

राजेंद्र पां. केरकर
सातेरी, केळबाय, ब्राह्मणी, जल्मी, खुंटी या दैवत परिवारात, इथे असलेली अष्टभुजा देवीची वैशिष्टयपूर्ण पाषाणी मूर्ती भिरोंड्याच्या गतवैभवाची प्रचिती देत आहे. मध्यतंरी आदिम जमातीचे उच्चाटन झाल्याने, भिरोंडे प्रदीर्घकाळ निर्मनुष्य झाला. आज या गावातले गावकर सत्तरीतील खोतोडेहून येऊन भिरोंड्यात स्थायिक झालेले असून, राणे आणि सावंत पर्येतून स्थलांतरित झालेले आहेत.आज भिरोंडा गाव झपाट्याने बदलत असून, इथली वनसंपत्ती संकटग्रस्त आहे. देवराई कधीच विस्मृतीत गेलेली आहे. संस्कृतीचा श्रीमंत वारसा लाभलेला हा गाव आगामी काळात आपली ओळख टिकवेल का?
म्हादई नदीच्या डाव्या काठावर वसलेला सत्तरी तालुक्यातील भिरोंडा या गावाला शेकडो वर्षांपूर्वी इतिहास आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभला होता. आज या गावाची बहुतांश सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेची संचिते इतिहासजमा झालेली आहेत आणि ज्या खाणाखुणा अस्तित्वात होत्या, त्याही शेवटची घटिका मोजत आहेत.
मोठ्या प्रमाणात इथल्या शेत आणि बागायतीच्या जमिनीचे रूपांतर होत असल्याने, भिरोंड्याचा ग्रामीण चेहरा मोहरा परिवर्तनाच्या वाटेवर आहे. सत्तरीतील भुईपाल, नागवे, सावर्डे, गुळेली, धामशे, शेळ मेळावली आणि फोंडा तालुक्यातील गांजे येथे नौकारूढ मातृदेवता पूजनाच्या ज्या पाषाणी मूर्ती आढळलेल्या आहेत, त्यात सत्तरीतील भिरोंड्याचा समावेश होतो.
कधीकाळी देवराईची अधिष्ठात्री असणाऱ्या अष्टभुजा देवीची पाषाणी मूर्ती, देवराईचे अस्तित्वच नष्ट केल्याने, सदर ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्व असणारी ही मूर्ती भग्न स्वरुपात आहे. देवराईच्या सान्निध्यात अर्ध्या शतकापूर्वी गादो या पाणथळ भूमीत वायंगणी शेती केली जायची, आज वायंगण शेतीची ही परंपराही बंद पडलेली आहे. भिरोंडा गावातून बारमाही प्रचंड पाण्याचा साठा घेऊन वाहणारी म्हादई नदी असल्याने, भिरोंडाहून गुळेलीला ये-जा करण्यासाठी जुन्या काळी मार्ग अस्तित्वात होता.
आज पाडेली येथे पूल उभारल्याने, नदीतला जलमार्ग खंडित झालेला आहे. २०१६. ४४ हेक्टर क्षेत्रफळातल्या या गावात एकेकाळी घनदाट जंगल होते आणि आदिम जमातीचे वास्तव्य होते. परंतु आकस्मिकपणे त्यांचे कसे आणि कोणी उच्चाटन केले, याचे कोणतेच पुरावे उपलब्ध नाहीत. सातेरी, केळबाय, ब्राह्मणी, जल्मी, खुंटी या दैवत परिवारात, इथे असलेली अष्टभुजा देवीची वैशिष्टयपूर्ण पाषाणी मूर्ती भिरोंड्याच्या गतवैभवाची प्रचिती देत आहे.
मध्यतंरी आदिम जमातीचे उच्चाटन झाल्याने, भिरोंडे प्रदीर्घकाळ निर्मनुष्य झाला. आज या गावातले गावकर सत्तरीतील खोतोडेहून येऊन भिरोंड्यात स्थायिक झालेले असून, राणे आणि सावंत पर्येतून स्थलांतरित झालेले आहेत. १७८८ साली सत्तरी तालुका पोर्तुगीज सत्तेखाली आला. परंतु असे असले तरी २५ पेक्षा ज्यादा वेळा सत्तरीतील राणे आणि रयतेने पोर्तुगीजांविरुद्ध उठाव केल्याने, सरकारने बंडांचा बिमोड करण्यासाठी सत्तरीतील सैनिकी कायदा लागू केला. ठिकठिकाणी मोक्याच्या जागी शस्त्रसज्ज सैन्य नियुक्त केले.
