

फोंडा: जनतेचे ‘पात्रांव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रवी नाईक यांनी गोरगरीब जनता आणि कूळ-मुंडकारांसाठी मोठे कार्य केले. त्यांच्या स्मृतींना खरी श्रद्धांजली म्हणून या घटकांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने १९ डिसेंबर अर्थात गोवा मुक्तिदिनापूर्वी राज्यातील सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
फर्मागुढी येथे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत आमदार रवी नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. रवी नाईक यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा गौरव करताना त्यांचे कार्य पुढे नेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मात्र, विधानसभा निवडणुकीला अवघे चार महिने शिल्लक असताना फोंड्यात रवी नाईक यांचा राजकीय वारसदार कोण, याबाबत मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले नाही. त्यामुळे त्यांच्या वारसदाराबाबत उत्सुक असलेल्या रवीप्रेमींची काहीशी निराशा झाली.
आपले उच्च माध्यमिक शिक्षण फर्मागुढी येथील पीईएस महाविद्यालयात झाले. त्या काळात रवी नाईक यांना दुरून पाहण्याची संधी मिळाली. मोठे नेते म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांनी ती अखेरपर्यंत जपली, असे मुख्यमंत्री म्हणाले. कुळ-मुंडकारांना न्याय मिळवून देण्यासाठी रवी नाईक यांनी मोठे प्रयत्न केले. त्यामुळे समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळण्यास मदत झाली. ‘माझे घर’ ही योजना आपण त्यांच्यासमोर मांडली, तेव्हा त्यांनी आनंदाने या योजनेला पाठिंबा दिला, अशी आठवणही सावंत यांनी सांगितली.
दरम्यान, रवी नाईक यांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, सभापती गणेश गावकर, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री रोहन खंवटे, आमदार गोविंद गावडे, रितेश नाईक, रॉय नाईक, मनोहर आडपईकर, अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, माजी सरपंच नावेद तहसीलदार, जयंत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कुर्टीत रवी नाईक यांचा अर्धपुतळा लवकरच
कुर्टी येथील क्रीडा संकुलात रवी नाईक यांचा अर्धपुतळा लवकरच उभारण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. काही कारणांमुळे हे काम रखडले होते. आता ते लवकरच पूर्ण केले जाईल. या क्रीडा संकुलाला रवी नाईक यांचे नाव देण्यात आले असून, त्यांच्या स्मृती कायम जपल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला नेता
सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या रवी नाईक यांनी नगरसेवक ते मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास करताना सर्वसामान्य जनतेसाठी काम केले. शत्रूलाही मित्र बनवण्याची ताकद त्यांच्यात होती. त्यामुळे असा नेता पुन्हा होणे कठीण आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.