

राजू नायक
आपल्या ऐतिहासिक अवशेषांची स्थळे पाहाताना - ती कितीही वैभवशाली कारकिर्दीची साक्ष देणारी असोत, आपल्याला शरम का वाटते? त्यांचे योग्यप्रकारे जतन-संवर्धन करण्यात आपल्याला यश का येत नाही? त्यासाठी निधीची, तरतूद करण्यात आपण अपयशी का होतो? हिंदुत्वाचा वारसा सांगणाऱ्या , किती नेत्यांच्या अजेंड्यावर हे पुनर्जीविकरण आहे?
पी ही एकेकाळी भरभराटीस आलेल्या विजयनगरच्या हिंदू साम्राज्याची राजधानी. या भव्यदिव्य राजधानीच्या इमारती व देवालयांचे भग्न अवशेष त्या काळातील सुवर्णयुगाची साक्ष देत उभे असले तरी त्यांची निगा व्यवस्थित राखलेली नाही. प्लास्टिक कचरा, तुटणारे अवशेष, विक्रेत्यांचा सुळसुळाट, पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष तसेच हलगर्जीपणा व भारत सरकारची एकूणच अनास्था याचे हे अत्यंत उद्विग्न बनविणारे चित्र आहे.
वास्तविक १३३६ ते १६४६ या काळात दक्षिण भारतासह गोवा व ओरिसापर्यंत विजयनगर साम्राज्याने आपली विजय पताका रोवली. आसपासच्या - सध्याच्या देशाच्या सीमा ओलांडण्यातही यश मिळाले, ती जगातील त्या काळातील एक श्रीमंत तेजस्वी कारकीर्द गणली गेली. द्रविडी स्थापत्य, प्रशासन व व्यापार - ज्यात कापूस, मसाले व तांदळाची निर्यात केली जात असे.
गोव्याचे बंदर तर घोड्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते - गोव्यात म्हणूनच त्यांच्या नावाने अजून ‘रायबंदर’चा उल्लेख होतो - त्या वैभवशाली परंपरेचा स्वतःला हिंदू म्हणून गौरवपूर्वक उल्लेख करणाऱ्या विद्यमान राजवटीला विसर पडावा आश्चर्यच आहे! भारतीय पुरातत्त्व खात्याकडे (एएसआय) हंपीच्या संरक्षणासाठी महत्त्वाकांक्षी योजना नाही, त्यांना निकड नाही व त्यासाठी लागणाऱ्या निधीचाही अभाव आहे, ही तर शरमेचीच बाब मानली पाहिजे.
एएसआयकडे हंपीच्या देखभाल व पुनर्निर्माणासाठी किमान २५ कोटींची आवश्यकता असता, त्यांच्याकडे अंदाजे दीड कोटी एवढाच तुटपुंजा निधी आहे. २०१४ व २०१९ मध्ये त्यासाठी योजना तयार केली जात होती, परंतु तिच्याकडे काणाडोळा झाला. पर्यटकांकडून विध्वंस तर होतोच, शिवाय ऊन-पाऊस यामुळे सतत झीज होते आहे व पर्यावरणाचे जबरदस्त मोल चुकते करीत या अवशेषांची रयाच गेली आहे.
युरोपमध्ये बाह्य आक्रमणांमुळे अनेक ऐतिहासिक स्मारके उद्ध्वस्त झाली, दुसऱ्या महायुद्धामुळे तर काही स्मारके, राजवाडे, किल्ले जमीनदोस्त झाले होते, परंतु ते वैभव पुन्हा उभे करणे त्या राजवटींना शक्य झाले, कारण त्यात त्यांचा इतिहास व दुर्दम्य इच्छाशक्ती दडली होती. जो खर्च झाला, तो पुन्हा वसूल झाला. भारतात पैसा नाही हे मान्यच होऊ शकणार नाही. काही राज्य सरकारांकडे उपलब्ध नाही एवढा पैसा आज मंदिरांकडे उपलब्ध आहे.
