अग्रलेख: ‘आमी पणजेकार’ चा धुव्वा उडवणारे ‘प्रोग्रेसिव्ह पणजी’ पॅनेल; जनसंपर्क यशाचे ‘इंगित’,

Panaji Municipal Election: तीस पैकी सत्तावीस जागांसह ‘आमी पणजेकार’ पॅनेलचा धुव्वा उडवणाऱ्या ‘प्रोग्रेसिव्ह पणजी’च्या यशाचे श्रेय भाजपपेक्षा बाबूशकडेच जाते.
Panaji Municipal Election Result 2026
Babush Monserrate Panel Victory Dainik Gomantak
Published on
Updated on

नाणे खणखणीत असून चालत नाही, ते वाजवूनही दाखवावे लागते. मंत्री बाबूश मोन्सेरात ते सातत्याने करत आले आहेत. त्यांच्या चारित्र्यावर कथित चिखल उडाल्यानंतर नाके मुरडणारे पुढे बाबूशच्या मांडीला मांडी लावून बसू लागले, ते त्याच किमयेमुळे!

केवळ पणजीच नव्हे, आसेतु हिमालय गारुड निर्माण करणाऱ्या दिवंगत मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पलनी भाजप-बाबूशप्रणीत पॅनेलला महापालिकेत चीतपट करण्याचे रचलेले मनसुबे धुळीस मिळाले, याचे श्रेयही बाबूशनाच.

मागील कार्यकाळापेक्षा एकही जागा कमी झाली असती तर ते बाबूशचे अपयश मानले गेले असते. त्याच न्यायाने तीस पैकी सत्तावीस जागांसह ‘आमी पणजेकार’ पॅनेलचा धुव्वा उडवणाऱ्या ‘प्रोग्रेसिव्ह पणजी’च्या यशाचे श्रेय भाजपपेक्षा बाबूशकडेच जाते. उत्पल गटाला मिळालेल्या केवळ तीन जागा नक्कीच आश्‍चर्यजनक आहेत. त्यातही एक मूळचा आप व एक काँग्रेसचा उमेदवार. सत्ता येण्याची अटकळ नव्हतीच, पण एकतर्फी लढतही अंदाजित नव्हती.

या निकालाने एक गोष्ट पुन्हा सिद्ध झाली- राजकारणात प्रतिमा, परंपरा वा भावनिक वारसा यापेक्षा सातत्याने जपलेला जनसंपर्क अधिक प्रभावी ठरतो. निवडणुका नशिबावर अवलंबून वा पूर्वपुण्याईवर जिंकता येत नाहीत.

अविरत मेहनत व प्रबळ जनसंपर्क हे पैलू अंगभूत असावे लागतात. ते नसल्यास कमालीचे वक्तृत्व, काकांची छबी असूनही राज ठाकरे अपयशी ठरतात. उत्पल पर्रीकरांसाठी महापालिकेचा निकाल धडा आहे.

बाबूशचे वर्चस्व पणजीतील विजयातून पुन्हा स्पष्ट झालेय. गतवेळीपेक्षा दोन जागा अधिक जिंकून त्यांनी टीकाकारांना गप्प केले. उर्वरित तीन मिळाल्या नाहीत, त्याचे शल्य व अपयशही कबूल केले.

लोकांशी असलेल्या घट्ट नात्यामुळेच हे शक्य होते. प्रत्येक मतदाराला ते ज्या आदराने, महत्त्वाने पाहतात, तितक्याच प्रेमाने लोकही त्यांना स्वीकारतात. बाबूशचे खुल्या दिलाने अभिनंदन!

पणजीतील यशाने बाबूशचे मूठभर मांस वाढेल, ज्याचा कदाचित भाजपलाही धसका वाटावा. ताळगावसह पणजी व पुढे सांताक्रूझवर दावा करण्याच्या त्यांच्या सुप्त इच्छेला बळकटी न लाभल्यास नवल! मनोहर पर्रीकर हे यशाचे सीमोल्लंघन करत होते तेव्हाही बाबूशनी महापालिकेत वर्चस्व दाखवले होते.

ही पूर्वपीठिका लक्षात घेता, बाबूश विरोधकांनी वर्षापूर्वीच महापालिकेसाठी तयारी सुरू करणे इष्ट होते. यशाची खात्री असूनही बाबूश व टीमने तशी तयारी केली होती. पण आप, कॉंग्रेस, उत्पल गाफील राहिले. भाजप निवडणूक जिंकण्याचे मशीन कसे बनले, याचा अदमास घेतल्यास आपण कोठे आहोत हे निवडणूक उत्सुकांना पडताळता येणे शक्य आहे.

