खरी कुजबुज: हम भी कुछ कम नहीं!

Khari Kujbuj Political Satire: मडगावमध्ये दिगंबर कामत यांचे बऱ्यापैकी बस्तान बसलेले असताना दोघा तरुण कार्यकर्त्यांनी जरूर राजकीय हालचाली चालविल्या आहेत.
Khari Kujbuj Political Satire
Khari KujbujDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

हम भी कुछ कम नहीं!

मडगावमध्ये दिगंबर कामत यांचे बऱ्यापैकी बस्तान बसलेले असताना दोघा तरुण कार्यकर्त्यांनी जरूर राजकीय हालचाली चालविल्या आहेत. त्यापैकी चिराग दत्ता नायक व बाबू नायक यांचे नातू प्रभव यांनी आतापासूनच मतदारांच्या गाठीभेटी घेणे चालू केले आहे. दोघेही तरुण आहेत आणि महत्त्वाकांक्षीही आहेत, परंतु दोघांमधले समान सूत्र म्हणजे दोघांनाही काँग्रेस पक्षाची उमेदवारी हवी आहे. त्या तुलनेत दिगंबर कामत यांची भाजपा उमेदवारी पक्की आहे. त्यात मडगावचे हे बाबा खात्रीने जिंकून येणार असल्याचे भाकीत प्रसारमाध्यमांनी व्यक्त केले असले तरी स्वस्त बसून राहाण्यापैकी ते नाहीत. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याप्रमाणेच ‘आमचे गोंय-विकसित गोंय वचनपूर्ती’ ही पुस्तिका देण्याच्या संधीमुळे मडगावातील प्रतिष्ठित लोकांच्या घरी भेट देणे सुरू केले असून ते इतरांपेक्षा आपण सरस आहोत, हे दाखवून देऊ लागले आहेत.

सिप्रू, कायतू जागे झाले!

निवडणुका जवळ येताच अनेक इच्छुक उमेदवार सक्रिय व्हायला लागतात. बाणावली मतदारसंघातून आपण निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याचे माजी आमदार कायतू सिल्वा यांनी जाहीर केले आहे. काँग्रेसबरोबर अन्यथा काँग्रेसशिवाय अशी घोषणा करीत नावेलीचे माजी झेडपी सिप्रू कार्दोजो यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यात भर म्हणून नावेली मतदारसंघातून वालांका आलेमाव, कुंकळ्ळी मतदारसंघातून एल्विस गोम्स यांनीही आपली उमेदवारी घोषित केल्यामुळे काँग्रेस पक्षापुढे पेच निर्माण होणार आहे. एका बाजूने काँग्रेस पक्ष इतर पक्षांशी युती करून एकसंधपणे निवडणूक लढण्याच्या प्रयत्नात आहे, तर दुसऱ्या बाजूने काँग्रेसचे घरचेच काँग्रेस पक्षाला खिंडीत पकडण्याचे प्रयत्न करू लागले आहेत.

Khari Kujbuj Political Satire
North Goa Voter List Revision: उत्तर गोव्यात मतदार यादी पुनरीक्षण सुरू; दावे-आक्षेप नोंदवण्यासाठी 11 डिसेंबरपर्यंत मुदत

म्हणे जमावबंदीचा आदेश

इफ्फीच्या स्थळापासून ५०० मिटरांत पाच किंवा त्यापेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. चित्रपट रसिक नेहमीच घोळक्याने फिरत असतात. फिरताना ते चर्चाही करत असतात. त्यांच्यापर्यंत या जमावबंदीच्या आदेशाची वार्ता पोचण्याची सुतराम शक्यता नाही. इफ्फीच्या निमित्ताने देश-विदेशातील चित्रपटप्रेमी, कलाकार आणि मान्यवर पणजीत एकत्र येणार असले तरी पाच किंवा त्यापेक्षा अधिक जणांनी एकत्र जमू नये, असा आदेश काढण्यात आला आहे. मग महोत्सवाचा आनंद घ्यायचा तरी कसा, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. चित्रपट पाहायला जातानाही चार जणांनीच जायचे की पाचव्या मित्राला बाहेरच थांबवायचे, असा नवा पेच निर्माण झाला आहे. इफ्फी हा एकत्र येण्याचा उत्सव; पण त्याच उत्सवाच्या परिसरात एकत्र येण्यावरच बंदी! मग यंदा चित्रपटांपेक्षा जमावबंदीचीच चर्चा रंगणार, हे नक्की!

