Heavy Rain In South Goa  Gomantak Digital Team
गोवा

Heavy Rains In South Goa : दक्षिणेत पावसाचा जोरदार खेळ!

स्थिती बिकट : घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान; ठिकठिकाणी वीजखांबही मोडले ; खोदलेल्या रस्त्यांमुळे कुडचडे ‘पाणी’मय

गोमन्तक डिजिटल टीम

Heavy Rains In South Goa : सकाळी पडलेल्या जोरदार पावसामुळे कुडचडे बाजारातील बरेच रस्ते पाण्याखाली गेले तर काही ठिकाणी दुकानात पाणी घुसल्याने कुडचडे बाजारात लोकांची तारांबळ उडाली. कुडचडे भागात भूमिगत विजवाहिनी व मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यासाठी जागोजागी रस्त्यांचे खोदकाम केल्याने या विकासकामांबद्दल लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून कुडचडे पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासकामांच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवल्याने लोक हैराण झाले असून त्यात पावसाळ्यापूर्वी खोदकाम केलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी लोकांनी मागणी केली होती. अन्यथा याचे विपरित परिणाम पावसाळ्यात दिसून येणार असल्याचे लोकांचे म्हणणे होते व ते खरे ठरले. जागोजागी खोदकाम केल्याने पाण्याचा निचरा होणारे मार्ग बंद झाल्याने गुरुवारी सकाळी पडलेल्या जोरदार पावसामुळे कुडचडे बाजाराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

मलनिस्सारण टाक्या बांधल्या गेल्या आहेत त्याठिकाणी रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे तर भूमिगत वीजवाहिन्या उघड्या पडल्याने या कामाच्या दर्जाविषयी लोकांनी संशय व्यक्त केला आहे. पावसाचे पाणी रस्त्यावरून जात असल्याने ते पाणी रस्त्याशेजारी असलेल्या काही दुकानांत गेल्याने व्यावसायिकांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. अचानकपणे पाणी दुकानात शिरल्याने व्यावसायिकांची तारांबळ उडाली.

बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने गुरुवारी सकाळीपर्यंत कुडचडे शहराला झोडपून काढले. यात कुडचडे मतदारसंघात सुरू असलेल्या कामांमुळे तसेच पालिकेद्वारे मॉन्सूनपूर्व कामे वेळेवर न केल्याने विविध ठिकाणी पाणी तुंबले होते. याबाबत लोकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

साकोर्डात मेघगर्जनेसह बरसला

साकोर्डा, मोले कुळे व धारबांदोडा भागात बुधवारी (ता.३१ मे) रात्री मेघगर्जनेसह जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने वातावरणात गारवा पसरला. त्यामुळे अनेक दिवसांपासून उकाड्याने अस्वस्थ झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

साकोर्डा परिसरात बुधवारी रात्री १० वा.च्या सुमारास तुरळक सरी बरसल्या. अर्ध्या तासानंतर ढगांचा गडगडाट व विजांच्या लखलखाटासह वादळी वारे सुटले. मुसळधार पाऊस कोसळायला लागल्याने वादळी वाऱ्याचा वेग मंदावला. पाऊस ओसरला तरी ढगांचा गडगडाट व विजांचा लखलखाट बराच वेळ सुरूच होता. साकोर्डा भागातील संपूर्ण वीजपुरवठा व भारत संचार निगमची दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली होती.

गुरुवारी (ता.१ जून) सकाळी ५.४५ वा.च्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. धारबांदोडा भगात अवकाळी पावसाचा अधिक फटका बसला. या भागातदेखील वादळी वारे सुटल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली. त्यामुळे साकोर्डा-फोंडा मार्गावरील वाहतूक खोळंबल्याने कामगारवर्गाची गैरसोय झाली होती. वीजखांबांची मोडतोड झाल्याने वीज खात्याचे नुकसान झाले. खंडित झालेला वीजपुरवठ सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचारी सकाळपासून कामात व्यस्त होते, तरीही संध्याकाळी ७ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नव्हता.

अग्निशमन दल पूर्ण दिवस व्यस्त

गुरुवारी पहाटेच्या वेळी आलेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वाहनांवर, घरांवर तसेच रस्त्यावर झाडे पडण्याच्या घटना घडल्या, अशी माहिती मडगावच्या अग्निशमन दलातर्फे देण्यात आली आहे. मालभाट येथील व्हिक्टर हॉस्पिटलजवळ एका कारवर झाड कोसळून १८ हजार रुपयांचे नुकसान झाले. यावेळी अग्निशमन दलाने ते झाड हटविले.

डोंगरी-नावेली या ठिकाणी एका स्कूटरवर झाड पडले होते. यात ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. दामोदर कॉलेज, पेडा या ठिकाणी एका कार पार्किंग शेडवर झाड कोसळून ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व ठिकाणची झाडे हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलातर्फे सुरू होते.

मडगाव फेस्ताच्या फेरीला फटका

ओल्ड मार्केट येथे असलेल्या चर्चच्या फेस्ताची फेरी एसजीपीडीए मार्केट परिसरात भरविण्यात आली आहे. यादरम्यान काहींनी पत्र्याची शेड टाकली आहे तर काहींनी ताडपत्रीची तात्पुरती शेड उभारली आहे. गुरुवारी पहाटेच्या सत्राला आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेकांची शेड उडून गेल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी पडल्याने अनेक दुकानदारांच्या मालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात एका फर्निचर विक्रेत्याच्या शेडचे पत्रे उडून गेल्याने यामध्ये असलेल्या फर्निचरचे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT