खरी कुजबुज: बाबू आता काय करतील?

Khari Kujbuj Political Satire: शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळणार, ही चर्चा स्थानिक राजकारणात तरंग उठवणारी ठरत आहे.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

बाबू आता काय करतील?

पेडणे मतदारसंघात पुनरागमनासाठी इच्छुक असलेले माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आता काय करतील, याकडे त्यांच्या समर्थकांचे डोळे लागले आहेत. आमदार प्रवीण आर्लेकर व आजगावकर यांचे शाब्दीक युद्ध सुरु झाले होते. भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी ते मिटवले. आता बाबू शांत झाल्यासारखे वाटत असले, तरी आग धुमसत आहे, असे पेडण्यातील लोकांचे म्हणणे आहे. आपल्याला जनतेची साथ आहे आपण मागच्यावेळी भाजपचे मडगावात पाठवले नसते तर अपक्ष म्हणून विधानसभेत पोचलो असतो यावर बाबू ठाम आहेत. त्यामुळे संघर्ष टाळत बाबू पेडण्यात सक्रीय कसे होतील याकडे त्यांच्या विरोधकांच्याही नजरा लागल्या आहेत.

मडगावात तिघे इच्छुक एकत्र

सध्या आगाखान पार्कमधील शेडच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव वादग्रस्त ठरताना दिसत आहे. परवा काही जणांनी माहिती हक्क कायद्याखाली या प्रस्तावाची माहिती मिळवून त्याचे सादरीकरण केले. त्यावेळी अनेक स्वयंभू नेते उपस्थित होते. मागे या प्रकरणात काहींनी उपोषणाचा प्रयोगही केला होता, त्यामुळे या प्रकरणाला तशी बरीच प्रसिध्दीही मिळाली होती. पण अनेकांत चर्चा चालली ती वेगळीच. या सादरीकरणावेळी मडगावात आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेले तिघे तरुण (चिराग, प्रभव व साव्हियो) उपस्थित होते, तेही एकमेकांना खेटून उभे होते. त्यामुळे उमेदवारीबाबत त्यांच्यांत समझोता झाला, की काय? ही नवी चर्चा आता सुरु झाली आहे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Weather: कडक उन्हात पावसाची एन्ट्री; राज्यात पुढील तीन दिवस 'अवकाळी'चे संकट, 'यलो अलर्ट' जारी

शिवोलीतील रंगत!

शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळणार, ही चर्चा स्थानिक राजकारणात तरंग उठवणारी ठरत आहे. शिवोलीतून माजी मंत्री दयानंद मांद्रेकर हे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. महामंडळाचे अध्यक्षपद देऊन भाजप सरकारने त्यांचा अलीकडे सन्मानही केला आहे. लोबो यांना मंत्रिपद मिळाल्यास मांद्रेकर यांची राजकीय वाट थोडीशी खडतर होऊ शकते. यामुळे शिवोली मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते या साऱ्या घडामोडींकडे डोळे वटारूनच पाहत आहेत.

अन्‌ बाबूशही झाले आक्रमक!

मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्‍सेरात तसे शांत व्‍यक्तिमत्त्‍व. जिथे गरजच असते, तिथेच बोलायचे हा बाबूश यांचा स्‍वभाव. पण, सोमवारी रंगलेल्‍या खट्टर प्रकरणात बाबूश यांनीही स्‍वत:हून उडी घेतली. काही उपद्रवी लोक गोव्‍याची शांतता, जातीय, धार्मिक सलोखा तसेच कायदा–सुव्‍यवस्‍थेला बाधा पोहोचवत असल्‍याचे म्‍हणत, माजी मुख्‍यमंत्री स्‍व. मनोहर पर्रीकर यांनी जशी प्रमोद मुतालिकांवर गोवा प्रवेश बंदी केलेली होती, तशीच बंदी मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी खट्टरवर घालावी, अशी मागणीही त्‍यांनी केली. बाबूश यांच्‍या मागणीवर मुख्‍यमंत्री काय निर्णय घेणार? याकडे जनतेचे लक्ष आहे.

कुंकळ्ळीचा संबंध दोनापावलाशी!

