Khari Kujbuj  Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: काँग्रेस आमदार कुणीकडे?

Khari Kujbuj Political Satire: केरळमध्‍ये काँग्रेस पक्षाला मिळालेला विजय साजरा करण्यासाठी काल काँग्रेस प्रदेश समितीने उत्तर तसेच दक्षिण गोव्यात भव्‍य रॅलीचे आयोजन केले होते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सावित्री पुन्हा उतरणार रिंगणात?

‘दुधाने तोंड पोळले तर ताकही फुंकून पितात’ असे मराठीत एक बोधवाक्य आहे. मात्र, काही लोक चुकीतून बोध न घेता तीच चूक पुन्हा पुन्हा करतात व स्वतःचे हंसे करून घेतात. बाबू कवळेकर यांच्या धर्मपत्नी सावित्री कवळेकर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुभाष फळदेसाईंविरोधात निवडणूक लढविली. उपमुख्यमंत्र्यांची पत्नी त्याच पक्षाशी बंडखोरी करते आणि पती तिला प्रोत्साहन देताे, ही बाब भाजप कार्यकर्त्यांना व आम जनतेला रुचली नाही. परिणामी सावित्री व बाबू दोघांनाही जनतेने घरची वाट दाखवली.आता येत्या निवडणुकीत सावित्री पुन्हा एकदा सांगेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे कळते. याचा अर्थ सावित्री व बाबूने चुकीतून बोध घेतलेला नाही. आता पुन्हा तीच चूक केली तर इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही का? ∙∙∙

राधांचे क्रिकेट आणि राजकारण

राजकीय विश्लेषक राधाराव यांना राजकारण तर आवडतेच, पण त्यांना क्रिकेट खेळातही विशेष रुची आहे. काल त्यांनी चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू संजू सॅमसन याच्या एका पॉडकास्टचा हवाला देत काँग्रेस पक्षात सामील होऊ पाहणाऱ्यांना एक सल्ला दिला आहे. या पॉडकास्टमध्ये त्‍यांना ‘तुम्हांला सॅमसन हा सीएसकेचा कर्णधार व्‍हावे असे वाटले नाही का?’ असा प्रश्‍‍न विचारला गेला. त्‍यावर त्‍यांनी, ‘जेव्हा कोणी एक घर सोडून दुसऱ्या घराचा आसरा घेतो, तेव्‍हा त्‍याने जास्त मागण्या करायच्या नसतात’ असे उत्तर दिले. राधाराव म्हणतात, काँग्रेस पक्षात जे कोण सामील होऊ पाहतात, त्यांनी हे ध्यानात ठेवायला पाहिजे. आता त्‍यांनी नेमका कुणाला बरे हा संदेश दिला असेल? ∙∙∙

एल्विस मांडणार वेगळी चूल?

राजकारणात टिकायचे असेल तर सर्व पर्याय खुले ठेवावे लागतात. सुवेंदू अधिकारी व हेमंता बिस्वा शर्मा जर काँग्रेस पक्षाला चिकटून राहिले असते तर मुख्यमंत्री कधीच बनले नसते. त्यांनी भाजपचा पर्याय शोधला आणि संधीचे सोने केले. एल्विस गोम्स हे तसे हुशार व्यक्तिमत्व. राजकारणात येण्यासाठी त्यांनी सरकारी अधिकारीपद सोडून आम आदमी पक्षाच्या झेंड्याखाली राजकीय प्रवास सुरू केला. मात्र, ‘आप’ त्यांना रुचला नाही.त्यांनी काँग्रेस पक्षाशी ‘हात’मिळवणी केली. तेथेही त्‍यांना उचित मान-सन्मान प्राप्त झाला नाही. एल्विस यांनी कुंकळ्ळी मतदारसंघावर दावा सांगितला आहे. मात्र, काँग्रेसचे आमदार युरी आलेमाव असताना एल्विस यांना उमेदवारी मिळणे कठीणच. तरीसुद्धा एल्विस यांनी मतदारांच्‍या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही, हे एल्विस यांना पुरेपूर माहीत आहे. ‘विथ काँग्रेस ऑर विदाऊट काँग्रेस’ एल्विस रिंगणात उतरणार म्हणजे उतरणार, असे त्‍यांचे समर्थक ठामपणे सांगतात. आता पाहू, एल्विसचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण होते की नाही ते! ∙∙∙

