खरी कुजबुज: 'तो' आवाज कुणाचा?

Khari Kujbuj Political Satire: वर्षानुवर्षे समस्यांच्या गर्तेत आणि मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत खितपत पडलेल्या प्रसिद्ध म्हापसा बाजाराला अचानक ‘अच्छे दिन’ येण्‍याची चिन्‍हे दिसू लागली आहेत.
Khari Kujbuj Political Satire:
Khari KujbujDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

‘तो’ आवाज कुणाचा?

घोषणांच्या आवाजावरून आता पोलिसांची कारवाई ठरणार असल्याने आझाद मैदानावरील घोषणाबाजीला सरकारी गंभीरतेची जोड मिळाली आहे. ‘हिंदुत्व मुर्दाबाद’चा नारा कोणी दिला, याचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना चित्रफीत तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता घोषणाही देताना सीसीटीव्ही आपल्याकडे पाहतोय का, याची खात्री करून घ्यावी लागेल, अन्यथा घोषणा देणाऱ्यापेक्षा घोषणा ऐकणाऱ्यांनाच अधिक उत्सुकता. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी पोलिस सज्ज आहेत; आता घोषणांच्या चित्रफितीतून सत्य बाहेर येण्याची प्रतीक्षा!

म्हापशात ‘व्हीआयपी’ चकरा

वर्षानुवर्षे समस्यांच्या गर्तेत आणि मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत खितपत पडलेल्या प्रसिद्ध म्हापसा बाजाराला अचानक ‘अच्छे दिन’ येण्‍याची चिन्‍हे दिसू लागली आहेत. अनेक वर्षांत जे घडले नाही, ते अवघ्या पाच दिवसांत पाहायला मिळाले; आधी खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बाजारात फेरफटका मारला, ही चर्चा शांत होते न होते तोच पर्यटनमंत्री रोहन खंवटे पाहणीसाठी दाखल झाले आणि दुसऱ्याच दिवशी साधनसुविधा पायाभूत मंडळाचे अध्यक्ष मायकल लोबो यांनीही हजेरी लावली. सरकारी पातळीवरून एकापाठोपाठ एक झालेल्या या बड्या नेत्यांच्या पाहणी दौऱ्यांनी बाजाराचा इतिहास नक्कीच बदलला, पण या ऐतिहासिक क्षणांनंतर खरोखर बाजाराचे भाग्य उजळणार आणि समस्या सुटणार, की या केवळ ‘इव्हेंट’ ठरून कागदावरच म्हापशाचा कायापालट होणार, यावर आता व्यापारी आणि सर्वसामान्यांमध्ये कुजबूज सुरू आहे.

Khari Kujbuj Political Satire:
Goa Liberation Day: मुक्तिदिनापूर्वी सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढणार! CM सावंतांची घोषणा; रवी नाईक यांच्या वारसदाराबाबत मौन

विजयचा चक्रव्यूहात प्रवेश

महाभारतातील अभिमन्यूला चक्रव्यूहात शिरता येत होते; पण बाहेर पडण्याचे ज्ञान अपुरे होते. गोव्यातील युतीच्या राजकारणात फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांचीही अवस्था तशीच झाल्याची चर्चा आहे. ‘आप’शी युती करून ते चक्रव्यूहात अडकले, असे बोलले जाते. आता काँग्रेससोबतच्या युतीच्या चर्चांनी नवा पेच निर्माण केला आहे. विजयबाब सध्या वेळ मारून नेत असले, तरी या राजकीय चक्रव्यूहातून ते सहीसलामत बाहेर पडतात की त्‍यात आणखी गुंततात, हे आगामी काळच ठरवेल!

