Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; विजय सरदेसाई, विश्वजीतमध्ये दुरावा?

Khari Kujbuj Political Satire: पूजा नाईक ज्‍या मंत्र्याचे नाव घेऊ इच्‍छिते, तो सध्‍याच्‍या मंत्रिमंडळातही असून, तो अजूनही नोकऱ्या वाटत आहे. पण, असा मंत्री आपल्‍या मंत्रिमंडळात नाही, असे मुख्‍यमंत्र्यांनी स्‍पष्‍ट करावे.

गोमन्तक डिजिटल टीम

विजयच्‍या ‘त्‍या’ विधानावरून तर्क-वितर्क!

‘जॉब स्‍कॅम’ प्रकरणी आरोपी असलेल्‍या पूजा नाईकने शुक्रवारी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केलेल्‍या दाव्‍यांवरून आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाईंनी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आव्‍हान तर दिले. पूजा नाईक ज्‍या मंत्र्याचे नाव घेऊ इच्‍छिते, तो सध्‍याच्‍या मंत्रिमंडळातही असून, तो अजूनही नोकऱ्या वाटत आहे. पण, असा मंत्री आपल्‍या मंत्रिमंडळात नाही, असे मुख्‍यमंत्र्यांनी स्‍पष्‍ट करावे. त्‍यानंतर आम्‍ही त्‍याचे नाव घेऊ, पुरावे सादर करू असे म्‍हणतानाच ‘त्‍या चॅनेललाही आत घेऊ’ असेही ते म्‍हणाले. पण, ‘त्‍या चॅनेललाही आत घेऊ’ या त्‍यांच्‍या विधानावरून मात्र राजकीय वर्तुळातून अनेक तर्क-वितर्क लढवण्‍यात येत आहेत. ∙∙∙

विजय सरदेसाई, विश्वजीतमध्ये दुरावा?

राजकारणात कोणीही कोणाचा मित्र किंवा शत्रू नसतो, असे म्हणतात. दोघांमध्ये चांगले संबंध आहेत, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते, हे खरे. पण झुवारीनगर येथील दीड लाख चौरस मीटर जागेच्या रुपांतरणास विजयचा विरोध, शिवाय मडगावमधील कार्यक्रमात विरोधकांवर केलेल्या टिकेला विजयने दिलेले प्रत्युत्तर पाहता, या दोघांमधील दोस्ताना संपला की काय? अशी शंका लोकांना येऊ लागली आहे. विश्र्वजीत साहेबांनी मडगावच्या दिगंबर बाबांचे गायलेले गुणगान विजय बाबांना आवडले नाही, हे सुद्धा सत्य आहे. अजून निवडणुका दूर आहेत. पण वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यात गोव्याच्या राजकारणात काय बदल होतात, हे पहाणे शहाणपणाचे ठरेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

दिगंबरबाबांच्या रम्य आठवणी!

मडगांवचे बाबा तथा दिगंबरबाब हल्ली वरचेवर त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील आठवणी आपल्या भाषणात काढताना दिसतात. एरवी त्याला कोणी आक्षेप घेण्याचे कारणही नाही, पण त्या मुख्यमंत्री पदावेळच्या अनेक घटनांनीच त्यांचा व त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाचाही घात केला ना! असे आजचे काँग्रेस नेते म्हणतात. मडगावचेच सावियो कुतिन्हो तर त्याचसाठी उठता बसता कामत यांचा उद्धार करताना दिसतात. एरवी दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्रिपदी असताना अनेक चांगले उपक्रम सुरु केले, हे खरेच. त्यांत ते म्हणतात, त्यांच्या काळातच गोव्यात एनआयटीची व अन्य अनेक शैक्षणिक प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली गेली, पण त्या काळात जे अनेक गैरप्रकार घडले, प्रशासनात जी बजबजपुरी माजली त्याचे परिणाम ते सरकार गेले, हे खरे असे काँग्रेसवालेच म्हणतात. ∙∙∙

‘इफ्फी परेड’चे आकर्षण!

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) २० तारखेपासून गोव्यात सुरू होत आहे. पहिल्या दिवशी उद्‍घाटनाचा कार्यक्रम डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होत आला आहे. परंतु यावर्षी गोवा मनोरंजन संस्थेने (ईएसजी) इफ्फीचे उद्‍घाटन ईएसजीच्या समोरील रस्त्यावर ‘इफ्फी परेड''द्वारे करण्याचा निर्णय घेतला. त्याला कारण म्हणजे गतवर्षी अशी ‘इफ्फी परेड'' आयोजकांना बरीच भावली. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये यावर्षीचा उद्‍घाटनाचा कार्यक्रम होणार नाही, हे स्पष्ट आहे. परंतु हे स्टेडियम उद्‍घाटनाला बुक केलेच नाही, ते स्टेडियम फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेसाठी बुक आहे, असे वृत्त आघाडीची खासगी वृत्तवाहिनीने शनिवारी रात्री चालवले. स्टेडिमय बूक करण्याविषयीचे म्हणणे ‘ईएसजी‘च्या पदाधिकाऱ्यांनी पेटाळून लावले. फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धा हडफडे येथे सुरू आहे. शिवाय इफ्फीचा समारोपाचा कार्यक्रम शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होणार आहे. परंतु वृत्तवाहिनीने चालवलेल्या वृत्तामुळे विनाकारण मनोरंजन संस्थेच्या अधिकाऱ्यांना पत्रकारांसह इतरांचे फोन गेल्याने अनेकांनी त्या वृत्ताविषयी आश्चर्य व्यक्त केले, काहींनी तर जे टोमणे मारायचे तेही मारले. परंतु इफ्फीसारख्या कार्यक्रमाच्या उद्‍घटनासाठी स्टेडियम बूक करण्याचे राज्य सरकारची संस्था कशी काय विसरून जाईल, असा प्रश्न सहजपणे पडल्याशिवाय राहणार नाही. ∙∙∙

