'आता उठवू सारे रान...' मुलांना मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढण्याची वेळ आली!

Summer Vacation Activities for Children: एका दिवशी संध्याकाळी बागेच्या एका कोपऱ्यात ऋतुजा काही मुलांसोबत बसलेली दिसली.
Summer Vacation Activities for Children
Child DevelopmentDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

स्नेहा महांबरे

एका दिवशी संध्याकाळी बागेच्या एका कोपऱ्यात ऋतुजा काही मुलांसोबत बसलेली दिसली. आपल्या सुरेल आवाजात, लयबद्ध काही बोधप्रद जुन्या रचना समोरील कुमारवयीन मुलांसाठी ती साने गुरुजींचे गीत गात होती, ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान...’ त्यांच्या त्या ओळींचे मौखिक अनुकरण ही मुले करताना दिसत होती. ऋतुजाच्या अलिखित अटींप्रमाणे त्यांच्या हातात मोबाईल मात्र दिसत नव्हते.

यंदा एप्रिल महिन्याचा पहिला पंधरवडा संपला, आणि उन्हाचा कहर वाढू लागला. फाल्गुन महिना तर केव्हाच संपला. होलिका दहन झाले आणि माणसांनी मनातील राग, द्वेष, मत्सरादी षड्रिपुंचे होळीत दहन केले, असे सारेजण समजू लागले. नवीन संवत्सर सुरू झाले, वसंत राजाच्या आगमनामुळे वृक्षराजीवरील मोहरांचे आता फळांत रूपांतर झाले. आम्रवृक्षावर कोकिळेने लावलेला पंचम मनात उगाच हुरहूर निर्माण करत होता. काजूच्या झाडावर केसरी, पिवळी फळे बियांसह डोलत होती, हिरवी-पोपटी जांभळे टपोरी होऊन आपला रंग बदलण्याच्या विचारात होती. करवंदांनीही तोच विचार सुरू केला होता. याला अपवाद होती ती म्हणजे चुरणे, ही इटुकली फळे हिरव्यातून पांढरी बनत चालली होती. कैऱ्याही हळूहळू पक्वतेकडे झुकू लागल्या होत्या. एकूण काय, मधुमास समृद्धी घेऊन आलेला जाणवत होता.

Summer Vacation Activities for Children
Bahujan Representation in Goa: लोकसंख्येत 39 टक्के, पण सत्तेतील वाटा 8 टक्क्यांहून कमी; गोव्याच्या मंत्रिमंडळात बहुजनांची पीछेहाट

अशाच एका दिवशी संध्याकाळी बागेच्या एका कोपऱ्यात ऋतुजा काही मुलांसोबत बसलेली दिसली. आपल्या सुरेल आवाजात, लयबद्ध काही बोधप्रद जुन्या रचना समोरील कुमारवयीन मुलांसाठी ती साने गुरुजींचे गीत गात होती, ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान...’ त्यांच्या त्या ओळींचे मौखिक अनुकरण ही मुले करताना दिसत होती. ऋतुजाच्या अलिखित अटींप्रमाणे त्यांच्या हातात मोबाईल मात्र दिसत नव्हते. ऋतुजा म्हणजे उत्साहाचा खळाळता झराच! नित्य नूतन कल्पना मनात आल्या की, त्या मूर्त करणे हे तिला सहजपणे साध्य झाले होते. गेले आठ दिवस तिचा हा क्रम खंड न पडता म्हणजे अविरत सुरू होता. रोज नवीन गीत मुलांच्या मनात, कंठात उतरले जात होते. उन्हाच्या तलखीत गार पाण्याचा शिडकाव व्हावा, असा हा प्रयत्न मुलांसोबत प्रौढांच्याही मनाला सुखावत होता.

या निसर्गरम्य सृष्टीमधील सगळ्या बदलात विद्यार्थ्यांच्या परीक्षाही संपल्या! क्रॅश कोर्स कोणता लावायचा? उन्हाळी सुट्टीतील शिबिरे, व्यक्तिमत्त्व संपन्न करणारे मोठ्या फी घेणारे कोर्स, यांच्या जाहिराती वृत्तपत्र उघडले की, रंगीत कागदाच्या रूपाने गिरक्या घेत जमिनीच्या दिशेने झेपावत होते. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर सुद्धा मी माझ्या मुलाला, आणि हो मुलीला सुद्धा, कोणता क्लास कसा आणि कधी सुरू केला किंवा करणार आहे, अशा संदेशांचे दळणवळण वाढले. असे संदेश वाचण्यापेक्षा पुढे ढकल म्हणजेच फॉरवर्ड केले जातात आणि ते महत्त्वाचे वाटते, कारण तुझ्या पूर्वी मी तुला मेसेज पाठवला किंवा संदेश पाठवला, हेच प्रत्येकाला महत्त्वाचे वाटते. वाचनातला रस केव्हाच संपून गेला.