अपूर्वचा गरबा डान्स

राज्‍यात सध्या नवरात्रीची धूम आहे. या उत्सवाला होणाऱ्या गर्दीत मिसळून आपला लोकसंपर्क अधिक दृढ करण्याची सध्या काही राजकारण्यांमध्ये जणू चढाओढच लागलेली दिसते. पूर्वी फोंड्यात कुठलाही कार्यक्रम असला तर तेथे डॉ. केतन भाटीकर हमखास दिसायचे. आता त्यांची जागा अपूर्व दळवी यांनी घेतलीय असे वाटते. फोंड्यात त्यांनी कित्येक ठिकाणी गरबा डान्स कार्यशाळा आयोजित तर केल्याच, पण त्या कार्यशाळांत जाऊन स्वतः डान्स करतानाही ते दिसतात. पूर्वी गरबा डान्स करताना नीलेश काब्राल यांची छायाचित्रे प्रसिद्ध व्हायची. आता अपूर्वची होऊ लागली आहेत. निवडणुकीपर्यंत हा उत्‍साह टिकला म्‍हणजे झालं!

पण वाचतो कोण?

एकेकाळी रहस्यकथा, गूढकथा आणि हिंदी-इंग्रजी कादंबऱ्यांत रमणारी पिढी होती. आता मोबाईलवर काही सेकंदांची रील पाहण्यातच अनेकांचा वेळ जातो. पुस्तकाच्या पानांवरचा आशय, कथानक आणि साहित्यिक मूल्ये यांच्यापेक्षा स्क्रीनवरचा चमचमाट अधिक आकर्षक ठरतो. परिणामी, छापील साहित्यापुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. पुरस्कार, अनुदान आणि गौरव लेखकाला लिहिते ठेवण्यासाठी उपयोगी असले, तरी शेवटी पुस्तक वाचले गेले पाहिजे; कपाटात सजून राहून साहित्याचा उद्देश साधत नाही. इंग्रजीच्या वाढत्या प्रभावात देशी भाषांतील साहित्य टिकवायचे असेल, तर लेखकांनी दर्जेदार लेखन करणे आणि वाचकांनी पुस्तकांकडे पुन्हा वळणे गरजेचे आहे. प्रश्न एवढाच, आजची पिढी पुस्तक उघडणार, की पुस्तकाचे परीक्षणही रील पाहूनच करणार?

सरकारी खुर्ची, टेबल अन्‌ वामकुक्षी

सांगे नगरपालिकेत जनतेच्या सेवेसाठी नेमलेले कर्मचारी टेबलावर पाय ठेवून वामकुक्षी घेत असतील, तर जनतेने कामासाठी कोणाकडे पाहायचे? सरकारी कार्यालयांत सामान्य माणसाची फाईल पुढे सरकण्यासाठी टेबलामागून टेबलांचे उंबरठे झिजतात; पण काही कर्मचाऱ्यांचे पाय मात्र थेट टेबलावर! व्हायरल व्हिडिओमुळे पालिकेचा कारभार चर्चेत आला आहे. आता या कर्मचाऱ्यांना कामाचा एवढा ताण आहे की कामच नसल्याचा निवांतपणा, हा संशोधनाचा विषय ठरावा! जनतेच्या करातून मिळणारा पगार हा जनसेवेसाठी की टेबलावर पाय पसरून आराम करण्यासाठी, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. नाहीतर उद्या नागरिकांनी कार्यालयात जाऊन कामाऐवजी वामकुक्षीची वेळ विचारली, तर दोष तरी कुणाचा?

Khari Kujbuj Political Satire:
Goa Politics: गोव्याची माणुसकी हरवतेय? खरगेंच्या ताफ्याला झालेल्या विरोधाने ज्येष्ठ नागरिक अस्वस्थ

कोंबडी आठशेची, किलाची फी दोन हजार!

