खरी कुजबूज Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबूज: काहीही म्हणा, पोटभर वाढा

Khari Kujbuj Political Satire: कृती दलाने कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहाच्या दुरुस्तीचं काम एक ऑगस्टपासून करण्याचं ठरवलं होतं.

दैनिक गोमन्तक डिजिटल

काहीही म्हणा, पोटभर वाढा

कृती दलाने कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहाच्या दुरुस्तीचं काम एक ऑगस्टपासून करण्याचं ठरवलं होतं. पण, सुस्त कारभारामुळे अजून तरी काही हालचाल दिसत नाही. संपूर्ण संकुल बंद करण्याची आवश्यकता नाही, फक्त सभागृह काही काळासाठी बंद करावं, अशी दलाची सूचना होती. ‘आयआयटी मद्रास’ पथकाच्या अभ्यासानुसार हे काम दोन ते तीन महिन्यांत होणार, असा अंदाज होता. या सभागृहाची आसनक्षमता ९०० आहे. या थिएटरची जी वाट लागत आहे, ती श्रोत्यांना बघवत नाही. ऑगस्ट सुरू झाला तरी हॉल बुकिंग बंद करण्याच्या किंवा निश्चित झालेल्या तारखा पुढे ढकलण्याच्या किंवा दुरुस्तीचे काम सुरू करण्याच्या कसल्याच सूचना आलेल्या नाहीत. प्रत्येक संस्थेचीही आवड असते. कला अकादमीचीही आवड नकारात्मक स्तरावर प्रसिद्धीझोताचं स्नान घेण्याची. नाट्य स्पर्धेतील भ्रष्टाचार चौकशी प्रकरण गाजलं. चौकशी कुठे पोहोचली? रया मात्र गेली.

अमितच्या रक्तातील काँग्रेस

काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या रक्तात काँग्रेस आहे, ती कोण बाहेर काढू शकेल का, अशा आशयाचा सवाल केला. कुडचडे येथील प्रसिद्ध खनिज व्यावसायिक असलेले पाटकर कुटुंब हे आधीपासून काँग्रेस समर्थक. त्यामुळे अमित यांच्याही रक्तात काँग्रेस असणे साहजिकच. यापूर्वी आपल्या रक्तात काँग्रेस आहे, असे म्हणणाऱ्या डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी गोव्यात गोवा काँग्रेसचा प्रयोग केला होता. आता अमित त्याची पुनरावृत्ती करणार तर नाहीत ना? तसे घडले तर मात्र त्याला काँग्रेस पक्ष जबाबदार असणार आहे. काँग्रेसने ज्या पद्धतीने पाटकरांना पदावरून काढले, त्याबाबत सामान्यतः जनमानसात चांगला संदेश गेलेला नाही. सासष्टीतही लोक नाराज आहेत. त्यामुळे अनेकांचे लक्ष गोवा काँग्रेसकडे लागले आहे.

पाटकर यांची चाल

बैठकीसाठी निमंत्रण देणारा संदेश आपण व्हॉट्सॲपवर विजय सरदेसाई यांना पाठवला होता, याचा पुरावा म्हणून आपला मोबाईल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पत्रकारांसमोर सादर केला. तो संदेश पाठवल्याची तारीख व वेळ दाखवण्याचा त्यांचा उद्देश होता. आता या वादात माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी आलेमाव यांची ही कृती अविश्वास दर्शवणारी होती, असे म्हटले आहे. एकेकाळी खांद्याला खांदा लावून काँग्रेससाठी लढणाऱ्या पाटकर आणि आलेमाव यांचेही संबंध आता चांगले राहिलेले नाहीत, असे यावरून दिसते. पाटकर यांची ही बदललेली भूमिका बरेच काही सांगून जाते, असे काँग्रेसवाल्यांना वाटत आहे.

वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी ...!