गेल्या आठवड्यात विरोधीपक्ष नेते युरी आलेमांव यांच्या कुंकळ्ळी मतदारसंघात एकाच दिवशी अनेक विकासकामांचा शुभारंभ व उद्‍घाटनही झाले, तेही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, त्यामुळे मुख्यमंत्री युरीबाबांवर फिदा आहेत, ते खरेच असल्याचे युरीसमर्थक म्हणू लागले. वास्तविक या कार्यक्रमांना दोतोरांसमवेत वाळपई व मडगावचे बाबा तसेच अन्य नेते उपस्थित राहणार होते, पण त्यापैकी कोणीच फिरकले नसल्याने त्याबाबत तर्क-वितर्क केले जात आहेत. काहींजण तर म्हणतात, की मागे आरोग्यमंत्र्यांच्या खासगी निवासावर जो मोर्चा काढला गेला. त्यामुळे ते भयंकर दुखावले गेले, त्या मोर्चामागे युरी व काँग्रेसची फूस होती, असे राणे यांच्या मनांत भरविले गेल्याने त्यांनी कुंकळ्ळीला जाण्याचे टाळले. मात्र मडगावचे बाबा तेथे का गेले नाहीत, याची माहिती म्हणे युरीचे समर्थक आता काढत आहेत.

Khari Kujbuj Political Satire
Goa Crime: पगार-जेवणाच्या वादातून साळगाव 'दुहेरी हत्याकांड', पाच महिन्यांनंतर संशयित ओडिशातून जेरबंद

दिल्लीचे काही समजले का?

फोंडा पोटनिवडणूक रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले. पुढे काय झाले कोणालाच समजले नाही. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या सुरवातीच्या १० व नंतरच्या ८ आमदारांविरोधात काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यांची १० आमदारांविरोधातील याचिका कालबाह्य झाल्याने न्यायालयाने रद्द केली. आता पुढील वर्षी निवडणूक असल्याने दुसरी याचिकाही कालबाह्य ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र कोणीही भाटीकर यांच्या याचिकेचे काय झाले? हे बोलत नाही हे विशेष.

वस्तुस्थिती नेमकी काय?

मडगाव नगरपालिकेच्या उद्यानात होऊ घातलेल्या एका प्रकल्पावर सध्या उलटसुलट चर्चा सुरु आहे. वास्तविक नगरपालिकेने त्या बाबतचे सादरीकरण केले आहे, पण त्यावर कोणाचाच विश्वास नाही, हे परवा जे माहितीहक्क कायद्याखाली मिळालेल्या तपशिलाचे सादरीकरण केले गेले, त्यावरून स्पष्ट होते. दुसरीकडे मंत्री दिगंबरबाब यांची एक मुलाखत एका वृत्तवाहिनीने प्रसारित केली आहे, ती सदर प्रकल्पाचे एकंदर स्वरूप स्पष्ट करते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या प्रकल्पामुळे नगरपालिका उद्यानाला नवा साज चढणार आहे. मात्र या एकंदर प्रकारामुळे मडगावकर गोंधळात पडला आहे. खरे काय बाबा म्हणतात, वा सांगतात, ते खरे की विरोधक दावा करतात, ते खरे! असे जो तो प्रत्येकाला विचारताना दिसतो.

अडकणार की सुटणार?

वास्‍कोतील परशुराम जयंती कार्यक्रमात वक्ता म्‍हणून आलेल्‍या गौतम खट्टरने ‘गोंयचो सायब’ म्‍हणून जगप्रसिद्ध असलेल्‍या सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्‍याबाबत केलेल्‍या वादग्रस्‍त वक्तव्‍यांमुळे राज्‍यात रान पेटलेले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्‍थित असलेल्‍या मंत्री माविन गुदिन्‍होंचा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तत्‍काळ राजीनामा घ्‍यावा, अशी मागणी काँग्रेस आमदारांनी लावून धरलेली आहे. दुसऱ्या बाजूला आपण खट्टर याला दोनवेळा रोखण्‍याचा प्रयत्‍न केला. पण, लोकांनी आग्रह केल्‍यामुळे तो बोलत राहिला, असे मंत्री गुदिन्‍होंचे म्‍हणणे आहे. आता काँग्रेसने खट्टरच्‍या भाषणानंतर मंत्री गुदिन्‍होंनी त्‍याचे कसे समर्थन केले, याचाही व्‍हिडिओ व्‍हायरल केलेला आहे. त्‍यामुळे या प्रकरणात गुदिन्‍हो अडकणार की मुख्‍यमंत्री त्‍यांची सुटका करणार? याकडे संपूर्ण गोव्‍याचे लक्ष लागले असून राज्यात या विषयाचीच चर्चा सुरू आहे.

फोंड्यात राजेश की केतन?

आगामी विधानसभा निवडणुकीत फोंडा मतदारसंघात राजेश की केतन अशी स्थिती निर्माण होणार हे नक्की आहे. मागच्या काळात फोंडा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाची उमेदवारी मगो पक्षाचे फोंड्यातील नेते केतन भाटीकर यांना देण्यात आली होती. त्यावेळेला काँग्रेसचे राजेश वेरेकर यांनी होकार दिला होता, मात्र आता पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर राजेश वेरेकर यांनी आपण येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे जाहीर करून एकप्रकारे बाँबच टाकला आहे. तसे पाहिले तर रवी पात्रांव काँग्रेस सोडून भाजपवासी झाल्यानंतर राजेश वेरेकर यांनी काँग्रेस पक्षाचे तारू फोंड्यात मार्गावर आणले, त्यामुळे एका अर्थाने त्यांचा दावा योग्य आहे, दुसऱ्या बाजूला केतन भाटीकर यांच्याकडे मतांचा गठ्ठा आहे, त्यामुळे राजेश की केतन अशी द्विधा अवस्था काँग्रेसच्या नेत्यांची नक्कीच होणार आहे.

मडगाव-फातोर्डातील कलगीतुरा

झुंजीसाठी जेव्हा कोंबड्यांना मैदानात उतरवले जाते, तेव्हा ते कोंबडे एकमेकावर सरळ हल्ला न करता सुरवातीला गोल गोल फिरून एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घेतात. याच कृतीला ‘कलगीतुरा’ असे म्हटले जाते. सध्या मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केलेली वक्तव्ये ऐकल्यास त्या दोघांमध्येही असाच कलगीतुरा चालू तर नाही ना? असे कुणाला वाटल्यास नवल नाही. यापूर्वी नगरपालिका निवडणुकीच्या बाबतीत बोलताना सरदेसाई यांनी आपण आता मडगावात घुसणार असे जाहीर केले होते. दोन दिवसांपूर्वी एका वृत्त चॅनलला मुलाखत देताना पक्षाने आदेश दिल्यास आपण फातोर्ड्यातही लक्ष घालेन असे कामत यांनी म्हटले. खरेच हे दोघे दुसऱ्या मतदारसंघात लक्ष घालणार की उगीच एकमेकाची ताकद आजमावून झाल्यावर आपली तलवार म्यान करणार? काय होणार बुवा, पालिका निवडणुकीत.

क्रिकेट स्पर्धा, की रोजगार मेळावा!

सध्या विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सगळीकडे राजकारणी क्रिकेट स्पर्धा आयोजित करत असून सावर्डेचे आमदार गणेश गावकर हेही त्यात मागे नाहीत. आमदार गावकर यांनी सावर्डे मतदारसंघापुरती आमदार चषक स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूना फॉर्म भरण्यास सांगितले आहे. या फॉर्म्सवर क्रिकेट संदर्भात माहिती देण्यास सांगितले, तर आहेच. त्याशिवाय त्या खेळाडूचे शिक्षण किती झाले आणि त्याचा रोजगार काय याचीही माहिती मागितली आहे. आता क्रिकेट स्पर्धा आणि शिक्षण तसेच क्रिकेट आणि रोजगार यांचा एकमेकांशी काय संबंध, ते कळायला मार्ग नाही. गणेश भाऊ क्रिकेट स्पर्धा आयोजित करतात, की त्या स्पर्धेला जोडून एक रोजगार मेळावाही घेण्याचा त्यांचा विचार तर नसावा ना! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com