मुख्यमंत्र्यांना जनतेचा वेढा
सरकारकडून राज्यातील विविध भागात सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधला जात आहे. या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वतः उपस्थित राहत जनतेचे प्रश्न जाणून घेत आहेत. ज्येष्ठ नागरिकांपासून तरुणाईचा वेढा त्यांच्याभोवती दिसत आहे. एरव्ही जनता दरबारच्या माध्यमातून साखळीत भेटणारे मुख्यमंत्री आपल्या शहराच्या ठिकाणी येत असल्याने अनेकांना आपले प्रश्न थेट त्यांच्याजवळ मांडण्याची संधी मिळत आहेत. शक्य असेल तर संबंधित अधिकाऱ्याला बोलावून तोडगा काढत असल्याने अनेकांची कामे तत्काळ होत आहेत. त्यामुळे अनेकजण बोलतात की, मुख्यमंत्र्यांपर्यंत एखादा विषय आला की त्यावर तोडगा निघणार, समस्यांचे निराकारण होणार; भिवपाची गरज ना!
आसिस नोरोन्हा गायब?
बाणावली येथील सामाजिक कार्यकर्ते सांतान परेरा यांनी काल मडगाव येथील काँग्रेस जिल्हा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. वास्तविक असे प्रवेश होतात तेव्हा पक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणे अपेक्षित असते. तसे कालच्या या कार्यक्रमाला गिरीश चोडणकर, कॅ. विरियातो फर्नांडिस, कार्लुस फेरेरा हे उपस्थित होते. मात्र, दक्षिण गोव्यातील मित्रांची जोडी म्हणून ओळखले जातात ते युरी आलेमाव आणि एल्टन डिकॉस्टा उपस्थित नव्हते. एवढेच नव्हे युरींच्या सांगण्यावरून दक्षिण गोवा जिल्हाध्यक्षपदी नियुक्त केलेले आसिस नोरोन्हा हेही उपस्थित नव्हते. कशाला बरे? सांतान यांचा काँग्रेस प्रवेश त्यांना मान्य नव्हता की, काँग्रेसचा मुख्यमंत्री निवडणुकीनंतर जाहीर करणार, असे ठाकरे यांनी जाहीर केल्यावर त्यांचा उत्साह कमी झाला? उत्तर काही मिळत नाही बुवा!
मुख्यमंत्र्यांची कन्या तियात्रामध्ये
गोव्यातील ‘तियात्र’ हा जरी ख्रिस्ती लोकांचे प्राबल्य असलेला, असे जरी म्हटले जात असले तरी हिंदू लोकांनाही या ‘तियात्रा’चे आकर्षण असतेच. या आकर्षणापासून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची कन्याही अपवाद नाही, हे काल कळून चुकले. मुख्यमंत्री सावंत यांची कन्या पार्थिवी सावंत हिने तियात्र अकादमी गोवाद्वारे रवींद्र भवनात आयोजित ६व्या अखिल गोवा आंतर उच्च माध्यमिक शाळा/महाविद्यालय/विद्यापीठ स्तरीय तियात्र स्पर्धेत धेंपो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, कुजिरातर्फे ‘‘देव निर्मिता तोशेच’’ या तियात्रामध्ये डॉक्टरची भूमिका साकारली. त्यामुळे हा चर्चेचा विषय होणे ओघाने आलेच म्हणायचे.
इमारतीची डागडुजी चर्चेत
उत्तर गोवा जिल्हाधिकारी, तिसवाडी उपजिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालयाची इमारत धोकादायक झाल्याचे खुद्द महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले होते. पणजी मामलेदार कार्यालयाची ही पोर्तुगीजकालीन इमारत आता अचानक ‘युद्धपातळी’वर दुरुस्तीला घेण्यात आली आहे. कार्यालय दुसरीकडे हलविण्याच्या घोषणा झाल्यानंतर तसे करण्याऐवजी इमारतीचीच डागडुजी सुरू झाली आहे. त्यामुळे सरकारी इमारतींचेही नशीब भारी म्हणायचे! आधी धोकादायक, मग स्थलांतराची चर्चा आणि आता युद्धपातळीवरील दुरुस्ती. उद्या हीच इमारत ‘नूतनीकरणानंतर पुन्हा धोकादायक’ ठरली तर आश्चर्य वाटायला नको. घोषणांपेक्षा बांधकामाला मात्र चांगलीच गती मिळाल्याचे चित्र आहे.
त्यांनाही आता दरवाजे बंद!