दारूची नशा भोवली

गोव्यात दारू स्वस्त व मुबलक मिळत असल्याने अनेकांना मदिराचा मोह टाळता येत नाही. मात्र, दारू पिऊन अचाट साहस केले तर त्याचे परिणामही भोगावे लागतात. कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेतूल येथे दोन दिवसांपूर्वी अपघाताची एक घटना घडली, यात दोषी कारचालक हा दारूच्या नशेत होता. सुरवातीला त्याने पोलिसांकडे हुज्जत घातली खरी. मात्र, नंतर अल्कोमीटर चाचणी घेतली असता त्याचे पित्त उघड झाले. त्यानंतर तो पोलिसांशी गयावया करू लागला. तोपर्यंत वेळ टळून गेली होती. पोलिसांनी कायद्याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अद्दल घडवली व त्याची नशा उतरविली.

झेडपीची परंपरा सिद्धार्थ पुढे नेणार?

इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात. पंचायत, नगरपालिका व जिल्हा पंचायत या स्वायत्त नागरी संस्था म्हणजे आमदार, खासदार बनण्याच्या नर्सरी समजल्या जातात. दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अस्तित्वात आल्यापासून अनेक झेडपी आमदार म्हणून प्रोमोट झालेले आहेत. बाबू कवळेकर, सुभाष फळदेसाई, रेजिनाल्ड लॉरेन्स, क्लाफास डायस, उल्हास तुयेकर, आंतोन वाझ यांची आमदारकीची कारकीर्द सुरू झाली झेडपी म्हणून निवडून आल्यावर. आता विद्यमान जिल्हा पंचायतीत आमदार बनण्यासाठी एकमेव एलिजिबल उमेदवार आहेत ते विद्यमान जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धार्थ गावस देसाई. आता सिद्धार्थ देसाई यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यास ते दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीची परंपरा पुढे नेऊ शकतात.

सर्वेक्षणाची चर्चा...

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका खासगी वृत्तवाहिनीने जाहीर केलेल्या राजकीय सर्वेक्षणाने सत्ताधारी गोटात अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे. अनेक आमदारांच्या जागा असुरक्षित असल्याच्या चर्चा रंगताच, म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी थेट मैदानात उतरून डॅमेज कंट्रोल सुरू केल्याचे दिसते. ‘सर्वेक्षणे खासगी असतात, खरी सुरक्षितता मतपेटीतून जनताच ठरवते’, असा दावा करत जोशुआंनी विरोधकांचे मनसुबे उधळण्याचा प्रयत्न केला असला, तरी सर्वेक्षणातील प्रतिकूल आकड्यांमुळे आमदार महोदयांच्या गोटात अंतर्गत धाकधूक नक्कीच वाढल्याची चर्चा म्हापशाच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मागील निवडणुकीची आठवण करून देत, त्यांनी स्थिती सावरण्याचा प्रयत्न केला असला, तरी राजकीय चर्चा बाजूला ठेवून जोशुआ प्रत्यक्ष विकासकामांच्या जोरावर मतदारांचा विश्वास पुन्हा जिंकण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Khari Kujbuj Political Satire
Goa Investment Fraud: गोव्यात व्यवसायातील भागीदारीचे आमिष, भोपाळच्या कंत्राटदाराला 3.47 कोटींचा गंडा; श्रीनिवास नायकसह चौघांवर गुन्हा

न झालेली पत्रकार परिषद

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांतील रायफल शुटींग स्पर्धा २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान मांद्रेतील यश शुटींग अकादमीत घेतली जाणार आहे. याची माहिती देण्यासाठी क्रीडामंत्री रमेश तवडकर हे शुक्रवारी दुपारी १२ वाजता मंत्रालयातील आपल्या कक्षात पत्रकार परिषद घेतील असे क्रीडा संचालनालयातून कळवण्यात आले होते. पत्रकार मंत्रालयाकडे पोचले. ११.५५ च्या दरम्यान तवडकर तेथे आले. ते पत्रकारांशी आपल्या कक्षात गप्पा मारू लागले. पत्रकार परिषद सुरू होत नसल्याने पत्रकारांनी चुळबूळ सुरू करताच पत्रकार परिषद बोलावल्याची माहिती मंत्र्यांना मुळीच नसल्याचे तेथे स्पष्ट झाले. शिवाय आपणाला आणखीन १० मिनिटांनी एक महत्त्वाची बैठक आहे. ती झाल्यावर बघू असे ते म्हणाले. दरम्यानच्या काळात काणकोण मतदारसंघातील राजकीय कौलाचा अंदाज कसा लावला याचा अंदाज ते घेऊ लागले होते. बैठक झाली पण पत्रकार परिषद झालीच नाही, त्यामुळे न झालेल्या पत्रकार परिषदेची चर्चा रंगली आहे.

स्वतःच स्वतःची सुरक्षा करायची का?

