

‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे’, असे एक बोधवाक्य आहे. बंगालात शुभेंदू अधिकारी यांनी पाच वर्षे अथक परिश्रम केले, जनतेशी कनेक्ट राहिले; परिणाम बंगालचे मुख्यमंत्रिपद प्राप्त झाले. केपे मतदारसंघाचे माजी आमदार बाबू कवळेकर यांना गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत एल्टन डिकॉस्टा यांच्याकडून हार स्वीकारावी लागली होती. मात्र, निवडणूक हरल्यानंतर बाबू इतरांप्रमाणे अज्ञातवासात गेले नाहीत. गेली साडेचार वर्षे ते राजकारणात सक्रिय आहेत. काल बाबूंच्या वाढदिवसाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री दिगंबर कामत यांनी बाबूंना इशारो इशारोमें पुढील निवडणुकीत केपे मतदारसंघाची उमेदवारी घोषित करून केपे मतदारसंघात पुन्हा कमळ फुलविण्याच्या शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या विधानसभेत भाजपचे तीस आमदार असणार व त्या लिस्टवर बाबू कवळेकर यांचे नाव अग्रक्रमाने असणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यावर बाबू व बाबू समर्थक खुश झाले. आता बघूया बाबू एल्टनला पटखनी देण्यात यशस्वी होतात की नाही. ∙∙∙
बाळ्ळी पंचायतीत तीनवेळा सरपंच बदलले; पण उपसरपंचपदी निवडून आलेल्या बिंदिया गावकर या सुरवातीपासून या पदावर असून त्यांना हलवायची हिंमत अजून कुणाला झालेली नाही. काल त्यांच्याविरोधात जो अविश्वास ठराव आणला गेला तो पाच नगरसेवक मतदानास उपस्थित न राहिल्याने बारगळला. वास्तविक सुरवातीला काँग्रेसबरोबर असलेले माजी सरपंच गोविंद फळदेसाई यांनी नंतर भाजपला आपले समर्थन दिल्याने या पंचायतीवर भाजपचा सरपंच निवडून आला होता; पण काल मतदानास हे गोविंदरावही गैरहजर होते. बिंदिया गावकर या एवढ्या पॉवरफूल आहेत का? की त्यामुळे भाजपला जवळ गेलेले गोविंदराव यांनीही नमते घेतले की यामागे आणखी कोणाचा हात आहे, ज्याने गोविंद फळदेसाई यांना रोखून धरले? ∙∙∙
वाढदिवसाला व सभांना होणाऱ्या गर्दीवरून निवडणूक जिंकता येत नाही, असे म्हणत असले तरी गर्दीवरूनच राजकीय नेत्यांची लोकप्रियता सिद्ध होते, हेही तेवढेच खरे. बाबू कवळेकर यांच्या वाढदिवसाला तुफान गर्दी होती. आता हे लोक चिकन-मटण व ब्लॅक ॲण्ड व्हाईटवर ताव मारण्यासाठी आले होते, असेही विरोधक म्हणू शकत नाहीत; कारण बाबूंची बर्थडे पार्टी शिवराक होती. बाबूंच्या बर्थडेला मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी मंत्री, आमदार, प्रदेशाध्यक्ष व विजय सरदेसाई यांच्यासह इतर पक्षांतील नेत्यांनीही उपस्थिती लावून बाबूंना शुभेच्छा दिल्या. मात्र, या गर्दीत केपे मतदारसंघातील मतदार पूर्वीप्रमाणे पाहायला मिळाले नाहीत. विशेषकरून केपे पालिका क्षेत्रातील मतदार बाबूंच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित नव्हते. ज्यांच्या आधारावर एल्टन जिंकले ते बाबूंपासून दूर गेलेले बाबू समर्थक व मूळ भाजपवाल्यांचे दर्शन झाले नाही, हे मात्र खरे. आता पाहूया, ही गर्दी बाबूंना कितपत फायदेशीर ठरते! ∙∙∙
माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी गुरुवारी आपला वाढदिवस साजरा केला. बाबूंचा वाढदिवस तसा सुकाच असतो; कारण त्या दिवशी ते सत्यनारायण महापूजा घालतात. ते जेव्हा सत्तेत होते त्यावेळी त्यांच्या वाढदिवसाला लोकांची गर्दी व्हायची; पण आता बाबू सत्तेत नाहीत. मात्र, तरीही गुरुवारी बाबू यांना शुभेच्छा देण्यासाठी लोकांनी गर्दी केली होतीच. सायंकाळी सुमारे ५ हजार लोक त्यांना शुभेच्छा देऊन गेले, त्याशिवाय संपूर्ण दिवस त्यांच्या घरी लोकांची ये-जा चालू होतीच. असे सांगतात बाबू जेव्हा आमदार होते आणि नंतर उपमुख्यमंत्री झाले, त्यावेळीही त्यांच्या वाढदिवसाला अशी गर्दी कधी झाली नव्हती, ती गुरुवारी झाली होती. आता सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी बाबूंच्या वाढदिवसाला झालेली ही गर्दी काही वेगळे संकेत देणारी तर नव्हती ना?