शिक्षकांना कुत्र्यांचा त्रास

देशाच्या विकासाला व प्रगतीला योग्य अशा जनगणनेची गरज असते. जर ‘डेटा’ उपलब्ध झाला तर योग्य विकासकामांचा आराखडा तयार करणे सोपे होते. याच कारणास्तव सरकारने जनगणना काम सुरू केलेय. या जनगणनेच्या आधारे भविष्याची दिशा ठरविण्यास मदत होते. जनगणनेच्या कामासाठी सरकारी कर्मचारी व शिक्षक ‘डेटा’ संकलनासाठी घरोघरी फिरतात. मात्र या कामात गुंतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतोय. काही ठिकाणी घाणेरडे ‘कॉमेंट’ ऐकावे लागतात. कहर म्हणजे काही लोक माहितीच देत नाहीत. काहीजण चुकीची माहिती देतात. बिच्‍चारे शिक्षक हे सगळे सहन करून जनगणनेचे काम करतात. ∙∙∙

युरीच्‍या विरोधकांची मोट?

एकीत बळ असते असे म्हणतात ते खरे. आजच्या राजकारणात युतीच्या गोष्टींना महत्त्‍व आहे. जर आपला विरोधक आपल्यापेक्षा सशक्त आणि पॉवरफूल असला तर त्याला हरविण्यासाठी विरोधकांत एकी असणे गरजेचे आहे. कुंकळ्‍ळी मतदारसंघात आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना आव्हान देण्यासाठी त्‍यांचे विरोधक एकत्र यायला लागले आहेत.काही संतुष्ट काँग्रेस नेते व काँग्रेस विरोधक युरीच्या विरोधात सक्षमपणे पुढे यायला लागले आहेत. काँग्रेस पक्षाचे एल्विस गोम्स, भाजपचे क्लाफास डायस, जॉर्सन फर्नांडिस, सॅमी तवारीस, प्रशांत नाईक यांच्यासह सर्व विरोधक आपापसांतील आयडोलॉजी व मतभेद विसरून केवळ ‘युरी नको’ यासाठी एकत्र येण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र निवडणुकीपर्यंत ही एकी कायम राहणार का? आम जनता या युरीविरोधी एकीला समर्थन देणार का? हाच खरा प्रश्न आहे. ∙∙∙

दबलेला आवाज

आपणाला पुरस्कार मिळणार नाही. सरकाराविरोधात आवाज काढला तर आपल्या कामगिरीची दखल घेतली जाणार नाही, यामुळे बहुतांश लेखक सध्‍या मौन आहेत, असे मत ज्येष्ठ साहित्यिक उदय भेंब्रे यांनी एका टीव्ही वाहिनीच्या मुलाखतीत मांडले. काही संघटना सरकारकडून निधी मिळत असल्याने ‘ब्र’ काढत नाहीत. असे असले तरी भेंब्रे यांच्या वक्तव्याला वजन आहे. आपली व्यक्तिगत सुरक्षा व पुरस्कारांची लालच या कारणांमुळे मुक्तपणे आवाज उठवण्याचे धाडस लेखक व संघटना करत नाहीत, असे त्यांचे ठाम मत आहे. काही लेखक सरकारला टरकून आहेत, तर काही जण सर्व पुरस्कार, सोयी, योजनांचा लाभ घेऊन आपण सरकारविरोधी म्हणवत आहेत. कोकणीवर अन्यायकारक उद्‌गार काढून जी निवेदने हल्ली केली गेली, त्यावर कुणी जाब विचारायला पुढे आला नाही, यावर त्यांनी खेद व्यक्त केला. बरे झाले, सोनाराने कान टोचले. ते अधिकृत चिन्हांकित असतात. ∙∙∙