डॉक्टर आणि वकील शेजारी राहत होते. डॉक्टरने आणलेली ब्रॉयलर कोंबडी शेजारच्या कुत्र्याने फस्त केली. नुकसान भरपाई मागायला डॉक्टर वकिलाकडे गेले, तर वकिलानेच सांगितले, ‘‘माझी फी दोन हजार रुपये; त्यातले बाराशे मला द्या!’’ हा विनोद असला तरी वकील केवळ फी घेणारे नसून समाजासाठी सेवाभावी कामही करतात. दक्षिण गोवा वकील संघटनेच्या सदस्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून महसूल प्रशासनातील कथित गैरकारभार आणि फेरफार-विभाजनाच्या फाईल्सवरील विलंबाचा निषेध केला. डिसेंबर २०२४ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीचे पालन होत नसल्याचा त्यांचा आरोप. या विलंबामुळे अशिलांचा छळ होत असेल, तर त्यांना वकिलांचे आभार मानावेसे वाटणारच! पण आभार मानताना ‘ओब्रिगाद’ म्हणून साग्वाद द्यायची की न्याय मिळवून देण्याचीच अपेक्षा ठेवायची, हा प्रश्न मात्र उरतोच!

पेलेचा ‘बिग कॅच’

गोव्यातील सेलिब्रिटी मच्छीमार म्हणून सगळीकडे परिचित असलेले पेले फर्नांडिस हे आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. कोलवा आणि बाणावली परिसरात वॉटर स्पोर्टस्‌ क्षेत्रात कार्यरत असलेले पेले बोट राईडसाठी आलेल्या पर्यटकांना आवर्जून आपल्या पारंपरिक मच्छीमार बोटीवर घेऊन जातात आणि त्यांना समुद्रातून पकडलेले ताजे मासे दाखवतात. गोव्याची अस्सल संस्कृती पर्यटकांना समजावी यासाठी आपले प्रयत्न असतात, असे ते सांगतात. त्यांची अशीच एक पोस्ट सध्या भलतीच व्हायरल झाली असून त्यात ते विदेशी पर्यटकांना मोठा पाच किलो वजनाचा ‘गोब्रो’ मासा पकडलेला दाखवत आहेत. पेलेचा हा बिग कॅच सध्या भलताच व्हायरल झाला आहे.

तेव्‍हा जयंत, आता भीमनाथ!

फोंड्यातील पालिका बाजार प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होण्याआधीच विक्रेत्यांनी जागेच्या व्यवस्थेसाठी मुख्याधिकारी भीमनाथ खोर्जुवेकर यांच्याकडे साकडे घातले. भीमनाथांनीही विक्रेत्यांची कैफियत ऐकून घेत, गरज पडल्यास पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे विक्रेत्यांचे समाधान झाले. या निमित्ताने १७ वर्षांपूर्वीच्या मार्केट संकुलाची आठवण ताजी झाली. त्यावेळी मुख्याधिकारी जयंत तारी यांनी विरोधाला सामोरे जात रवींच्‍या मार्गदर्शनाखाली मार्केट उभारण्याची प्रक्रिया पुढे नेली होती. आता बाजाराला नवा साज देण्याची वेळ पुन्हा आली आहे. विक्रेत्यांच्या मनात एकच आशा, तेव्हा जयंत होते, आज भीमनाथ आहेत; नाव वेगळे, पण कामाचा वारसा तसाच राहणार का? कारण आश्वासनांनी विक्रेत्यांचे समाधान होते, पण खरा कस लागतो तो प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावरच!

‘सिंह’ आक्रमक बनू लागलाय!

निवडणुका जवळ येताच गोव्यात राजकीय आक्रमकता वाढू लागली आहे. विरोधकांच्या युतीच्या चर्चांबरोबरच भाजप-मगोतील अंतरही वाढताना दिसतेय. पूर्वी फोंडा, प्रियोळ, मडकई आणि शिरोडा या चार मतदारसंघांवर दावा करणाऱ्या मगोला आता डिचोली, पेडणे आणि साखळीही आपली वाटू लागली आहे. भाजपकडून युती होणार असल्याचे सांगितले जाते, तर मगोचे नेते मात्र मौन बाळगतात. त्यामुळे दोन्ही होड्यांवर पाय ठेवण्याची ही रणनीती आहे का, अशी चर्चा रंगली आहे. सरकार कोणाचेही येवो, मगो सत्तेत असेल, असा लोकांचा अंदाज; आता मतदार त्यावर किती विश्वास ठेवतात, हेच पाहायचे!