काँग्रेसने पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना दरवाजे बंद केले आहेत. परत काँग्रेसमध्ये येण्याची ज्यांना इच्छा आहे, त्यांच्या इच्छेला काँग्रेसने बासनात गुंडाळून ठेवले आहे, असे म्हटले तर सध्या तरी काहीच गैर नाही. काँग्रेसमधून भाजपमध्ये आतापर्यंत १८ आमदारांनी उड्या मारल्या आहेत. त्यातील आता काहीजण मंत्री आहेत, तर काहीजण पराभूत झाले असून, त्यांचे भाजपने पुनर्वसन केलेले आहे; परंतु मागील दोन अनुभव पाहता काँग्रेस ताकही फुंकून पिल्याशिवाय राहणार नाही. सत्तेत बसायचे झाल्यास विधानसभेला पूर्ण बहुमत मिळवणे आवश्यक आहे. मात्र, बहुमतासाठी नेत्यांना पक्षात घेताना काही अपवाद ठेवले जावेत, असे काँग्रेसमधील एका गटाला वाटत आहे. कदाचित ‘जर-तर’च्या समीकरणावर सत्ताकारण येऊन ठेपले, तर परत येऊ इच्छिणाऱ्यांना बरोबर घ्यावे, असे या गटातील नेत्यांना वाटते. मात्र, २०१९ आणि २०२२ मध्ये बाबू आजगावकर व दीपक पाऊसकर यांच्यासह इतर १८ माजी काँग्रेस आमदारांना काँग्रेस पक्षात कधीही घेतले जाणार नाही, असे पक्षातील वरिष्ठ वारंवार का सांगत आहेत, तेच काही उमगत नाही.
...उगाच साहेबांपर्यंत गेलात!
म्हापशात ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा दरबार भरला होता. नागरिकांची तक्रार ऐकताच मुख्यमंत्री त्या-त्या खात्याच्या प्रमुखाला स्टेजवर बोलावून संबंधिताचे ‘काम लगेच मार्गी लावा,’ अशी सूचना करायचे. साहेबांची हाक येताच अधिकाऱ्यांची धांदल उडायची आणि ते धावत जाऊन हजेरी लावायचे; पण स्टेजवरून खाली उतरताना हेच अधिकारी तक्रारदाराला हळूच म्हणायचे, ‘अहो, साहेबांपर्यंत कशाला गेला? मला एक फोन केला असता तरी काम झाले असते; उगाच साहेबांकडे येण्याची तसदी का घेतली!’ एरव्ही साध्या सहीसाठी लोकांना तासन्तास बसवून ठेवणारे काही अधिकारी अचानक एवढे गोड बोलायला लागल्याचे पाहून तक्रारदारही गालातल्या गालात हसत होते. आता काम खरोखर मार्गी लागणार की साहेबांसमोर मान डोलावून विषय तिथेच विरून जाणार, यावरच नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.
प्रचाराची धुरा महिलांकडे; उमेदवारी मात्र पुरुषांकडे?
निवडणूक आली की महिला कार्यकर्त्यांची लगबग सुरू होते. घरोघरी प्रचार, महिला मतदारांशी संवाद, सभा-मेळावे आणि पक्षाची भूमिका पोहोचविण्यात त्यांचा मोठा वाटा असतो; पण उमेदवारीची वेळ आली की चित्र काहीसे बदलते. पेडणे-मांद्रे मतदारसंघातही प्रमुख पक्षांकडून महिलांना विधानसभा निवडणुकीत फारशी संधी मिळालेली नाही. पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये आरक्षणामुळे महिलांना नेतृत्वाची संधी मिळते; काहींनी आपली क्षमता सिद्धही केली आहे. मग विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर विश्वास ठेवताना राजकीय पक्षांची पावले का अडखळतात? प्रचाराच्या मैदानात महिला पुढे आणि उमेदवारीच्या रांगेत मात्र मागे, असे चित्र आणखी किती काळ दिसणार?
आयोगच कायद्याच्या कचाट्यात?
मतदार यादीतून नाव गायब झाले? मग पुन्हा नवीन मतदार म्हणून नोंदणी करा, असा सल्ला निवडणूक आयोगाकडून दिला जातोय. परेश साळगावकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर हा विषय आणखी चर्चेत आला; पण गंमत अशी की, नव्याने नोंदणी करताना चुकीची माहिती दिली तर कारवाई आणि दंडाची तरतूद असल्याचे सांगितले जाते. मग मतदारांनी करायचे काय? आयोगाचा सल्ला ऐकायचा की कायद्याची भीती बाळगायची? आयोगाच्या सांगण्यावरून नोंदणी केली आणि त्याच नोंदणीमुळे कायद्याचा पेच निर्माण झाला तर जबाबदार कोण? आता प्रश्न मतदारांसमोरच नाही, तर आयोगासमोरही आहे, अशी चर्चा आहे.
‘गोवा गजब है!’
