलणार, हे निवडणुकीतच कळेल. मात्र, गुरुवारी सांगे येथे झालेल्या यात्रेत पाच वर्षीय श्रीजा गावकरने मात्र साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले! आमडई, सांगे येथे राहणारी आणि कुडचडे येथील न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये शिकणारी श्रीजा हिने मोनोलॉगच्या शैलीत केलेले भाषण इतके चुणचुणीत होते की, राजकीय नेत्यांच्या गर्दीत ही चिमुकलीच सेंटरस्टेजवर आली! आता यात्रेचा राजकीय परिणाम काहीही होवो, पण श्रीजाच्या भाषणाची चर्चा मात्र नक्कीच रंगणार!

प्रवीण आर्लेकर एकाकी?

पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांना भाजपने उमेदवारी दिली नाही, तर मांद्र्याचे आमदार जीत आरोलकर यांची भूमिका काय असेल, याचे उत्तर आरोलकर यांनीच दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आपले म्हणणे मुख्यमंत्र्यांना कळवले आहे. ते कोणत्याही व्यक्तीमागे राहणार नाहीत. युती म्हणून पेडण्यात ज्याला उमेदवारी दिली जाईल, त्याला आपला पाठिंबा राहील, असे आरोलकर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. आर्लेकर हेही आधी आरोलकर यांच्यासोबत मगोमध्ये होते. निवडणुकीआधी महिनाभर ते भाजपमध्ये गेले. त्यावेळी आरोलकर यांना वाईट वाटले होते. त्यामुळे आता त्यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

आरोलकर-मुख्यमंत्री जवळीक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आपल्याला मगोचे नेते व मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यापेक्षा जवळचे असल्याची कबुली आमदार जीत आरोलकर यांनी दिली. मुख्यमंत्री व आपण समवयस्क असल्याने, तसेच ढवळीकर व आपल्यात वयाचा फरक असल्याने असे होत असावे, अशी पुस्ती आरोलकर यांनी जोडली आहे. आरोलकर यांची सर्व कामे मुख्यमंत्री करतात, असे पेडण्यातील जनतेला वाटते. त्यांनी दिलेला कोणताही प्रस्ताव सरकारदरबारी अडवला जात नाही. त्याचे गुपित आता खुद्द आरोलकर यांनीच उघड केले आहे. त्यामुळे आरोलकर यांच्याकडूनही आता त्यांच्या मतदार संघातील जनतेच्या अपेक्षा वाढणे साहजिकच आहे. कारण, आपली कामे आरोलकरांमुळे लवकर होतील, असा विश्‍वास त्यांना आहे. तसेही, आरोलकर सुद्धा कोणतीच संधी सोडत नाहीत

Khari Kujbuj Political Satire
Goa Agriculture: गोव्यात झेंडू शेतीला बहर! 150 हेक्टरवर लागवड, 200 टन उत्पादनाचा अंदाज

मुख्यमंत्री रमले बाळगोपाळांत!

मडगावच्या रवींद्र भवनात चार दिवसांच्या बुलबुल बाल चित्रपट महोत्सवाच्या समारोपावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आवर्जून उपस्थिती लावली. पण मुख्यमंत्री केवळ उपस्थित राहिले नाहीत, तर चक्क बालगोपाळांत रमले! ‘मारिया पिताशे’ या गाण्यावर त्यांनी चिमुकल्यांसोबत ठेकाही धरला. आता मुख्यमंत्र्यांना राजकीय व्यासपीठावर पाहण्याची सवय असलेल्यांना त्यांचा हा बालसुलभ अंदाज पाहून आश्चर्य वाटले असेल! सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत आणि नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनीही या मौजमस्तीत सहभाग घेतला. राजकारणाच्या धावपळीत मुख्यमंत्र्यांनी चिमुकल्यांसोबत असा आनंदाचा क्षण अनुभवला, याची चर्चा आता रंगणारच!

पन्ने उलटले की हिशेब जुळणार?

