खरी कुजबुज: जनतेचा मंच की तिकिटाचा पंच?

Khari Kujbuj Political Satire: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हापसा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
Khari Kujbuj Political Satire
Khari KujbujDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

जनतेचा मंच की तिकिटाचा पंच?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हापसा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी दिसून येत आहे. नागरी समस्यांवर आवाज उठवणाऱ्या ‘टुगेदर फॉर म्हापसा’ या स्थानिक मंचाने तर पुढील आमदार आपल्याच गटाचा असेल असा ठाम दावा ठोकल्याने राजकीय विश्‍‍लेषकांच्‍या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात मतांचे हे नवे गणित नेमके कसे जुळणार, हा खरा प्रश्‍‍न आहे. दुसरीकडे, नागरी प्रश्नांच्या नावाखाली एकत्र आलेले मंचाचे काही प्रमुख चेहरे स्वतःच पडद्यामागून काँग्रेस, मगो आणि शिवसेना अशा प्रमुख पक्षांच्या उमेदवारीवर डोळा ठेवून असल्याची कुजबुज सुरू आहे. त्यामुळे हा जनतेचा दबावगट म्हणून उभा राहील की इच्छुकांसाठी केवळ तिकीट मिळवण्याची राजकीय पायरी ठरेल, यावर म्हापशाच्या कट्ट्यांवर चर्चा रंगली आहे.

चर्चिलचा पुन्‍हा ‘शांबा’

चर्चिल आलेमाव यांना बाणावलीचे आमदार व्‍हेंझी व्‍हिएगस यांच्‍याबद्दल मत्‍सर आहे आणि तो त्‍यांनी कधी लपवून ठेवला नाही. काही वर्षांपूर्वी व्‍हेंझी यांनी विधानसभेच्‍या आवारात पत्रकारांशी बोलताना चर्चिलबद्दल एक प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना, ‘अरे ओ सांबा, कितने आदमी थे’ असे म्‍हटले होते. आता चर्चिल त्‍याचीच आठवण सतत काढत असतात आणि आपल्‍या स्‍टाईलमध्‍ये ‘अरे आे शांबा’ असे म्‍हणतात. सोमवारी त्‍यांनी वार्का येथे आपल्‍या निवासस्‍थानी पत्रकार परिषद घेताना पुन्‍हा एकदा या शांबाचा उल्‍लेख केला. जो आमदार विधानसभेत ‘शांबा, शांबा’ करतो, तो मतदारसंघाप्रति खरेच गंभीर आहे का, असा सवाल त्‍यांनी केला. काही का असेना, यापूर्वी चर्चिल यांचे ‘ऑन फातोर्डा ग्राऊंड’ हे वाक्‍य गाजले होते. आता त्‍याची जागा कदाचित हा ‘शांबा’ घेऊ शकेल!

Khari Kujbuj Political Satire
Goa Transport Rules: गोव्यातील स्थानिक टॅक्सीचालक, बसमालकांच्या संरक्षणासाठी मोटार वाहन नियम बदला; ताम्हणकरांची मागणी

पोलिसांची ‘पक्षपाती तत्परता’

सर्वसामान्य नागरिकावर गुन्हा दाखल झाला की पोलिसांची अटक करण्यासाठीची तत्परता पाहण्यासारखी असते. जणू अटक झाली की तपासाला गती मिळतेच! मात्र, आरोपी पोलिस कर्मचारी असेल तर हीच तत्परता कुठे गायब होते, असा प्रश्न पडतो. मडगावच्या एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणात उपनिरीक्षक आणि पोलिसांना अटक झाली नाही. आता अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपानंतर निरीक्षक विकास देयकर निलंबित झाला; पण त्‍याच्‍या अटकेचा पत्ता नाही. चौकशीला सहकार्य करतो म्हणून अटक नको, हा निकष असेल तर तो सर्वसामान्यांनाही लागू व्हायला हवा ना? कायदा सर्वांसाठी समान म्हणतात; मग खाकी वर्दीसमोर त्याच्या पावलांना बेडी का पडते, असा प्रश्‍‍न सर्वसामान्‍य लोक करतात

विजयचा आदर्श ‘फिडेल कॅस्ट्रो’