विजयनगरमधील मंदिरे व पवित्र स्थाने याच पारंपरिक धार्मिक संस्कृतीचा भाग असतील व तो जर गौरवशाली इतिहास मानला जातो, तर या मंदिरांनी त्यांच्या पुनर्निर्माणात खारीचा हिस्सा का उचलू नये? विजयनगरचे वैभवशाली साम्राज्य संपूर्ण देशात आणि आशियातील अनेक भागांत पसरलेले होते. दक्षिण भारतावर तर त्यांची निर्विवाद सत्ता होती. या राजवंशाची सुरवात १३३६-१४८५मध्ये झाल्यानंतर १५७०पर्यंत त्यांचे अनेक ताकदवान राजे सत्तेवर आले, लष्करी ताकद वाढत गेली, जी पुढे सम्राट कृष्णदेवराया (१५०९-१५२९) या काळात आपल्या सीमा फैलावत सर्वमान्यता पावली.
या काळात तिचे वर्णन जगातील श्रीमंत - मातब्बर शक्ती म्हणून करण्यात येऊन तिच्या देखण्या इमारती, शहराची रचना, जागतिक शहरांना असलेली भव्यता, दिमाख सारे येथे निर्माण झाले. राजधानी हंपी येथील विठ्ठलाच्या देवळाच्या प्रांगणातील प्रसिद्ध दगडी रथ हे विजयनगर साम्राज्यातील वास्तुकलेचा चमत्कार मानला जातो. हा रथ झिजलेल्या अवस्थेत पर्यटकांची गर्दी खेचतो, ज्याच्यावर हत्ती आणि इतर पौराणिक आकृत्यांचे बारीक नक्षीकाम आहे. रथाची चाके पूर्वी फिरत असत, परंतु आता ती एकाच जागी सिमेंटने जोडलेली आहेत.
या प्रांगणातील इतर इमारती, वाद्यकलेतील शिल्पे अद्भुत आहेतच शिवाय हा मंदिर परिसरच अप्रतिम आहे. चोल राजवंशाप्रमाणे विजयनगरचे साम्राज्य देशाबाहेर फारसे पसरले नसले तरी देवराय दुसरे यांच्या कारकीर्दीत ते श्रीलंकेवर राज्य करीत व तेथून त्यांनी दोन हजार कैदी देशात आणून त्यांच्याकडून कामे करून घेतल्याचा उल्लेख सापडतो. त्याच काळात ब्रह्मदेशावरही त्यांनी स्वारी केली, परंतु लष्करी संलग्नीकरणाऐवजी समुद्रावर नियंत्रण मिळवण्यात या राजवटीला स्वारस्य होते.
अरबी समुद्र व बंगालच्या खाडीवरील ३०० बंदरे त्यांनी ताब्यात ठेवली होती. राजवटीचे पर्शिया, अरबी, इथियोपिया येथे व्यापारी संबंध होते. विजयनगर साम्राज्याने १४व्या शतकाचा शेवट व संपूर्ण १५वे शतक गोव्यावर राज्य केले, त्यातून बंदरांवर ताबा व व्यापारावर हुकूमत गाजवता आली. बहामनी व विजापूरच्या सुलतानाशी त्यांनी वारंवार मुकाबला केला, याकाळात गोव्यात विजयनगरचे सरदार म्हणून माधव मंत्री यांची नेमणूक झाली.
त्यांनी अनेक देवालयांना मदत केल्याचे उल्लेख सापडतात. या काळात मध्य-पूर्वेशी व्यापारातील सुलभतेसाठी गोवा हे महत्त्वाचे बंदर बनले होते, त्याचाच ताबा मिळवण्यासाठी ११५ वर्षांच्या काळात विजयनगर व सुलतानांच्या फौजा यांच्यात तीन महत्त्वाची युद्धे झाल्याचे दाखले सापडतात. १३६९मध्ये बहामनींनी विजयनगरकडून गोवा घेतला, त्याचे एक कारण स्थानिक नेत्यांमधील वैमनस्य हे होते.