गोव्याच्या विकासाची चर्चा आता दिल्लीपर्यंत पोहोचली आहे म्हणायची! केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान गोवा दौऱ्यावर आले आणि झुआरी पुलावरून गोव्याचे विहंगम रूप पाहून चक्क ‘गोवा गजब है!’ अशी दाद दिली. यापूर्वीच्या गोवा दौऱ्याची आठवण सांगताना ‘तेव्हाचा गोवा आणि आताचा गोवा यात खूप फरक आहे’, असेही त्यांनी नमूद केले. झुआरी पुलाचे शानदार अभियांत्रिकी काैशल्य पाहून भारावलेल्या चौहान यांनी भविष्यातील टॉवर आणि वॉकिंग ब्रिजमुळे या परिसराचे आकर्षण आणखी वाढणार असल्याचे सांगितले. झुआरीचा हा बदलता चेहराच विकसित गोव्याची नवी ओळख ठरणार, असा संदेशही त्यांनी दिला. चाैहान यांनी झुआरीचा व्हिडिओही शेअर केला.
पर्यटन क्षेत्रात ‘एआय’चा वापर
गोवा पर्यटन विभागाकडून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ‘एआय’ आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे योजिले आहे. त्यामुळे पर्यटन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होईल. ‘एआय’च्या मदतीने गर्दीचे विश्लेषण, धोकादायक ठिकाणांची ओळख, आपत्कालीन परिस्थितीचे जलद निदान आणि पर्यटकांना त्वरित सूचना देणे शक्य होईल. सीसीटीव्ही, जीपीएस व इतर डिजिटल साधनांमधील माहितीचे विश्लेषण करून हरवलेल्या पर्यटकांचा शोध घेणे किंवा संशयास्पद हालचाली ओळखणेही सुलभ होऊ शकते. यामुळे पोलिस व पर्यटन प्रशासनाचा प्रतिसाद वेगवान होऊन पर्यटकांचा विश्वास वाढू शकतो. मात्र, तंत्रज्ञानाची अचूकता, इंटरनेट आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज ही आव्हाने आहेत. वैयक्तिक माहितीचा गैरवापर, गोपनीयतेचा भंग, चुकीचे अलर्ट किंवा ‘एआय’च्या निर्णयांवर अतिनिर्भरता या धोक्यांविषयी दक्षता घ्यावी लागेल. ‘एआय’चा वापर वाढत आहे, हे सत्य.
हरित आत्मनिर्भरता
गोव्यात आणखी एक कृषी विज्ञान केंद्र येणार असल्याच्या घोषणेने शेतीच्या हरित भविष्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. एला आणि मडगाव येथील केंद्रे आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देत आहेत, तर कृषी महाविद्यालयाचीही साथ आहे. पॉलीहाऊस, अळंबी उत्पादन, मधमाशीपालन यांसारख्या तंत्रांचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना मिळते. दूध, भाजी, फळे, फुले, काजू आणि नारळ उत्पादनात गोवा आत्मनिर्भर झाला, तर चित्रच बदलेल. नारळ उत्पादनासाठी केंद्राची नवी योजना म्हटल्यावर स्थानिक शहाळ्यांच्या स्वप्नही आता गोड वाटू लागले आहे. शेतीचे हे हिरवे आवरण गोव्याचे पर्यावरण आणि लोकांचे स्वास्थ्यही जपणारे ठरेल, अशी चर्चा आहे. ∙
कौतुकाच्या पत्रकार परिषदा कुठे गेल्या?
गोव्यात कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा दावा विरोधकांकडून होत असला, तरी नागरिकांना आता त्याचा अनुभवही येऊ लागल्याची चर्चा आहे. पर्यटकांवरील अत्याचार असो, अल्पवयीन मुलांबाबतीत गंभीर घटना असोत किंवा दलालीचे प्रकार - प्रत्येक घटनेनंतर गोव्याची चर्चा राज्याबाहेरही होते. गंमत म्हणजे, एखादी मोठी कारवाई यशस्वी झाली की पोलिसांची पत्रकार परिषद भरते आणि कामगिरीचे कौतुकही होते. मग नागरिकांना अस्वस्थ करणाऱ्या गंभीर घटनांवर समोर येऊन पोलिस स्पष्टीकरण का देत नाहीत? चांगल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी तयार; पण कठीण प्रश्नांवर उत्तर देताना ते का कचरतात, अशी मिश्किल चर्चा आता सुरू झाली आहे!
पितृपक्ष अन् राजकारण
पितृपक्ष सुरू असताना कोणत्याही प्रकारचे नवे काम करू नये, नव्याने काही निर्णय घेऊ नयेत, असे बोलले जाते. एरव्ही इतर कोणी हा नियम पाळो अथवा न पाळो राजकारणी पितृपक्षात कोणतेच निर्णय घेत नाहीत, एवढे खरे... सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे अधिक तीव्रतेने वाहू लागले आहेत आणि अशावेळी अनेक ठिकाणी युती करण्यासंबंधी काही गौप्यस्फोट करण्यासाठी सज्ज असलेले नेते आता पितृपक्ष संपण्याची वाट पाहत आहेत. पितृपक्ष संपल्यानंतर हे नेते आपले निर्णय जाहीर करतात की, फक्त हूल दाखवतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
म्हापसा मार्केटचा श्वास?