क्‍युबाचे राष्‍ट्राध्‍यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांना काहीजण हुकूमशहा म्‍हणतात, तर काहीजण त्‍यांना सुधारणावादी असेही म्‍हणतात. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्‍या बाबतीतही काहींचा तोच समज आहे. काहीजण विजयला ‘आपल्‍याला पाहिजे तेच करणारा’ असे म्‍हणतात (यात त्‍यांच्‍या विरोधकांचा समावेश अधिक आहे) तर काहीजण त्‍यांच्‍यामुळेच फातोर्ड्याचा कायापालट झाला असे म्‍हणतात. काल ‘पीपल्‍स पाथ’ या मुद्यावरुन विरोधकांनी सरदेसाई यांना टार्गेट केले असता त्‍याला उत्तर देताना स्‍वत: सरदेसाई यांनी, ‘फिडेल कॅस्ट्रो’ हा माझा आदर्श असे सांगितले. ते म्‍हणाले, कॅस्ट्रो यांनी आपले नाव कुठल्‍याही रस्‍त्‍याला किंवा चौकाला द्यायचे नाही असा फतवा काढला होता. मीही त्‍याच मताचा आहे. त्‍यामुळे माझ्‍या मतदारसंघात हा जो पीपल्‍स पाथ तयार झालाय, त्‍याची पाटी लावून मी उद्‍घाटन केले नाही. पाटीवर माझे नाव यावे ही हौस मला नाही, असे ते म्‍हणाले. आता यातून कोणी काय अर्थ घ्‍यावा, हा ज्‍याचा-त्‍याचा प्रश्‍‍न. कदाचित काहीजण विजयने आपण फिडेल कॅस्ट्रोसारखा हुकूमशहा असल्‍याचे मान्‍य केले, असेही म्‍हणतील.

फोंड्यात मतदारांचा ‘थांबा आणि पाहा’

फोंड्यात सध्या मतदारांपेक्षा राजकीय पक्षच अधिक संभ्रमात असल्याचे दिसते. मगो-भाजपची युती होणार की पुन्हा एकदा ‘एकला चलो रे’चा नारा घुमणार? काँग्रेस-गोवा फॉरवर्ड आणि आरजीचीही गणिते अजून गुलदस्त्यातच! त्यामुळे भाजप, मगो, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीचे मतदार सध्या ‘थांबा आणि पाहा’च्या भूमिकेत आहेत. गेल्या निवडणुकीत मगो-भाजपची युती झाली नव्हती; यंदाही तोच इतिहास पुन्हा घडणार की मैत्रीचा हात पुढे येणार, याची उत्सुकता आहे. नेत्यांचे युतीचे गणित जुळेपर्यंत मतदारांनीही आपले पत्ते उघडायचे नाहीत, असेच दिसते.

नरकासुरांची आंघोळ!

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाने नरकासुरांना काही सोडले नाही. लाखो रुपये खर्चून उभारलेले अक्राळविक्राळ नरकासुर पावसाच्या तडाख्यात भिजून चिंब झाले. मग काय, कुणी ताडपत्रीचा आधार घेतला, तर कुणी प्लास्टिकच्या पिशव्यांनी नरकासुराला झाकण्याची धडपड केली. पहाटेपर्यंत काही नरकासुर वाळत घातल्याचेही दृश्य दिसले. युद्धाला सज्ज असलेला नरकासुर पावसासमोर मात्र हतबल झाला. शेवटी ज्याचे दहन करायचे, त्याला आधी पावसानेच भिजवून काढले. यंदा नरकासुराच्या वधाआधी पावसानेच त्याची अांघोळ घातली म्हणायची! नरकासुर हा खरा म्‍हणजे पर्यारवणाचा विद्‌ध्‍वंसक. प्रदूषण तर तो करतोच. निसर्गानेच दरवर्षीप्रमाणे यंदाही त्‍याला धडा शिकविण्‍याचा बेत केलेला दिसतोय!

