

राजेंद्र पां. केरकर
आज गवे अळमो डोंगरावरुन पायथ्याशी येऊन, मोठ्या प्रमाणात तेथील शेतकऱ्यांच्या शेती आणि बागायती पिकांची नासधूस करू लागलेले आहेत. विदेशी वृक्षांच्या लागवडीमुळे स्थळनामाप्रमाणे प्रसिद्धीस आलेला अळमो डोंगर आपले अळिंबांच्या नानाविध प्रजातींचे वैभव हरवू लागला आहे.सत्तरीतील रावण, घोटेली आणि मोर्ले आणि महाराष्ट्रातील तळेखोल गावांच्या परिसरात अळमो डोंगर वसलेला आहे. केरी वनक्षेत्रात समाविष्ट होणारा हा डोंगर एकेकाळी माडत, किंदळ, जामो, असण, चांदिवडो, घोटींग, तिरफळ, कुमयो, नाणो आदी स्वदेशी वृक्षवेलींनी समृद्ध होता. येथील प्रामुख्याने वृक्षवेलींनी संपन्न जंगलातील पानगळतीमुळे पावसाळ्यात तेथील वारुळांवरती,माळरानावरच्या गवतात मांसल व छत्रीसारख्या अळिंबांची पैदास व्हायची.
त्यामुळेच हा डोंगर अळमो नावाने परिचित झाला होता.जिवंत वा मृत वनस्पती, प्राणी यांपासून अन्न घटक शोषून इथे कवकांची पैदास होते. ब्रॅकेट कवके, स्टिंक हॉर्न, पफबॉल, शॅतरेल अशी कवके पहायला मिळतात. कवकजाल प्रजातींतील अळिंबे जमिनीतील आवश्यक कर्बोदके, प्रथिने व विशिष्ट जीवनसत्वे तसेच इतर पोषक द्रव्ये शोषून घेतात. मृत गवत, कुथित मृदा यापासून त्यांना अन्न घटक मिळतात. इतरत्र पडलेले वृक्ष, खुंट आणि बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडांवरती त्याचप्रमाणे तृणहारी प्राण्यांच्या विष्ठेवरती अळिंबांची पैदासी होत असते.
वनस्पतींच्या निकोप वाढीसाठी पदार्थाचे अपघटन करण्याच्या प्रक्रियेत उपयुक्त खनिजे मातीत मिसळण्यात कवके महत्वाचे योगदान देतात. पानगळतीच्या वृक्षांमुळे इथे खार, शेकरू यांचे वास्तव्य असून, त्यांना आवश्यक अन्न, पाणी यांची इथे उपलब्धता आहे. खरंतर कीटक आणि अन्य प्राण्यांसाठी कवके अन्न घटक देत असतात. काही खारी उन्हाळ्यात अळिंबे गोळा करून, झाडाच्या फांदीवर सुकवण्यासाठी ठेवतात आणि हिवाळ्यात त्यांचा वापर करतात.
प्राण्यांच्या याच सवयीचे अनुकरण आदिवासी जमातींने केले, त्यामुळे गोव्यातल्या वेळीप जमातीत अळिंब सुकवून ठेवून, गरजेनुसार वापरण्याची प्रथा आहे. समुद्र सपाटीपासून १२९.८ मीटर उंची असलेल्या अळमो डोंगराच्या पायथ्याशी पेडणेतील मोरजी, बार्देसातील म्हापसा, महाराष्ट्रातील पारगड किल्ल्यावरून, कोल्हापूर येथील महालक्ष्मीच्या पूजनाचा वारसा घेऊन, तसेच कोकणातील माईण, सत्तरीतील पर्येचे सावंत तसेच वाघेरीवरून स्थलांतरित झालेल्या पशुपालक धनगर व अन्य प्रांतांतून आलेल्या कष्टकरी लोकसमुहांचे वास्तव्य आहे.