१३७७मध्ये पराभवाचे उट्टे काढत विजयनगरचे राजे हरीहर दुसरे यांनी बहामनी सुलतान मुजाहिद शहांविरोधात मोठा लष्करी लढा देत गोवा पुन्हा जिंकून घेतला व तेथे सरदार माधव मंत्री यांचे स्थिर सरकार स्थापन केले. १०० वर्षांहून अधिक काळ गोवा व पश्चिम किनारपट्टीवर विजयनगरची स्थिर हिंदू राजवट स्थापन झाली होती, हे नसे थोडके! दुर्दैवाने राजे विरुपाक्ष दुसरे यांच्यामुळे काहीशी कमकुवत राजवट निर्माण होताच १४७०मध्ये बहामनीचे सरदार ख्वाजा महमूद गवान यांनी गोव्यावर जबरदस्त लष्करी हल्ला चढवत गोवा ताब्यात घेतलाच शिवाय पश्चिमी तटावरची त्यांची राजवट संपुष्टात आणली.
बेळगाववर ताबा मिळवत घनदाट जंगलातून स्फोटके व घातक दारुगोळ्याचा वापर करीत हे सैन्य गोव्यात घुसले व दुसऱ्या बाजूने आपल्या ताब्यातील दाभोळ बंदरातून असंख्य बोटी त्यांनी गोव्यापर्यंत आणल्या. १४७०मधील गोव्याचा पराभव विजयनगरच्या लष्करी साम्राज्याचे कंबरडे मोडणारा ठरला, कारण उच्च दर्जाच्या अरबी व पर्शियन लष्करी घोड्यांचा पुरवठा बंद झाला. दक्षिण भारताचे तापमान घोड्यांच्या पैदाशीसाठी योग्य नसल्याने लष्करी ताकद शाबूत ठेवण्यासाठी घोड्यांची आयात महत्त्वपूर्ण मानली गेली.
त्यामुळे साम्राज्याचे लष्कर व विदेश धोरणाची ताकद कमकुवत बनली. बहामनी व नंतर विजापूरचे सुलतान शक्तिशाली बनले कारण ते आता घोड्यांच्या आयातीचे नियंत्रण करू लागले व विजयनगरला मोठा भुर्दंड बसू लागला. त्यातून पायदळावर व हत्तींवर विसंबून राहाणे भाग पडले, लष्कराची रणनीती बदलली. पुढे या सुलतानांना गोव्यातून हुसकावण्यासाठी विजयनगरने पोर्तुगीजांशी आपल्या सहकार्याचा हात पुढे केला.
तिमय्या या स्थानिक सरदाराच्या मदतीने विजयनगरचे राजे कृष्णदेवराया यांनी पोर्तुगीजांशी हातमिळवणी केली. सुरवातीला त्यांच्यातील सौदाही एकाच मुद्यावर झाला. गोव्यात येणारे सर्व घोडे विजयनगर साम्राज्याला देण्यात यावेत. पोर्तुगीजांना एकही घोडा सुलतानांना विकता येऊ नये ही या करारातील महत्त्वाची तरतूद होती. गोवा व पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीजांची हुकूमत राहील, परंतु त्या बदल्यात विजयनगरच्या हद्दीत हस्तक्षेप होणार नाही, शिवाय विजापूरच्या संघर्षात दोघेही एकमेकांना मदत करतील.
परंतु १५४७ च्या या लष्करी करारानंतरही सुलतानांच्या आक्रमणापासून विजयनगरच्या साम्राज्याचे रक्षण झाले नाही. कारण दक्षिणी सुलतानांची एकी व त्यांचा तुफानी तोफगोळा हल्ला हंपीचे रक्षण करू शकला नाही. १५६५च्या तालिकोटा लढाईत विजयनगरचे दोन मुस्लिम सरदार फितूर झाले, युद्धभूमीवर चुका झाल्या व हत्तींच्या अतिवापराचाही परिणाम झाला. त्यानंतर साम्राज्य आणखी १०० वर्षे टिकले असले तरी ते कमकुवत बनले होते व नंतर लयास गेले.