गोवा क्रिकेट संघटनेच्या कारभारात सध्या नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे. ऑडिट अहवालातून ५० कोटींच्या कथित गैरव्यवहाराची चर्चा सुरू झाली आणि आता दोषींवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला जातोय. विद्यमान पदाधिकारी म्हणतात, आमच्या हातात कारभार आला तेव्हा अवघे तीन महिने मिळाले; मग गेल्या वीस वर्षांचा हिशेब कोण देणार? एकीकडे आरोप, दुसरीकडे खुली आव्हानं आणि मध्ये न्यायालयाची तारीख! आता ३० नोव्हेंबरनंतर तरी हिशेबाच्या खेळातील गुपितं उलगडणार की आरोप-प्रत्यारोपांचाच सामना रंगणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे!

आंदोलनाच्या धुरात निर्णयांची खिचडी!

जनतेचे लक्ष एका बाजूला गुंतले की दुसऱ्या बाजूला आपले काम साधून घ्यायचे, असे राजकारणात म्हटले जाते. सध्या देशभरात आंदोलनांचा धुरळा उडतोय, गोव्यातही आंदोलने, निदर्शने आणि राजकीय डावपेच सुरू आहेत. अशा गदारोळात सरकारने एखादा निर्णय अलगदपणे घेतला, तर त्याची कुणाला खबरही लागणार नाही. त्यामुळे आता लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की, आंदोलनांच्या या धामधुमीत सरकारने आणखी काही निर्णयांची खिचडी तर शिजवली नाही ना? कारण आंदोलन संपल्यावर मागे वळून पाहिले, तर हातात निषेधाचे फलक आणि समोर नव्या निर्णयांचे फटाके, अशी वेळ आली तर नवल वाटायला नको!

पाटकरांची राखण यात्रेकडे पाठ!

काँग्रेसची ‘गोय राखण यात्रा’ गोवा राखणार की पक्षातील फाटाफूट, अशी चर्चा सुरू झाली आहे. यात्रा कुडचडेत येईल, तेव्हा सहभागी होण्याचा निर्णय घेऊ, असे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आधीच सांगितले होते. पण यात्रा कुडचडेत आली आणि पाटकर मात्र आलेच नाहीत! कॅप्टन विरियातो आले, हजेरी लावली आणि लगेच निघूनही गेले. मग ही यात्रा गोवा राखण्यासाठी की काँग्रेसमधील नेत्यांची मनधरणी करण्यासाठी, अशी चर्चा आता रंगू लागली आहे!

रात्रंदिन आम्हा मोबाईल?

चीनने १८ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घातली आहे; कारण त्याच्या दुष्परिणामांवर संशोधन झाले आहे. नैसर्गिक वाढ होण्यासाठी हे रील आभासी विश्व सोडून रियल वास्तव जगात त्यांचे पोषण व्हावे, हा उद्देश आहे. त्यांना मैदानी खेळ, विविध व्यायाम यांत दररोज गुंतवले जाते. आमच्या देशात आईवडिलांनी शेतात राबून कष्ट करून मुलांना घडवले. मुले वकील, इंजिनियर, डॉक्टर झाली. त्यांची मुले मात्र रात्रंदिन आम्ही मोबाईलसंगे अशी असतात. आपला त्रास वाचला जातो म्हणून त्यांना गेम्स खेळायला, व्हिडिओ पाहायला मोबाईल देणे चुकीचे आहे. भारतात पाच वर्षांवरील मुले तीन ते चार तास सरासरी दर दिवशी स्क्रिनटाईमसाठी डोके घालतात, असे सर्वेक्षण पुढे आले आहे. पाच वर्षांची बालकेही मोबाईल हाताळण्यास निपुण असतात. पिढी वाचवण्यासाठी कडक निर्बंध हवेत, असे मानसशास्त्रज्ञ चिंतातुर होऊन सांगतात, ती धोक्याची घंटा आहे.

