Alphonso Alert: हापूसवर युद्धाचं सावट! मध्यपूर्वेतील संघर्षाचा कोकणच्या आंब्याला फटका; निर्यातीचं गणित बिघडणार

Konkan Alphonso Mango Export: मार्च महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आखाती देशांमधील ही युद्धजन्य परिस्थिती निवळली नाही, तर यंदा हापूसची निर्यात मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Konkan Alphonso Mango Export
Alphonso AlertDainikGomantak
Published on
Updated on

Middle East Conflict Impact on Trade: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या तीव्र संघर्षामुळे आता भारताच्या कृषी निर्यातीवर, विशेषतः कोकणच्या जगप्रसिद्ध 'हापूस' आंब्यावर संकटाचे सावट पसरले. मार्च महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आखाती देशांमधील ही युद्धजन्य परिस्थिती निवळली नाही, तर यंदा हापूसची निर्यात मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरवर्षी 15 ते 20 मार्च दरम्यान हापूसच्या निर्यातीचा हंगाम जोमाने सुरु होतो, परंतु यंदा जागतिक स्तरावरील अस्थिरतेमुळे लॉजिस्टिक आणि व्यापार मार्गांमध्ये अडथळे येण्याची शक्यता निर्माण झाली.

महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. त्यांच्या मते, आखाती देशांमधील तणावामुळे एअर कार्गोच्या हालचालींवर मर्यादा येऊ शकतात, ज्याचा थेट परिणाम निर्यातीवर होईल. कोकण पट्ट्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड हे तीन जिल्हे देशातील एकूण आंबा निर्यातीत 60 ते 70 टक्के वाटा उचलतात.

दरवर्षी या भागातून साधारण 1.7 लाख मेट्रिक टन हापूसचे उत्पादन होते, ज्यापैकी 20 ते 25 हजार मेट्रिक टन आंबा थेट परदेशात निर्यात केला जातो. संयुक्त अरब अमिराती ही हापूससाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. याशिवाय अमेरिका (America), जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपीय देशांमध्येही हापूसला मोठी मागणी असते. मात्र, आखाती प्रदेशातील असुरक्षिततेमुळे विमान वाहतूक आणि व्यापार विस्कळीत झाल्यास आंबा बागायतदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकते.

Konkan Alphonso Mango Export
Iran US Israel War: ''इराण कधीही सरेंडर करु शकतो'', डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 बैठकीत मोठा दावा; मध्यपूर्वेतील युद्धाला नवं वळण

यंदा आंबा बागायतदार आधीच दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे जागतिक युद्धाचे सावट आहे, तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केलेल्या संयुक्त सर्वेक्षणानुसार, यंदा प्रतिकूल हवामानामुळे मोहोराचे नुकसान झाले असून हापूसच्या उत्पादनात तब्बल 80 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नर फुलांचे वाढलेले प्रमाण आणि मोहोर सुकल्यामुळे झाडांना फळधारणा अत्यंत कमी झाली आहे. उत्पादनातील या प्रचंड घटीमुळे स्थानिक बाजारपेठेतही हापूसचे भाव गगनाला भिडले आहेत.

Konkan Alphonso Mango Export
Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

या युद्धाचा फटका केवळ ताज्या फळांच्या निर्यातीलाच नाही, तर प्रक्रिया उद्योगालाही बसणार आहे. कोकणातील एकूण उत्पादनापैकी 25 ते 30 टक्के आंबा पल्प (रस) काढण्यासाठी वापरला जातो आणि या आंब्याच्या रसाची 85 टक्के निर्यात युरोपीय देशांमध्ये केली जाते. मध्यपूर्वेतील तणाव वाढल्यास या प्रक्रिया केलेल्या मालाची वाहतूकही महागडी आणि कठीण होऊ शकते. अशा परिस्थितीत उत्पादनातील घट आणि जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता यांमुळे कोकणचा आंबा बागायतदार यंदा पूर्णपणे कोंडीत सापडला असून, 15 मार्चपर्यंत परिस्थिती सुधारते का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com