Goa Politics: गोव्याची माणुसकी हरवतेय? खरगेंच्या ताफ्याला झालेल्या विरोधाने ज्येष्ठ नागरिक अस्वस्थ

Mallikarjun Kharge Goa Visit Controversy: नुकतेच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असलेले श्री. खर्गे हे आपल्या पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी गोव्यात आले होते.
Mallikarjun Kharge Goa Visit Controversy
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

नुकतेच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असलेले श्री. खर्गे हे आपल्या पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी गोव्यात आले होते. दाबोळी विमानतळावर ते उतरले तेव्हा सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर जणू काही आक्रमण केले आणि त्यांची हुर्यो घातली. अशी हुल्लडबाजी या प्रदेशाच्या सभ्यतेला कलंक लावणारी आहे.

अलीकडे या गोमंतभूमीत आणि देशपातळीवर घडणाऱ्या बातम्या पाहून, वाचून आणि ऐकून मन अस्वस्थ होते. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी या देशाला ‘सपेरों वालों का देश’, म्हणजेच पुंगी वाजवून साप डोलवणारा देश, असे हेटाळणी करणारे संबोधन विदेशात वापरले जायचे! १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला; परंतु यातील पुदुच्चेरी, दादरा-नगर हवेली आणि गोवा, दमण व दीव हे अनुक्रमे फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्या ताब्यात असणारे प्रदेश मुक्त झाले नव्हते. सन १९५६ ते १९६१ या पाच वर्षांच्या काळात हे प्रदेश अनुक्रमे मुक्त झाले. उर्वरित भारत स्वतंत्र झाला तेव्हा हा देश एकसंघ कधीच नव्हता.

Mallikarjun Kharge Goa Visit Controversy
Goa Water Crisis: गोव्यात पावसाची विक्रमी तूट, तापमान 37 अंशांपार! आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट?

अनेक ठिकाणी राजेशाही होती, अनेक ठिकाणी संस्थानिक होते. जम्मू आणि काश्मीर येथे हरिसिंग यांचे राज्य होते, तर हैदराबाद येथे निजामाचे राज्य होते. राजस्थान, मध्य प्रदेश आणि म्हैसूर येथेही राजेशाही होती. या सगळ्यांना एकत्र करण्याचे काम तत्कालीन गृहमंत्री आणि उपपंतप्रधानपदावर असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले आणि तेव्हा कुठे भारत नावाचा देश बनला. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश साम्राज्य हळूहळू कमजोर पडत गेले आणि ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य जगाच्या पाठीवरून जो कधीच मावळत नव्हता, तो अस्तंगत झाला. अनेक देश ब्रिटिश हुकूमतीतून एकेक करून मुक्त झाले. त्यापैकीच आपला भारत देश एक होय. परंतु हे करीत असताना ब्रिटिश सरकारने दुटप्पी चाल खेळली.

मुळातच ‘फोडा आणि राज्य करा’ ही त्यांची नीती होती. भारताला स्वातंत्र्य देताना त्यांनी मुस्लिम नेत्यांना फूस लावली आणि स्वातंत्र्य हवे असेल, तर अखंड भारताची फाळणी करा, अशी अट घातली. गुलामगिरीत पिचलेल्या भारताला ही अट मान्य करण्याशिवाय काही पर्याय नव्हता; म्हणून ही अट मान्य केली गेली. तरीदेखील जम्मू व काश्मीर कुणाचे, यावरून ठिणगी पडेल, अशी व्यवस्था ब्रिटिश सरकार करून गेले आणि आजही ही डोकेदुखी थांबलेली नाही. १९४७ ते १९५२ पर्यंत या देशावर लोकशाही पद्धतीने निवडलेले सरकार नव्हते, कारण तेव्हा संविधानाची निर्मिती झाली नव्हती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनी संविधान लिहून पूर्ण केले.

२६ जानेवारी १९५० रोजी त्याची अंमलबजावणी झाली आणि देश प्रजासत्ताक बनला. त्यानुसार पहिली सार्वत्रिक निवडणूक होऊन पहिले केंद्रीय मंत्रिमंडळ १९५२ साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले. सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात संसदेत वादविवाद व्हायचे. निवडणूक प्रचारात एकमेकांवर शाब्दिक प्रहार केले जायचे. परंतु व्यक्तिगत जीवनात कुणी कुणाचे वाभाडे काढून आणि अश्लील चित्रे प्रदर्शित करून कुणाचे चारित्र्यहनन केले नाही. विचारांचा मुकाबला विचारांनी केला जात होता. विरोधी पक्षनेत्यांना संसदेत आणि संसदेबाहेर सन्मानाची वागणूक मिळत होती.

