

मंत्रिमंडळातील ‘कचरा’
रस्त्यांवर व सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले अनेक ठिकाणी दिसते. गोव्याच्या मंत्रिमंडळातही म्हणे ‘कचरा’ आहे आणि त्यामुळेच सरकारला कित्येकदा नमते घ्यावे लागते. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी माविन गुदिन्हो यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे जाहीर कार्यक्रमात केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात त्याबाबत उल्लेख केला नाही. त्यानंतर लगेच विजयबाब उभे राहिले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे भाषण चांगले झाले, मात्र त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील कचरा काढण्याबद्दल ब्रसुद्धा काढला नाही किंवा आश्वासन दिले नाही. आता मंत्रिमंडळात ‘कचरा’ किती आहे, हे त्यांनाच माहीत!
मुख्यमंत्री भक्त रोहन!
राजकारणात यशस्वी होण्यासाठी गॉडफादरची मदत लागतेच. राजकीय वरदहस्त लाभल्याशिवाय राजकारणात यशस्वी होणे कठीण. मुख्यमंत्र्यांच्या सावलीत राहून अनेक युवा राजकारणी यशस्वी होण्याच्या प्रयत्नात आहेत. कुडचडे मतदारसंघात विद्यमान आमदार नीलेश काब्राल यांच्याकडून भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी रोहन कठोर मेहनत घेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी कुडचडेकरांचे संदेश व शुभेच्छा गोळा करून मुख्यमंत्र्यांकडे पोहचविण्याचे कॅटेलिस्ट म्हणून योगदान दिले. बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या मोहिमेचे कुडचडेत ते ब्रँड ॲम्बेसेडर बनले आहेत. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्यालाच जनता स्वीकारते हे रोहनबरोबर नीलेश काब्राल यांनाही माहीत आहे.आता पाहुया, कमळाचा मफलर कोणाच्या गळ्यात पडतो व कोण यशस्वी होतो ते. ∙∙∙
अशा वाचाळवीरांना बोलावताच कशाला?
कोण कुठला गौतम खट्टर गोव्यात येतो आणि आपल्या अकलेचे तारे तोडून जातो. विशेष म्हणजे त्यामुळे तो देशभर प्रसिद्ध होतो. नाव दोन प्रकारे कमावता येते. चांगले काम करून वा अशा प्रकारे चिखलफेक करून. पण मुख्य मुद्दा हा आहे की अशा लोकांना कार्यक्रमासाठी बोलावताच कशाला? आता आयोजक म्हणतात, आपला या प्रकाराशी काही संबंध नाही. पण अशी सारवासारव करून विषय मिटणार आहे का? यास्तव भविष्यात अशा वाचाळवीरांना कार्यक्रमांसाठी न बोलावलेलेच बरे.
आव्हान महिला आरक्षणाचे
महिला आरक्षण विधेयकावरून सध्या रण माजले आहे. प्रमुख पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. पण मजेची बाब म्हणजे कोणीच आगामी निवडणुकीत आपण महिलांना 33 टक्के उमेदवारी देणार असल्याचे सांगत नाहीयत. खरे म्हणजे प्रत्येक पक्षाने महिलांना उमेदवारी दिली तरी हा गुंता सुटण्यासारखा आहे. एकेकाळी गोव्यात एका महिलेने मुख्यमंत्रिपद भूषविलेले आहे. मग आत्ताच महिलांना उमेदवारी देण्यास हात का आखडता घेतला जातोय? या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आपला मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाला तर चालेल असे जे म्हटले आहे ते उल्लेखनीयच होय.
खट्टर नेमका आहे कुठे?
सध्या गोमंतकीयांना एकच प्रश्न पडलाय व तो म्हणजे ‘गौतम खट्टर नेमका आहे तरी कुठे?’. काही जण म्हणतात, तो येणार आहे, तर काहींचे ठाम मत तो सापडतच नाही! आता एवढ्या चर्चा रंगल्या की, खट्टरपेक्षा त्याच्या गायब होण्याची कथाच मोठी. गमतीची बाब म्हणजे, काहींनी तर थेट कथानकच तयार केलंय... त्याला कुणीतरी लपवलंय! आंदोलनकर्त्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केलीय. लपवाछपवी नको, थेट गोव्यात आणा. आता उत्सुकता याचीच की तो गोव्यात आला की काय बोलेल?. कारण सध्या तरी तो न येताच इतकी चर्चा रंगलीय, मग तो प्रत्यक्ष आला तर किती ‘एपिसोड’ वाढतील?. खट्टर सापडतोय का, की शोधणारेच हरवलेत? या प्रश्नाचे उत्तर कधी मिळेल याची वाट बघण्यापलीकडे जनतेच्या हातात काहीच नाही.
कामतांची पोटतिडक
सोनसोडा कचरा डेपोच्या ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मडगावचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांचे भाषण पोटतिडकीने झाले. रस्त्याच्या बाजूला टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याविषयी त्यांनी उपस्थितांना उपदेश दिला. शिवाय रस्त्याच्या बाजूला कचरा टाकणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असेही सुनावले. यावेळी त्यांनी ‘मार्ग''चे गुरुनाथ केळेकर यांचे उदाहरण दिले. कामत मुख्यमंत्री राहिले असल्याने ते कोणत्याही विषयावर बोलू शकतात. मडगाव पालिकेसमोरील कचऱ्याची समस्या त्यांना जवळून माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी काही मिनिटांचे केलेले भाषण प्रभावी वाटू लागले. यापुढे कधी एखाद्या पंचायतीने किंवा पालिकेने कचरा प्रक्रिया प्रकल्प अथवा एमआरएफ सेवेच्या उद्घाटनाला कामतांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले तर नवल वाटायला नको.
लुईझिनची निवृत्ती
गाेव्याचे माजी मुख्यमंत्री आणि कित्येक वर्षे गोवा सरकारमध्ये मंत्री असलेले लुईझिन फालेरो हे सध्या सामाजिक क्षेत्रापासून काहीसे लांब राहणे पसंत करतात. सार्वजनिक कार्यक्रमात ते आता अभावानेच उपस्थिती लावतात. मात्र बुधवारी बाबू नायक यांचे नातू प्रभव नायक यांच्या वाढदिवसाला ते आवर्जून उपस्थित होते. लुईझिन यांची राजकारणात एंट्री बाबू नायक यांच्यामुळेच झाली आणि याचा लुईझिन वारंवार उल्लेखही करतात. प्रभवच्या वाढदिनीही लुईझिन यांनी बाबू नायकांची आठवण काढली. त्यावेळी त्यांना काही पत्रकारांनी आणखी एक राजकीय इनिंग खेळण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का असे विचारले असता, मी पाहिजे तर आणखी दोन इनिंग्स खेळू शकतो. मात्र यापुढे खेळायचे नाही असे मी ठरविले आहे असे म्हणत विधानसभा निवडणुकीत आपल्याला इंटरेस्ट नाही असे त्यांनी सांगितले. आता त्यांनी हे वक्तव्य अगदी मनापासून केले की ते फक्त वरवरचे बोल होते, हे लवकरच कळेल म्हणा.
खट्टरनंतर आता बाबिट!
गौतम खट्टरने गोव्यात येऊन ख्रिस्ती बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्यामुळे गोंधळ निर्माण झालाय. ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’ असे म्हटले जाते. तरीसुद्धा जनभावनेची कदर व्हायलाच हवी. आता खट्टरने ख्रिस्ती धर्मभावना दुखावल्या म्हणून, त्या धर्माच्या लोकांनी हिंदू धर्मभावना दुखावणे योग्य आहे का?. बाबिट फर्नांडिस नावाच्या एका महाभागाने सोशल मीडियावर हिंदूचे आराध्य दैवत श्रीराम व माता सीता यांच्याबाबत जे लिहिले आहे, ते वाचल्यावर कोणाच्याही तळपायाची आग मस्तकाला पोहोचेल. खट्टरला शिक्षा झालीच पाहिजे, पण माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर व राधाराव ग्रासियस यांचा फेसबुक फ्रेंड असलेल्या बाबिट यांच्यासारख्यांचे काय? त्यांना सजा व्हायला नको का? ∙
कुंकळ्ळीत युरीला पर्याय कोणता?
‘जो जिता वही सिकंदर’ असे म्हटले जाते. राजकारणात जो यशस्वी होतो, त्यालाच जनता मानते. आता काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे. कुंकळळी मतदारसंघात विद्यमान आमदार युरी आलेमाव यांना पर्याय आहे का, यावर जनतेत चर्चा सुरू झाली आहे. युरी यांना पर्याय कोण?, त्यांना टक्कर देण्याच्या ऐपतीचा उमेदवार भाजपकडे आहे का?, भाजपचे माजी आमदार क्लाफास डायस पुन्हा निवडणूक लढविणार का?, भाजपचे सुदेश भिसे, विशाल देसाई, संतोष फळदेसाई यांच्याकडे युरी यांना आव्हान देण्याची ताकत आहे का?, भाजप या मतदारसंघात युरीविरोधात इतरांच्या मदतीने स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा विचार करत आहे का?, सध्या काँग्रेस पक्षात असलेले एल्विस कॉन्सेन्सेस उमेदवार ठरू शकणार का?, माजी पोलिस अधीक्षक सॅमी तवारीस यांना युरींच्या विरोधात उभे केले जाणार का?, जॉर्सन, सॅमी व एल्विस भाजपच्या मदतीने युरीची गेम बिघडविण्यात यशस्वी ठरणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे लोक शोधत आहेत व राजकारणी गणित मांडत आहेत.
माविनच्या मागे खट्टर?
‘भित्याच्या मागे ब्रह्मराक्षस’ अशी मराठीत एक म्हण आहे. सध्या गोव्यात गाजत असलेल्या गौतम खट्टर प्रकरणानंतर ‘माविनच्या मागे खट्टर’ अशी नवी म्हण तयार होऊ लागली आहे. कारण, सध्या गौतम खट्टरपेक्षा गोव्यातील एनजीओ आणि राजकारणी कुणाच्या मागे लागले असतील तर ते माविनच्या. चर्चिल आलेमाव यांनी एका फेसबुक वाहिनीला मुलाखत देताना, ‘माविन हे घातकी ख्रिश्चन’ अशी त्यांची संभावना केली आहे. तर, विजय सरदेसाई यांनी त्यांना ‘राजकीय कचऱ्याची’ उपमा देताना अजूनही त्यांना मंत्रिमंडळातून काढून का टाकत नाहीत, असा प्रश्न केला. विशेष म्हणजे त्या कार्यक्रमाला दाजी आणि संकल्प हे दोघेही आमदार होते. असे असताना एकट्या माविनवरच हे बालंट का बरे?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.