गोमंतक भंडारी समाज संस्थेच्या बरखास्त समितीच्या तालुका प्रमुखांना समाज दाखले देण्याचे अधिकार प्रशासकांनी दिले आहेत. समाज दाखला देण्यासाठी समाज संस्थेकडून दाखला अनिवार्य नसल्याचा निवाडा आहे. समाज दाखल्यासाठी समाज संस्थेचा दाखला अनिवार्य असल्याचा उल्लेख सरकारी पोर्टलवरूनही हटवण्यात आला आहे. तरीही गोमंतक भंडारी समाजाचे तालुकावार दाखले का व कोणाला दिले जात आहेत, अशी विचारणा दबक्या आवाजात का होईना होऊ लागली आहे. ∙∙∙
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही तमिळ अभिनेता जोसेफ विजय यांना पहिल्या दोन भेटींत राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सरकार स्थापनेस आमंत्रण दिले नाही; कारण टीव्हीके पक्षापाशी बहुमतासाठी आवश्यक ११८ जागांचा आकडा नव्हता. तमिळनाडूतील द्रमुक पक्षाशी असलेली युती तोडून काँग्रेस पक्ष विजय यांच्या मदतीस आला, तरीही अपेक्षित संख्याबळ झाले नाही. तिसऱ्यांदा विजय राज्यपाल आर्लेकर यांना भेटले तेव्हा त्यांच्यापाशी सीपीआय, सीपीआय (एम), व्हीसीके, इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) यांची समर्थनपत्रे होती आणि बहुमताचा आकडा १२० वर गेला. यावेळी राज्यपाल आर्लेकर यांनी विजय यांना मुख्यमंत्री बनण्यास अनुकूलता दर्शविली. राज्यपाल या नात्याने चालढकल केल्याबद्दल आर्लेकर यांच्यावर टीका झाली; पण केंद्र सरकारच्या नजरेतून विचार करता आर्लेकर चाणाक्ष ठरले. कारण, विजय यांना पाठिंबा देण्यावरून प्रतिस्पर्धी द्रमुक पक्षप्रणित आघाडीत फूट पडली. काँग्रेस, डावे कम्युनिस्ट, मुस्लिमांचा पक्ष द्रमुकपासून दूर गेले आहेत. केंद्र सरकारसाठी मुख्य विरोधक असलेल्या ‘इंडिया’ आघाडीसाठीही ही फूट धोक्याचा इशारा आहे. राज्यपाल आर्लेकर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केंद्र सरकाने एकाच गोळीत अनेक पक्षी टिपले आहेत. विजय यांनी अगोदरच द्रमुक आपल्यासाठी ‘राजकीय विरोधक’ असल्याचे स्पष्ट केले आहे. ∙∙∙
बार्देश तालुक्यात रवींद्र भवन म्हणजे जणू एखादे मृगजळ झाले. जेवढे जवळ जावे, तेवढे लांब पळते. गेल्या २५ वर्षांपासून या भवनाच्या गप्पांची नुसती तालीम सुरू आहे; पण प्रत्यक्ष प्रयोग काही रंगमंचावर येईना. या तालुक्यात सात-सात नामवंत आमदार, दोन मंत्री, उपसभापती आणि अनुभवी वकील आमदारांची फौज असतानाही एका वास्तूसाठी जागा मिळत नाही, हे पाहिले की आपल्या नेत्यांच्या इच्छाशक्तीचे कौतुक करावे तितके थोडेच! मध्यंतरी, कुचेलीच्या जागेची पाहणी झाली, मंत्र्यांचे दौरे झाले; पण फाईल काही केल्या पुढे सरकेना. म्हापशाच्या आमदारांनी तर निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भवनाचे गाजर दाखवले होते; पण आता विधानसभेच्या टर्मचा क्लायमॅक्स जवळ आला तरी पायाभरणीचा पत्ता नाही. डिसेंबरमध्ये निवडणुका लागण्याच्या वावड्या उठल्यात, त्यामुळे यंदाही विकासकामांचा नारळ फुटण्याऐवजी कलाकारांच्या स्वप्नांचाच पुन्हा एकदा अपेक्षाभंग होणार, असे चित्र आहे. एकंदरीत, बार्देशच्या या दिग्गज नेतृत्वाला साधी एक जागा शोधता येत नसेल, तर हे भवन उभे राहेपर्यंत पुढची २५ वर्षे कलाकार फक्त ‘तारीख पे तारीखच’ मोजत राहणार! ∙∙∙
‘जीपीएससी’ने रिक्त जागांसाठी अर्ज मागवले आहेत. आदर्श आचारसंहिता लागू होईपर्यंत जागा भराभर भरण्याची प्रक्रिया चालू राहील. परीक्षेत कोकणीचे ज्ञान तपासायला काही प्रश्न असतात. पेपर ऑनलाईन उपलब्ध आहेत. हा प्रश्न बघा. संवादातील एक कोकणी वाक्य दिलेय. ‘जगूंक जाय’ या पथनाट्यातील हे विधान कोणत्या पात्राचे आहे? खाली चार पर्याय आहेत. पात्रांची नावे दिली आहेत. पथनाट्यातील संवाद म्हणजे शोलेतील गब्बर सिंगचे किंवा रायगडाला... नाटकातील संभाजी महाराजांचे गाजलेले संवाद आहेत की काय? पथनाट्यांची पुस्तके आली आहेत काय? विद्यार्थ्यांकडून असली उत्तरे अपेक्षित धरायला? वेगवेगळ्या प्रकारचे काळ किंवा क्रियाविशेषणे, भाषाशास्त्र यावर पराकोटीचे कठीण प्रश्न आहेत. कोकणीचे ज्ञान म्हणजे ही पारखणी? अमुक कथा कुणी लिहिली हे विचारणे नव्हे. कुणालाच सर्व कथा व लेखक आठवणीत नाहीत. परीक्षेला बसणारे नवे उमेदवार धास्तावले आहेत. ∙∙∙
मंजुरी नसल्याने गोवा विद्यापीठाचे ५ वर्षांचे नवे अभ्यासक्रम बारगळले. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून हे पाच वर्षांचे अभ्यासक्रम लागू व्हायचे होते. सरकारची मंजुरी न घेताच हे ५ वर्षांचे मास्टर्स अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा इरादा बारगळला. यासंदर्भातील प्रवेशांसाठी जारी केलेली अधिसूचना मागे घेतली गेली आहे. नवकल्पना आणि नवप्रयोग, कार्यपद्धत सोडून, आपल्या मर्जीप्रमाणे अमलात आणण्याचा प्रयोग केल्यानंतर परिणती काय होते ते विद्यापीठात अनेक प्रयोग ओम फस्स... होऊनही संबंधितांना कळत नाही. साळावलीच्या धरणाच्या पाण्याची पातळी सोडा; परंतु या अशा कृत्यांमुळे विद्यापीठाची पातळी कितपत खाली जाते, त्याची चाड संबंधितांना नाही, असे विद्यार्थी, पालक बोलत आहेत. ∙∙∙
बिठ्ठोण परिसरात नदीकिनारी बांधण्यात आलेली बांधवजा भिंत सध्या चर्चेची ठरली आहे. नदीचे निमखारे पाणी भरतीवेळी नदीच्या पात्राबाहेर पडत असे. त्या भागात आता खारफुटीने चांगला जम बसवला आहे. भविष्यात या कांदळवनांचा त्रास होऊ शकतो, हे लक्षात घेऊन खारफुटींचाच काटा काढण्याचा बेत कोणीतरी आखल्याचे दिसते. या भिंतवजा बांधामुळे नदीचे निमखारे पाणी पात्राबाहेर पडणे बंद होईल आणि खारफुटीचा नैसर्गिक अंत होईल, अशी ही योजना आहे. आता गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे हा विषय पोहोचल्याने ते काय करतील याकडे नजरा लागल्या आहेत. ∙∙∙
ज्यांच्याकडे एकगठ्ठा मतांचे गणित असते त्यांच्यापुढे सत्ता लोटांगण घालते, अशी तक्रार आता सर्वसामान्य गटातील मतदार करायला लागले आहेत. देशात विविध विद्यापीठांत व महाविद्यालयांत भाजप सरकारने ‘यूजीसी’ कायदा आणून सर्वसामान्यांना रस्त्यावर आणले. आता राज्यांत सरकारने एसटी समाजातील विद्यार्थ्यांना बारावी विज्ञान शाखेत ६५ टक्के गुण मिळाले तर जेईई व नीट या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी तीन लाख रुपये शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ओबीसीसाठी रोस्टर पद्धत लागू करण्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. ज्या माणे राज्य सरकारने बिरसा मुंडा शिष्यवृत्ती जाहीर केली आहे, तशीच आता सर्वसामान्य गटातील विद्यार्थ्यांसाठी सरकार छत्रपती शिवाजी महाराज व परशुराम शिष्यवृत्ती सुरू करणार का? असे प्रश्न सर्वसामान्य गटातील विद्यार्थी डॉ. प्रमोद सावंत, दिगंबर कामत, रोहन खंवटे, सुभाष फळदेसाई यांना विचारायला लागले आहेत. ∙∙
