

डॉ. मधु स. घोडकिरेकर
सरकारने केलेल्या अतिरिक्त नियुक्त्या नियमित करण्यासाठी संस्थेच्या घटना-तरतुदीत दुरुस्ती करण्याची विनंती अजून अनिल सामंत यांनी भाषा संचालनालयाकडे केलेली नाही. माना डोलविणारे पदाधिकारी व अधिकारी समोर असले की सरकारकडून चुका होतच राहणार, याचे हे उदाहरण. सरकार चुकले असेल तर त्याची दुरुस्ती याच लोकांनी करायची असते; पण ते करत नाहीत.
अनिल सामंतांनी राजभाषा विषयाचा अभ्यास करावा’ या विषयावरील लेख मी समाजमाध्यमावर टाकला. तेव्हा डॉ. अनुजा जोशी यांनी तेथे चिखलात दगड मारून स्वतःच्या अंगावर चिखल उडवून घ्यावा, तशी कमेंट टाकली. या कमेंटवरून मागच्या आठवड्यातील ‘गोवा अकादमी ही संस्था की संस्थान’ हा लेख तयार झाला. परत हा लेख समाजमाध्यमावर टाकला तर डॉ. अनुजा जोशी कमेंट टाकतात की, ‘अनेक हितचिंतक व अनेक सच्चे मराठीप्रेमी सोबत असल्यावर कुणीही व्यक्तिगत चिखलफेक करून वातावरण गढूळ करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी असला उपद्व्याप यशस्वी होणार नाही. कारण सच्चाई, प्रामाणिकपणा, प्रांजळ प्रयत्न हे सारे लोक जाणतात. कर नाही त्याला कसलीच डर नाही!!!’
त्यांची वकिली करणाऱ्या त्यांच्या त्या एकमेवाद्वितीय अशा राजेंद्र बर्वे नामक हितचिंतकाने, ‘मधु सर, तुमचा काहीतरी वैचारिक गोंधळ सुरू आहे व तुमची खालची पोस्ट फक्त वातावरण गढूळ करत आहे. अनिल सामंत सर आमच्यासाठी आदर्श देवमाणूस आहेत व अनुजा जोशी यांनी लिहिले आहे ते तंतोतंत बरोबर आहे. सामंत सर अगदी प्रामाणिकपणे काम करतात, त्यांना हटविण्याचा प्रयत्न का?’ अशी कमेंट माझ्या पोस्टवर टाकली.
म्हणजेच, सामंत यांच्या पात्रतेविषयी त्यांच्या हितचिंतकांनी ‘आदर्श देवमाणूस’ असे गुणपत्रासह नवे प्रमाणपत्र पुढे आणले आहे. संस्थेच्या घटनेची पायमल्ली झाली तरी चालेल, मराठी अकादमीसाठी कोकणी अकादमीप्रमाणे समान स्वायत्तता नसली तरी चालेल; पण आपण आपली खुर्ची सुरक्षित ठेवावी, हा एक नवा व जाज्ज्वल्य आदर्श अनिल सामंत यांच्या कार्यकारिणी समितीवर असलेल्या मराठीप्रेमींनी घालून दिला आहे. आज जरा अजून थोडे खोलात जाऊया.
मागच्या वर्षी मी ‘अकादम्या ठरताहेत संशोधनाचा विषय’ हा लेख प्रसिद्ध केल्यानंतर ‘सरकारी व बिगरसरकारी अकादमी’च्या स्वायत्ततेविषयी बरेच जण विचारणा करीत होते. त्या अनुषंगाने, मी भाषा संचालनालयातून सरकारने स्वीकृत केलेल्या गोवा मराठी अकादमीच्या घटनेची प्रत मिळविली. या घटनेच्या तरतुदीनुसार, या अकादमीच्या कार्यकारिणीची सदस्यसंख्या दहा आहे, तर प्रत्यक्ष सरकारनियुक्त सदस्यांची संख्या बारापेक्षा जास्त आहे. सरकारने केलेल्या या अतिरिक्त नियुक्त्या नियमित करण्यासाठी संस्थेच्या घटना-तरतुदीत दुरुस्ती करण्याची विनंती अजून अनिल सामंत यांनी भाषा संचालनालयाकडे केलेली नाही. माना डोलविणारे पदाधिकारी व अधिकारी समोर असले की सरकारकडून चुका होतच राहणार, याचे हे उदाहरण. सरकार चुकले असेल तर त्याची दुरुस्ती याच लोकांनी करायची असते; पण ते करत नाहीत.
