खरी कुजबुज: युतीच्या गप्पा, टेबलावर दुरावा

Khari Kujbuj Political Satire: काँग्रेसचे कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, जे काँग्रेस सोडून गेले होते, ते हल्लीच स्वगृही परतले. शनिवारी त्यांच्या मुलाचे लग्न होते. लग्नाला अनेक राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी हजर होते.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

युतीच्या गप्पा, टेबलावर दुरावा

काँग्रेसचे कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, जे काँग्रेस सोडून गेले होते, ते हल्लीच स्वगृही परतले. शनिवारी त्यांच्या मुलाचे लग्न होते. लग्नाला अनेक राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी हजर होते. त्‍यात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा, ‘गोवा फॉरवर्ड’चे विजय सरदेसाई यांची उपस्थिती होती. युरी-एल्टन यांच्यासोबत काँग्रेसचे सुनील कवठणकर, अमित पालेकर एका टेबलावर बसून मेजवानीचा आस्वाद घेत असताना उपस्थितांनी पाहिले. विजय सरदेसाईंच्या टेबलावर जाऊन वा त्यांना आपल्या टेबलवर बोलाविण्याचे सौजन्य कुणीही दाखविले नाही वा सरदेसाईही तिकडे गेले नाहीत. नेत्यांचे हे कर्तृत्व पाहिले तर एका बाजूला युतीच्या गप्पा करायच्या आणि प्रत्यक्षात मात्र एकमेकांचे तोंड पाहायचे नाही, असाच काहीसा संदेश त्यांच्या या वर्तनावरून दिसून आला. ∙∙∙

केपेत एसटी उमेदवाराची मागणी!

राजकीय आरक्षण लागू होवो अथवा न होवो, केपे मतदारसंघ हा एसटीबहुल मतदारसंघ असल्यामुळे काँग्रेस (Congress) पक्षाने या मतदारसंघात एसटी उमेदवाराला उमेदवारी देऊन आपले एसटी प्रेम व्यक्त करावे अशी मागणी आता एसटी समाजातील युवा ब्रिगेड करायला लागली आहे. एसटी आरक्षण मिळावे म्हणून ज्यांनी प्रारंभापासून जनजागृती सुरू केली ते केपे मतदारसंघातील एसटी वकील जुआंव फर्नांडिस यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरायला लागली आहे. ख्रिस्ती ट्रायबल संघटनेच्या बॅनरखाली जुआंव फर्नांडिस चांगले काम करीत असून केपे मतदारसंघात एसटी आमदार देण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेण्याची मागणी जोर धरत आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: खाकी वर्दीचा धाक आता संपला?

कुडचडे मतदारसंघ होणार ‘सोलर’?

सध्याचा जमाना विविध सवलती आणि ‘फ्री’ सेवेचा आहे. महिलांना मोफत बससेवा, ज्येष्ठांना व निराधारांना आर्थिक आधार... गृहिणींना आधार, युवकांना विविध सवलती व वेगवेगळ्या सबसिडी जाहीर केल्या की विजय नक्की हे गणित आता राजकीय पक्षांना व राजकारण्यांना समजले आहे. कुडचडे मतदारसंघाचे विद्यमान आमदार नीलेश काब्राल यांनी आपल्या मतदारसंघात एक अभिनव योजना जाहीर केली आहे. ‘मोफत सोलर कनेक्शन’ या योजनेंतर्गत सरकारी सबसिडी बरोबरच उर्वरित रक्कम कर्ज रूपात मिळणार आहे आणि कर्जाचे हप्ते नीलेश काब्राल भरणार असे जाहीर केले आहे. आता पाहूया या योजनेचा काब्राल यांना निवडणुकीत किती फायदा होतो. काब्राल जिंकले तर हप्ते भरणार आणि हरले तर..? ∙∙∙

