

मारवाड हा राजस्थानच्या नैऋत्य भागात अरावलीच्या डोंगररांगांच्या वायव्येला वसलेला विस्तीर्ण वाळूचा वाळवंटी प्रदेश. भारतातील सर्वांत मोठा थार वाळवंटांचा तो एक भाग. तसेच बदलते वाळूचे ढिगारे, कमी अल्प पाऊस यामुळे वाळवंटातील स्थानिक शब्द ‘मारू’वरून या प्रदेशाचे नाव ‘मारवाड’ पडले आहे.
या भागात जोधपूर, पाली, नागौर, बाडमेर आणि सीकरचा काही भाग येतो. जोधपूरमधील मुख्य राजपूत वंश असलेल्या राठोडांनी राष्ट्रकूट राजघराण्याच्या पतनानंतर कन्नौज येथे स्थलांतर केले. १५८३ मध्ये मुघल बादशहा अकबराने उदयसिंहला पुन्हा गादीवर बसवले असले, तरी हे संस्थान कमी-अधिक प्रमाणात मुघलांच्या आधिपत्याखाली राहिले.
१६३८ मध्ये महाराजा जसवंतसिंह राठोड हे गादीवर बसवले गेले, पण पुढे १६६७ मध्ये जसवंतसिंह यांनी आपला मुलगा पृथ्वीराज सिंह गमावला; ज्याला मुघल बादशहा औरंगजेबाने विष पाजून ठार मारले, असे मानले जाते.
पुढच्या काही वर्षांत १६७८ मध्ये जामरूड येथे एका मोहिमेदरम्यान महाराजा जसवंतसिंह राठोड मरण पावले. मारवाड सैन्याचे सेनापती दुर्गादास राठोड यांचे वडील भास्कर राठोड हे जसवंतसिंह यांच्या दरबारात मंत्री होते. राव रणमल यांचे वंशज असल्याने राजघराण्याशीही त्यांचा थेट संबंध होता. जसवंतसिंह यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही राण्यांनी प्रत्येकी एका मुलाला जन्म दिला.
मात्र, त्यातील एकाचे लहानपणीच निधन झाल्याने दुसरा अजितसिंह हा सिंहासनाचा एकमेव वैध वारसदार ठरला. मात्र मुघल बादशहा औरंगजेबाने अजितसिंहला सिंहासनावर बसवण्यास नकार दिला. संतापलेल्या मारवाड सैन्याचे सेनापती दुर्गादास राठोडने अपमानास्पद अटी मान्य करण्यास नकार देत बलाढ्य मुघल सैन्याला सामोरे जावे लागले तरी अजितसिंहला मारवाडचा शासक बनवण्याचा निर्धार केला.
अजितसिंह आणि राण्यांची वैयक्तिक जबाबदारी घेत दुर्गादास राठोड यांनी त्यांना दिल्लीतून १६७९मध्ये हलवले. मुघल सैन्याच्या पाठपुराव्यानंतर त्याने आपल्या अनुयायांच्या टोळीसह तीव्र प्रतिकार केला आणि अनेक मुघल सैन्याशी लढा दिला. मुघल सैन्याला जोरदार प्रतिहल्ल्यापुढे दुर्गादासांना माघार घ्यावी लागली व अजितसिंहच्या मुलाला आधी बलुंदा येथे नेण्यात आले आणि नंतर माऊंट आबू येथे ठेवणयात आले.
जिथे त्याला सुरक्षिततेसाठी अरावलीत आश्रय देण्यात आला. त्याचदरम्यान मुघल बादशहा औरंगजेबाने मारवाडला थेट मुघलांच्या आधिपत्याखाली आणले आणि त्याची सर्व स्वायत्तता काढून घेतली. मारवाडसाठी मुघल बादशहा औरंगजेबांचा कार्यकाळ एक भयानक हिंसाचाराचा काळ होता. मुघल सैन्याने तेथील मंदिरे उद्ध्वस्त केली, समृद्ध व्यापारी शहरे लुटली गेली आणि हिंदूंचा मोठ्या प्रमाणात नरसंहार करण्यात आला.