‘अमूल्य’ घोटाळा

डिचोलीतील सर्वण गावात सध्या कोमुनिदाद जमीन घोटाळा गाजत आहे. कोमुनिदादची जमीन परस्पर एका प्रकल्पाच्या रस्त्यासाठी दिली असून, त्‍यात मोठा घोटाळा झाल्याचा संशय ग्रामस्‍थांमधून व्‍यक्त केला जात आहे. हा घोटाळा करणारे कोण, ते ग्रामस्थांना माहीत आहे. घोटाळा करणाऱ्यांनी गावातील देवळात येऊन जाब द्यावा. त्यासाठी ग्रामस्थांनी त्‍यांना संधीही दिली होती. चार दिवसांची मुदत देऊनही घोटाळा केल्याचा ज्यांच्यावर संशय आहे, ते शेवटपर्यंत पुढे आले नाहीत. अखेर ठरल्याप्रमाणे ‘घोटाळा करणाऱ्यांना कायमचा धडा शिकव’ असे गाऱ्हाणे देवासमोर घालण्यात आले. ज्यांच्याकडे अंगुलीनिर्देश करण्यात येत आहे, ते गाऱ्हाण्यावेळीही आले नाहीत. त्यामुळे त्यांनीच हा घोटाळा केलाय, असा संशय आता बळावला आहे. गाऱ्हाणे झाले, आता कायद्याचा मार्गही पत्करण्याचा विचार ग्रामस्थांनी चालविला आहे. त्यामुळे हा घोटाळा आणखी तापणार हे निश्‍चित. ∙∙∙

‘राजा’समोर सिंहाचे आव्‍हान

प्रियोळ मतदारसंघात पुन्हा एकदा ‘तू माझा, की मी तुझा?’ असा राजकीय सवाल उभा ठाकल्याची चर्चा रंगली आहे. एकीकडे भाजपचे कार्यकर्ते ‘हा मतदारसंघ आमचाच’ असा दावा करत आहेत तर दुसरीकडे मगोचे निष्ठावंत ‘अहो, प्रियोळ म्हणजे आमचे माहेरघर’ असे सांगत फिरताना दिसत आहेत. त्यामुळे मतदार संभ्रमित झालेले आहेत. या मतदारसंघात दीपक ढवळीकर यांनी दोनदा विजय मिळवत मंत्रिपदही चाखले. पण नंतर गोविंद गावडे यांनी अपक्ष राहून त्‍यांचा पराभव करून भाजपच्या तंबूत प्रवेश केला. त्‍यामुळे राजकीय समीकरणे बदलली. या दोन्‍ही पक्षांची युती आहे. आता प्रश्न असा पडला आहे की, पुढच्या निवडणुकीत प्रियोळमध्‍ये भाजपचे ‘कमळ’ फुलवणार की सिंहाची डरकाळी ऐकू येणार?. दुसरे म्‍हणजे, तेथे मगोला संधी मिळाली तर गावडे साहेबांची भूमिका काय असणार? ∙∙∙

भीक नको, पण कुत्रा आवर!

भाडेकरू फॉर्म भरणे आता कायद्याने बंधनकारक झाले आहे. घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची यादी पोलिसांना दिली नाही तर तो गुन्हा असून कैद व दंडाची शिक्षा होऊ शकते. आता फॉर्म भरण्यास घरमालकांचा आक्षेप नाही. मात्र हा फॉर्म ऑनलाईन भरावा लागतो व नेमकी ती साईट्स बंद आहे. पोलिस ठाण्यात गेले तर ‘ऑनलाईन मस्ट’ असे सांगून आल्या पावली माघारी पाठवून दिले जाते. लोकांना सतत हेलपाटे घालावे लागतात. त्‍यामुळे ‘भाडेकरूंची कटकट नको’ म्‍हणजेच ‘भीक नको पण कुत्रा आवर’ म्‍हणण्‍याची वेळ घरमालकांवर आली आहे. ∙∙∙