बाबूश जेव्हा पणजीतील कार्यालयात येतात, तेव्हा बाहेर अनेक लोक भेटीस उभे असतात. ती त्यांच्या लोकप्रियतेची, कामाच्‍या हमीची पावती. प्रचारादरम्यान कोणतेही वक्तव्य न करता, प्रतिष्ठित लोकांना, अगदी पर्रीकर चाहत्यांना आपलेसे करून बाबूशनी विजयरथ कवटाळला.

लोकांची नस ओळखण्याची कला इथे दिसते. २०२२च्या निवडणुकीत बाबूशविरोधात उत्पल यांचा केवळ ७१६ मतांनी पराभव झाला होता, तेव्हा मिळालेली ६ हजार मते आपल्यासोबत राहिली, असा पर्रीकर समर्थकांचा दावा आहे.

परंतु तेव्हा विरोधातील कॉंग्रेस, ‘आप’ला पडलेली मते (आता हे पक्ष सोबत राहिल्‍याने) वजा करता, पर्रीकरांच्या खात्यातील आकडा पाच हजारांच्या घरात जातो. याचा अर्थ उत्पलची मते घटली, असाही होतो. उत्पलना पुढील विधानसभेला सामोरे जायचे असल्यास काही सुधारणा आवश्यक वाटतात. जनसंपर्क व मेहनतीला पर्याय नाही.

मनोहर पर्रीकरांच्या प्रतिमेच्या छत्रछायेतून बाहेर पडून स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याचे आव्हान पेलावे लागेल. भाजप आपणाहून काहीतरी पदरात टाकेल, अशी आस सोडून ठोस भूमिका घ्यावी लागेल. जनहिताच्या आड येणाऱ्या धोरणांविरोधात भक्कमपणे उभे राहण्याचे धारिष्ट दाखवावे लागेल. निवडणुकीत किती फरकाने जागा गेल्या याला काहीच अर्थ नसतो.

अथवा आरक्षण, प्रभाग रचना विषय फिजूल ठरतात. ‘जो जिता वही सिकंदर’. उत्पल समर्थकांना महापालिकेत तीन जागा मिळाल्या असल्या तरी कर्तव्यपूर्तीतून इतरांवर तिघांना वचक ठेवता येणे शक्य आहे.

महापालिकेला एकूण २२,४४५ मतदान झाले, पैकी भाजप-बाबूश प्रणीत पॅनेलला १२, ८५० मते मिळाली, तर उत्पल गटाला ८,४८४ मते मिळाली. जी मते सोबत राहिली, ती उत्पल गटासाठी ‘आशा’ आहेत. त्याव्यतिरिक्त इतरांना सोबत कसे घेऊन जायचे हा विचार पुढील मार्ग सुकर करू शकतो. या निवडणुकीने मतदारांचा कलही स्‍पष्‍ट केला.

Panaji Municipal Election Result 2026
Panaji Municipal Election: विजयोत्सवाने राजधानी दुमदुमली! सलग 7 तास मिरवणूक; बाबूश पॅनेलवर शुभेच्छांचा वर्षाव VIDEO

‘स्‍मार्टसिटी’च्‍या नावाने केलेला उकिरडा लोक विसरले. तेव्‍हा भोगलेल्‍या यातना मतांमध्‍ये परावर्तित झाल्‍या नाहीत. कॅसिनोंचा मुद्दा चालला नाही. निवडणुकीस उभी राहिलेली व्यक्ती किती ‘प्रोग्रेसिव्ह’ आहे किंवा किती ‘पणजीकार’ आहे, याच्याशी लोकांना फारसे देणेघेणे नसते.

त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोण दरवेळी उभा ठाकतो, विचारपूस करतो, हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरते. सामान्य माणूस आपल्यापुरते पाहतो. म्हणूनच पंचायत, पालिका, मतदारसंघ आणि राज्य यासाठी मतदान करताना तो वेगवेगळे निकष लावतो.

Panaji Municipal Election Result 2026
Panaji Municipal Election Result 2026: पणजी महानगरपालिकेवर भाजप-बाबूश पॅनेलचं निर्विवाद वर्चस्व, उत्पल पर्रीकरांच्या पॅनेलचा धुव्वा; विजयी उमेदवारांची संपूर्ण लिस्ट

शेवटी महापालिका व विधानसभेच्या निवडणुकीकडे पाहण्याचा मतदारांचा दृष्टिकोन निराळा असतो. प्रत्येक निवडणुकीची गणिते, समीकरणे वेगवेगळी असतात. राजकारण राजकारणासारखेच खेळावे लागते. ही निवडणूक त्याचाच उत्तम वस्तुपाठ आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com