भिरोंडा येथे कापितांव द ट्रोपास म्हणजे मिलीटरी कॅप्टनचे कार्यालय शस्त्रसज्ज सैनिकांच्या तुकडीसह १९३५ साली नियुक्त केले. इटालियन नन्सची मात्रिदाद ही महिलांच्या संरक्षण सेवेसाठी संस्था सुरु करण्यात आली. १९३५ साली इथे अंगणवाडी सुरू झाली आणि आई व तिच्या आत्यांना प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून दिली जात होती. गुन्हेगारांवर कारवाई करून, त्यांना शिक्षा ठोठावण्यास इथे तुरुंगाची व्यवस्था करण्यात आली होती.
पोर्तुगीज अमदानीत आपल्या सोयीसाठी त्यांनी गोव्याच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांना भिरोंडेत स्थायिक होण्यासाठी प्रोत्साहित केले आणि त्यामुळे पेडणे, म्हापसा, हडफडे, मेरशी, लोटली, उसगाव, खांडेपार आदी गावांतून इथे लोक स्थायिक झाले होते. गोवा मुक्ती चळवळीला १८ जून १९४६ रोजी डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या आगमनाने नवी ऊर्जा आणि दिशा लाभली. त्यानंतर भारतभरातील स्वातंत्र्य सेनानींनी सत्याग्रहाद्वारे गोवा मुक्ती चळवळीत आपला सहभाग दिला. त्यात क्रांतिकारी समाजवादी चळवळीतले बंगालचे त्रिदिबकुमार चौधरी सत्याग्रहीचा जथा घेऊन १० जुलै १९५५ रोजी भिरोंड्यात प्रवेश केला होता.
त्यावेळी त्यांना पोर्तुगीज सरकारने लगेचच अटक करून तुरुंगात डांबले होते. गोवा मुक्ती चळवळीतल्या सहभागाखातर त्यांना सालाझारशाहीत जो तुरुंगवास भोगला, त्या संदर्भात पुस्तकाची निर्मिती केली होती, त्यात भिरोड्यातल्या सत्याग्रहाच्या आठवणी नोंद केलेल्या आहेत. १९३९ साली भिरोंडा येथे अवर लेडी ऑफ फातिमा चॅपेलची उभारणी ख्रिस्ती धर्मियांसाठी करण्यात आली आणि दरवर्षी अवर लेडीच्या प्रित्यर्थ १३ ऑक्टोबर रोजी फेस्त साजरे करण्यात येऊ लागले. येथील ख्रिस्ती धर्मियांनी शिक्षण, उदयोग, व्यवसाय आदी क्षेत्रांत पोर्तुगीज अमदानीपासून उत्तुंग भरारी घेतली होती.
भिरोंडावासीय ज्युलियस ब्रागांझा मुंबई पुणे येथील ब्रिटीश सरकारच्या महत्त्वाच्या सचिवपदी कार्यरत होते. डॉ. जॉन बाग्रांझा यांनी अमेरिकेतल्या नासासारख्या प्रतिष्ठित संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून काम केले होते. फायबर ग्लास तज्ञ म्हणून वेलरियन त्रिनिदाद यांनी लौकिक मिळवला होता. गोवा कोकणातल्या दशावतारी नाटय क्षेत्रात तर स्त्री कलाकार म्हणून सूर्यकांत राणे यांनी आपली नाममुद्रा कोरली होती. भिरोंडा गावातील पोर्तुगीज अमदानीत राज्याच्या ख्रिस्ती धर्मगुरू प्रमुखाला म्हादई नदी किनाऱ्यावरची लागवडीयोग्य जमीन देण्यात आली होती.
मुक्तीनंतर इथे शेती आणि बागायती पिकांचे नवनवीन प्रयोग पिलार फादर संस्थेतर्फे फादर इनासियो आल्मेदा यांनी जोगती फार्ममध्ये घेतले होते आणि या फार्मला प्रयोगशील केंद्र म्हणून नावारूपाला आणले होते. आज भिरोंडा गाव झपाट्याने बदलत असून, इथली वनसंपत्ती संकटग्रस्त आहे. देवराई कधीच विस्मृतीत गेलेली आहे. कधीकाळी निसर्गाचे वरदान लाभलेला आणि इतिहास आणि संस्कृतीचा श्रीमंत वारसा लाभलेला हा गाव आगामी काळात आपली ओळख टिकवेल का? हाच प्रश्न आज आवासून उभा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.