Heavy Rain With Gale In Goa गुरुवारी पहाटे वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण गोव्यातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तसेच काही परिसरात रस्तेही पाण्याखाली गेले. धारबांदोडा, मुरगाव, फोंडा, कुडचडे, मडगाव या शहरांनाही याचा फटका बसला.
मडगाव शहरात हॉटमिक्स डांबरीकरण केल्याने रस्त्यांची ऊंची दुकानांच्या स्तरापेक्षा अधिक झाल्याने अनेक दुकानांत पाणी शिरले. मडगाव पालिकेचे सज्जेही पाण्याखाली गेले होते.
धर्मापूर येथे मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने काही ठिकाणी वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला, तर तळावली-नावेली येथे एका घरावर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले. मडगाव व सभोवतालच्या परिसरात झालेल्या पडझडीत मनुष्यहानी झाल्याची नोंद नाही.
अनेक ठिकाणी वित्तहानी झाली. मात्र, किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही. कदंब बस स्थानकावर एका फर्निचर दुकानाचे छत कोसळले आणि काही प्रमाणात नुकसान झाले.
‘अग्निशमन’ला 43 कॉल
पडझडीच्या घटनांचे मडगाव अग्निशमन दलाच्या कार्यालयाला 43 कॉल आले. यातील 11 वाजेपर्यंत केवळ 10 ते 12 ठिकाणांचे कॉल क्लिअर केल्याची माहिती मडगाव अग्निशमन दलाचे अधिकारी गिल सौझा यांनी दिली.
यातील काही ठिकाणी रस्त्यांवर तसेच काही घरांवर झाडे व झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. तसेच काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रकार घडले होते.
मुरगाव तालुक्यात सहा ठिकाणी झाडे घरांवर व इतर ठिकाणी पडून हजारो रुपयांचे नुकसान झाले. वेळसांव येथील वृद्ध जोडप्याच्या चारचाकी वाहनावर माड पडल्याने महिला जखमी झाली.
मांगोरहील येथील गणपती मंदिरामागे कडुनिंबाचे झाड घरावर पडल्याने 15 हजार रुपयांचे नुकसान झाले, तर बायणा, मोगाबाय, काटे बायणा व सार्वजनिक बांधकाम भूगटार प्रकल्पात माड पडल्याने अंदाजे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले.
सर्वाधिक पाऊस केपेत
राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असून मागील २४ तासांत सर्वाधिक केपे येथे सर्वाधिक ९०.० मिमी पावसाची नोंद झाली असून त्याखालोखाल मडगाव ७३.०, सांगे २१.४ मिमी, दाबोळी १२.५ मिमी, काणकोण १०.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. आज, गुरुवारी पणजी येथे कमाल ३० तर किमान २५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
मेघगर्जनेसह पाऊस शक्य
राज्यात गुरुवारी सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण होते. गुरुवारी पहाटे काही भागांत पाऊस बरसला, तर काही भागांत केवळ ढगाळ वातावरण राहिले. मात्र, येत्या काही दिवसांत राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मडगाव पालिकेला पाण्याचा वेढा
या पावसामुळे सोनसोडो कचरा यार्डवरील कचरा रस्त्यावर वाहून आल्याने रस्ता निसरडा झाला होता. त्यामुळे हा कचरा जेसीबीने हटविल्यानंतर या ठिकाणी कचरा घेऊन येणाऱ्या वाहनांची वाट मोकळी झाली.
मुसळधार पावसामुळे पहाटे मडगाव पालिका इमारतीला चोहोबाजूंनी काही वेळासाठी पाण्याचा वेढा पडला होता. पालिका इमारतीत काही ठिकाणी गळतीही लागली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
मॉन्सून अरबी समुद्रात दाखल
आज, गुरुवारी मॉन्सून दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव तसेच बंगालच्या पूर्व मध्यवर्ती उपसागराकडे सरकला. अशाच प्रकारे मॉन्सूनची प्रगती कायम राहिल्यास नियोजित वेळेत मॉन्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
गोवा आणि दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीत ताशी ५५ किमी वेगाने वादळी वारे वाहणार असून मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
बोरीमध्ये पडझड : फोंडा तालुक्यात विशेषतः बोरी, शिरोडा आदी भागांत सर्वाधिक पाऊस झाला. बोरी येथील सुभाष नाईक यांच्या घरावर झाड पडून घराचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले.
सर्वाधिक हानी धारबांदोडा तालुक्यात झाली असून अग्निशामक दलाची बरीच धावपळ झाली. तालुक्यात काही ठिकाणी झाडे कोसळली; पण सुदैवाने हानी झाली नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.