म्हापशाचे मार्केट हे देशातील पहिले ड्राईव्ह इन स्वरूपाचे मार्केट. कार घेऊन थेट दुकानाच्या दाराशी जाण्याची सोय या मार्केटमध्ये आहे. सध्या अतिक्रमणांनी तेथे चालणेही अवघड झाले आहे, ही दुसरी गोष्ट. या मार्केटचा कायापालट होणार अशा घोषणा गेल्या दशकभर ऐकू येत आहेत. मार्केटचे प्रश्न सोडवू, ही घोषणा आता गुळगुळीत झाली आहे. घोषणा देणाऱ्यांना तरी ड्राईव्ह इन मार्केटला पूर्वीची शान मिळवून द्यायची आहे, हे ठाऊक तरी आहे का? हा खरा प्रश्न आहे. विधानसभा निवडणूक जवळ आली की अशा घोषणा वाढत जातील. म्हापसावासीयांनाही आता त्याची सवय झाली आहे.
शेती आणि युवा शक्ती
गोव्याच्या काही तरुणांनी सरकारी नोकऱ्यांच्या मागे न धावता आपल्या पायांवर उभे राहण्यासाठी शेती सुरू केली. त्यांना भरघोस पीक व यश मिळत आहे. झेंडूची फुले, भेंडी, कलिंगड अशी बागायती आणि शेती परिश्रमपूर्वक करून या युवकांनी आत्मनिर्भरतेवर जीविका करणे शक्य आहे, हे सिद्ध केले आहे. वाडवडिलांची पडीक जमीन लागवडीखाली आणण्याची गरज आहे. सरकारी योजनांची माहिती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, योग्य नियोजन याद्वारे वर्षभर उत्पन्न मिळेल, अशाप्रकारे शेती करता येते. एका बाजूला बाह्य बिल्डरना शेती विकायचे कुबुध्दीपूर्वक प्रयत्न चाललेत आणि इथे युवा शेतकरी जमिनी विकू नका, असे आक्रंदून सांगत आहेत. भाजी, दूध, फुले, फळे, नारळ याबाबत आपण स्थानिक स्तरावर स्वावलंबी व्हायला नको का?
नेमेचि येतो...
ऑक्टोबर सुरू होणे म्हणजे कैक हालचाली गियरमध्ये पडणे. संमेलने, उत्सव, कार्यक्रम, पुरस्कार यांना ऊत. साहित्य अकादमी पुरस्काराचे वेध लागतात ते याच महिन्यात; कारण डिसेंबरअखेरीला हे पुरस्कार जाहीर होतात. प्रक्रिया सुरू झाली असे समजते. कोकणीत कुणाच्या गळ्यात ही माळ यंदा पडणार याविषयी अंदाज, कुंडली अनुमान बांधणे सुरू आहे. ‘अंदाज पंचे धावोदशे’ अशी एक म्हण आहे. त्याला अनुसरून या भविष्याच्या आडाख्यांचा काही उपयोग होत नाही. दरम्यान, गेल्या वर्षीचे अकादमीचे अनुवाद, बाल साहित्य, युवा पुरस्कार अजूनपर्यंत घोषित केलेले नाहीत. संस्कृती मंत्रालय आणि अकादमी यांच्यात तिढा झाला होता, तेव्हा या तिनापैकी काही पुरस्कार विलीन करायची आवश्यकता आहे, असे सुतोवाच पुढे आले होते; पण तो विषय गुलदस्त्यात आहे. तूर्त साहित्यिकांचे लक्ष डिसेंबरकडे लागल्याची चर्चा आहे.
करंझाळेतील कचरा
गांधी जयंतीनिमित्त शहरभर स्वच्छतेचे फोटो काढत मोहिमा गाजल्या; पण करंझाळे किनाऱ्यावर पडलेल्या कचऱ्यावर मात्र कुणाचीच नजर पडली नाही. ‘स्वच्छता हीच सेवा’चे फलक झळकले, भाषणे झाली, हातात झाडूही दिसले. मात्र, किनाऱ्यावरील कचऱ्याने या सेवेला मुकाट साक्ष दिली. त्यामुळे स्थानिकांचा साधा सवाल- ‘हा कचरा कोण उचलणार?’ गांधी जयंतीपुरती स्वच्छतेची आठवण ठेवणाऱ्यांनी करंझाळे किनाऱ्याकडे फिरकावे. अन्यथा मोहिमांचे फोटो स्वच्छ व किनारा मात्र कचऱ्यातच राहणार! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.