Goa Mining ई-लिलावामधील खनिज मालाचे वाहतूक कंत्राट कुणाला मिळावे, यावरून भाजप सरकारातील दोन मंत्री सुभाष फळदेसाई आणि नीलेश काब्राल यांच्यातच जबरदस्त जुंपली आहे. या व्यवसायावर वर्चस्व कुणाचे असावे, यावरून आज, बुधवारी वाद पेटला.
त्यामुळे कुडचडेत सुमारे सात तास खनिज भरून आलेले ट्रक रस्त्यावरच अडकून पडले. आधीच उन्हामुळे तापलेल्या वातावरणात इतर वाहनचालकांनाही वेठीस धरण्याचा प्रसंग घडला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांचे पुतणे कुणाल फळदेसाई यांना या खनिज वाहतुकीचे कंत्राट मिळाले आहे. मात्र, खामामळ-कुडचडे येथील तारकर यांच्या जेटीवर हा माल उतरविण्यात येणार होता.
सार्वजनिक बांधकाम मंत्री काब्राल यांनी आपल्या मतदारसंघात हा माल उतरविण्यात येत असेल तर हे कंत्राट आपल्याला कसे मिळाले नाही, असा मुद्दा उपस्थित करून समर्थक नगरसेवकांना भडकावून आज ही खनिज वाहतूक बंद पाडली.
खामामळ-कुडचडे येथील मॅग्नम जेटीवर खनिज माल खाली करण्यावरून गावात काब्राल आणि फळदेसाई असे दोन गट तयार झाल्याने बुधवारी (ता.३१) या जेटीवर खनिज माल खाली करण्यासाठी आलेले ट्रक एका गटाने अडवून धरल्याने संध्याकाळी उशिरापर्यंत ते रस्त्यावरच उभे होते.
ही वाहतूक अडविण्यात काब्राल यांचे समर्थक नगरसेवक प्रसन्न भेंडे यांनी पुढाकार घेतला होता. दरम्यान, यासंदर्भात दोन्ही मंत्रिमहोदयांशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही.
दुसऱ्या गटाचा पाठिंबा
खामामळ येथील या जेटीवर खनिज वाहतुकीवरून काब्राल आणि फळदेसाई असे दोन गट तयार झाले असून या दोन्ही गटांमध्ये खनिज वाहतुकीवरून आज चांगलीच जुंपली. बुधवारी विरोधी गटाने ही वाहतूक झाली पाहिजे, असे सांगितले.
जो कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून त्यासाठी आम्ही या वाहतुकीला पाठिंबा दिला आहे, असे रायसू नाईक यांनी सांगितले.
खनिज ट्रक खोळंबल्यामुळे कुडचडेतील संपूर्ण रस्त्यावर भर उन्हात तब्बल सात तास लोकांना वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागले. अखेर हा प्रश्न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापर्यंत पोहोचला.
शेवटी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा माल उतरविण्यात आला. कायदेशीरपणे केलेली वाहतूक कुणी अडवू नये, अशी समज मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
ती’ बैठक निष्फळ
एक महिन्यापूर्वी या जेटीवर खनिज माल खाली करण्यावरून खामामळ येथे कुडचडेचे आमदार या नात्याने मंत्री नीलेश काब्राल यांच्याबरोबर ट्रकमालकांची बैठक झाली होती. यावेळी काब्राल यांच्या विरोधकांनी एक लाख टन खनिज असेल तरच येथे खनिज खाली करू देणार असल्याचे काब्राल यांना सांगितले होते.
मंत्र्यांमुळे दोन गट
खनिज व्यवसाय बंद झाल्याने ट्रकमालक हवालदिल झाले होते. सध्या ई-लिलाव झालेल्या खनिज मालाची वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली असली तरी, मंत्र्यांच्या राजकारणावरून दोन गट निर्माण झाले. यासंदर्भात दोन्ही मंत्र्यांशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.
‘काब्राल’ गटाकडून अडवणूक : बुधवारी (ता.31) कुणाल फळदेसाई या कॉन्ट्रॅक्टरने खामामळ येथे खनिज माल खाली करण्यासाठी आपले ट्रक जेटीवर पाठविले असता, काब्राल यांच्या गटाने ही वाहतूक अडवून धरली व या जेटीवर किती लाख टन माल आणला जाणार, असा प्रश्न नगरसेवक प्रसन्न भेंडे यांनी उपस्थित केला.
यावेळी मॅग्नम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उत्तर देण्यासाठी कोणीच उपस्थित नसल्याने आम्ही ही वाहतूक सोडणार नसल्याचे सांगितले.
काँग्रेसची टीका
..हे तर काब्रालांचे खंडणीराज : पाटकर
1 वाहतूक कंत्राट आपल्यालाच मिळावे, हा मंत्री काब्राल यांचा हट्ट म्हणजे एकप्रकारे त्यांनी चालविलेले खंडणीराज असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.
2 सध्या खनिज वाहतूक बंद असल्याने खाण पट्ट्यातील ट्रकमालक हवालदिल झाले आहेत. ही खाणबंदी त्यांच्यावर भाजपनेच लादली.
3 लिलावाच्या मालाची वाहतूक सुरू होऊन ट्रकमालकांना थोडा व्यवसाय मिळत असेल तर काब्राल यांच्या पोटात का दुखते? जर ट्रकवाल्यांना चार पैसे मिळत असतील तर काब्राल त्यात आडकाठी का आणतात, असे पाटकर म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.