गोवा मेरिटाईम बोर्ड म्हणून नामकरण केलेल्या कार्यालयात कामकाज अजूनही ‘कॅप्टन’ यांच्याच नियंत्रणाखाली चालत आहे. कॅप्टन यांच्याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही दुजाभाव नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे आणि कोणाला विनाकारण त्रास न देण्यात त्यांना अजिबात रस वाटत नाही. परंतु, एक लिपिक पदावर काम करणारा कर्मचारी कॅप्टनच्या मर्जीतील असल्याचे दाखवून आपल्या चुका झाकण्याचा प्रयत्न करीत आहे. जुन्या इमारतीतून नव्या टर्मिनल इमारतीत तरी या लिपिकाच्या वागण्यात बदल होईल, असे कर्मचाऱ्यांना वाटत होते, पण तसे काही झालेले नाही. अंगीभूत असलेल्या गुणांमुळे म्हणे लिपिक कर्मचाऱ्यांविषयी कॅप्टन यांचे कान भरतो, अशीही चर्चा आहे. त्याचा या कर्मचाऱ्यांना आता त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे कॅप्टन यांनी किमान नव्या इमारतीतील सीसीटीव्हीद्वारे कोण किती काम करतो? काय करतो? हे तपासले, तर कर्मचाऱ्यांसाठी चांगलेच ठरेल.

रुडॉल्फ सापडले कोंडीत

सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांना महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात हे राजकीय कोंडीत पकडू लागले आहेत. फर्नांडिस यांनी मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर आपली कैफियत मांडली आहे. मोन्सेरात यांचा उधळलेला राजकीय घोडा कोणीच रोखणार नाही, हे सर्वांना ठाऊक आहे. आपण जे काही करतो आहे, ते भाजपसाठीच, असे सांगत बाबूश यांनी पक्षालाही चुचकारले आहे. यामुळे विधानसभा निवडणूक जवळ येत जाईल, तसे सांताक्रुझमधील राजकारणाला बाबूश कसे वळण लावतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पालिकेच्या दाव्यांची हवाच!

म्हापशात सोमवारी फक्त अर्धा तास पाऊस पडला, अन् काय चमत्कार! म्हापसा पालिकेची वर्षभराची मान्सूनपूर्व कामेच वाहून गेली! मार्केटमध्ये तर इतके पाणी साचले होते, की लोकांना वाटले, पालिका रस्त्यावरच बोट चालवायची सोय करून देतेय की काय! अन् ती नगरपालिकेची खास ‘टास्क फोर्स’, ती बिचारी कागदावरच पाणी साचल्यामुळे अडकून पडली असेल, म्हणून रस्त्यावर कुठे दिसलीच नाही! नगरपालिकेचे अधिकारी पण मस्त उत्तर देतात, ‘अहो, पाऊस अचानक अन् जास्त पडला ना!’ पावसाळ्यात पाऊस पडणार नाही तर काय उन्हाचे चटके बसणार? दरवर्षी हेच नाट्य, अन् नागरिक मात्र पाणी उपसत बसायचे! सध्या पावसाची तशी उसंतच आहे, अन्यथा पाणी तुंबण्याचे प्रकार नित्याचेच बनले असते, असे लोकच आता बोलू लागलेत...

पदपथावरून युरींवर टीका

‘कोणाच्या म्हशी आणि कोण काढतो उठाबशी’ अशी मराठीत एक म्हण आहे. रस्त्याच्या बाजूने चालण्याचा अधिकार प्रत्येक पादचाऱ्याला मिळायला हवा. जिथे जिथे रस्ता आहे, त्या रस्त्याच्या बाजूला पादचाऱ्यांना चालण्यासाठी फुटपाथ, पदपथ निर्माण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला होता. त्याचाच भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने कुंकळळी बस स्थानक ते देमानीपर्यंत रस्त्याच्या बाजूला फुटपाथ उभारले आहेत. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र, या फुटपाथमुळे अपघात होतात व अपघातात तिघांचा बळी गेल्याचा दावा ‘स्वाभिमानी कुंकळळीकर’ म्हणणारे काही स्थानिक करायला लागले आहेत. हे फुटपाथ काढून टाकावेत, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, हे फुटपाथ आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा ड्रीम प्रकल्प असल्याचे सांगून आता युरींवर टीका होत आहे. बिचारे युरी... निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आणि दोष युरींना?

परीक्षण व समीक्षण

नाट्यक्षेत्र सर्व अंगांनी असे लडबडून गेले आहे. अस्वच्छ व गलिच्छ झाले आहे. नाट्यस्पर्धेवेळी पेपरवर काही अतिउत्साही लोक परीक्षणे (वार्तांकन) करतात. त्याला ते आपणच समीक्षण संबोधतात. नाट्यशाळेतील स्नातक छान लिहितात; परंतु एकांकिका, नाटक न लिहिलेले वा देशी-विदेशी नाटककारांची नावेही माहीत नसलेले हे लोक बातम्या लिहाव्या तसे परीक्षण लिहितात. ‘वॉशिंग्टनची कुऱ्हाड’ हा एक इंग्रजी शब्दप्रयोग. त्याचा अर्थ, उत्क्रांती हे या नखरेवाल्यांना माहीत नसेलच; पण लिहिताना पेन आहे, काहीही छापून येते म्हणून या कुऱ्हाडीसारखी आक्रमक मस्ती करू नये. तथापि नाट्यमंचाची स्वच्छता पुढे नेताना तज्ज्ञांनी काही उपाय केले आहेत. कुणीही माजोरी केली तर मडगावकरांनी सुरू केलेला तुती, हथोडा व घण यांचे यथायोग्य आघात हाणायचे उत्तरदायित्व तज्ज्ञांच्या हाती दिले आहे, अशी माहिती मिळाली आहे.

माघार नाही!

राज्यातील मोटारसायकल पायलटांसाठी सरकारने काही दिवसांपूर्वी सुरू केलेल्या ‘माझे ॲप’ला गोवा फॉरवर्डने प्रखर विरोध दर्शवत ॲप तत्काळ रद्द करण्याची मागणी लावून धरली. फॉरवर्डचे पदाधिकारी चेतन कामत यांनी मंगळवारी वाहतूक खात्याला तसे निवेदनही सादर केले. परंतु, हे ॲप अनिवार्य नसून, ऐच्छिक असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्यांना ॲपमध्ये सहभागी व्हायचे नसेल, तर त्यांना रस्त्यावर येण्याची गरजच नाही. तरीही गोवा फॉरवर्डने या विषयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे लक्षात आल्यानंतर ॲपवर आधारित टॅक्सीच्या निर्णयाप्रमाणेच ‘माझे ॲप’वरूनही मुख्यमंत्री माघार घेणार नसल्याची चर्चा सुरू आहे.

युरींचे ‘काजार’

सध्या गोव्यातील काँग्रेस नेमक्या कुठल्या मूडमध्ये आहे, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. सध्या काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यातील युती टिकून राहावी, यासाठी गिरीश आणि विजयकडून प्रयत्न सुरू झाले असताना विरोधी पक्षाने युरी आलेमाव यांच्याकडून त्या प्रयत्नात खो घालण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, असा सवाल लोक करीत आहेत. दुसऱ्या बाजूने युरी आलेमाव हे आताच सोयरिकेची बोलणी चालू झाली आहेत. सोयरिकेची बोलणी सुरू आहेत. सोयरिक झाल्यावर लगेच काजार कधी झाले आहे का? असा प्रश्न करतात. युरी आलेमाव यांना नेमके काय म्हणायचे आहे? सर्वश्रुत आहे की, युरींना विजय सरदेसाई डोळ्यांसमोर नको आहेत. विजय यांच्यासमोर आपण फिके पडतो, असे त्यांना वाटते.