जनतेचा मंच की तिकिटाचा पंच?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हापसा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी दिसून येत आहे. नागरी समस्यांवर आवाज उठवणाऱ्या ‘टुगेदर फॉर म्हापसा’ या स्थानिक मंचाने तर पुढील आमदार आपल्याच गटाचा असेल असा ठाम दावा ठोकल्याने राजकीय विश्‍‍लेषकांच्‍या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात मतांचे हे नवे गणित नेमके कसे जुळणार, हा खरा प्रश्‍‍न आहे. दुसरीकडे, नागरी प्रश्नांच्या नावाखाली एकत्र आलेले मंचाचे काही प्रमुख चेहरे स्वतःच पडद्यामागून काँग्रेस, मगो आणि शिवसेना अशा प्रमुख पक्षांच्या उमेदवारीवर डोळा ठेवून असल्याची कुजबुज सुरू आहे. त्यामुळे हा जनतेचा दबावगट म्हणून उभा राहील की इच्छुकांसाठी केवळ तिकीट मिळवण्याची राजकीय पायरी ठरेल, यावर म्हापशाच्या कट्ट्यांवर चर्चा रंगली आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Police Suspension: लाचखोरी, कोठडीतील मारहाण ते लैंगिक अत्याचाराचे आरोप; गोव्यात 10 महिन्यांत 26 पोलिस निलंबित!

परतायचेय नक्की, मग मुहूर्त कशाला?

‘आरजी’त अंतर्गत वाद उफाळल्यानंतर मनोज परब यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत राजकारणातून संन्यास जाहीर केला. मात्र, ते पुन्हा पक्षात सक्रिय होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. अजय खोलकरही त्यांच्या पुनरागमनाचे संकेत देत आहेत. पक्षाचे नुकसान टाळण्यासाठी म्‍हणे परब परतणार असल्याचे सांगितले जाते. पण मग पक्षाची काळजी एवढीच होती, तर राजीनाम्यानंतर लगेच पुनरागमन का केले नाही? विधानसभा निवडणुकीला अवघे तीन महिने उरले असताना प्रवेशाचा मुहूर्त अजूनही का सापडत नाही? राजकारणातून संन्यास घेणे सोपे, पण त्यातून परतण्याचा मुहूर्त शोधणे कठीण, अशीच काहीशी अवस्था झाली आहे. त्‍यात अजय खोलकर यांनी वाचाळपणामुळे टीकेचे धनी होऊन ‘पनवती’ ओढवून घेतली आहे.

अजयचा बोलविता धनी कोण?

अजय खोलकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यंमुळे आक्रमक झालेल्या ‘आरजी’च्या प्रदेशाध्यक्ष शविना शिरोडकर यांनी पत्रकार परिषद घेत खोलकर यांचा चांगलाच समाचार घेतला. कुणाच्या तरी सांगण्यावरूनच खोलकर यांनी आपल्याबाबत अशी वक्तव्ये केली, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आरजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून एका माजी नेत्‍यावर संशय घेतला जात आहे. त्यातच त्‍याने सोशल मीडियाद्वारे खोलकर यांची बाजू घेत या संशयाला अधिक बळकटी दिली आहे. त्‍यामुळे आगीत आणखी तेल ओतले गेले आहे. राज्‍यभरातही खोलकर यांच्‍या वक्तव्‍याचा निषेध करण्‍यात आला. अखेर त्‍यांनी माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्‍याचा प्रयत्‍न केला. पण आता वणवा पेटलेलाच आहे, तो शांत करणे अजय यांना तेवढे सोपे नाही.

ग्राहकांच्या ताटात विष!

मडगावात ‘एफडीए’च्या पथकाने छापा टाकून ३१ हजार रुपयांचा नियमबाह्य अन्नसाठा जप्त करून नष्ट केला. म्‍हापसा येथेही कारवाई करण्‍यात आली.. राज्‍यभर ही कारवाई सुरूच आहे. दूध, खरवस आणि तळलेला कांदा अशा पदार्थांना ना वैध परवाना, ना आवश्यक लेबल; काहींची मुदतही संपलेली. म्हणजे ग्राहकांच्या ताटात काय वाढले जाते, याची व्यापाऱ्यांनाच पर्वा नाही. नफा कमावण्यासाठी लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा धंदा काही नवा नाही. मात्र, एफडीएने एखाद्या दिवशी छापा टाकून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा नियमित तपासण्यांचा धडाका लावावा. कारण भेसळखोरांचा धंदा रोज सुरू असतो; मग सरकारी कारवाईलाच सुट्टी कशाला?

संशयाचे पाणी साचलेच!