१६७८मध्ये जोधपूरच्या राठौड राजपुतांनी शेजारच्या मेवाडच्या सिसोदिया राजपुतांशी युती केली ज्यामुळे राजपूत बंडखोरी सुरू झाली व बादशहा औरंगजेबाने ९ जानेवारी १६७९ रोजी जोधपूर ताब्यात घेण्यासाठी मोठी फौज पाठवली. या सैन्याच्या एका तुकडीचे नेतृत्व मुहम्मद अकबरकडे होते.
१ जानेवारी १६८१ रोजी, मिर्झा मुहम्मद अकबरने स्वतःला बादशहा घोषित केले आणि आपल्या वडिलांना म्हणजे बादशहा औरंगजेबाना पदच्युत करणारा जाहीरनामा जारी करून, त्याच्याशी लढण्यासाठी अजमेरकडे कूच केली.
अकबराकडे १२ हजार घोडदळाचे सैन्य होते. मेवाडच्या महाराणा अमरसिंग दुसरा याने ६हजार राजपूत घोडदळ, अर्धे स्वतःचे सैन्य त्यास जोडले आणि त्यांची संख्या २५ हजार घोडदळांपर्यंत वाढवली. पण औरंगजेबाने विश्वासघाताचा अवलंब केला, त्याने तहव्वूर खानला एक पत्र पाठवून त्याला क्षमेचे आश्वासन दिले, तहव्वूर गुपचूप औरंगजेबास भेटण्यास आला.पण तंबूच्या प्रवेशद्वारावर हाणामारीत त्याचा मृत्यू झाला.
त्यानंतर औरंगजेबाने मुहम्मद अकबराला खोटे पत्र लिहिले आणि ते पत्र राजपुतांना मिळेल, अशी व्यवस्था केली. या पत्रात, औरंगजेबाने आपल्या मुलाचे अभिनंदन केले, की शेवटी राजपुतांना उघड्यावर मैदानात आणले जिथे त्यांना पिता आणि पुत्र एकत्र चिरडू शकतात.मुहम्मद अकबरने काही जवळच्या अनुयायांसह छावणीतून घाईघाईने निघून वडिलांशी युद्धाची व पराभवाची शक्यता टाळली. दुर्गादास यांनी अकबरला छत्रपती संभाजींच्या दरबारात नेले व त्याला दिल्लीच्या गादीवर बसवण्याच्या योजनेसाठी पाठिंबा मागितला.
१७०४ मध्ये मुहम्मद अकबर वनवासात मरण पावला आणि त्याची मुले राठोडांच्या ताब्यात राहिली. आपली नातवंडे परत मिळावीत म्हणून आतुर झालेल्या औरंगजेबाने दुर्गादासशी वाटाघाटी केल्या, मात्र त्याने मारवाडला पुन्हा राठोडांना परत करण्यास नकार दिला. औरंगजेबाने तडजोड करून अजितसिंगला कमी जागा दिली आणि दुर्गादासला गुजरातचा प्रभारी म्हणून नेमले. मात्र, औरंगजेबाने राठोडांकडे संशयाच्या नजरेने पाहिले आणि १७०२ मध्ये गुजरातचे प्रभारी दुर्गादासच्या अटकेचे आदेश दिले.
बादशहाच्या हेतूची माहिती मिळताच दुर्गादास मारवाडला पळून गेला, तेथे त्याने पुन्हा एकदा बंडखोर गट उभा केला. मात्र, दुर्गादास यांचे वय वाढत गेल्याने व बंडखोरांना अत्यल्प निधी व प्रशिक्षण मिळाल्याने त्यांना मर्यादित यश मिळाले. परंतु १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दुर्गादासने अखेर जोधपूर पुन्हा ताब्यात घेतले. अजितसिंग यांना महाराजा म्हणून घोषित करण्यात आले. मारवाड आता राठोड लोकांच्या ताब्यात आल्याने दुर्गादासांनी सर्वस्व त्यागले व आपले शेवटचे दिवस तीर्थयात्रेत घालवत उदयपूरमार्गे प्रवास करून उज्जैन येथे स्थायिक झाले, जिथे अखेर २२ नोव्हेंबर १७१८ रोजी वयाच्या ८१व्या वर्षी त्यांचे निधन झाले. उज्जैनच्या चक्रतीर्थात आजही त्यांचे छत्र अस्तित्वात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.