सध्या पेडण्यातील मोबाईलवर वाजणाऱ्या एका गीताने सर्वांचे लक्ष वेधून घेणे सुरू केले आहे. ‘आला रे आला, लोकनेता आला, पेडण्याच्या मातीचा वाघ परतला’ अशी सुरवात असणाऱ्या ३० सेकंदांच्या या गीताच्या शेवटी ‘बाबू इज बॅक’ असे ऐकू येते आणि बाबू आजगावकर यांच्याविषयी हे गाणे असल्याचे समजून येते. सध्या उत्साहाने मोबाईलवर हे गाणे लावण्यात येत असल्यावरून बाबू यांची पेडण्यातील लोकप्रियता कायम असल्याचे दिसून येते. या गीताला उत्तर देण्यासाठी आता कोणी नवे गीत सादर करतो की काय, याची उत्सुकता मात्र निश्चितपणे आहे. ∙∙∙
वाचिक अभिनयात उच्चार महत्त्वाचा. त्याच्याकडे जाणता किंवा अजाणता दुर्लक्ष झाले की विचका झाला म्हणून समजायचे. ‘पश्चिम’ म्हणण्याऐवजी ‘पच्चीम’ उच्चार होतो किंवा ‘गेला खुणीकडे’ असे उच्चारणे, हे गंभीरप्रसंगी हास्य पिकवते. एका नाटकात ‘इक्ष्वाकू’ हा शब्द उच्चारायचा होता. त्या पात्राचे ओठ, कंठ, जीभ थरथरत फक्त शेवटचा ‘कू’ ऐकू आला. ‘खरखरीत पणस’ असा शब्दप्रयोग कोकणी नाटकात होता. तो नट ‘खर-खरीत’ असा उच्चार करत होता. एक हिंदी पात्र मराठी नाटकात होते. ‘यही बरकरार रहे’, इतकेच वाक्य होते. त्याने ते ‘बकर, बरकर व बकरी’ असे म्हणून टाकले. नाटक म्हणजे पात्रांनी फक्त संवाद फेकणे व हालचाली करणे नव्हे. शब्दांची फुले, त्यांचा सुगंध, प्रसंगानुरूप भाव-भावना यांचे वहन, आवाजाची कंपने लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत. स्वप्रेमात मश्गुल झालेले नट हे लक्षात कुठे हो घेतात? ∙∙∙
सध्या गोव्यात स्मार्ट वीजमीटर बसवण्याचा धडाका सुरू झाला आहे. काही लोक वेगवेगळी कारणे पुढे करून स्मार्ट मीटरला विरोधही करीत आहेत. जे जुने मीटर आहेत ते वाईट आहेत का? शिवाय स्मार्ट मीटर जास्तीत जास्त चार वर्षे टिकू शकतात, असे सांगण्यात येते. शेकडो कोटी रुपयांचा खर्च कशाला करायचा? गोव्याला वीज क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याऐवजी हे स्मार्ट मीटरचे वजन लोकांच्या डोक्यावर कशाला? असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत. पूर्वीचे ट्रान्सफॉर्मर बदला, भूमीगत वीजवाहिनीचे काम पूर्ण करा, वारंवार वीजपुरवठा बंद होत असतो तो सुरळीत करा, वीज खात्यातील कर्मचाऱ्यांना परिपूर्ण करा. यातील काहीही न करता, साधनसुविधा उपलब्ध न करता स्मार्ट मीटरचा अट्टहास का? हा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत.
गोव्यात कुठलेही सरकार स्थापन होवो, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष त्यात सामील असतोच. आता डिसेंबर २०२६ मध्ये विधानसभा निवडणुका होण्याचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे केवळ सहा ते सात महिने बाकी असताना आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी अनेक संस्था, कार्यकर्ते, नागरिक सरकारवर दबाव आणतात. त्याचप्रमाणे आता ‘मगो’ पक्षातर्फेही दबावतंत्र सुरू झाल्याचे दिसते. वीजमंत्री व महाराष्ट्रवादी गोमतंक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनी भाजप व मगो पक्षाच्या युतीबद्दल वक्तव्य केले आहे. जर युती झाली तर २५ जागा निश्र्चित व झाली नाही तर नेमके काय होईल, हे सांगता येत नाही, असे ते म्हणतात. सरकारवर दबाब आणण्याबरोबरच ते इतर पक्षांसाठीही आपले दरवाजे अप्रत्यक्षपणे उघडे ठेवतात. एका दगडाने दोन पक्षी मारण्यासारखा हा प्रकार दिसतो. सुदिनबाब धूर्त राजकारणी आहेत, हे या वक्तव्यातून दिसते, अशी लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मगो पक्षाला किती जागा मिळणार? त्यांचे किती आमदार निवडून येणार? ‘मगो’सोबत भाजप युती करणार की नाही? हे प्रश्न सध्यातरी अनुत्तरित राहतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.