गोवा कोकणी अकादमीच्या घटनेप्रमाणे या मराठी अकादमीच्या घटनेतही ‘संस्था नोंदणी कायदा, १८६० अंतर्गत नोंदणी करण्याची’ तरतूद आहे. ही स्वायत्तता राखण्यासाठी दर पाच वर्षांनी त्या नोंदणीचे नूतनीकरण करावे लागते. या घटना-दुरुस्त्या वगैरे झाल्यास, त्याची माहिती उत्तर गोवा संस्था नोंदणीकरण निबंधकांना द्यावी लागते. या मराठी अकादमीला बारा वर्षे झाल्याने आतापर्यंत दोनदा नूतनीकरण व्हायला हवे होते. ‘आरटीआय’अंतर्गत माहिती मिळविल्यास असे नूतनीकरण केल्याचा दुजोरा मिळत नाही. अशोक नाईक तुयेकर उर्फ पुष्पाग्रज हे हयात असताना या समितीचे उपाध्यक्ष होते. ते एकदा म्हणत होते की, ही नोंदणी प्रक्रिया राजभाषा संचालनालयाने करावी की कार्यकारिणी समितीने, याविषयी ठरत नसल्याने नोंदणी रखडली आहे. म्हणजे २०१६ पर्यंत ही नोंदणी झाली नव्हती.
अगदी हा लेख लिहिण्याआधी मी समितीतील एका सक्रिय सदस्याकडे, तसेच कार्यपद्धतीला कंटाळून अकादमीत जाणेच बंद केलेल्या दुसऱ्या एका सदस्याला याविषयी विचारले असता, मुळात अशी नवी नोंदणी झाली आहे की नाही, हे दोघांनाही माहीत नाही. नूतनीकरण झालेले नाही, हे जवळजवळ पक्के आहे; पण मुळात नोंदणी झाली आहे का, हा गंभीर प्रश्न आहे. ‘पुढे व्यवस्था होईपर्यंत तुम्ही कार्यकारिणीवर राहा,’ अशा एका ओळीच्या सरकारी आदेशावर प्रस्तुत कार्यकारिणी चक्क दहा वर्षे आपले दिवस ढकलत आहे; कारण कार्यकाळ संपला व मुदत दिल्याचे एकही कागदपत्र ‘आरटीआय’अंतर्गत मिळालेले नाही. असे मानुया की २०१६ साली नोंदणी झाली, तर पहिल्यांदा २०२१ साली व दुसऱ्यांदा २०२६ साली हे नूतनीकरण व्हायला हवे होते.
नूतनीकरण करते वेळी कार्यकारिणी सदस्यांची निवड किंवा नियुक्ती करताना घटनेनुसार नियम पाळले गेले आहेत की नाही, हे कटाक्षाने पाहिले जाते. या व्यतिरिक्त नूतनीकरणासाठी गरजेची अशी दुसरी गोष्ट म्हणजे वार्षिक ऑडिट, जे सरकारी स्वायत्त संस्थेसाठी लेखा खाते नित्यनेमाने करते. सदर नूतनीकरणाची (नोंदणी झाली आहे, असे गृहीत मानून) प्रक्रिया अध्यक्षाच्या सहीने करायची असते. आता अनिल सामंतांना स्वतःची जबाबदारी माहीत नाही की ते आजचे संकट उद्यावर ढकलतात, हा प्रश्न आहे. एक बिगर सरकारारी संस्थाची घटना बरोबर नाही म्हणून मोठ्या उमेदीने नवी सरकारी स्वायत्त संस्था उभी केली व तिथे अनुदान स्वरूपात जाणारा पैसा येथे वळविला.