२०१४ नंतर हे चित्र पूर्णपणे पालटले. धार्मिक उन्माद आणि व्यक्तिगत चारित्र्यहनन हे जनमत बनवण्याचे मुद्दे बनवले गेले. विकासाचे भ्रामक चित्र उभे करण्यात आले. सार्वजनिक संस्थांचे एकामागोमाग एक खासगीकरण केले जाऊ लागले. बेरोजगारी आणि महागाई यांनी उच्चांक गाठला. निवडणुकीच्या तोंडावर प्रलोभने दाखवणाऱ्या योजना आखल्या. १९६४ सालच्या मे महिन्यात मी कोकणातून प्रथमच गोव्यात आलो, तो येथील माझ्या एका चुलतबंधूच्या विवाहाच्या निमित्ताने! गोवा मुक्त होण्यापूर्वी कितीतरी वर्षे आधी माझे दोन चुलते गोव्यात आले होते. १९४२ साली महात्मा गांधी यांनी पुकारलेल्या चले जाव आंदोलनात ते सहभागी झाले होते. त्यांच्यावर ब्रिटिश सरकारचे अटक वॉरंट होते. ती अटक चुकवण्यासाठी हे दोघेही चोरमार्गाने गोव्यात आले होते आणि पुढे इथेच त्यांचे विवाह होऊन ते स्थायिक झाले होते.

Mallikarjun Kharge Goa Visit Controversy
Goa Undeclared Assets: गोव्यातील 1200 लोकप्रतिनिधींची नावे जाहीर! मालमत्तेचे विवरणपत्र न दिल्याने लोकायुक्तांची कारवाई

त्यांच्यापैकीच एकाच्या मुलाचा विवाह होणार होता. हा माझा चुलतबंधू मुष्‍टिफंड या संस्थेत शिक्षक होता. गोवा मुक्त झाल्यावर तो आपले मूळ गाव शोधत कोकणात आला. त्याची आणि आमची भरतभेट झाली. तेव्हा मी केवळ चौदा वर्षांचा होतो. आठवीत शिकत होतो. मध्ये चार वर्षे गेली. मी अकरावीच्या वर्गात पोहोचलो आणि माझ्या या चुलतबंधूचे पोस्टकार्डावर लिहिलेले विवाहाचे निमंत्रणपत्र आले. त्या वेळी फोन ही दुर्मिळ व्यवस्था होती. पत्रव्यवहार पोस्टकार्ड किंवा अंतर्देशीय पत्राने चालायचा. अकरावीची माझी शालांत परीक्षा संपलेली होती आणि निकाल तेवढा जाहीर व्हायचा होता.

त्याच दरम्यान हे निमंत्रणपत्र आले होते. वेंगुर्ला या माझ्या जन्मगावाहून मी एसटी बसने बेतीपर्यंत आलो. (तेव्हा मांडवी पूल नव्हता.) फेरीबोटीतून पणजीच्या किनाऱ्यावर पोहोचलो. पुढे कसे जायचे, हे माहीत नव्हते. इथली स्थानिक भाषा येत नव्हती. पोस्टकार्डवर लिहिलेला पत्ता पणजी किनाऱ्यावर असलेल्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकाला दाखवला. त्याने मला अगदी योग्य पत्त्यावर, म्हणजे कालापूर येथे आणून सोडले. फक्त दोन रुपये! (आता याच अंतराला चारशे रुपये मोजावे लागतात.) त्यावेळची माणुसकी, आपुलकी, आदर आणि स्नेहभाव आज दृष्टीस पडणे मुश्कील झाले आहे.

नुकतेच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असलेले श्री. खरगे हे आपल्या पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी गोव्यात आले होते. दाबोळी विमानतळावर ते उतरले तेव्हा सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर जणू काही आक्रमण केले आणि त्यांची हुर्यो घातली. अशी हुल्लडबाजी या प्रदेशाच्या सभ्यतेला कलंक लावणारी आहे. विरोधकांना काळी निशाणे दाखवून आपला निषेध व्यक्त करणे इथपर्यंत ठीक आहे; परंतु विरोधी पक्षनेत्याला अशा प्रकारे अपमानित करणे योग्य नाही.

Mallikarjun Kharge Goa Visit Controversy
Goa Saligao Waste Management: साळगावचा कचरा प्रकल्प 25 दिवस बंद! उत्तर गोव्यात कचरा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान

समाजमाध्यमावर ती चित्रफीत पाहिली आणि मला पूर्वीचे ते सोनेरी दिवस आठवले. गोवा किती बदलला आहे! सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या जात आहेत, हे पाहून मन अस्वस्थ झाले. असा गोमंतक कधीच नव्हता. आल्या-गेलेल्यांचे सुहास्य वदनाने स्वागत करणारा, आदर आणि प्रेम दाखवणारा असा हा प्रदेश होता. आज त्याची जागा वैर, द्वेष, मत्सर आणि हेटाळणी यांनी घेतली आहे. गोवा वेगळ्या दिशेने चालला आहे आणि ती चुकीची दिशा आहे. याचे दूरगामी परिणाम येणाऱ्या अनेक पिढ्यांना भोगावे लागणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com