खरी कुजबुज: काँग्रेस आमदार गेले कुठे?

Khari Kujbuj Political Satire: काँग्रेस पक्षाचे तीन आमदार कुठे आहेत? कारण परवा, महिला आरक्षण विधेयकावर भाजपने कशी जनतेची फसवणूक केली, हे सांगण्यासाठी काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष, खासदार व तीन आमदारांची पत्रकार परिषद ठेवली.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

परत एकदा घराणेशाही?

सेंट फ्रांसिस झेव्हियर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी तसेच गोमंतकीयांनी गौतम खट्टर यांचा निषेध केला. आज विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आमदार एल्टन डिकोस्ता व खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस तसेच इतरांसह पोलीस महासंचालकांची भेट घेवून खट्टर व पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांच्या अटकेची मागणी केली. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सुनिल कवठणकर, आपमधूम कॉंग्रेस पक्षात आलेले ॲड. अमित पालेकर, तृणमूल कॉंग्रेसमधून आलेले समिल वळवईकर तसेच मगोतून येवून फोंडा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसची उमेदवारी घेतलेले डॉ. केतन भाटीकर वगैरे युरी आलेमाव सोबत हजर होते. परंतू, विरोधी पक्षनेत्याच्या मागे उभ्या असलेल्या युरी आलेमावांच्या भगिनी राईसा आलेमाव यांना बघून काँग्रेसवाल्यांच्या मनात वेगवेगळ्या विचारांचे नक्कीच काहूर माजले असणार. कारण २०१२ मध्ये आलेमावांना घराणेशाही बाधली होती. त्याची पुनरावृत्ती आगामी निवडणुकीत होणार नाही ना? असे काही कॉंग्रेसजन आपसात कुजबूजत होते. ∙∙∙

सावर्डेत क्रिकेट स्पर्धांना ऊत

सध्या देशात आयपीएलचा बोलबाला असताना सावर्डे मतदारसंघात राजकारण्यांनी पुरस्कृत केलेल्या क्रिकेट स्पर्धांची धामधूम चालू आहे. सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांनी आमदार चषक स्पर्धा आयोजित केल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले असताना माजी आमदार दीपक पाऊसकर आणि विनय तेंडुलकर यांनी पुरस्कृत केलेल्या अन्य दोन क्रिकेट स्पर्धा लवकरच होणार असल्याचे सांगितले जाते. दुसऱ्या बाजूने संकेत आर्सेकर हेही स्थानिक युवकांना स्पर्धा आयोजित करण्यासाठी सढळ हस्ते पैशांची मदत करत आहेत. निवडणूक होईपर्यंत या मतदारसंघात किती क्रिकेट स्पर्धा होणार, तेच आता पाहावे लागणार आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: बाबू आता काय करतील?

महिला आरक्षणाचा फटका कोणाला?

महिला आरक्षण विधेयकाला संसदेत पुरेसे संख्याबळ मिळाले नसल्याने ते बारगळल्यात जमा आहे. याचा फायदा आता सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष घेण्याच्या प्रयत्नात दिसतात. मात्र महिला आरक्षण विधेयक संमत न झाल्याने अनेक पुरुष व महिला नेत्यांना मात्र फटका बसला. काही महिला आमदार, खासदार बनण्याची स्वप्ने पहात होती. पुरुष नेते आपल्या पत्नी, बहिण किंवा कुटुंबातील अन्य अगदी जवळच्या महिलेला उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात होते. काही पुरुष नेत्यांनी तर आपण आपला मतदारसंघ महिलांसाठी सोडू, असे वक्तव्य सुद्धा केले होते. विधानसभेचे मतदारसंघ वाढणार. गोव्यात तरी मतदारसंघ वाढल्याने मतदारांच्या संख्येच्या दृष्टीने ते लहान असणार. त्यामुळे आपला मतदारसंघ महिलांसाठी आरक्षीत झाला, तरी स्वतःला जवळच्या मतदारसंघातून निवडणूक लढवता येईल अशी खेळी खेळण्याचे त्यांचे मनसुबे असावे. या सर्व मनसुब्यावर अखेर पाणी पडले, असे म्हणावे लागेल. महिला आरक्षण बारळगले. पुढे काय? असा प्रश्न दिवास्वप्न पाहणाऱ्या या राजकीय नेत्यांना निश्र्चितच पडला असावा. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: विरोधी आमदार आहेत कुठे?

काँग्रेस आमदार गेले कुठे?

