पणजी: नदीपरिवहन खाते चालवू न शकलेली सौरफेरीबोट चालवण्यास देण्यासाठी दुसऱ्यांदा जारी केलेल्या निविदेची मुदत आणखीन दहा दिवसांनी वाढविण्याची वेळ आली आहे. आजवर केवळ एकाच कंपनीने या फेरीबोटीत रस दाखवल्याने आता २२ एप्रिलपर्यंत देकार सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
सरकारने ३ कोटी ९० लाख रुपये खर्चून विकत घेतलेली ही फेरीबोट एकही दिवस चाललेली नाही. चोडण-पणजी या जलमार्गावर खाते ही फेरीबोट चालवू न शकल्याने ती पर्यटनासाठी द्यावी असा विचार पुढे आला आहे. यासाठी खासगी कंपन्यांनी ही फेरीबोट चालवण्यास घ्यावी यासाठी यापूर्वी निविदा मागवण्यात आली होती. त्यास प्रतिसाद न मिळाल्याने ती फेरीबोट विनावापरच राहिली.
गोवा शिपयार्ड लिमिटेडने तयार केलेल्या या सौरफेरीबोटीची क्षमता सुमारे १२५ प्रवाशांची आहे. तिच्या डिझाईनमध्ये सौरपॅनेल्सचा समावेश असून, ती पूर्णपणे सौरऊर्जेवर चालते. या बोटीचा मुख्य उद्देश प्रवासी वाहतूक सुलभ करणे आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देणे हा होता. सध्या ही फेरीबोट निष्क्रिय स्थितीत पडून आहे.
देखभाल व्यवस्थेतील त्रुटी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ती वापरात आणली जात नाही. त्यामुळे बोटीचे सौरपॅनेल्स आणि अन्य उपकरणे खराब होण्याची शक्यता वाढली आहे. या फेरीबोटीच्या वायर मध्यंतरी उंदरांनी कुडतरल्याने ती निकामी ठरली होती.
मध्यंतरी सौरफेरीबोट विकण्याचा विचार पुढे आला होता. मात्र तसा निर्णय घेण्याआधी ती चालवण्यासाठी कोणती कंपनी पुढे येते का, याची चाचपणी करावी असे ठरविण्यात आले. यासाठी निविदा मागवण्यात आली. मात्र केवळ एकच कंपनी ती फेरीबोट भाडेपट्टीवर चालवण्यासाठी पुढे आल्याने आणखीन दहा दिवसांत काही कंपन्या येतील का, याची वाट पाहण्याचे सरकारने ठरवले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.