अळमो डोंगराच्या दोन बाजूना दाबेलाचा हरल आणि गटारो या ओहळांद्वारे जलसिंचनाची सोय उपलब्ध व्हायची. महाराष्ट्रातील तळेखोल परिसरात उगम पावणाऱ्या गटारोचे पाणी मुतरो गुण्याकडून बारामाही सिंचन सुविधा पुरवायचे. त्यामुळे घोटेलीतील मोरशी येथील पावलांची कोण या ठिकाणी आदिम संस्कृतीशी नाते सांगणारी प्रस्तर चित्रे मानवी पावलांच्या ठशांची पहायला मिळतात.
रावण, घोटेली आणि मोर्ले परिसरात राहणाऱ्या कष्टकरी समाजासाठी देवसू, करमळी, दाबेल हरल, माणुक तळे आदी भागांतील लागवडीयोग्य जमीन भातशेती करण्यासाठी प्रवृत्त करायची. मॉन्सूनच्या पावसाळ्यातील पाणी अळमो डोंगराच्या माध्यमातून हिवाळ्यात आजूबाजूच्या झऱ्यांना प्रवाहित करायचे.
आषाढात पावसाच्या सरी कोसळू लागल्या म्हणजे वारुळावर उगवणाऱ्या अळिंबांचे वैभव इथे दृष्टीस पडायचे. रोयण अळमी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अळिंबांच्या स्थानिक प्रजातीचे दर्शन इथल्या डोंगरावर जागोजागी पहायला मिळायचे. पावसाळा सुरू झाला की, कधी आणि कुठे रोयण अळमी, शृंगार अळमी, खुट्याळी, भुईफोड आदी अळिंबांच्या प्रजाती दृष्टीस पडतील याचे पारंपरिक ज्ञान स्थानिकांकडे होते.
अळमो डोंगरावरच्या गिर्यारोहणात जेव्हा आपण शतकोत्तर परंपरा असणाऱ्या माडतीच्या (आईन) महावृक्षाकडे पोहचायचे तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसायची. माट्टीकडे हा अळमो डोंगरावरचा महत्वाचा बिंदू ठरल्याने, तेथे जाऊन गोवा-महाराष्ट्र सीमेवरच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे, वृक्षवेलींनी नटलेल्या माळरानांचे दर्शन घडायचे.
गोवा मुक्तीनंतर वन खात्याने सामाजिक वनीकरणांतर्गत ऑस्ट्रेलियन अकेशिया ऑरिकुलस व अन्य प्रजातीच्या वृक्ष लागवडीला प्राधान्य दिले, तेव्हा तेथील माळराने आणि स्थानिक प्रजातींनी नटलेल्या जंगलाच्या वैभवावर गदा आली, हा हा म्हणता त्याचे दुष्परिणाम येथील तृणहारी जंगली श्वापदांच्या नैसर्गिक अधिवासावर प्रकर्षाने जाणवू लागले. आज गवे अळमो डोंगरावरुन पायथ्याशी येऊन, मोठ्या प्रमाणात तेथील शेतकऱ्यांच्या शेती आणि बागायती पिकांची नासधूस करू लागलेले आहेत.
विदेशी वृक्षांच्या लागवडीमुळे स्थळनामाप्रमाणे प्रसिद्धीस आलेला अळमो डोंगर आपले अळिंबांच्या नानाविध प्रजातींचे वैभव हरवू लागला आहे. माणुक तळ्याच्या परिसरातील पुरण शेती तसेच वायंगण शेतीचा समृद्ध वारसा कधीच इतिहासजमा झालेला आहे. सांवतांच्या बांधावरती पावसाळ्यातले कोंगे मिळणे दुरापास्त झाले आहे. रावणातील काजरो टेंब गतवैभव हरवून बसला आहे.
पूर्वी श्रावणात या परिसरातले लोक मातीच्या घराला नैसर्गिक रंगाने रंगवण्यासाठी तामिडगीच्या डोंगरावर शेड आणण्यासाठी जायचे. आज सिमेंट कॉक्रिटची बांधकामे उभी राहू लागल्याने नैसर्गिक रंगांचे आकर्षणही गायब झालेले आहे. आंबा, पायरी, घोटींग, कांगला, भेरलीमाड या वृक्षवेलींनी नटलेल्या गोठणीचे नैसर्गिक आणि वैभव लोप पावलेले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.