६०० वर्षांनंतर ऊन-पाऊस व पर्यावरणाशी संघर्ष करीत राजधानीचे वैभवही झिजले आहे व कोलमडून पडण्याची भीती आहे. विजयनगरचे साम्राज्य हे हिंदू वैभवाचे जबरदस्त प्रतिक मानता येऊ शकते. १३३६-१६४६ ची ही राजवट हिंदू स्वाभिमानाचे, दिमाखाचे पर्व आहे व मुस्लिम आक्रमणापासून हिंदू धर्म, संस्कृती व संस्थांचे संरक्षण व सांभाळ करण्याचे मोठे कार्य त्यांनी चालविले. त्यांचे लष्करी सामर्थ्य, व्यापार, विदेश नीती हा कौतुकाचा विषय राहिला, अनेक वर्षे त्यांनी आपल्या बुद्धिचातुर्य व तरबेज विदेश नीतीचा भाग म्हणून आक्रमक मुस्लिम राजवटींमध्ये दुही पेरण्याचे काम चालविले.
कृष्णदेवराय यांच्या कारकीर्दीत हिंदू देवळांचे, व्यासपीठांचे निर्माण करून धर्म, संस्कृती व कला यांना त्यांनी संरक्षण दिले. हंपी हे या हिंदू धर्माच्या वैभव निर्माणाचे प्रतिक आहे. दख्खनी सुलतानांना दोन शतके रोखून धरण्याचे कसब विजयनगरमध्ये होते. भव्य स्मारके, देवालये, शिल्पे, शहरांची वास्तुकला, विस्तीर्ण बागा, रस्ते, जलस्रोतांचे निर्माण हीसुद्धा त्यांच्या स्थापत्य कला व दूरदृष्टीची साक्ष देतात. या राजवटीने सामाजिक सौहार्दाला पूरक वातावरण तयार करून त्याकाळी सर्वधर्म समभावाची शिकवण निर्माण केली होती.
दुसऱ्या महायुद्धात युरोपातील अनेक ऐतिहासिक वास्तू उद्ध्वस्त करण्यात आल्या. त्यांचे पुनर्निर्माण करण्यात त्या राजवटींनी कसर सोडली नाही. त्यांचे राजवाडे, किल्ले त्यांच्या वैभवाची साक्ष तर देतातच, शिवाय त्यांची दूरदृष्टी, औदार्य, इतिहासाप्रति ओढ, पुराभिलेखीय संरक्षण व जतन - यामुळेही त्यांच्याप्रति आदर निर्माण होतो. आपण संस्कृती व सनातनी धर्माचे केवळ गोडवे गातो, परंतु आपल्याच पर्यटकांनी ही शिल्पे व त्यांचे सौंदर्य नष्ट करण्यास हातभार लावला.
सरकारांना त्यांच्या जतनाची दृष्टी नाही आणि अतिश्रीमंतीचा हव्यास बाळगणाऱ्या श्रीमंत देवालयांनी त्यांच्या जतन-संरक्षणाकडे ढुंकूनही पाहिले नाही. तिरुमला, साईबाबा, पद्मनाभस्वामी आदी देवस्थानांनी मदत करायची ठरवले तर नव्या हंपीचे निर्माण करता येईल, हा सांस्कृतिक ठेवा केवळ पर्यटकांसाठी नाही तर भविष्यातील पिढ्यांना नवी अनुभूती देईल.
माझा एक निकटचा मित्र ‘हंपी’ची दशा पाहून सहज बोलून गेला, ‘‘सुलतानांनी हंपीच्या अवशेषांवर मशिदीचे निर्माण केले असते, तर एव्हाना ती पाडून मंदिराचे पुनर्निर्माण करण्यावरून मोठे राजकारण घडले असते.’’ मशीद-मंदिराचा मुद्दा राजकीय मुद्दा बनू शकतो, परंतु सामर्थ्यशाली विजयनगर सम्राटांनी धर्म-संस्कृतीची द्वाही फिरवली, मुस्लिम आक्रमणकर्त्यांना शेकडो वर्षे रोखून धरले, सनातन धर्म खऱ्या अर्थाने जिवंत ठेवला. दुर्दैवाने त्यांनी स्मृती जतन करावी हा राजकीय मुद्दा बनू शकत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.