Professor accused of paper leak
पणजी: गोवा विद्यापीठातील पेपर लीकप्रकरणी दाखल तक्रारीनंतर विद्यापीठाने प्राथमिक अहवाल तयार केला आहे. तो कुलपती तथा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे कुलगुरू हरिलाल मेनन यांनी सुपूर्द केला.
भौतिकशास्त्र आणि उपयोजित विज्ञान शाळा विभागातील साहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक याच्यावर झालेल्या प्रश्नपत्रिका चोरीच्या आरोपप्रकरणी विद्यापीठाने केलेल्या कारवाईचा प्राथमिक अहवाल आज कुलपतींना देण्यात आला.
प्रणव नाईक याने सप्टेंबर २०२४ मध्ये सहकारी प्राध्यापकांच्या केबिनमध्ये बनावट चावीचा वापर करून प्रवेश केला आणि प्रश्नपत्रिका चोरल्याचा त्याच्यावर आरोप आहे. इतर प्राध्यापकांनी त्याला रंगेहाथ पकडल्यानंतर हे प्रकरण स्थानिक पातळीवरच दाबण्यात आले. त्याची वाच्यता कुठेही झाली नाही.
‘गोमन्तक’ने रविवारी या प्रकरणाचा पर्दाफाश केला. ‘गोमन्तक’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुळे राज्यात खळबळ उडाली. संबंधित प्राध्यापक प्रणव नाईकने आपली प्रेयसी असलेल्या विद्यार्थिनीसाठी ती चोरी केल्याचे समोर आले होते.
तरीही विद्यापीठाने ते प्रकरण दाबून ठेवले. वस्तुत: त्याचवेळी प्रणव नाईकवर कारवाई होणे गरजेचे होते. त्याशिवाय फेरपरीक्षा करणे आवश्यक होते. ‘गोमन्तक''ने उघड केलेल्या या प्रकरणामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
त्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आणि कुलगुरूंना घेरावही घातला गेला. हे प्रकरण पोलिसांत गेल्यामुळे कुलगुरूंनी प्रणव नाईकला निलंबित केले आहे. कुलपती तथा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सोमवारी कुलगुरूंकडे या प्रकरणाचा अहवाल मागितला होता. त्यानुसार कुलगुरूंनी आज या घटनेचा प्राथमिक अहवाल कुलपती तथा राज्यपालांकडे सादर केला.
कुलगुरू मेनन यांनी प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणाचा तपास करण्यासाठी सोमवारी तीन सदस्यीय सत्यशोधक समिती नेमली होती. या समितीला ४८ तासांत अहवाल देण्याच्या सूचना कुलगुरूंनी केल्या आहेत. त्या समितीने सोमवारी सायंकाळपासून चौकशीला सुरुवात केली असून, उद्या (बुधवारी) तो तपासणी अहवाल कुलगुरूंकडे समिती सादर करण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.