विश्‍‍वासघाताच्‍या शक्‍यतेमुळे निर्णय?

गेल्‍या काही दिवसांत विरोधी पक्षांमध्‍ये घडत असलेल्‍या घडामोडींमुळे येत्‍या १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स (आरजीपी) या तीन पक्षांत युती होण्‍याची शक्‍यता सर्वांनाच होती. आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई अजूनही युतीबाबत आशावादी आहेत. पण, तरीही त्‍यांनी काहीच दिवसांपूर्वी ‘आप’मधून बाहेर पडलेल्‍या राजेश कळंगुटकर यांच्‍यासह त्‍यांची पत्‍नी राधिका कळंगुटकर यांना पक्षात प्रवेश दिला. शिवाय मयेची जागा महिलांसाठी राखीव असल्‍याने गोवा फॉरवर्डची मयेची उमेदवारीही राधिकांना जाहीर करून टाकली. त्‍यामुळे काँग्रेसकडून विश्‍‍वासघाताची शक्‍यता असल्‍यामुळेच विजयनी असा निर्णय घेतला का? असा प्रश्‍‍न फॉरवर्डसह काँग्रेसचेही कार्यकर्ते विचारत आहेत. ∙∙∙

प्राप्तीकर खात्याचे मौन

पैशाच्या बदल्यात नोकरी, या प्रकरणात कोट्यवधींचा खुलासा झाला आहे. एरव्ही केंद्रीय यंत्रणा लगेच सतर्क होतात चौकशी करतात. या प्रकरणात खुलेआमपणे कोट्यवधी रुपये दिल्या घेतल्याचा खुलासा होऊनही प्राप्तिकर खात्याने काहीच दखल न घेण्याचे कारण काय असावे याचा तर्क लावला जात आहे. यंत्रणांना कारवाईपासून कोणी रोखले तर नसावे ना अशी शंका घेतली जात आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा सौदा होतो आणि ती रक्कम कुठून आली याची साधी चौकशीही प्राप्तिकर खाते करत नाही, यामागे कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय व्‍यक्त होत आहे. ∙∙∙

आता पाळी कोणाची!

मडगाव पोलिस कोठडीत असलेल्‍या एडबर्ग परेरा याला झालेल्‍या मारहाण प्रकरणी उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर निलंबित झाला आहे, तर हवालदार मिंगेल वाझ व पोलिस अजय झिंगली या दोघांवर सध्या शिस्तभंगाची कारवाई झाली आहे. सध्या हे प्रकरण पुढील तपासासाठी क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात आले आहे. मात्र एवढ्यावरच ही साखळी थांबणार का? असा प्रश्‍न सध्‍या विचारु लागले आहेत. याचे कारण म्‍हणजे, या मारहाण प्रकरणात

अन्य काही पोलिसही गुंतले आहेत. आपण गोत्‍यात येऊ, या शंकेने आता त्यांची पाचावर धारण बसली आहे. आता कुणावर कारवाई होईल? याची चर्चा पोलिस ठाण्यात सुरू आहे. आता पुढची पाळी कुणाची असेल बरे! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बंगाल हादरले! झोपेत असताना 'मच्छरदाणी फाडून'अपहरण, लैंगिक अत्याचारानंतर 4 वर्षांची चिमुकली आढळली गटाराजवळ

Konkani Drama: सर्जनशीलतेचा प्रत्यय देणारी व्हिजुअल ट्रिट - ‘इन सर्च ऑफ सर्वायव्हल’

Goa Chess World Cup: जगज्जेत्या गुकेशचे आव्हान संपुष्टात! स्वेनने केले पराभूत; अर्जुन, प्रज्ञानंद, हरिकृष्ण, प्रणव चौथ्या फेरीत दाखल

Goa: "किती पैसे घेतेस?", गोव्यात 19 वर्षांच्या मुलीसोबत गैरव्यवहार! 'विदेशी पर्यटक' समजून अश्लील कमेंट्स; Video Viral

Goa ZP Election: बहुतांश ठिकाणी ‘झेडपीं’ची पळापळ सुरू, डिचोली वाढणार रंगत; पेडणे तालुक्यातून अनेकांचा पत्ता कट!

SCROLL FOR NEXT