पणजी: मच्छीमारांच्या गावांचे सर्वेक्षण करताना काही सर्वेक्षणाच्या नकाशांत भूप्रदेशीय सीमा उल्लंघन किंवा परस्पर संघर्ष आढळून आले असून यावर शहानिशा करणे आवश्यक आहे. नकाशांकन करताना सीमांकनाचा कोठेही उल्लंघन असल्यास शहानिशा न केल्यास मालमत्ता वाद निर्माण होण्याची भीती सरकारी यंत्रणेला वाटत आहे.
गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा २०१९ तयार करण्यासाठी मच्छीमार गावांचे सर्वेक्षण मत्स्योद्योग खात्याने हाती घेतले आहे. त्या सर्वेक्षणादरम्यान सीमांचे उल्लंघन नगर नियोजन खात्याला आढळून आले आहे. त्याविषयीच्या बैठकीत त्या खात्याचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले उपनगरनियोजन अधिकाकरी विनोदकुमार यांनी हा मुद्दा मांडला अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
पर्यावरण खाते या साऱ्याचा समन्वय पाहत आहे. या बैठकीत सांगण्यात आले, की मच्छीमारांच्या घरांचे नकाशांकन जवळजवळ पूर्ण झाले असून मुरगाव तालुक्यातील काही गावांत अजून नकाशांकन सुरू आहे. केळशी व खारीवाडा येथे सर्वेक्षण झालेले नाही. पारंपरिक प्रक्रिया केंद्रे, बर्फ उत्पादन यंत्रणा, लिलाव हॉल, जेटी, मासेमारी यार्ड, जाळे दुरुस्ती शेड आणि झोपड्यांच्या नकाशांची निर्मिती सुरु आहे.
सर्वेक्षणाचे काम मत्स्योद्योग खाते, ग्रामपंचायत, मच्छीमार समाज आणि नकाशांकन एजन्सी यांच्या संयुक्त सहकार्याने पार पडला आहे. बैठकीत गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाचे सतीशकुमार नायक आणि जीसी ॲण्ड ईएमएस या संस्थेच्या लक्षिता भगत यांनी २०११च्या गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन नकाशांवर मच्छीमारांच्या घरांच्या स्थितीचे सादरीकरण केले. काही सर्वेक्षणाच्या नकाशांत भूप्रदेशीय सीमा उल्लंघन किंवा परस्पर संघर्ष आढळून आले असून यावर शहानिशा करणे आवश्यक आहे. सर्व एजन्सींनी जीआयएस डेटा एकसारखा, युनिफॉर्म स्वरुपात सादर करावा असा आदेश देण्यात आला आहे.
सर्व माहिती व्यवस्थित आणि एकसंध स्वरूपात मिळणे गरजेचे आहे.मच्छीमार समाजाचे प्रतिनिधी सूरज पगी यांनी या नकाशांची पडताळणी करु इच्छित असल्याची मागणी केली आहे .व्यापक योजनांसाठी नकाशांवर भरती रेषा, १०० मीटर, २०० मीटर, ५०० मीटर तसेच धोका रेषा आणि मच्छीमार स्थानिक रेषा स्पष्ट करणे अत्यावश्यक असल्याचा मुद्दाही बैठकीत चर्चेत आला होता. मच्छीमारांसाठी सायक्लोन शेल्टर डेटा गोळा करण्याचे ठरले असून यासाठी जलसंपदा खाते व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून माहिती घेण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
मत्स्योद्योग खात्याला खारीवाडा आणि केळशी गावातील नकाशांकन कार्य जलद पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्यास म्हणण्यात आले आहे. नकाशांकन करताना सीमांकनाचा कोठेही उल्लंघन असल्यास तज्ज्ञांनी शहानिशा करावी, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मालमत्ता वादांना प्रतिबंध घातला जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.