आठ दिवसांसाठी राजधानीत पाहुण्यांची रेलचेल वाढणार म्हटल्यावर पोलिसांचीही राजधानीत संख्या वाढणार हे अपेक्षितच! सुरक्षा व्यवस्थेचा तगडा बंदोबस्त, रस्त्यांवर पोलिस, ठिकठिकाणी तपासणी आणि राजधानीला सुरक्षा कवच... सगळं काही चोख असणार. पण आता लोकांच्या मनात एक छोटीशी शंका डोकावू लागली आहे. राजधानीत आठ दिवस पोलिसांची एवढी फौज तैनात असेल, तर राज्याच्या इतर भागांत कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायला कोण असणार? राजधानी सुरक्षित ठेवताना बाकीच्या शहरांनी स्वतःच स्वतःची सुरक्षा करायची का? राज्यात पोलिसांची कमतरता आहे म्हणून ही चर्चा आहे बरं का...

बाबू आजगावकर फॉर्ममध्ये

पेडणेहून मागच्या विधानसभा निवडणुकीत मडगाव मतदारसंघात पाठवून देण्यात आलेले बाबू आजगावकर यांनी पुन्हा एकदा पेडण्यातून निवडणूक लढवण्याचे निश्चित केले असून त्यांनी तिथे लोकांच्या मोठ्या प्रमाणावर गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. आता कुठल्याही स्थितीत पेडण्यातून माघार नाही हे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. अशी स्थिती असताना प्रवीण आर्लेकर हे ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे निष्कर्ष काढले गेले असल्यामुळे बाबू अधिकच फॉर्ममध्ये आले आहेत.

सुव्यवस्थेच्या व्यवस्थेलाच गर्दीचा आधार

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कोयता आणि लोखंडी सळी घेऊन हल्ला केल्याची घटना राज्यात घडली, त्यात एक गंभीर जखमी झाला, तर चारजण जखमी झाले. मात्र, पोलिसांच्या कारवाईबाबत स्थानिकांमध्ये समाधानापेक्षा नाराजीच अधिक दिसून येते. लोकांनी गर्दी केली नसती, तर संशयितांना पकडलेच गेले नसते, अशाही प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. आता या प्रतिक्रिया किती खऱ्या, किती गैरसमजुतीच्या हा वेगळा विषय. पण एक मात्र नक्की, लोकांना पोलिसांनी कारवाई करावी यासाठी गर्दी करावी लागत असेल, तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या व्यवस्थेलाच गर्दीचा आधार घ्यावा लागत असल्याची चर्चा होणे स्वाभाविक आहे.

नावेली फेस्ताचा जुगार...

नावेली फेस्तात यावर्षीही जुगाऱ्यांनी आपला पाट मांडला होता. त्यासाठी मडगाव पोलिसांशी आधीच हफ्ता बुकिंग केले होते. फेस्ताच्या फेरीत लाल काळा व अंदर बाहर जुगार खुलेआम सुरू होता. नावेलीच्या एका राजकीय पक्षाच्या खंद्या समर्थकाचा जो एका पोलिस सायबाचा नातेवाईक आहे, त्याच्या पुढाकाराने हा जुगार चालू होता. पोलिसांना आधीच मॅनेज केले होते. या जुगाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, पण पोलिसांनी डोळ्याला पाणी लावण्यासाठी जुजबी कारवाई केली व ते खाल्या अन्नाला जागले, अशी चर्चा नावेलीत सुरू आहे.

देसाईंच्या राजकीय डावाची प्रतीक्षा

एकही चेंडू न खेळता फलंदाज बाद होऊ नये, यासाठी खेळपट्टीवर उतरण्याची संधी मिळणे महत्त्वाचे असते. गोवा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष चेतन देसाई यांच्याबाबतही सध्या अशीच उत्सुकता आहे. त्यांनी काणकोण मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर दावा केला असून, पक्षाकडून त्यांना कामाला लागण्याचे संकेत मिळाल्याची चर्चा आहे. दरम्यान, काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात संभाव्य युतीच्या हालचाली सुरू आहेत. गोवा फॉरवर्डनेही काणकोणवर दावा केला आहे. त्यामुळे युतीच्या जागावाटपात काणकोणची जागा कोणाच्या वाट्याला येते, याकडे लक्ष लागले आहे. मात्र, चेतन देसाई यांच्यासाठी उमेदवारीची संधी कायम राहावी, अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे. आता अंतिम निर्णयात त्यांच्या राजकीय डावाला संधी मिळते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