कोंब येथील सांडपाणी समस्येची पाहणी करण्याचे आदेश खुद्द आरोग्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पाहणी निश्चित झाली. मात्र, प्रभव नायक यांच्या म्हणण्यानुसार, पाहणीला उपस्थित राहण्याचे पत्र मिळाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पाहणी रद्द झाल्याचे पत्रही मिळाले. त्यात पत्रांच्या तारखांबाबतही गोंधळ असल्याचे दिसते. वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगे येथील बैठकीला जावे लागणार होते, हे कारण असेल तर दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करता आली नसती का? वेळ बदलता आली नसती का? की पाहणी रद्द होण्यामागे आणखी काही कारण आहे? सांडपाण्याची समस्या जागेवर, पण पाहणी मात्र कागदावरच. आता मडगावकरांना प्रश्न पडला आहे, पाहणी रद्द करण्याचे कारण योग्य की त्या कारणाचीच चौकशी व्हायला हवी?

अजयचा बोलविता धनी कोण?

अजय खोलकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यंमुळे आक्रमक झालेल्या ‘आरजी’च्या प्रदेशाध्यक्ष शविना शिरोडकर यांनी पत्रकार परिषद घेत खोलकर यांचा चांगलाच समाचार घेतला. कुणाच्या तरी सांगण्यावरूनच खोलकर यांनी आपल्याबाबत अशी वक्तव्ये केली, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आरजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून एका माजी नेत्‍यावर संशय घेतला जात आहे. त्यातच त्‍याने सोशल मीडियाद्वारे खोलकर यांची बाजू घेत या संशयाला अधिक बळकटी दिली आहे. त्‍यामुळे आगीत आणखी तेल ओतले गेले आहे. राज्‍यभरातही खोलकर यांच्‍या वक्तव्‍याचा निषेध करण्‍यात आला. अखेर त्‍यांनी माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्‍याचा प्रयत्‍न केला. पण आता वणवा पेटलेलाच आहे, तो शांत करणे अजय यांना तेवढे सोपे नाही.

...म्हणून भाजप महिला मोर्चा शांत!

‘आरजी’च्या प्रदेशाध्यक्ष शविना शिरोडकर यांच्याबाबत अजय खोलकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे आरजी समर्थक महिलाही आक्रमक झाल्या असून, त्या सोशल मीडियाद्वारे खोलकर यांच्यावर निशाणा साधत आहेत. महिला काँग्रेसनेही यात मागे न राहता खोलकर यांचा निषेध नोंदवला. परंतु, महिलांबाबतचा अन्याय सहन करून घेणार नाही, असा नारा कायम देणाऱ्या भाजप महिला मोर्चाच्या एकाही महिला पदाधिकाऱ्याने यावर भाष्य केले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपचे आरजीशी सूत जुळले असते तर भाजप महिला मोर्चाने खोलकरांना चांगलेच फैलावर घेतले असते. परंतु, तसे काही नसल्याने मोर्चाने याकडे दुर्लक्ष केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Khari Kujbuj Political Satire
Goa PF Registration: सरकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! 2,220 जणांना पीएफ आणि विमा योजनेचा लाभ

राजकारण अन् कंबरेखालची भाषा

गोव्याच्या राजकारणात नवा पर्याय म्हणून उदयास आलेल्या ‘आरजी’कडून जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, पक्षातील गटबाजी आणि अंतर्गत संघर्ष पाहता हा पर्याय आता अधोगतीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप हे नवीन नाहीत; पण त्यालाही काही मर्यादा असतात. आरजीच्या महिला पदाधिकाऱ्यांविषयी अजय खोलकर यांनी वापरलेली भाषा अनेक गोमंतकीयांच्या जिव्हारी लागली. समाजमाध्यमांवरही त्यांच्यावर टीकेची झोड उठली. राजकारणात विरोधकांवर तुटून पडण्याचा अधिकार आहे; पण महिलांचा सन्मान पायदळी तुडवण्याचा परवाना कुणालाच नाही. विचारांची लढाई विचारांनी लढायची की कंबरेखालच्या भाषेने? आरजीने बदलाचे स्वप्न दाखवले होते; आता मात्र जुन्याच राजकीय संस्कृतीची लागण झाली की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

वाचनाची दिवाळी अंधारात?

