Dayanand Samajik Suraksha Yojana Limit
पणजी: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या समाजकल्याण खात्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेसाठी (डीएसएसएस) लाभार्थींची संख्या १ लाख ४० हजार अशी मर्यादित ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सध्या १ लाख ३८ हजार लाभार्थी असून, त्यांचे खात्याच्या वतीने सर्वेक्षण सुरू आहे.
मात्र, अशाप्रकारे लाभार्थींची संख्या मर्यादित ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाविषयी सध्या उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
समाजकल्याण खात्याच्या वतीने दयानंद सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येते. त्यात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विधवा महिलांना मदतनिधी दिला जातो. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या या योजनेंतर्गत महिन्याकाठी २ हजार रुपये दिले जातात. यातील लाभार्थींसाठी सुरुवातीला राज्य सरकारने वार्षिक उत्पन्नाची मर्यादा २५ हजार रुपये ठेवली होती; परंतु आता ती वाढवून दीड लाख रुपये करण्यात आली आहे.
खात्याच्या वतीने २० डिसेंबरपर्यंत सर्वेक्षण होणार होते; परंतु आता ती मुदत वाढविण्यात आली आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर मूळ लाभार्थी किती आहेत, ते खरोखर लाभार्थींच्या अटीमध्ये बसतात काय, हे स्पष्ट होणार आहे. त्याशिवाय अनेक ज्येष्ठ नागरिकांचे पत्ते सापडत नाहीत. त्यांनी दिलेले संपर्क क्रमांकही अस्तित्वात नाहीत.
खात्याच्या अधिकाऱ्यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले की, १ लाख ४० हजारांपर्यंत जी मर्यादा ठेवली आहे, त्याबाबत काही संशय निर्माण होऊ शकतो; परंतु सध्याची संख्या ही १ लाख ३८ हजार आहे. लाभार्थींची संख्या दरवर्षी कमी होत जाते, तर जे वयाच्या अटीत येतात ते नवे अर्जदार तयार होतात. ज्या पद्धतीने गृहआधार योजनेलाही लाभार्थींची मर्यादा घालून ठेवली आहे, तशीच मर्यादाही ‘डीएसएसएस’ला लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारचा हा खर्चावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते.
राज्य सरकारातील मंत्री खासगी जेट विमानात ‘मस्त’ आणि राज्यातील गरजवंत जनता सरकारी धोरणांनी ‘त्रस्त’ अशी खोचक प्रतिक्रिया काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.