साई पल्लवी आणि इफ्फी

५७ व्या इफ्फीचा उद्‍घाटन सोहळा नुकताच दिमाखात पार पडला, पण या सोहळ्याची खरी रंगत वाढवली ती अभिनेत्री साई पल्लवीने! तिच्या ‘रामायण’ चित्रपटातील सीतेच्या भूमिकेने चाहत्यांना भुरळ घातली आहे. त्यामुळे इफ्फीच्या आवारात तिला प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि एक सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची प्रचंड झुंबड उडाली होती. काहींचे सेल्फीचे स्वप्न पूर्ण झाले, तर काहींची निराशा झाली. परंतु काहींना अजूनही आशा आहे, कारण येत्या रविवारी इफ्फीमध्ये ‘रामायण’ चित्रपट दाखवला जाणार आहे. साई पल्लवी गोव्यातच थांबली, तर चित्रपटाच्या सुरुवातीला चाहत्यांना तिला पुन्हा भेटण्याची सुवर्णसंधी मिळू शकते; अन्यथा ही संधी हुकणार!

दिलासादायक पण..!

राज्यातील एका खासगी माध्यम समूहाने विधानसभेच्या अनुषंगाने सर्व्हे केला आणि त्याचा निकाल काही तासांपूर्वी जाहीर केला. त्यात सात आमदार सुरक्षीत, १७ असुरक्षित आणि १४ फिप्टी-फिप्टी आहेत. परंतु जे सातजण आहेत, त्यांच्यासाठी ही निश्चित दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल, परंतु जे १७ जण असुरक्षित आहेत त्यांना ही बाब धक्कादायक निश्चित वाटली असावी. त्याशिवाय ज्यांची ५० टक्के हमी आहे, त्या १४ जणांचीही धडधड वाढली असेल. यातून हे राजकारणी काय निष्कर्ष काढायचा तो काढतील, पण सुरक्षीत आहेत तेथेही वारे कधी फिरेल आणि जे असुरक्षित आहेत, तेथेही प्रवाह उलटा वाहण्याची शक्यता नाकारता येणार नाही, हेही हे राजकारणी जाणून असणार आहेत. या अहवालावरून सुरक्षीत असलेल्या आमदारांचे समर्थक मात्र समाज माध्यमांत बरेच खूष असल्याचे दिसत आहेत.

Khari Kujbuj Political Satire
Goa Film City: गोव्यात फिल्मसिटी उभारणार; जगभरातील चित्रपट निर्मात्यांना मुख्यमंत्र्यांचे चित्रीकरणासाठी आवाहन

इफ्फीच्या प्रतिनिधींचे सार्थक

‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये (इफ्फी) पहिल्यांदाच असे घडले आहे, ते म्हणजे सुमारे चार हजार लोकांना पाहता यावा, यासाठी पाच ठिकाणी शुक्रवारी दुपारी उद्‍घाटनाचा चित्रपट दाखवण्यात आला. पोलिश चित्रपट निर्माते पावेल पावलिकोव्स्की यांनी दिग्दर्शित केलेला ‘फादरलँड’ हा पहिल्यांदाच अनेक ठिकाणी एकाच वेळी प्रदर्शित केला गेला. त्यामुळे या इफ्फीतील वेगळेपण दिसून आले. यंदा हा चित्रपट सर्व नोंदणीकृत प्रतिनिधींसाठी (डेलिगेट्स) खुला होता. उद्‍घाटनाचा चित्रपट पणजीमधील ‘आयनॉक्स’मधील तीन सभागृहांमध्ये, पर्वरी येथील ‘आयनॉक्स’मध्ये आणि मडगावमधील ‘रवींद्र भवन’ येथे दाखवला गेला. प्रदर्शनाची व्याप्ती वाढवल्यामुळे आणि अनेक ठिकाणी सोय केल्यामुळे अधिकतर प्रतिनिधींना उद्‍घाटनाचा चित्रपट पाहण्याची संधी मिळाली आणि इफ्फीचे प्रतिनिधीत्व स्वीकारल्याचे सार्थक झाल्याचे वाटल्याशिवाय राहिले नसेल.

इफ्फीचा माहोल

राजधानी पणजी सध्या ‘इफ्फी’च्या रंगात पूर्णपणे न्हाऊन निघाली आहे! देश-विदेशातील सिनेरसिकांनी शहरात गर्दी केली असून पणजीच्या रस्त्यांवर केलेली मनमोहक रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या झगमगाटाचे आकर्षक रील्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पुढील आठ दिवस चालणाऱ्या या सिने-महाकुंभात आपल्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. संपूर्ण शहर जणू एका भव्य चित्रपट महोत्सवाच्या उत्साहात बुडाले असून, पणजीत आता फक्त सिनेमाचीच चर्चा रंगली आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.