एकेकाळी दिवाळी आली की महाराष्ट्रातील नामवंत दिवाळी अंकांची गोव्यातही आतुरतेने वाट पाहिली जायची. कथा, कादंबऱ्या, कविता आणि वैचारिक लेखांनी अंकांची पाने फुलायची. आता मात्र दिवाळी अंकांपेक्षा मोबाईलवरील रिल्सचीच प्रतीक्षा अधिक. तरुण पिढीला मराठी वाचनासाठी वेळ नाही, तर मोठ्यांना वेळ असूनही उसंत नाही. त्यात कागद, छपाई आणि वितरणाचा खर्च वाढल्याने प्रकाशकांचे गणितही बिघडले आहे. काही अंकांनी गाशा गुंडाळला, तर काहींची पाने आणि प्रती दोन्ही कमी झाल्या. प्रश्न एवढाच की, दिवाळी अंकांची परंपरा संपतेय की वाचकांची वाचनाची भूकच हरवतेय?

मॉकड्रिलच्या नावाखाली माहितीचा ‘बॉम्ब’

उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. तपासण्या झाल्या, यंत्रणा कामाला लागली; पण संशयास्पद काहीच सापडले नाही. पत्रकारांनी विचारणा केली असता, पर्वरीच्या अधिकाऱ्यांनी तर हे मॉकड्रिल असल्याचे सांगितले. आता प्रश्न असा की, बॉम्बची धमकी मॉकड्रिलचा भाग होती की पोलिसांनी दिलेली माहितीच मॉकड्रिलचा भाग होती? अधिकृत खुलासा नाही, तपासाचा तपशील नाही; पण संभ्रम मात्र कायम. बॉम्बच्या अफवेपेक्षा पोलिसांच्या उत्तरानेच अधिक गोंधळ उडवला. आता पोलिस अधीक्षकांनीच सांगावे, ही सुरक्षा यंत्रणेची रंगीत तालीम होती की माहिती देण्यातील गोंधळाची तालीम?

घराणेशाहीचा ‘कौटुंबिक विस्तार’

विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र, काही राजकीय कुटुंबांमध्ये उमेदवारीची तयारी एकट्याची नसून संपूर्ण कुटुंबाचीच असल्याची चर्चा आहे. ढवळीकर, राणे, लोबो, मोन्सेरात, आलेमाव कुटुंबांतील अनेक चेहरे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ४० आमदारांच्या विधानसभेत घराणेशाहीचा वाटा किती, याची चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, घराणेशाहीला विरोध करणाऱ्यांकडून एकाच कुटुंबातील किती जणांना उमेदवारी मिळते, याकडेही लक्ष लागले आहे. पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू असताना काही घरांमध्‍ये मात्र उमेदवारीची चर्चा कौटुंबिक बैठकीतच होत आहे. आता निवडणूक जनतेसाठी की काही राजकीय कुटुंबांच्या विस्तारासाठी, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Agriculture Udate: काटेकणगीच्या शेतीला ग्रहण! लागवड वाढली, तरी उत्पादन घटले; दिवाळीच्या मागणीवर परिणाम होणार?

तहान लागल्यावर विहीर खणू?

यंदा पावसाने गोव्याला अपेक्षेइतकी साथ दिली नाही. सरासरीपेक्षा ३२ टक्के कमी पाऊस झाल्याने प्रमुख धरणांतील पाणीसाठ्याबाबत आत्तापासूनच चिंता व्यक्त होत आहे. साळावली ९९ टक्के, अंजुणे ९८ टक्के भरले असले, तरी इतर धरणांतील पाणीसाठा तुलनेने कमी आहे. साळावलीतील अतिरिक्त पाण्याचा विसर्गही गेल्या वर्षीपेक्षा ४० दिवस आधी थांबला. म्हणजे निसर्गाने पाण्याचा इशारा आताच दिला आहे. मात्र, पाणी बचतीच्या जागृतीला अजून किती वेळ लागणार? उन्हाळा आला की टँकर, मोर्चे आणि पाण्यासाठी वणवण सुरू होईल. मग प्रशासन जागे होणार आणि नागरिकांच्या डोळ्यांत पाणी येणार! तहान लागल्यावर विहीर खणण्याची आपली जुनी सवय यंदाही कायम राहणार का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.