

१९ फेब्रुवारी हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिन. महाराजांना जाऊन आता जवळ जवळ ४५० वर्षे होत आली असली तरी त्यांचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही. उलट आजच्या नीतीमूल्यांचे अवमूल्यन होत चाललेल्या काळात महाराजांनी त्यांच्या काळात केलेले कार्य दीपस्तंभाची भूमिका बजावताना दिसत आहे. तसे पाहायला गेल्यास महाराज फक्त पन्नास वर्षेच जगले. पण एवढे कमी आयुष्य वाट्याला येऊनसुद्धा त्यांनी आपल्या कार्याची मोहर केवळ महाराष्ट्रावरच नव्हे तर पुऱ्या देशावर उमटविली. महाराज जेव्हा जन्माला आले तेव्हा देशावर मोगलांचे राज्य होते. बेरकी बादशाह औरंगजेब याच्या हातात सूत्रे होती. अशा कठीण परिस्थितीत महाराज घडले.
माता जिजामाता या त्यांच्या पहिल्या गुरु. आई आपल्या मुलाला कशी घडवू शकते याचे जिजामाता हे ज्वलंत उदाहरण. त्या माऊलीने महाराजांमध्ये लढाऊ वृत्ती निर्माण केली . दादोजी कोंडदेव हे महाराजांचे नंतरचे प्रशासकीय गुरू. शत्रूकडे दोन हात कसे करायचे याची शिकवण दादोजींनीच महाराजांना दिली. रामदास स्वामी हे महाराजांचे आध्यात्मिक गुरु म्हणून गणले जातात. मन विचलित झाले की महाराज रामदास स्वामींकडे जात असत.
पण तरीही त्यावेळी महाराजासमोर आव्हान मोठे होते. औरंगजेबाच्या अफाट मोगलसेनेला तोंड देणे म्हणजे खायचे काम नव्हते. महाराजांनी मावळ्यांची सेना स्थापन केली खरी पण मूठभर मावळे औरंगजेबासमोर टिकणार कसे हाच मोठा प्रश्न होता. पण त्याकरता महाराजांनी ’गनिमी कावा’ची पद्धत अमलात आणायला सुरुवात केली. गनिमी कावा म्हणजे शक्तीपेक्षा अधिक युक्ती वापरून लढणे. त्याकरता महाराजांनी महाराष्ट्रातील दऱ्याखोऱ्यांचा प्रभावीपणे वापर केला.
मोगलांचा शूर सेनानी म्हणून ज्याची गणना केली जात असे त्या अफजल खानाचा वध महाराजांनी याच गनिमी काव्याचा वापर करून केला. मिठी मारायच्या निमित्याने जवळ आलेल्या खानच्या पोटात वाघनखे खुपसून महाराजांनी त्याला संपविला. अफजलखानाचा वध औरंगजेबाला हादरा देणारा ठरला. औरंगजेब चवताळला आणि त्याने आपला मामा शाहिस्तेखान याला महाराजांना धडा शिकवायला पाठविला.
पण पुण्याच्या लाल महलमध्ये मुक्काम ठोकलेल्या शाहिस्तेखानाची बोटे कापून महाराजांनी त्यालाच पर्याया ने औरंगजेबला धडा शिकवला. इथून औरंगजेबाच्या दरबारी महाराजाचे महत्त्व वाढायला लागले. संतप्त झालेल्या औरंगजेबानी महाराजांना अटक करण्याचा निर्धार केला. आणि जयसिंह आणि त्यांचा पुत्र रामसिंह यांसारख्या फुटीर नेत्यांच्या साहाय्याने तो महाराजांना अटक करण्यात यशस्वी ठरला ही. पण मिठाईच्या पेटाऱ्यात बसून महाराजांनी पुत्र संभाजीसह आग्र्याहून पलायन करून महाराजांना आवर घालणे किती कठीण काम आहे याचा प्रत्यय औरंगजेबांना आणून दिला.
६ जून १६७४ रोजी जिजाऊ मातेच्या उपस्थितीत महाराजांचा राज्याभिषेक झाला. आपल्या पुत्राचा राज्याभिषेक बघण्याकरता आतुर असलेल्या जिजामाता नंतर जास्त दिवस जगू शकल्या नाहीत. बारा दिवसांतच त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. जिजामातेचे जाणे हा महाराजांवर मोठा आघात होता. विपरीत परिस्थितीत महाराजांचे मनोधैर्य वाढविणाऱ्या जिजामाता गेल्यामुळे महाराज बरेच खचल्यासारखे झाले. आणि तीन एप्रिल १६८० रोजी म्हणजे सहा वर्षांच्या आतच तेही मावळ्यांना, रयतेला पोरके करून निघून गेले.
पण जाता जाता राज्य कसे चालवावे याचा वस्तुपाठ जगाला देऊन गेले. केवळ सहा वर्षे मिळूनसुद्धा त्यांनी मूल्याधिष्ठित राज्य केले. जिवाला जीव देणारे साथी मिळाल्यामुळेच महाराज हिंदवी स्वराज स्थापन करू शकले. त्याचबरोबर महाराजांकरता जंग जंग पछाडणाऱ्या औरंगजेबासारख्या मोगल सम्राटाच्या हाताला लागू शकले नाहीत हेही तेवढेच खरे आहे. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंक, बाजी पासलकर यांसारख्या जिवाला जीव देणाऱ्या महाराजांच्या अनेक निष्ठावंत साथीदारांनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिली. म्हणूनच तर रायगड किल्ला मिळवण्याकरता आपली प्राणाहुती दिलेल्या तानाजी मालुसरेंना उद्देशून महाराजांनी ‘गड आला पण माझा सिंह गेला’, असे उद्गार काढले होते.
महाराजांनी लढाई केली पण नीतीमूल्ये सांभाळून. म्हणूनच तर मोगल सुभेदाराला अटक केल्यानंतर त्याच्या रूपवती सुनेला ’अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती आम्हीही सुंदर झालो असतो’ असे म्हणत साडीचोळी देऊन तिची पाठवणी केली होती. ते नेहमीच परस्त्रींचा आदर करत असत. यामुळेच महाराजांच्या राज्यात बायका लहान मुलांचे अस्तित्व अबाधित राहिले. याकरताच महाराजांना ‘आदर्श राजा’ म्हणून संबोधले जाते. आणि यामुळेच आजच्या जमान्यात परत एकदा महाराज जन्माला यावे असे वाटायला लागते.
आजचे राज्यकर्ते शिवजयंती साजरी करतात खरे, पण एखादे शिवाजी महाराज राज्यात, देशात जन्माला यावेत म्हणून प्रयत्न करताना मात्र दिसत नाहीत. महाराजांच्या नावाने भाषण केले म्हणजे आपले कार्य संपले असेच आजच्या राज्यकर्त्यांना वाटत आहे. म्हणूनच तर शिवाजी महाराजांची पोकळी आजसुद्धा भासत आहे. त्यांच्या कार्याने प्रेरित झालेले आजचे अनेक युवक त्यांच्या कार्याचा कित्ता गिरविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या प्रयत्नातून राष्ट्राला शिवाजी महाराजांसारखे एखादे व्यक्तिमत्त्व तरी लाभो आणि विस्कळीत होत चाललेली राज्याची, देशाची घडी मार्गावर लागो हीच आज त्यांच्या जन्मदिनी कामना आणि हीच त्यांना खरी मानवंदना ठरू शकेल.
शिवरायांचे आठवावे रूप,
शिवरायांचा आठवावा प्रताप,
शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी..
- मिलिंद म्हाडगुत