युरी यांच्‍यासमोर आव्‍हानांचा डोंगर

आगामी निवडणुकीत कुंकळ्ळीत काँग्रेसला काँग्रेसशीच लढावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव पक्षबांधणीसाठी राज्यभर फिरत असताना, त्यांच्याच मतदारसंघात विचारांनी काँग्रेसशी निकट असणारे एल्विस गोम्स यांनी उमेदवारी जाहीर करून प्रचार सुरू केला आहे. युरी काँग्रेससाठी मतांचा जोगवा मागतात, तर एल्विस त्यांच्याविरोधात प्रचार करत असल्याची चर्चा आहे. हे काँग्रेसचे अंतर्गत राजकारण की विरोधकांना आयती संधी, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. कुंकळ्ळीत विरोधकांशी लढण्याआधी काँग्रेसला घरातीलच लढाई जिंकावी लागणार, असे दिसते!

Khari Kujbuj Political Satire:
Goa Marathi Academy: गोवा मराठी अकादमीत दहाच्या जागी बारा सदस्य? अनिल सामंतांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

ताकापुरते रामायण

रामानंद सागरांचे रामायण दूरदर्शनवर लागायचे, तेव्हा रविवारी एक तास देश जणू थांबायचा. लग्नाच्या पत्रिकेवरही ‘‘लग्नस्थळी रामायण पाहण्याची सोय आहे’’ अशी ओळ असायची.आता रामायणावर आधारित भव्य चित्रपटाचा गवगवा सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे युद्धे, उड्या आणि दिव्य दृश्ये पडद्यावर प्रभावीपणे दाखवता येतील; पण त्या काळची भक्ती, उत्सुकता आणि घराघरांतली एकत्रित प्रेक्षकसंख्या पुन्हा जमेल का? ‘दृश्यम ३’सारख्या चित्रपटांना तरुणांचा प्रतिसाद मिळतो; मग रामायणालाही जनरेशन झी थिएटरपर्यंत घेऊन जाईल का? आज नेटफ्लिक्ससारखे मंच घरबसल्या मनोरंजन देतात. त्यामुळे चित्रपट किती भव्य आहे, यापेक्षा तो प्रेक्षकांना थिएटरकडे किती खेचतो, हे महत्त्वाचे ठरेल. रामायणाची कथा चिरंतन; पण तिकीट काढून पाहण्याची इच्छा किती चिरंतन, हेच पाहायचे!

फलकावर अखेर ‘कमळ’ फुलले

पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या कोजागरी पौर्णिमा आणि दसरोत्सवाच्या शुभेच्छा फलकावर भाजप प्रदेशाध्यक्षांचे छायाचित्र आणि पक्षाचे चिन्ह नसल्याची ‘खरी कुजबूज’ प्रसिद्ध होताच दुरुस्तीची लगबग सुरू झाली. आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासोबत दामू नाईक यांनाही फलकावर स्थान मिळाले आहे. एवढेच नव्हे, तर वरच्या उजव्या कोपऱ्यात भाजपचे ‘कमळ’ही फुलले आहे. कुजबुजचा परिणाम असा की, फलकावरचे चेहरेही वाढले आणि कमळही फुलले!

पक्षांतर केलेल्‍या चौघांचे पत्ते कट!