उद्घाटनपर भाषणात मराठीसाठी कल्पनेतले महाल उभे केले व आता या भाषणाची तपपूर्ती झाली तशी, ‘यांच्यापेक्षा ते परवडले,’ अशी परिस्थिती समोर येत आहे. हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला, त्यांपैकी आज विष्णू वाघ एक हयात नाहीत; पण बाकीच्यांनी परत एकत्र येऊन ‘याचसाठी केला होता अट्टहास की काय?’ यावर चिंतन करावे. काहीच करता आले नाही, तर एकदातरी त्यांनी स्वतःच्या कपाळावर हात मारून घ्यावा. आता अनिल सामंतांना तेथून कुणी हलवू नये, अशी वकिली करण्यासाठी पुढे आलेल्या डॉ. अनुजा जोशी यांच्या आदर्श दुटप्पीपणाचे एक उदाहरण पाहूया. त्यांनी गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविली होती व तिथे त्या हरल्या.
आपल्या प्रचारादरम्यान गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे नूतनीकरण झालेले नाही, हा मुद्दा तिने जोरात लावून धरला होता व या मुद्द्यावरून पदावर अध्यक्ष त्या पदावर राहण्यास कसे लायक नाहीत, हे त्या सांगत होत्या. आता डॉ. अनुजा जोशी यांच्या हिशोबाने याच मुद्द्यावरून अनिल सामंतही समान दोषी ठरतात. आता एक मात्र आहे, डॉ. अनुजा जोशी तेथे निवडणूक लढवून अध्यक्ष होऊ शकल्या नसल्या, तरी या सरकारी कादमीवर आपल्या कथित 'सच्च्या ‘मराठीप्रेमी' या पुण्याईवर त्या अनिल सामंत यांच्या उत्तराधिकारी होऊ शकतात.
गुरुवारी पहाटे नाना गेले. शेवटपर्यंत ते तत्त्वाला धरून राहिले व त्यांचे बा. भ. बोरकरांच्या कवितेतील गोमंतकीय नदीकाठच्या घरात राहायचे राहून गेले. आळंदीत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली, तशी नानांना गोमंतभूमीत एक प्रकारे संजीवन समाधीच प्राप्त झाली. डिसेंबर २०२१ साली त्यांना गदिमा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमात त्या वर्षी गदिमा प्रतिष्ठानने राष्ट्रीय पातळीवर कोविडवर काम केलेल्या मराठी डॉक्टरांना आमंत्रित केले होते. त्यात मलाही आमंत्रण होते. या कार्यक्रमात नानांनी आपल्या संपूर्ण गौरव भाषणात गदिमांच्या ‘विठ्ठला, तू वेडा कुंभार’ व ‘उद्धवा, अजब तुझे सरकार!’ या दोन गीतांतील प्रत्येकी एक कडवे समजावून सांगितले.
त्यांच्या भाषणाची सुरुवातच, ‘इथे फुलांना मरण जन्मता, दगडाला पण चिरंजीविता... बोरीबाभळी उगाच जगती, चंदनमाथी कुठार!.. उद्धवा, अजब तुझे सरकार!’ या कडव्याने केली. नाना पाटेकरांप्रमाणेच आपले अनिल सामंतही कविता वाचन छान करतात, कवितेचा भावार्थही मस्त सांगतात. आता तर ते नानांच्या आठवणींविषयी विचार करत असतील, तर त्यांनी नानांना नेमका कडव्याचा अर्थ पुण्यात मराठी साहित्यिकांना का सांगावासा वाटला असावा, याविषयी विचार करावा. घटनेत तरतूद नसताना दहाच्या जागी बाराजणांना बसवून तुम्ही मराठी संस्था चालवत आहात, कोकणी अकादमीच्या कार्याच्या तुलनेत तुम्ही दहा वर्षांनी मागे राहिला आहात, अशा वेळी ‘अनिला, अजब तुझा दरबार!’ असे खोचकपणे आपल्याला कुणी टोमणे तर मारत नसेल ना, याची विचारणा त्यांनी करावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.