Ramesh Tawadkar: रमेश तवडकर यांची 'श्रम-धाम फळाला, क्रीडा शिक्षक ते सभापतीपदापर्यंत यशस्वी वाटचाल, वाचा त्यांची कारकीर्द

Ramesh Tawadkar political career: कोणी कोणत्या समाजात व जातीत जन्माला यावे हे जन्माला येणाऱ्याच्या हातात नसते. मात्र, मोठे होऊन त्याचे कर्तृत्व ही त्याची ओळख बनते.
Ramesh Tawadkar Political Career
Ramesh Tawadkar Political CareerDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: कोणी कोणत्या समाजात व जातीत जन्माला यावे हे जन्माला येणाऱ्याच्या हातात नसते. मात्र, मोठे होऊन त्याचे कर्तृत्व ही त्याची ओळख बनते. हे आमोणे येथील एका लहानशा गावात जन्मलेल्या रमेश तवडकर यांच्या बाबतीत तंतोतंत खरे आहे.

तवडकर बीपीएड अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर श्री श्रद्धानंद विद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर राजकारणात येऊन आमदार, मंत्री व सभापती बनले. त्यानंतर त्यांचे काम वाढले. सभापती रमेश तवडकर हे पाचेक मिनिटांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी गेले होते.

विषय होता ‘श्रम-धाम’ या गरीबांसाठी लोकसहभागातून बांधण्यात येणाऱ्या घरांचा विषय पंतप्रधानांसमोर मांडण्याचा. तवडकर यांनी संकल्पनेची सुरवात, विस्तार याविषयी बोलण्यास सुरवात केली आणि पाच मिनिटांची भेट अर्धा तास कधी लांबली हे समजलेच नाही. हा किस्सा खुद्द तवडकर यांच्या तोंडातूनच ऐकायला हवा.

Ramesh Tawadkar Political Career
Goa Politics: 'बाप्‍पा' पावला... तवडकर, कामतांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ; 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

सध्या तवडकर म्हणजे ‘श्रम-धाम’ असे समीकरण झाले आहे. एक आमदार जनहिताची चाड असेल तर काय करू शकतो याचे उदाहरण त्यांनी सर्वांसमोर ठेवले आहे. काणकोणचे आमदार लोकाभिमुख कामाची नवी दिशा दाखवत ‘श्रम-धाम’ ही संकल्पना यशस्वीपणे राबवत आहेत. या उपक्रमाचा गाभा असा की, गरीबांना केवळ आश्वासन न देता प्रत्यक्षात सुरक्षित, पक्की व सन्मानाने जगता येईल अशी घरे उभारून देणे.

‘श्रम-धाम’ची कार्यपद्धती विशेष आहे. घर बांधण्यासाठी लागणारे साहित्य लोकवर्गणीतून उपलब्ध केले जाते, तर प्रत्यक्ष कामात लाभार्थी, स्वयंसेवक व नागरिक श्रमदान करतात. त्यामुळे ही घरे केवळ दानातून नव्हे तर ‘आपल्या हातांनी उभारलेली स्वप्नांची घरे’ म्हणून लाभार्थ्यांना मिळतात.

या योजनेमुळे काणकोणमधील अनेक कुटुंबांना स्थैर्य लाभले आहे. पडक्या झोपडीवजा घरांत राहणारी कुटुंबे आता स्वतःच्या पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण करून समाजात नव्या ओळखीने उभी राहत आहेत. ‘श्रम-धाम’चे वैशिष्ट्य म्हणजे ही योजना केवळ मदतीवर आधारलेली नसून सहभाग व स्वाभिमानावर उभी आहे. समाजातील प्रत्येक हात एकत्र आल्यावर कसे परिवर्तन घडते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे हा उपक्रम होय.

आज ‘श्रम-धाम’ ही संकल्पना काणकोणच्या सीमांना ओलांडून लोककल्याणाची प्रेरणादायी चळवळ ठरत आहे. घरे उभारली जात असली तरी प्रत्यक्षात उभा राहत आहे तो - सहकार्य, बांधिलकी आणि उज्ज्वल भविष्याचा विश्वास.

Ramesh Tawadkar Political Career
Goa Food Adulteration Cases: पाच वर्षांत राज्‍यात अन्न भेसळीची 43 प्रकरणे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती

रमेश तवडकर यांची ठळक कारकीर्द

जन्‍म : २७ जुलै १९६८. आमोणे येथील सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षण, नंतर श्रद्धानंद विद्यालय पैंगीणमधून, महाविद्यालयीन शिक्षण कुंकळ्ळी सोसायटी महाविद्यालयातून. बीपीएड शिक्षण अंबाबाई तालीम संस्थेच्या बीपीएड महाविद्यालय मिरज-सांगली येथे. बीपीएड अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर श्री श्रद्धानंद विद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून रुजू.

२७ डिसेंबर १९९५ : आदर्श युवा संघाची स्थापना केली. २००० पासून गाकुवेध संघटनेचा क्रियाशील कार्यकर्ता म्हणून काम. २००० मध्ये श्रीस्थळ येथे दोन हजार कार्यकर्त्यांचा सहभाग असलेले आदर्श युवा संघ व गाकुवेध संघटनेतर्फे यशस्वी अधिवेशनाचे आयोजन.

२००२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपने पैंगीण मतदारसंघातून उमेदवारी दिली मात्र ते निवडणुकीत यशस्वी झाले नाहीत. २००५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत पैंगीण मतदारसंघातून ते विजयी झाले व प्रथम आमदार बनले.

२०१२ ते २०१७ या कालावधीत ते दुसऱ्यांदा आमदार बनले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री बनले. त्यांच्याकडे कृषी, पशुसंवर्धन, क्रीडा व आदिवासी कल्याण ही महत्त्वाची खाती देण्यात आली. त्याच काळात कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याने त्यांना केंद्र सरकारचा ‘कृषी करमण्ये’ हा पुरस्कार प्राप्त झाला.

श्रम धाम योजना : डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात सभापती म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी पार पाडली. श्रमधाम योजनेतून आतापर्यंत ७० घरे पूर्ण झाली आहेत. त्याची दखल केंद्र सरकार व सामाजिक संस्थांनी घेऊन त्यांना या सामाजिक कार्यासाठी डॉक्टरेट पदवी बहाल केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com