गेल्‍या दहा वर्षांत झालेल्‍या दोन विधानसभा निवडणुकांत काँग्रेसच्‍या उमेदवारीवर निवडून आलेल्‍या काही आमदारांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला. २०१७ मध्‍ये अशा दहा आमदारांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला होता. त्‍यातील तत्‍कालीन उपमुख्‍यमंत्री बाबू कवळेकर यांच्‍यासह सात जणांचा २०२२ च्‍या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्‍यामुळे या निवडणुकीनंतर भाजप प्रवेश केलेल्‍या आठ जणांच्‍या कामगिरीवर भाजपच्‍या केंद्रीय नेतृत्‍वाने लक्ष केंद्रीत केले आहे. त्‍यापैकी केदार नाईक, नीळकंठ हळर्णकर, रुडॉल्‍फ फर्नांडिस आणि आलेक्‍स सिक्‍वेरा या चार आमदारांना उमेदवारी न देण्‍याच्‍या निर्णयाप्रत पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते पोहोचले आहेत. उर्वरित मायकल लोबो, डिलायला लोबो, संकल्‍प आमोणकर आणि राजेश फळदेसाई यांच्‍या कामगिरीचा अंतर्गत सर्वे सुरू आहे. तो पूर्ण झाल्‍यानंतर पुढील काहीच दिवसांत किती जणांचा पत्ता कट करायचा याचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्‍व घेणार असल्‍याची कुजबूज भाजपच्‍या गोटात सुरू झाली आहे.

जुने काब्राल कुठे हरवले?

कुडचडेचे नीलेश काब्राल यांच्या स्वभावात बदल झाल्याची चर्चा त्‍यांच्‍या समर्थकांत रंगू लागली आहे. पूर्वी कार्यकर्त्यांशी हसतखेळत बोलणारे काब्राल आता जरा गंभीर झालेत, असे काहींचे म्हणणे आहे. राजकारणातील वाढती धावपळ की निवडणुकीचे पडसाद, याचा अंदाज मात्र कुणालाच येत नाही! कारण काहीही असो, समर्थकांना मात्र जुन्या काब्रालांची आठवण येतेय. आता प्रश्न एवढाच, काब्राल बदललेत की राजकीय वातावरणामुळे समर्थकांनाच प्रत्येक गोष्टीत बदल दिसू लागलाय? बहुधा उमेदवारीचा प्रश्‍‍न त्‍यांना सतावू लागलाय.

Khari Kujbuj Political Satire:
Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

पोट भरलं, शिळोप्याच्या शिट्ट्या!

गरजूंना मदत करण्यासाठी काही सेवाभावी संस्था कपडे, भांडी आणि शालेय साहित्य गोळा करतात. दात्यांचा हेतूही प्रामाणिक असतो. वापरण्यायोग्य वस्तू गरजूंच्या कामी याव्यात, एवढीच त्यांची अपेक्षा. पण मदतीचे पार्सल घेऊन दुकानात गेलेल्या दात्याला मोबाईलवरील संभाषण संपेपर्यंत थांबावे लागते आणि नंतर ‘खाली गोडाऊनच्या पायऱ्यांवर ठेवा’ असा आदेश मिळतो, अशी तक्रार असेल तर प्रश्न पडणारच! नाव नाही, गाव नाही, संपर्क क्रमांक नाही; वस्तू कुणी दिल्या आणि त्या गरजूंपर्यंत पोहोचणार कशा, याची विचारपूसही नाही! पिशव्या उघड्यावर पडल्या, भटक्या जनावरांनी फाडल्या तर जबाबदार कोण? दात्याने मदत केली, संस्थेने ती स्वीकारली; पण पुढे तिचे काय झाले, याचा हिशेब कोण देणार? कोकणीत म्हणतात, ‘पोट भरलं की शिळोप्याच्या शिट्ट्या!’ मदत गोळा करणे ही समाजसेवा; पण ती योग्य हातांत पोहोचवणे ही जबाबदारी. अन्यथा दात्याचा उत्साह आणि गरजवंतांची आशा, दोन्ही पायऱ्यांवरच पडून राहतील!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com