वेळीच इलाज हवा

मुलांनी फुटबॉलवर कीक मारली, ठीक. उद्या बॉलच जर मुलांवर कीक मारू लागला तर ते विचित्र ठरणार. तंत्रज्ञान आपल्या सोयीसाठी आहे, तेवढाच त्याचा वापर हे योग्य. परंतु त्याचा गैरवापर मुलं करू लागली तर ती नैतिक घसरण समजायची. दुसऱ्याच्या नावाने फेसबुकवर खाते उघडणे व तेथून इतरांना मॉर्फ करून फोटो पाठवणे हा थ्रील म्हणून केलेला अपराध दंडनीय आहे. इन्‍स्‍टाग्रामवरही असेच प्रकार होत आहेत. सोन्याचे अलंकार घेऊन शाळकरी विद्यार्थी बेपत्ता होण्याची घटना घडली आहे. या घटना वाढत आहेत. कुमारवयीन मुलांना हाताळण्याचा नाजूक प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे. ‘जखमेला सुईने एक टाका मारला तर नऊ टाके वाचतात’ अशी अर्थपूर्ण इंग्रजी म्हण आहे. तंत्रज्ञानाने पालकांची झोप उडवून जबाबदारी वाढवली आहे हे मात्र नक्की. ∙∙∙

गोव्‍याचा ‘विजय’ कोण?

अलीकडेच झालेल्‍या तमिळनाडू निवडणुकीत गोव्यातील काँग्रेस नेते व माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी महत्त्‍वाची भूमिका पार पडली. तेथे त्‍यांनी काँग्रेसचे पाच आमदार निवडून आणले व टीव्हीकेचे विजय यांना पाठिंबा जाहीर करून सरकार पण स्थापन केले. आता तमिळनाडू निवडणुकीतील परिणामांची झलक गोव्यातही पाहायला मिळणार असे भाकीत केले जात आहे. गोव्यात भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस तामिळनाडूप्रमाणे भूमिका बजावणार का?, त्यासाठी गिरीश यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करणार का? या प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे. पण गोव्यातील ‘विजय’ कोण हा प्रश्‍‍न मात्र अनुत्तरितच आहे. ∙∙∙

प्रभावी दाम्‍पत्‍याचा प्रभाव

साखळीत पतंजली योग समितीतर्फे झालेला ‘महिला संमेलन’ हा कार्यक्रम सर्वार्थाने महिलांचा व त्यांच्या कार्याचा गौरव करणारा ठरला. तेथे लाईव्ह व्हिडिओ मार्गदर्शनातून स्वामी रामदेवजींनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या कार्याची स्‍तुती केली. दुसरीकडे या कार्यक्रमास उपस्थित केंद्रीय पतंजली महिला प्रभारी साध्वी डॉ. गुरुप्रिया यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांच्‍या कार्याची तोंडभरून प्रशंसा केली. एकंदरीत या प्रभावी दाम्‍पत्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी हे सुचिन्हच म्हणावे लागेल. ∙∙∙

आंबा खायचा की टेस्ट करायचा?

बाजारात सध्या आंब्यांचा दरवळ पसरला आहे. प्रत्येक विक्रेता आपल्या आंब्याला ‘झाडावर पिकलेलात, ‘गोड’, ‘रसाळ’ अशी पदवी देताना दिसतोय. पण ग्राहकांच्या मनात मात्र एकच प्रश्न ‘हा आंबा खायचा की आधी प्रयोगशाळेत तपासायचा?’ मागच्या काही महिन्यांत अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करून केमिकलने पिकवलेल्या फळांचा पर्दाफाश केला होता. पण आता ती मोहीम जणू उन्हाळ्याच्या सुट्टीवर गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे बाजारात आलेला प्रत्येक आंबा स्वतःला ‘नैसर्गिक’ म्हणवून घेतोय व ग्राहकही देवाचे नाव घेऊन तो घरी नेतोय.एकूण काय, सध्या फळे खरेदी करणे म्हणजे छोटासा जुगारच झाला आहे. ∙∙∙

चर्चिल ‘अनहॅपी’

‘लुईस बर्जर’ प्रकरणात चर्चिल आलेमाव यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला असला तरी ते स्वतः खूष नाहीत. मीडियावाल्यांशी बोलताना त्यांनी स्वतः तसे बोलून दाखवले आहे. आता ते खूष नसण्याचे कारण काय बरे असावे, हे एक कोडेच आहे. लुईस बर्जर प्रकरणी चर्चिल यांना अटक होऊन काही दिवस तुरुंगाची हवा खावी लागली होती. मात्र या प्रकरणातील अन्य संशयितांना मात्र शेवटपर्यंत अटक झालीच नव्‍हती. त्‍यात मडगावच्या बाबाचा प्रामुख्याने समावेश होता बरे का! थोरले आलेमाव यांना कदाचित अजूनही हीच बाब सलत असावी. त्यामुळे ते आपण खूष नसल्याचे उघडपणे सांगत तर नसावेत ना? ∙∙∙

‘उतर राखपी मनीस’

फातोर्ड्यात आयोजित नेत्रचिकित्सा शिबिरात बोलताना आमदार विजयबाब सरदेसाई यांनी रविवारी सांगितले की, ‘उतर राखपी मनीस’ (शब्द पाळणारी व्यक्ती) अशी आपली ओळख आहे. बरोबर आहे. विजयबाब लोकांना जे आश्‍‍वासन देतात, ते पूर्ण करण्‍याचा आटोकाट प्रयत्न करतात. त्यात यश-अपयश ही दुसरी बाजू. पण हे सांगून विजयबाबना नेमके काय सांगायचे आहे. जसे ‘देवाचो मनीस’ तसेच ‘उतर राखपी मनीस’ असे तर विजयबाबना सांगायचे नाही ना? ∙∙∙

काँग्रेस आमदार कुणीकडे?

केरळमध्‍ये काँग्रेस पक्षाला मिळालेला विजय साजरा करण्यासाठी काल काँग्रेस प्रदेश समितीने उत्तर तसेच दक्षिण गोव्यात भव्‍य रॅलीचे आयोजन केले होते. उत्तर गोव्यात आयोजित केलेल्या रॅलीत हळदोण्‍याचे आमदार कार्लुस फेरेरा सामील झाले, मात्र दक्षिण गोव्यात झालेल्या रॅलीत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा हे कोठे दिसलेच नाहीत. आता पूर्वनियोजित कामामुळे ते कदाचित या रॅलीत सामील झाले नसावेत किंवा अचानक त्‍यांना काही तरी महत्त्‍वाचे काम आले असावे. मात्र त्यामुळे काँग्रेस प्रदेश समिती आणि विधिमंडळ गट यांच्यात समन्वयाची कमी तर नाही ना, असे जाणवल्याशिवाय राहिले नाही. काँग्रेस पक्षात ‘ऑल इज वेल’ आहे ना? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colva Beach Pollution: कोलवा किनाऱ्याची झाली दैना! कचरा आणि अस्वच्छतेमुळे पर्यटकांनी फिरवली पाठ; स्थानिकांनी प्रशासनावर ओढले ताशेरे

Goa Assembly Election 2027: वेळ अजूनही गेलेली नाही! 2012चा इतिहास पुन्हा घडणार? गोव्यात बदलाची हवा वाहण्यासाठी विरोधकांची एकजूट हवीच

Goa Tiger Death: वाघाच्या मृत्यूनं खळबळ! खाणींच्या विळख्यात संपतोय 'जंगलाचा राजा'? पण वनखात्याची सोयीस्कर अनास्था

Cutbona Jetty: 100 बोटी, 3000 लोक पण मूलभूत सोयी शून्य! कुटबण जेटीवर आरोग्याचा प्रश्न झाला गंभीर, आमदारांनी दिला समस्या सोडवण्याचा शब्द

Bicholim Fish Price Hike: मान्सूनपूर्वी मासळीचे दर कडाडले! डिचोलीत ‘सुरमई’चा तोरा; मत्स्यखवय्यांच्या खिशाला कात्री

SCROLL FOR NEXT