मतदारांचा हवाला

म्हापशात भाजप आपली जागा पक्की मानतो; मात्र उमेदवारीचा मुद्दाही समोर येऊ लागला आहे. विधानसभा निवडणूक जवळ येताच इच्छुकांनी अपेक्षा व्‍यक्‍त केल्‍या आहेत. विद्यमान आमदार ज्योशुआ डिसोझा यांचे तिकीट कापले जाणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर ‘मतदार माझे राजकीय भवितव्य ठरवतील,’ असे विधान ज्योशुआ यांनी अलीकडे केले. वरकरणी हे विधान आत्मविश्वासाचे वाटत असले, तरी राजकीय वर्तुळात त्याचे वेगळेच अर्थ काढले जात आहेत. आपणच उमेदवारीचे निर्विवाद दावेदार आहोत, हे ठासून सांगण्याऐवजी मतदारांवर निर्णय सोपवण्याची वेळ का आली, असा सवालही उपस्थित होतोय. ज्योशुआ यांच्या या विधानाने प्रतिस्पर्ध्यांचे मनोबल मात्र वाढले असावे. आता खरी उत्सुकता भाजपच्या निर्णयाची. म्हापशात कमळ कुणाच्या हातात देणार, याची चर्चा सुरू असतानाच ज्योशुआ यांना मतदारांचा कौल आधीच आठवू लागला आहे, हीच या राजकारणातील गंमत! ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: हम भी कुछ कम नहीं!

कुर्टीला ओंगळवाणे स्वरूप!

कुर्टीतील बाबल्याखळी भागात चक्क गटारांवर बेकायदा बांधकामे करण्याचे प्रकार घडले आहेत, एवढेच नव्हे तर अशा गटारांत सांडपाण्यासह मलमूत्र विसर्जनही होत असल्याने परिसरात ओंगळवाणी स्थिती आहे. हा विषय पंचायतीच्या ग्रामसभेत आल्यानंतर गटारांवरील बांधकामे तोडण्याचा निर्णय झाला. आता ही बांधकामे काही एका रात्रीत झालेली नाहीत, त्यामुळे या बांधकामांना अभय मिळाले म्हणूनच तर अशी बेकायदा बांधकामे फोफावली आहेत, केवळ बाबल्याखळीच नव्हे तर कुर्टी हा फोंड्याचा उपनगरी भाग असल्याने अनेक ठिकाणी गटारांवर थेट बांधकाम आणि गटारात सांडपाणी मलमूत्र विसर्जनाचे प्रकार सर्रासपणे झाले आहेत, आता हे सर्व रोखायचे आणि स्वच्छ सुंदर कुर्टी करायची म्हणजे खरेच मोठे काम आहे बाबा... तरीपण सर्वांना शुभेच्छा, असेच सुजाण नागरिक म्हणताहेत. ∙∙∙

फोंड्यात काँग्रेस सक्रिय

फोंड्यात काँग्रेस बरीच सक्रिय झाली आहे. राजेश वेरेकर हे कुशावती जिल्हा प्रमुख असल्याने त्यांना दक्षिण गोव्यावर लक्ष द्यावे लागते. त्यात फोंडा हा आमदाराविना मतदारसंघ असून या मतदारसंघात अनेक विकासकामे खोळंबली आहेत. ही कामे करण्याबरोबरच फोंडावासीयांना जे चांगले ते देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षातर्फे केला जाईल, अशी ग्वाही राजेश वेरेकर देताना दिसत आहेत. सध्या फोंड्यात काँग्रेसकडून बैठकांचा सपाटा सुरू आहे. काँग्रेसचे बडे नेतेही फोंड्याला भेट देतात, त्यामुळे यावेळेला फोंडा काबीज करायचाच, असा चंग या लोकांनी बांधला आहे की काय, अशीच चर्चा होताना दिसत आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: राजकारण्यांचे भक्त...

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक...

