राफेलपासून एआयपर्यंत, 21 करारांतून भारत-फ्रान्स मैत्रीची नवी भरारी - संपादकीय

India France bilateral relations: आर्थिक-औद्योगिक-व्यापारी संबंधांमध्ये आलेले द्विपक्षीय संबंधांचे महत्त्व लक्षात घेऊन भारताने फ्रान्सबरोबर केलेला करार हे एक सकारात्मक पाऊल आहे.
India France bilateral relations
India France bilateral relationsDainik Gomantak
Published on
Updated on

आर्थिक-औद्योगिक-व्यापारी संबंधांमध्ये आलेले द्विपक्षीय संबंधांचे महत्त्व लक्षात घेऊन भारताने फ्रान्सबरोबर केलेला करार हे एक सकारात्मक पाऊल आहे. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार, स्वच्छ ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रांमध्ये २१ करार केले. सध्याच्या काळातील त्याचे महत्त्व समजावून घेतले पाहिजे. समान भागीदारीचे तत्त्व, परस्परविश्वास आणि स्वायत्ततेचा आदर करणाऱ्या भारत-फ्रान्स संबंधांना साडेतीन शतकांचे अधिष्ठान लाभले आहे.

या मैत्रीची प्रतीकात्मक क्षमता आणि उंची भविष्यात संयुक्त सहकार्यातून ८८४८ मीटरवरील माऊंट एव्हरेस्टवर उतरू शकणाऱ्या हेलिकॉप्टरच्या निर्मितीतून साकारली जाणार आहे. भारत-फ्रान्स संबंध अमेरिकेप्रमाणे व्यवहारापुरते मर्यादित नाहीत. या संबंधांना ऐतिहासिक परंपरा आहे. भारत-अमेरिका संबंधांमध्ये दिसणाऱ्या व्यापारविषयक आणि इतर तणावपूर्ण मुद्द्यांच्या विपरित वसाहतकालीन अनुभवांतून दृढ होत अधिक वैविध्यपूर्ण, संतुलित आणि दशकानुदशकांच्या परस्परविश्वासाच्या पायावर उभी राहिलेली ही दीर्घकालीन भागीदारी आता एअरोस्पेस, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीकरणीय ऊर्जा आणि उच्च-तंत्रज्ञान व्यापारासारख्या नव्या क्षेत्रांमध्ये विस्तारत आहे.

India France bilateral relations
Goa Open Arts Festival: कला, संस्कृती, संगीताचा उत्सव! गोवा ओपन आर्टस फेस्टिवल; काय असणार कार्यक्रम? वाचा..

संरक्षण, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि भारत-प्रशांत धोरण या क्षेत्रांमध्ये भारत-अमेरिकेचे सहकार्य वाढत असले तरी व्यापारातील तूट, आयातशुल्क धोरण, रशियाबाबतची भूमिका, व्हिसाविषयक मतभेद आणि भूराजकीय प्राधान्यक्रमांवरुन ताण आहे. गेल्या वर्षभरात अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये बसलेल्या चटक्यांमधून धडा घेत भारताने कोणत्याही एका देशावर अवलंबून न राहता, समान हितसंबंध असलेल्या बड्या लोकशाहीवादी देशांशी संबंध मजबूत करण्यावर भर दिला आहे.

केवळ एका देशाशी संपूर्णपणे जोडले जाण्याऐवजी भारताने बहुध्रुवीय सहकार्याचा विचार स्वीकारला आहे. अणुऊर्जा, एआय आणि नवोन्मेष परिसंस्था या क्षेत्रांमध्ये कोणत्याही एका भूराजकीय गटावर अवलंबून न राहता प्रगत तांत्रिक क्षमता उभारण्याच्या व्यापक उद्दिष्टातून भारताने फ्रान्स, युरोपियन संघ आणि इतर देशांसोबत धोरणात्मक भागीदाऱ्यांना प्राधान्य दिले आहे.

भारत आणि फ्रान्सच्या द्विपक्षीय संबंधांना औपचारिकरीत्या विशेष जागतिक ‘धोरणात्मक भागीदारी’चा दर्जा देत हा परस्पर धोरणात्मक विश्वास अधोरेखित केला. सध्याच्या भारत–फ्रान्स भागीदारीचा मुख्य आधार म्हणजे संरक्षण क्षेत्रातील सहकार्य. अध्यक्ष मॅक्रॉन यांनी भारताबद्दल बोलताना ‘रणनीतिक स्वायत्तता’ ही संकल्पना ठळकपणे मांडली.