दिल्ली फेऱ्यांचे फलित

गोवा अग्निशमन दलात आज २३ कोटी रुपयांच्या अत्याधुनिक वाहनांचा समावेश झाला. परंतु, यासाठी लागणारी रक्कम केंद्राकडून मिळावी, यासाठी मुख्य सचिव व्ही. कांदवेलू यांनी शर्थीचे प्रयत्न केले असल्याचे कळते. ज्यावेळी सरकार प्रस्ताव पाठवायचे, त्यावेळी त्यात काही ना काही त्रुटी राहायच्या. परंतु, त्या दूर करण्यासाठी मुख्य सचिवांनी जोडे झिजवत दिल्ली दरबारी फेऱ्या मारल्या. कागदी घोड्यांच्या त्रुटी दूर करून त्यांनी ही वाहने पदरात पाडून घेतली. मुख्य सचिवांच्या प्रयत्नांमुळे अग्निशमन दलात ही वाहने आल्याची चर्चा अग्निशमन दलाचे अधिकारी करत होते. दिल्ली फेऱ्यांचे फलित मात्र गोव्याची सुरक्षितता मजबूत करणारे ठरले, एवढे नक्की...

गोंयबाब कथामालेचे सायास-आयास

शणै गोंयबाब कथामालेची ढासळती लोकप्रियता व अल्प प्रतिसाद लक्षात घेऊन मंडळाने गवगव्याचा हर प्रयत्न चालवला आहे. संस्था प्रमुख, गत कालीन विजेते विद्यार्थी यांचे बाईट्स मागवून ती रील्स प्रसारीत करण्याचा सपाटा चाललाय. अनधिकृत प्रवक्ते तयार करून कामाला लावले आहे. ‘सोशल मिडिया’चा वापर करून प्रसिध्दीचा दणका, आवाज अंगावर येईल इतका घमासान आहे. एकटा कथामालेवर लेखमालाच लिहित आहे. ती संपतच नाही. धडपडीला अंत नसतो. अर्थ मात्र असायला हवा. साने गुरूजी कथामालेच्या संकल्पनेवर आधारीत ही कथामाला. साने गुरूजी कथामालेत विजेत्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे, ढाल द्यायचे. अजूनही देतात. ते अनुकरण करण्याची बुध्दी कोंकणी जनांना होत नाही. साहित्यिक पुरस्कार देताना छोटासा पापेलांवाचा तुकडा (मानचिन्ह) देतात (रोख नाही) ते आपलंच अनुकरण चाललंय. मुलांना देतात न खपलेली पेटुलं.

सलील कुलकर्णी आणि कोकणी...

सलील कुलकर्णी हे हुशार संगीतकार, गायक. एम.बी.बी.एस. होऊनही पूर्ण वेळ संगीतात. बाकीबाबांचे ‘तव नयनांचे दल हलले गं’, हे गीत त्यांनी सुरेल मधाळ आवाजात गायिले आहे. प्रेरक मूल्ये कथन केलेला त्यांच्या आवाजातील एक व्हिडिओ व्हायरल झाला.सलीलना रागेश्री, बागेश्री या रागातील भेद माहीत आहे. औपचारिक शिक्षण आहे संगीताचे. माईक हातात घेऊन गाणे, हे संगीताचे ज्ञान नसलेल्यांसमोर चालते. सूज्ञ रसिकाग्रणी ‘गोट्यांवरून शिताची पारख’ करतात. त्यांना बिन-रियाझी गाणे व कोकणी अशुद्धलेखन, चुकीचे व्याकरण समजते.

बेअरिंगचा वस्तुपाठ देणारा नट

बहुगुणी कलाकार तसे विरळाच. फोंड्यातील व्यंकटेश (बाबू) गावणेकर यांच्या कोकणी नाटकातील भूमिका म्हणजे चाबूकच. डोक्यात अहंकारी नशेचे किडे चढलेल्यांनी त्यांच्या भूमिका पाहाव्या आणि शिकावे. सहजता, वाचाशुद्धी शिकावी. सर्वात विशेष म्हणजे बाबू गावणेकरांचे घनगर्भ बेअरिंग. भल्याभल्या नटांचं बेअरिंग (भूमिकेत शिरून रुतणे) अध्येमध्ये सुटत असते; पण बाबूंची अभिनयातील रोवणी पक्की मजबूत. दुसऱ्याची नाटके न बघता, कौतुक न करता आपल्यावरच प्रेम करण्याचे एक व्यसन जडले आहे. गावणेकरांचा सत्कार कला अकादमीने हल्लीच केला आणि अकादमी एक ग्रॅम मोठी झाली. सरळ मनाचे बाबू गावणेकर, ‘पिंपळ पेटला’ या नाटकात भूमिका करत आहेत. अद्भुतरम्यतेचे व कलात्मकतेचे दर्शन हवे का? गावणेकरांची भूमिका बघा. जरूर.