गोव्याच्या ११३ वर्षांच्या खाद्य परंपरेचा आस्वाद जोपासलेल्या पणजीतील प्रतिष्ठित ‘कॅफे तातो’मध्ये रविवारी सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाऊन तेथील नाश्त्याचा आनंद घेतला. या उपाहारगृहाच्या ११३ वर्षांच्या वारशाचे जतन केल्याबद्दल धुरी कुटुंबीयांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. ‘कॅफे तातो’ने गोव्याच्या अस्सल चवी आणि खाद्य-परंपरा जपून गोमंतकीयांच्या अनेक पिढ्यांची सेवा केली असल्याचेही यावेळी त्यांनी आवर्जून नमूद केले. विशेष बाब म्हणजे ‘कॅफे तातो’ हे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचेही नाश्त्याचे ठिकाण होते, अनेकदा उपहाराचे पदार्थ ते येथूनच मागवित. विशेष बाब म्हणजे सावंत यांनी भेट दिल्यानंतर पर्रीकरांच्या आठवणीही धुरी कुटुंबातील सदस्यांमध्ये ताज्या झाल्या. ∙∙∙

अपूर्व दळवी यांचा ‘बिग कॅच’

सध्या फोंड्यात राजकीय हालचालींना उत आला असून या सर्व हालचालीचा सेंटर पॉईंट अपूर्व दळवी हे झाले आहेत. काल रविवारी शेकडो तरुणांनी अपूर्व दळवी यांच्या ‘प्रोग्रेसिव्ह फोंडा’ गटात प्रवेश करून त्यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी सुमारे २५० जणांचा समावेश होता. स्व. केतन भाटीकर यांचे कट्टर समर्थक लक्ष्मण नागूल यांचाही या गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये समावेश होता. अपूर्व दळवी यांच्यासाठी हे मोठे यश मानले जात आहे. त्याशिवाय साहिल मुजावर, अश्पाक मीराभाय, मेहताब खान आणि इम्तियाज मेहताब काजी यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यापूर्वी मोठमोठ्या राजकारण्यांनी लक्ष्मण यांचा पाठिंबा आपल्याला मिळवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना तो मिळवता आला नव्हता. मात्र, अपूर्व यांनी ते करून दाखवले आहे. आता लक्ष्मणची साथ असल्यावर अपूर्वचे पारडे अधिकच जड झाले असे म्हटले तर त्यात काही वावगे ठरणार का? ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: निवडणूक आणि नरकासुर स्पर्धा

पोलिसांची तत्परता...

पोलिसांच्या कामगिरीबाबत नेहमीच टीका होत असते, पण त्यांच्यातील माणुसकीचीही चांगली उदाहरणे आहेत. दोन दिवसांपूर्वी याचा प्रत्यय फातोर्डा येथे आला. फातोर्डा पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल कल्पेश नागवेकर आणि अश्याक कलबुर्गी फातोर्डा येथील ‘पीपल्स पाथ’ परिसरात सेवा बजावत असताना एका व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आला. या प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने त्या व्यक्तीला सीपीआर देत प्राथमिक मदत केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीला पुढील उपचारांसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखलही केले. या दोघा पोलिसांचे सध्या कौतुक होत आहेत. ∙∙∙

पुन्‍हा ‘त्‍याच’ शैलीमुळे नाराजी

गेल्‍या मे महिन्यात रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाच्‍या (आरजी) अध्‍यक्षपदाचा राजीनामा देत राजकीय संन्‍यास घेतलेल्‍या मनोज परब यांनी रविवारी पुन्‍हा आरजीत प्रवेश केला. सहकारी अजय खोलकर, विश्‍‍वेश नाईक यांनी परब यांच्‍या पक्षप्रवेशाची जय्‍यत तयारी केली होती आणि पर्वरीतील गाडगे महाराज सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला आरजी कार्यकर्त्यांनीही उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. पक्षात प्रवेश केल्‍यानंतरच्‍या भाषणात परब यांनी मी सध्‍याच्‍या नाही, तर २०२२ पूर्वीचा मनोज परब असल्‍याचे सांगत, आमदार वीरेश बोरकर यांच्‍यावर सडकून टीका केली. यापूर्वी परब यांच्‍याबाबत ज्‍या ‘शैली’विषयी आक्षेप घेतला जात होता, त्‍याच शैलीने पुढे जाणार असल्‍याचे त्‍यांनी जाहीर केल्‍यानंतर कार्यकर्त्यांत उत्‍साह पसरला. मतदारांकडून मात्र नाराजी वर्तवण्‍यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: 'आरजी'च्या दोन्ही बाजू आमने-सामने

काँग्रेस खरोखरच ‘सुशेगाद’ आहे का?

गोमंतकीय ‘सुशेगाद’ आहेत हे वाक्य आम्ही कित्येक वर्षांपासून ऐकत आलो आहोत. ‘सुशेगाद’ हा पोर्तुगीज शब्द म्हणजेच आरामात राहणारा. निवडणुका अगदी दोन ते तीन महिन्यांवर आलेल्या असताना गोव्यात कॉंग्रेस पक्ष मात्र ‘सुशेगाद’ आहे असे विजयबाब म्हणतात. जेव्हा इतर पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केलेली असताना कॉंग्रेस पक्षाने गोवा फॉरवर्ड किंवा रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (वीरेश बोरकर गट) यांच्याकडील युती अजून निश्चित केलेली नाही. अजुनही बोलणी होतात, मध्येच बंद पडतात. यामुळे विजयबाबसुद्धा थोडे नाराज आहेत. त्यांनी एक चांगले केले आहे की युतीसाठी न थांबता आपला प्रचार सुरू केला आहे. मात्र, त्यांना युती लवकरात लवकर व्हावी असे वाटत आहे. गोमंतकीय ‘सुशेगाद’ असू शकतो, पण राजकीय पक्ष कसा शांत असू शकतो असे विजयबाबचे मत आहे. गोमंतकीयांना भाजप विरोधात योग्य व चांगला पर्याय हवा आहे. त्यामुळे लोकांनासुद्धा विरोधी पक्षांमध्ये मजबूत युती हवी आहे, असे सध्या तरी गोमंतकीयांच्या बोलण्याचा कानोसा घेता कळून येते.∙∙∙

विजय पै खोत ‘कम बॅक’च्या तयारीत

काणकोणचे माजी आमदार विजय पै खोत पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागले आहेत. ते काणकोणच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. आता त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत ते कोणत्या पक्षाच्या उमेदवारीवर मैदानात उतरणार, काँग्रेस की गोवा फॉरवर्ड पार्टी याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. त्याला कारण म्हणजे हल्लीच त्यांच्या काँग्रेस तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाच्या नेत्यांशी बैठका झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. स्वतः विजयबाब मात्र ताकास तूर लावू देत नाहीत. तूर्त ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’. ∙∙∙

आमदार वीरेश यांचा ‘बॉम्ब’

रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाची दोन शकले पडल्यानंतर मनोज परब पुन्हा राजकारणात परतण्याच्या आदल्या दिवशी शनिवारी रात्री आमदार वीरेश बोरकर यांनी ‘बॉम्ब’ टाकला. मनोज परब यांनी सुरू केलेल्या एका कंपनीविषयी आमदार बोरकर यांनी जी माहिती एका व्हिडिओतून दिली आहे, त्यावरून असे आरोप-प्रत्यारोप आता पक्षाचे मूळ मालक कोण, हे जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत होणार हे नक्की. काही झाले तरी बोरकर यांनी जे काही सांगितले आहे, ते पाहता गोव्यातील जनतेला किंवा ‘आरजी’वर प्रेम करणाऱ्यांना नक्कीच विचार करायला लावणारे आहे. या आरोपांवर परब यांचे उत्तर येणार हे यावरून स्पष्ट आहेच. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: निवडणूक आणि नरकासुर स्पर्धा

परब की बोरकर? खरा कोण?