नौदलसराव, संयुक्त संशोधन-विकास आणि संरक्षण पुरवठ्याचे विविधीकरण यांमधील फ्रान्सचे समर्थन भारताच्या स्वायत्ततेच्या उद्दिष्टांना पूरक ठरले आहे. भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठा संरक्षण करार ठरू शकणारा आणि ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत स्थानिक उत्पादनाचा समावेश असलेला ११४ राफेल लढाऊ विमान खरेदीचा संभाव्य करार, हेलिकॉप्टर असेंब्ली लाइन्स आणि शस्त्रनिर्मितीतील संयुक्त उत्पादनासारखे औद्योगिक सहकार्य वाढवून एकमेकांना मदतीने जागतिक अनिश्चिततेचा संयुक्तपणे सामना करण्याची इच्छाशक्ती भारत आणि फ्रान्सने व्यक्त केली आहे.

भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, चित्रपट, साहित्य, कला, शिक्षण आणि संस्कृतीच्या प्रभावामुळे फ्रान्सचे भारतीय सांस्कृतिक कूटनीतीला समर्थन लाभले आहे. या सांस्कृतिक कूटनीतीला यश मिळून भारत-फ्रान्स संबंध बहुआयामी भागीदारीपर्यंत विकसित झाले आहेत. राफेल लढाऊ विमाने आणि ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत संयुक्त उत्पादनप्रकल्पांसह फ्रान्स भारतासाठी महत्त्वाचा संरक्षण साहित्य पुरवठादार ठरला आहे.

India France bilateral relations
OLA CEO Goa Case: ‘ओला’चे सीईओ भाविश अग्रवालना दिलासा! गोवा खंडपीठाक़डून ‘वॉरंट’ला स्थगिती; पुढील सुनावणी 6 मार्च रोजी

बदलत्या भूराजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे करार वाढत्या धोरणात्मक विश्वासाचे प्रतीक आहेत. हवामान बदलासारख्या जागतिक प्रश्नांवरही दोन्ही देश एकत्र काम करतात. भारताने सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा फ्रान्स सह-अध्यक्ष आहे. सौर, पवन आणि हायड्रोजन क्षेत्रात तंत्रज्ञान सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. गुंतागुंतीच्या जागतिक सत्तासंतुलनात धोरणात्मक निर्णयांमध्ये स्वायत्तता राखण्याच्या भारताच्या या प्रयत्नांत फ्रान्स भारताचा सर्वांत भरवशाचा भागीदार ठरला आहे.

भारताने केलेल्या अणुचाचण्या असोत, की युक्रेनशी युद्ध करणाऱ्या रशियाकडून केलेली खनिजतेलाची खरेदी, अमेरिकेप्रमाणे फ्रान्सने भारताशी कधीही सार्वजनिक दबावाचे आणि आर्थिक निर्बंधांचे राजकारण केले नाही. संरक्षण, अणुऊर्जा आणि अवकाश या संवेदनशील क्षेत्रांमध्ये फ्रान्सने भारताची स्वायत्त निर्णयक्षमता मान्य केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर फ्रेंच प्रदेशांचे भारतात विलीनीकरण आणि सार्वभौमत्वाचे शांततापूर्ण हस्तांतर झाले.

फ्रान्सने भारताच्या अणुहक्कांना पाठिंबा देत नागरी अणुऊर्जा सहकार्याचा महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून भूमिका बजावली. भारत–फ्रान्स जागतिक प्रशासन, संरक्षण स्वायत्तता व तांत्रिक सहकार्याबाबत समान दृष्टिकोन बाळगणारे आहेत. अमेरिका किंवा चीनसारख्या महासत्तांच्या दबावाखाली न जाता स्वतःचा मार्ग ठरवण्याची क्षमता हा दोन्ही देशांचा समान धागा आहे. भारत-फ्रान्स मैत्री परस्परविश्वास, धोरणात्मक स्वायत्तता आणि दीर्घकालीन भागीदारीचे आदर्श उदाहरण ठरावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com