शब्द टोचतात, सल राहते!

युरी आलेमाव व विजय सरदेसाई यांच्यातील मोबाईल संदेशावरून जे काही शाब्दिक खटके उडाले, ते मिटवण्याचा किंवा या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न गिरीश चोडणकर यांनी केला. चोडणकर म्हणे दोन्ही नेत्यांशी बोलले आणि पुढे त्यांच्याकडून तसे होणार नाही, याची खबरदारीही घेतली जाईल, असे वाटते. परंतु, राजकारणात शाब्दिक हल्ले फार जपून करावे लागतात, हे वरील दोन्ही नेत्यांना पुरते माहीत असावे. पण, शब्दाचा एकदा बाण सुटला की तो अडविता येत नाही किंवा उत्साहाच्या भरात काहीतरी वेगळे दाखविण्याचा नेत्यांचा प्रयत्न असतो, तोच प्रयत्न सोमवारी पत्रकार परिषदेत झाला, असेच दिसते. चोडणकरांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला तर आहेच, पण तो किती यशस्वी होतोय, हे काही दिवसांत स्पष्ट होईलच.

कुंकळ्ळी पालिकेचा नवा कोरा ट्रक !

‘असुनी नाथ मी अनाथ’ म्हणतात त्याप्रमाणे साधनसुविधा उपलब्ध असूनही कुंकळळी पालिकेच्या कृपेने स्थानिकांना सुविधांचा लाभ घ्यायला मिळत नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. सरकारने पालिकेला नवा कोरा मालवाहतूक ट्रक प्रदान केला. त्याला आता अनेक महिने उलटले आहेत, मात्र पालिकेने या ट्रकचा वापर अजून सुरू केला नसल्यामुळे लाखो रुपये खर्चून आणलेला हा ट्रक धूळ खात पडला आहे. पालिकेकडे यापूर्वी असलेला मालवाहतूक योग्य निगा न राखल्यामुळे खराब झाला होता. लाखो रुपये खर्चून पालिकेला दिलेला नवीन ट्रक पालिकेचे अधिकारी का वापरत नाहीत, हा प्रश्न आहे. स्थानिकांना आवश्यक असल्यास मालवाहतुकीसाठी तो उपलब्ध होत नाही. पालिकेवर सध्या सरकारी अधिकाऱ्यांचे राज्य आहे. कांबळे साहेब, जरा पालिकेकडे लक्ष द्या, असे जनता प्रशासकांना सांगत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh Gochar 2026: 'बुधादित्य राजयोगा'चा महाचमत्कार! 'या' राशींची श्रीमंतीकडे वाटचाल; बँक बॅलन्स अचानक वाढणार, आर्थिक चिंता कायमची मिटणार

Goa Congress: "मी जनतेचे प्रश्न मांडले, म्हणूनच हकालपट्टी'', मनीषा उसगावकरांचा आरोप; काँग्रेसमधील राजकीय समीकरणांवर रोखठोक भाष्य

Goa Water Metro: गोव्यात 'जल मेट्रो' येणार, पण लगेच नाही! मंत्री कामतांचं मोठं वक्तव्य; आराखडा तयार करण्यात येणार

Goa Opposition Alliance: 'युरी-विजय वादावरुन गोमंतकीयांचा दोन्ही पक्षांवरील विश्वास उडेल!', अमित पाटकरांनी व्यक्त केली जाहीर नाराजी

Satari Heavy Rain: सत्तरीला मुसळधार पावसाने झोडपले; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT