Water Shortage यंदा पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. त्यातच धरणांच्या जलसाठ्यामध्ये कमालीची घट झाल्याने राज्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील नागरिकांना पिण्याकरता 650 एमएलडी पाण्याची गरज असून सध्या राज्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पातून सुमारे 400 एमएलडी पाणी मिळते, तर 250 एमएलडी पाणी कमी पडते.
यासाठी नवे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतरच लोकांना मुबलक पाणी मिळेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता संतोष म्हापणे यांनी दिली.
ते म्हणाले की, उत्तर गोव्यासाठी अस्नोडा येथे 50, 30 आणि 20 एमएलडीचे जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत. हे प्रकल्प तिळारी आणि पर्रा नदीच्या पाण्यावर उभारले असून बार्देश आणि डिचोली तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा होतो.
पर्वरी येथे 15 एमएलडीचा प्रकल्प उभारला आहे. चांदेलला 15 एमएलडीचे दोन प्रकल्प आहेत. ते पेडणे आणि मांद्रे भागात पाणीपुरवठा करतात. शिवाय साखळी, पडोशे येथे 5 आणि 7 एमएलडीचा पाणी प्रकल्प आहेत.
तो पर्येपर्यंत पाणीपुरवठा करतो. धामसे येथे 15 एमएलडीचा पाणी प्रकल्प आहे. दक्षिण गोव्यात ओपा येथे खांडेपार नदीवर 115 एमएलडीचे दोन प्रकल्प आहेत. येथून तिसवाडी, फोंडा तालुक्यांतील गावांना पाणीपुरवठा केला जातो.
याशिवाय शिरोडा-म्हैसाळ धरणावर पाणी प्रकल्प असून तो १० एमएलडीचा आहे. साळावली धरणाखाली 180 आणि 100 एमएलडीचे पाणी प्रकल्प आहेत. ते या धरणावर अवलंबून आहेत. चापोली धरण परिसरात श्रीस्थळ येथे 10 आणि 5 एमएलडीच्या पाणी प्रकल्पातून काणकोण परिसरातील गावांना पाणीपुरवठा केला जातो.
यापैकी काही पाणी प्रकल्प पूर्णांशाने चालतात तर काही पाणी प्रकल्पांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवतो. अतिरिक्त 250 एमएलडी पाणीपुरवठा करणारे प्रकल्प उभारल्यास राज्याला मुबलक पाणी मिळू शकते. सध्या यावर काम सुरू आहे.
जलशुद्धीकरण प्रकल्पांना जलस्रोत खात्यामार्फत कच्च्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या काही धरणांमध्ये कमालीची घट झाली असली तरी जूनच्या मध्यापर्यंत पुरेल इतके पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या तरी पाणीटंचाई होणार नाही.
- प्रमोद बदामी, मुख्य अभियंते, जलस्रोत
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.