बोलावलेला उष्म्याचा म्हारू

गोव्यात उष्णतेची तीव्रता वाढली आहे. दिवस-रात्र उकाडा असतो. अरबी समुद्रातील वाढलेले समुद्रपृष्ठ तापमान वातावरणातील आर्द्रता वाढवते, ज्यामुळे ‘फील्स-लाईक’ तापमान प्रत्यक्ष तापमानापेक्षा जास्त जाणवते. याशिवाय, एल निनोचा प्रभाव, हवामान बदल, शहरीकरण आणि झपाट्याने कमी होणारे हिरवे आवरण हे घटक उष्णतेला अधिक तीव्र करतात, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. उष्णतेचे डोम या हवामान घटनेमुळे गरम हवा अडकून राहते आणि थंडावा मिळत नाही. परिणामी, ग्रामीण व शहरी भागात उष्णतेची लाट निर्माण होते. चूड दाखवून म्हारू आमंत्रित करणे असे कोकणीत म्हटले जाते. पैशांच्या वखवखीमुळे बेपर्वा वृत्तीने पर्यावरणाकडे खेळ करून, झाडांची कत्तल करून, हिरवाई नष्ट करून, इमारती उभारून बोलावलेला हा उष्म्याचा म्हारू गोव्याला देशातील दहा उष्ण प्रांतात पोहोचवीत आहे, हे मात्र आता जाणवू लागले आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Land Zoning: गोव्यातील सेर्नाभाटी, कोलव्यातील 12.74 लाख चौ. मीटर जमीन 'अविकासयोग्य'; सरकारची मंजुरी

रेडिओ ऑफिसरचे लाड का?

बंदर कप्तान खात्यातील रेडिओ ऑफिसरचे एवढे लाड का पुरवले जात आहेत, असा प्रश्न मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनाही पडला. कारण यातील काहींनी गेली अनेक वर्षांपासून रेडिओ ऑफिसरला दिली जाणारी सेवावाढ हा चर्चेचा विषय ठरली. गलेलठ्ठ पगार घेऊन हा रेडिओ ऑफिसर कॅप्टनच्या मर्जीतील असल्याचे कोणीच नाकारणार नाही. स्वतः कॅप्टन या रेडिओ ऑफिसरच्या केबिनमध्ये वारंवार जातात, त्यामुळे रेडिओ ऑफिसर म्हणून काम पाहणारी व्यक्ती कॅप्टनला हवी-हवीशी का वाटते, यामागील वेगवेगळी चर्चा नव्या टर्मिनल इमारतीत सुरू आहे. रेडिओ ऑफिसरच्या सेवा मुदतवाढीची फाईल पर्वरीत पोहोचली. आता त्याच्या पाठोपाठ कॅप्टनही आपली सेवा मुदतवाढीची फाईल पाठविणार काय, अशी शंका कर्मचाऱ्यांना येऊ लागली आहे. केवळ मर्जी राखून सेवावाढ पदरात पाडून घेण्यात हा रेडिओ ऑफिसर पटाईत आहे, याची कल्पना काही मंत्र्यांना आली आहे. त्यामुळे त्याच्या डोक्यावर नक्की कोणाचा वरदहस्त आहे, याचा मात्र येथील कर्मचाऱ्यांना पत्ता लागला नाही, हे विशेष.

ई-वाहनांच्या बॅटऱ्यांची तपासणी

इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेबाबत परत चिंता निर्माण केली आहे. साखळीच्या शो-रूममध्ये दुरुस्तीसाठी आणलेल्या दुचाकींपैकी एका वाहनात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आग लागली असावी, असा संशय आहे. चार दुचाकी खाक झाल्या. अग्निशमन दलाने तत्काळ धावून दुर्घटना टाळली. पारंपरिक पेट्रोल आणि डिझेल वाहनांना पर्यावरणपूरक पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा, यासाठी सरकार उपाययोजना करते. अनेक इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयर्न बॅटरी हाताळताना विशेष काळजी घेणे, त्यांची योग्य देखभाल करणे आणि कठोर गुणवत्ता तपासणी करणे आवश्यक असते. विविध कारणांमुळे अतिगरम होऊन बॅटरी पेट घेऊ शकते. सरकारने लिथियम-आयर्न बॅटरीच्या गुणवत्ता नियंत्रणावर, चाचणीवर अधिक भर देणे गरजेचे आहे. ग्राहकांनीही बॅटरी चार्ज करताना शिफारस केलेल्या पद्धतींचे पालन करावे आणि खराब झालेली बॅटरी वापरणे टाळावे. आगीशी, विजेशी खेळू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com