काँग्रेस पक्षाचे तीन आमदार कुठे आहेत? कारण परवा, महिला आरक्षण विधेयकावर भाजपने कशी जनतेची फसवणूक केली, हे सांगण्यासाठी काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष, खासदार व तीन आमदारांची पत्रकार परिषद ठेवली. परंतु तेथे युरी-एल्टन हजर राहिले नाहीत. त्यानंतर दोन दिवसांमागे प्रदेशाध्यक्ष व आज दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस कारापूर-सर्वणला जावून आंदोलनकर्त्यांना भेटले, पण तेथे अजूनही काँग्रेसचा एकही आमदार पोचलेला नाही. मंगळवारी गोवा सहप्रभारी डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची पत्रकार परिषद झाली, तेथेही आमदार दिसले नाहीत. काँग्रेस पक्षात सध्या ‘कुणाचा पायपोस, कुणाच्या पायात नाही’ अशीच परिस्थिती आहे म्हणायची.. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: युरींचा प्लॅन फसला?

महानगरपालिकेचा उपक्रम स्तुत्य!

महानगरपालिकेतर्फे अलीकडे काही चांगले उपक्रम सुरू झाले आहेत. स्वतःची इमारत असुरक्षित इमारत असली तरी तिची डागडुजी करण्यात आली आहे. सभागृहाची दुरुस्ती करून बैठकव्यवस्था बदलली आहे. खुर्च्यांची संख्या वाढवली गेली आहे. टाईल्सही बदलण्यात आल्या, रंगरंगोटी केली गेली असल्याने सभागृहात झगमगाट दिसू लागला आहे. त्याशिवाय महानगरपालिकेतर्फे सफाई कामगारांना दर महिन्याला प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येत आहे. महिनाभरात सफाईचे काम चोखपणे जे कर्मचारी काम करतात, त्यांच्या कामाची दखल महानगरपालिका घेते, हे यातून दिसून येते. त्याशिवाय कामगारांनाही त्यातून प्रोत्साहन देण्याचा हा एक प्रयत्नच म्हणावा लागेल. जीसूडा, महापौर रोहित मोन्सेरात, आयुक्त क्लेन मेदेरा, आणि अभियंत्यांची टीम यांचेही यासाठी योगदान लाभत आहेच. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: युवा काँग्रेस ‘सायलेंट मोड’वर?

आंदोलनांचा सीझन

राज्यात सध्या आंदोलनांचा असा काही सीझन सुरू झालाय की हवामान खात्यानेही कदाचित वेगळे बुलेटिन काढावे. “आज हलक्या सरींसह दोन आंदोलनांची शक्यता!” एखाद्या ठिकाणी आंदोलन पेटतंय, तर दुसरीकडे लगेच “धर्मात फूट पाडणाऱ्यांना आत टाका” अशी मागणी होऊन दुसरेच आंदोलन उभं राहतंय. म्हणजे विषय काहीही असो, शेवट एकच.. “चल, आंदोलन करूया!” गावोगावी चर्चा रंगलीय. सरकारी अधिकारी खरंच काम करत नाहीत का? की ते काम करतात, पण लोकांना ते दिसत नाही? की काम होतंय, पण इतक्या शांतपणे होतंय की आवाजच येत नाही? काहीजण मिश्किलपणे म्हणतात, आता सरकारी फाईल हलण्यापेक्षा आंदोलनाची पोस्टरं जास्त वेगाने हलतात! आंदोलन करणाऱ्यांचं म्हणणं, आम्ही आवाज उठवला नाही, तर काहीच हलत नाही. सरकारचं म्हणणं, आम्ही काम करतोय, पण तुम्ही ऐकत नाही आणि जनता मधेच म्हणते, दोघंही बोलतायत, पण खरं कोण? एकंदरीत, राज्यात सध्या ‘मुद्दा शोधा आणि आंदोलन करा’ ही नवीन परंपरा सुरू झालीय की काय, अशी शंका येतेय. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: काँग्रेसचा सावळा गोंधळ

एनएसयूआयची पत्रकार परिषद

राजकीय पक्षांशी संलग्नित आहे, म्हणजे पत्रकार परिषदा घेण्याचा ते एक खुले प्रमाणपत्र अशी समज गोव्यातील एनएसयूआय या काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटनेने करून घेतली असावी. पत्रकार परिषद घेण्यास कुठलीही हरकत नाही. मात्र जो विषय या परिषदेत मांडणार निदान त्‍याचा अभ्‍यास करुन यावे, ही अपेक्षाही या संघटनेला मान्‍य नसावी, असे म्‍हणण्‍याचे कारण म्‍हणजे, काल या संघटनेने मडगावात घेतलेली पत्रकार परिषद. कुडचडे वासनाकांड प्रकरणात अटक केलेल्‍या सोहम नाईक याला न्‍यायालयाने अंतरिम जामीन दिल्‍याचा विषय घेऊन न्‍यायालयाच्‍या या आदेशाला सरकारने उच्‍च न्‍यायालयात आव्‍हान द्यावे अशी मागणी काल या संघटनेने केली. वास्‍तविक सोहम नाईक याला मिळालेला हा अंतरिम जामीन केवळ तांत्रिक स्‍वरुपाचा आहे. अन्‍य तीन प्रकरणात तो सध्‍या अटकेत असल्‍याने हा अंतरिम जामीन मिळूनही तो बाहेर आलेला नाही. म्‍हणजे, हा अंतरिम जामीन एकाअर्थी कुचकामीच. तरीही या निर्णयाला उच्‍च न्‍यायालयात आव्‍हान द्यावे, अशी अपेक्षा एनएसयुआय धरत असल्‍यास त्‍यांना म्‍हणावे तरी काय? ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: काँग्रेसचा सावळा गोंधळ

मोर्चा आला, आता जेवूनच जाऊ!

कार्यक्रम असो, मोर्चा असो की आंदोलन... भाजप त्याचे नीटनेटके नियोजन करते. या नियोजनाची सतत चर्चाही होतच असते. गर्दी कशी जमवायची, हे भाजपला सर्वश्रुत आहे. महिला आरक्षणावरून सध्या सत्ताधारी भाजपकडून सर्वत्र विरोधी पक्षांच्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. गोव्यातही या भाजपने मोर्चाचे आयोजन केले, आज सकाळी भाजपच्या महिलांचा पणजीत मोर्चा निघाला. या मोर्चाचे नियोजन भाजपने आदल्या रात्री (सोमवारी) ऐनवेळी केले. त्यामुळे पणजीत अनेक भागातून मोर्चासाठी येणाऱ्या महिलांना लवकर सकाळी बसेसची सोय करण्यात आली होती. त्या खासगी बसने पणजीत पोहोचणे आवश्यक असल्याने अनेक महिला आज सकाळी चहा घेऊन घर सोडले होते. मोर्चा संपल्यानंतर मात्र त्यांनी पणजीतून जाताना जेवूनच जाऊ, असे म्हणत आझाद मैदानापासून जवळ असलेली सर्व हॉटेल्समध्ये या महिलांनी धाव घेतली होती. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: काँग्रेसचा सावळा गोंधळ

मुख्यमंत्री, मंत्री रमले मैदानावर!

मडगाव येथे गोवा क्रिकेट असोसिएशनने मडगाव क्रिकेट क्लब येथे मंगळवारी पिंक क्रिकेट केंद्राचे उद्‍घाटन केले. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत उपस्थित होते. त्यांनी यावेळी फलंदाजीची आपली हौस भागवून घेतली. सायंकाळी उशिरा मिरामार येथे राष्ट्रीय शालेय बीच व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्‍घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. आपण व्हॉलीबॉलामध्येही विरोधकांना हरवू शकतो, असे कौशल्य प्रदर्शन मुख्यमंत्र्यांनी केले. राजकीय मैदानावर तरबेज असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा वेगळा पैलू यानिमित्ताने उपस्थितांना दिसला. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: खरोखरच राजकारणी असे वागतील?

पालिका निवडणुकीची तयारी!

राजकारणात काहीही स्थायी नसते आणि नसावे, राजकारणात बदल असायलाच हवा. राज्यात पालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता असली तरी काणकोण नगरपालिका क्षेत्रात काही राजकारण्यांनी व इच्छुकांनी पालिका निवडणुकीची जय्यत तयारी केल्याचे चित्र दिसत आहे. आता पालिका निवडणुकीपूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तर मात्र चित्र बदलण्याची शक्यता आहे. क्रीडा मंत्री रमेश तवडकर समर्थकांनी पालिका निवडणुकीत भाजपाचे समर्थक पॅनल उतरविण्याची तयारी केली असली, तरी भाजपात एका पेक्षा जास्त इच्छुक असल्याने रमेश तवडकर यांच्यावर ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिका घेण्याची पाळी येऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस पक्ष पालिका निवडणुकीत धमाका करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. कधी नव्हे तेवढे काँग्रेस समर्थक एकत्र येताना दिसत आहेत. आता काही आजी-माजी नगराध्यक्ष व नगरसेवक आपली राजकीय कारकीर्द पुन्हा स्थापित करण्याच्या तयारीत लागले आहे. पाहूया निवडणुकीपर्यंत या इच्छुकांचा आक्रमकपणा कितपत टिकतो. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: खरोखरच राजकारणी असे वागतील?