माझा पाल्य पुढे नेमके काय करणार आहे? हे माझ्यापेक्षा क्लासवाले ठरवणार! इतके महत्त्व आता या क्लासवाल्यांना मागील दहा-पंधरा वर्षांत आपोआपच प्राप्त झाले होते. आपल्या मुलाचे व्यक्तिमत्त्व आणि उज्ज्वल भवितव्य आई-बाप, आजी-आजोबा, काका, मामा, आते, मावशी यांच्यापेक्षाही अशा संस्थाचालकांशी बांधले गेले आहे. चार आकडी फी तर केव्हाच मागे पडली; आता पाच आकड्यांपासूनच सुरुवात झालेली आहे. माझ्या मुलाची किंवा पाल्याची नेमकी आवड काय आहे? त्याची पात्रता कोणती आहे? यापेक्षा मोठी जाहिरात करणाऱ्या क्लासला त्याने जाणे जास्त महत्त्वाचे आहे. कारण त्या क्लासवाल्यांनाच माझ्यापेक्षाही जास्त समजते. याचे कारण काय, तर त्या क्लासला २० ते २५ सीटची मर्यादा आहे! माझ्या मुलाला, पाल्याला जणू तोच क्लास घडवू शकतो.

हा दृढ म्हणजेच ठाम विश्वास पालकांच्याही ठायी हळूहळू रुजू लागला. मूल माझे आहे, तर मी निर्णय घेऊ शकतो किंवा शकते, असे आता राहिलेले नाही. माझ्यापेक्षा समाजातील इतरांना काय वाटते, याचाच विचार बहुतेक सारे जण करतात. आणि ही मोठी रेस सुरू झाली आहे. मित्रांचे, मैत्रिणीचे किंवा बॉसचे मूल जेथे जाते, तेथेच माझेही पाठवणे आवश्यक आहे. इतकेच नव्हे, तर ते गेलेच पाहिजे, हा नसता दुराग्रह वाढत आहे. आजच्या जगात स्वतःविषयीचा, स्वतःवरचा विश्वास, आत्मविश्वास कमी कमी होत नाहीसा झाला. आपण सुशिक्षित आहोत की साक्षर आहोत, असा विचार कित्येकदा धुसरपणे मनातून तरळत जातो, कारण तो विचार करण्यासाठी आपल्यापाशी आता वेळच शिल्लक नाही.

नाही हो! याचा अर्थ आता १८-२० तासांचा दिवस आहे, असा चुकीचा कोणीही कृपया घेऊ नका. मला हात आहेत, ते स्वच्छ धुऊन मी त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ शकतो, हे लोक विसरले आहेत. ‘तुझे आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलासी’ या न्यायाने पाणी किंवा तत्सम पेय हे दहा-पंधरा रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत आपण सीलबंद बाटलीतून किंवा कॅनमधून पिऊ शकतो. त्यासाठी आता पैसा हाताने मोजण्याची गरज राहिलेली नाही, अशी अवस्था झाली आहे. भ्रमणध्वनीमुळे जी-पे किंवा तत्सम स्वरूपात आपल्याला आर्थिक व्यवहार म्हणजे दुसऱ्यांना पैसे देता घेता येऊ लागले आहेत. जागतिकीकरणात अनेक बदल झालेले आहेत, हा त्याचा एक भाग! आपण स्वीकारला म्हणजे तो योग्यच आहे का? कधीतरी असाही विचार जर केला, तर कदाचित मनात आणखी दुसरे विचार येऊ शकतील. शेवटी म्हणावे लागते, हा काळाचा महिमा अगाध आहे.

Summer Vacation Activities for Children
Goa Crime: 'अयशस्वी प्रेमसंबंध म्हणजे बलात्कार नव्हे'; लग्नाचे आमिष दाखविल्याच्या आरोपातून युवक निर्दोष

अशावेळी वीस वर्षांपूर्वीचे पुस्तक आठवते. प्राथमिक शाळेतल्या गणिताच्या पुस्तकात सुट्टे नाणे, पैसे आणि रुपयांच्या नोटा आणि त्यांची किंमत छापील रूपात मुलांसमोर होती आणि ते मुलांना शिकवले जात होते. कित्येकदा छोट्या मुलाकडे कापडी पिशवी आणि कागदाच्या तुकड्यावर अत्यंत निकड असणाऱ्या वस्तूंची नावे लिहून, एखादी नोट त्याच्या हातावर ठेवून त्याला वाड्यातल्या कोपऱ्यावरच्या दुकानाच्या दिशेने पाठवले जात होते. ते सारे घेऊन घरी परतत असताना जर एखाद-दुसरे सुट्टे नाणे शिल्लक राहिलेच, तर आणलेल्या वस्तूंची बक्षिसी म्हणून त्याच्या हातावर ते टिकवले जात होते. ‘येनो दिवसः गताः’ अशी आता अवस्था झाली आहे. बऱ्या-वाईटाच्या व्याख्या कालपरत्वे ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे बनलेल्या आहेत. अशावेळी, ‘आता उठवू सारे रान...’ हे किती महत्त्वाचे आहे, याविषयीचा विचार मनात रुंजी घालू लागला. ऋतुजा जशी बागेत मुलांना मोबाईलशिवाय गाणं शिकवते, तसंच आपणही आपल्या मुलांना मुळाकडे न्यायला हवं. सारेच विचार बदलावयाला हवेत. हेच खरं ‘आता उठवू सारे रान’ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.