एकेकाळी एकमेकांचे सर्वात जवळचे मित्र असलेल्‍या मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांच्‍यात राजकारणामुळे प्रचंड कटुता निर्माण झालेली आहे. दोन्‍ही नेते एकमेकांवर आरोपांच्‍या फैरी झाडत आहेत. त्‍यातच आमदार बोरकर यांनी मनोज परब यांच्‍या कपाळावर ‘सेटिंग’बाज असल्‍याचा शिक्‍का मारला. परब यांनी शिवसेना आणि पुण्‍यातील बिल्‍डरच्‍या आशीर्वादाने स्‍वत:ची कंपनी सुरू केली आणि १५० फ्‍लॅटच्‍या रंगरंगोटीचे कामही मिळवले, असा आरोपही त्‍यांनी केला. त्‍याचवेळी परब यांनी ही कंपनी आपल्‍या मामाची असल्‍याचे सांगत, व्‍यवसायासाठी गोमंतकीय बिल्‍डरांच्‍या संपर्कात असल्‍याचे मान्‍य केले. त्‍याचवेळी परप्रांतीय एकाही बिल्‍डरशी आपले संबंध नसल्‍याचा निर्वाळाही त्‍यांनी दिला. आपल्‍याच दोन्‍ही नेत्‍यांनी एकमेकांवर आग ओकण्‍यास सुरुवात केल्‍याने दोघांपैकी खरा कोण? याचा शोध आरजीच्‍या कार्यकर्त्यांनी सुरू केला आहे. ∙∙∙

आत्ताच कसे जागे झाले?

बाणावलीतील नेते तथा माजी आमदार कायतू सिल्वा यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने उमेदवारी देण्यासाठी ४० लाख रुपये घेतल्याचा आरोप करून दक्षिण गोव्यात खळबळ उडवून दिली आहे. पक्षाने आपल्याला उमेदवारी नाकारली, तरी यंदा अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या आरोपांकडे काँग्रेस नेते फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसते. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ‘हे आरोप आत्ताच का? आतापर्यंत गप्प का होते?’ असा सवाल करून सिल्वा यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे इतकी वर्षे मौन बाळगल्यानंतर आता अचानक आरोप करण्यामागचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता आरोपांची उठणार याचाही अंदाज येतो. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: जनतेचा मंच की तिकिटाचा पंच?

आरजीतील वाद, किती खरा किती खोटा?

इंग्रजीत ‘कॅरेक्टर असेसेनेशन’ म्हणून एक शब्दप्रयोग आहे. हा एकप्रकारचा माणसाच्या चारित्र्याचा खून असतो. चारित्र्यावर शिंतोडे उडविणारे अनेक असतात. गोव्याच्या मातीत जन्माला आलेल्या रिव्होल्युशनरी गोवन्स या पक्षातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. पक्षात जातीय वाद असल्याचाही आरोप होत आहे. मराठा समाजातील मनोज परब यांनी भंडारी नेतृत्वाला विरोध केला असा दावा वीरेश बोरकर समर्थक करताना दिसतात. मनोज परब विरुद्ध वीरेश बोरकर वादाला जातीचे नाव देणे गैर असल्याचे काही आरजीवाले म्हणतात. खरे म्हणजे मराठा समाजातील आरजी कार्यकर्ते मनोज परब यांना सोडून वीरेश बोरकर यांच्या कळपात गेले आहेत. आदित्य देसाई व विशाल देसाई या आरजी कार्यकर्त्यांनी तर मनोज परब यांना कठोर विरोध केला आहे. मग जातीचा वाद आला कुठून? बरे झाले खोलकर एसटी समाजातील, नाहीतर याला काहीजण सवर्ण विरुद्ध आरक्षित गट असे स्वरूप द्यायला मागे राहिले नसते. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.