कोकणी विश्वातील `कोफुसांवां’

धुमसणारा धूर, पेटते इंगळे यामुळे धुनी पेटत राहते, असे म्हणतात. कोकणीच्या साहित्य अकादमी पुरस्काराच्या संदर्भात जे कुभांड रचले गेले त्यावर सद्या प्रचंड खदखद साहित्य वर्तुळात धुमसत आहे. ८० पानांच्या या पुस्तिकेत कोकणी कवितेच्या समीक्षेपेक्षा निमंत्रक मेलवीन यांच्या कवितेचे उदात्तीकरण करून पाने खर्ची घातली आहे. या जागृतीसाठी साहित्यिकांना पत्रे येत आहेत. या पुस्तिकेच्या प्रस्तावनेत पुरस्कारार्थी लेखक पेरनाल यांची अतिरंजित अतिशयोक्तीने स्तुती केली गेली आहे. या अगोदर पुरस्कार दिलेल्या समीक्षात्मक ग्रंथांकडे तुलना केली तर पेरनाल यांना हा पुरस्कार देऊन ही थट्टा, कावेबाजपणा हे स्पष्ट झाले आहे, असे पत्रात म्हटले आहे. ‘आपका साथ, आपका विकास’ हे नवे धोरण राबवून सल्लागार समितीने वशिलेबाजीच्या खेळींमुळे कोकणीचे नुकसान केले आहे असाही सूर पत्रात आहे. दिवसागणिक कोकणीतील वाद, केस्तांवां, अंतर्गत बंडाळी वाढत आहे, हे खरे. ∙∙∙

‘पळ’ काढण्‍याची वेळ का?

गेली १४ वर्षे राज्‍यात भाजपची सत्ता आहे. या काळात भाजप सरकारने गोमंतकीय जनतेला जी आश्‍‍वासने दिलेली होती, त्‍यातील काही पूर्ण झाली. तर, काही अजूनही प्रलंबित आहेत. त्‍यामुळे भाजपने पत्रकार परिषद आयोजित केली की पत्रकार प्रलंबित प्रश्‍‍नांवरून पत्रकार परिषद घेणाऱ्यांना घेरतात. याआधी भाजप नेते त्‍याला उत्तरेही देत असत. पण, गेल्‍या काही वर्षांत मात्र ही परिस्‍थिती बदलली आहे. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक वगळता भाजपचे इतर नेते, मंत्री, आमदार तसेच महिला मोर्चाच्‍या पदाधिकारी पत्रकारांच्‍या प्रश्‍‍नांना उत्तरे देण्‍याऐवजी व्‍यासपीठावरून पळ काढत असल्‍याचेच चित्र वारंवार दिसून येत आहे. त्‍यामुळे त्‍यांना पत्रकारांच्‍या प्रश्‍‍नांना खरेच उत्तरे द्यायचे नसते की त्‍यांच्‍या त्‍याबाबतीत अभ्‍यासच नसतो, असा प्रश्‍‍न मतदारांना पडत चालला आहे. ∙∙∙

चांदेलवासीयांना आली जाग!

साळावली प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने पावले टाकणे सुरु केले आहे. पाणीपुरवठा खाते सांग्याचे आमदार सुभाष फळदेसाई यांच्याकडे आल्यानंतर या कामाला गती मिळाली आहे. यापासून प्रेरणा घेत आता पेडणे तालुक्यातील चांदेलवासियांनी आपल्यालाही सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी पुढे रेटली आहे. चांदेल येथे जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. पेडणे तालुक्याची तहान भागवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तुये येथील जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु होईपर्यंत चांदेलवरच पेडण्याची मदार आहे. या प्रकल्पासाठी जागा दिल्याची भरपाई अद्याप न मिळाल्याची ग्रामस्थांना आठवण झाली आणि त्यांनी ही मागणी पुढे केली आहे. विधानसभा निवडणूक जवळ येत जाईल, तशी ही मागणी तीव्र होईल, हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुज: कोण कुणाला मतदान करतो?

खट्टर अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात?

राज्यात सध्या ‘खट्टर’ नावाचा विषय इतका तापलाय की राजकारण, पोलिस आणि जनतेच्या चर्चेचा तो मुख्य ‘हीरो’च बनलाय. कट्टर साहेब मात्र शांतपणे आपली पुढची चाल आखत असल्याची चर्चा आहे. म्हणे ते थेट अटकपूर्व जामिनाच्या दरवाजावर टकटक करणार! आता हा दरवाजा उघडतो, की पोलिस आधीच कुलूप बदलतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे. वास्को पोलिसांकडून आता हे प्रकरण गुन्हे शाखेकडे दिल्याने त्यांच्या हालचालींवर सध्या सर्वांची नजर आहे. फाईल हलतेय का, की फक्त चहाचे कपच फिरतायत, याचीच चर्चा रंगलीय. काही जाणकार तर म्हणतात, अटकपूर्व जामीन मिळाला, तर ‘खट्टर’ सुटणार, नाही मिळाला तर ‘खट्टर’चं कटकारस्थानच उघड होणार! आता पुढचे दृश्य काय, खट्टर कोर्टात, पोलिस कोर्टाबाहेर, की दोघेही एकाच स्क्रिप्टवर? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com