खरी कुजबूज Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबूज: विजेच्या धक्क्यापेक्षाही धास्ती राजकीय धक्क्याची

Khari Kujbuj Political Satire: वीज खात्याच्या अधिकाऱ्यांना आता विजेच्या धक्क्यापेक्षा ‘राजकीय धक्क्या’चीच जास्त भीती वाटू लागली की काय?

दैनिक गोमन्तक डिजिटल

विजेच्या धक्क्यापेक्षाही धास्ती राजकीय धक्क्याची

वीज खात्याच्या अधिकाऱ्यांना आता विजेच्या धक्क्यापेक्षा ‘राजकीय धक्क्या’चीच जास्त भीती वाटू लागली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्मचारी निलंबित झाल्यानंतर कार्यालयात घुसून दबाव टाकल्याचा आरोप होताच अधिकाऱ्यांना थेट पोलिस संरक्षण मागण्याची वेळ आली. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेलाच आपल्या कार्यालयात सुरक्षित वाटत नसेल, तर सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची? कार्यालये प्रशासन चालवते की राजकीय दडपशाही, हा प्रश्न आता जनतेलाच पडू लागला आहे.

शाश्वत अरण्यरूदन पुरस्कारांचे

पुरस्कार निवडीसाठीच्या परीक्षकांची नावे विजेत्यांच्या नावांसहीत पत्रकार परिषदेत जाहीर व्हायची. ही प्रथा आहे. साहित्य अकादमीचीही ती प्रथा आहे. साहित्य अकादमी त्याच दिवशी ती ऑनलाईन ठेवते. ती नावे सन्मान देताना मिळतील, असे प्रवक्ता असल्यासारखे निवेदन बिगरअकादमी लोकांनी करण्याची गरज नसते. ‘बूंद से गई तो हौद से नहीं आती.’ सत्य कटू असते व अपरिपक्वांना टीका सहन होत नाही. निरोगी टीकेमुळे सुधार होतो. इच्छा असल्यास. भ्रष्टाचार, वैचारिक दिवाळखोरी, चारित्र्यशून्यता, उथळ साहित्य, हल्ली चालू असलेली नाटकातील उघड शब्दश: चोरी व त्याअनुषंगाने चाललेली नामुष्की, नाचक्की यामुळे खरे नुकसान होते. न भरून येण्यासारखे. त्या जखमा भरून येण्यासाठी काही औषध केले नाही व ससेहोलपट झाली. ‘अब पछतावा क्या करें, जब चिडिया चुग गई खेत’, ही सशक्त हिंदी म्हण समजली तर सार्थक झाले.

पाटकरांचा गृहप्रवेश!

मागच्या विधानसभा निवडणुकीत अमित पाटकर यांनी कुडचडे मतदारसंघातून निवडणूक लढवताना कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांना अक्षरशः घाम आणला होता. काही अवघ्याच मतांच्या आघाडीने त्यावेळी काब्राल जिंकून आले होते; पण त्यानंतर अमित यांनी कुडचडेकडे तसे दुर्लक्षच केले; कारण पाटकर पणजीला राहत होते. मात्र, आता त्यांनी कुडचडे येथे आपल्या जुन्या घराची दुरुस्ती करून नवीन घर बांधले असून काही दिवसांपूर्वी त्यांनी फार मोठा गाजावाजा न करता या घरात ‘प्रवेश’ही केला. हा गृहप्रवेश एवढ्या साधेपणाने केला की कुडचडेच्या लोकांनाही फारशी याची भनक लागू शकली नाही. विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे पाटकर पुन्हा एकदा कुडचडेत सक्रिय होऊ पाहत आहेत का?

दामोदर हायर सेकंडरीची डोनेशन्स!

मठग्रामस्थ हिंदू सभेतर्फे मडगाव येथे चालविल्या जाणाऱ्या दामोदर हायर सेकंडरीचा कारभार योग्यरीत्या चालत नसल्याचा ठपका ठेवून या शाळेवर सरकारी प्रशासक नेमला. मात्र, या प्रशासकांचे प्रशासनही ढेपाळले आहे की काय? असा प्रश्‍न आता या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पडला आहे. याचे कारण म्हणजे, या शाळेच्या पालक-शिक्षक समितीला पुढे काढून आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाने शाळेला ६ हजार रुपयांचे डोनेशन द्यावे, असा फतवा काढला आहे. अर्थात हा फतवा काढताना प्रशासकांनी आपले अंग न दाखवता पालक-शिक्षक संघाला ढाल म्हणून पुढे केले आहे. शिक्षण खात्याचा सरकारी प्रशासक असलेल्या या शाळेत विद्यार्थ्यांच्या पालकांकडून देणग्या घेणे हे कुठल्या नियमात बसते बरे? आता काही पालक म्हणूही लागले आहेत की, या नवीन प्रशासकाच्या कारभारापेक्षा जुन्या शाळा व्यवस्थापनाचा कारभार कित्येक पटींनी चांगला होता. यावर शिक्षण खाते काही खुलासा करणार का?

निवडणूकपूर्व प्रेम

मडगावला काहीही घडू शकते. अकस्मात काही गुरुवर्यांच्या घरी एका उमेदवाराचे समर्थक दाखल झाले. हार, श्रीफळ, फळांची मोठी टोपली, पेटी. हे शिक्षक भांबावूनच गेले. इतका आदर, सन्मान शाळेत, समाजात कधीच नाही मिळाला. लागलीच फोटो व्हायरल झाले. तथापि याच गावात बालकलाकारांसाठी आमदाराने पंधरा दिवसांचे घुमट आरती प्रशिक्षण आयोजित केले. बालकलाकार चमू तयार झाला. हे प्रेम पाहून पालक स्तंभित झाले. कुठे कुठे, काय काय वाटप चालू आहे, बी-बियाण्यांपासून इतर वस्तूंपर्यंत. विधानसभा निवडणूक घोषित होईपर्यंत हे निस्सीम प्रेम असेच राहणार. पुढील वर्षीही गुरुपौर्णिमा सत्कार होणार का? घुमट वादन प्रशिक्षण होणार का? अशी चर्चा सुरू आहे. पुढील सहा महिन्यांचा काळ सामान्यांसाठी सुबत्तेचा असेल, असे भविष्य वर्तवायला ज्योतिषाची गरज नाही.

नाटकचौर्य उकिरड्याची स्वच्छता

‘गणंग’ नावाचा एक मराठी शब्द आहे. मराठी नाटकांची नक्कल करून जशास तशी ठोकायची जी सवय या गणंगाना झाली होती, ती आता मोडीत काढण्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे, अशी कोकणीवाद्यांमधे चर्चा आहे. चौर्याची तीच खोड स्पर्धात्मक रंगमंचावर पोहोचते. म्हणून मुळांना उच्चाटन करून कोकणी हिताचे हे प्रयत्न मजबूत होत आहेत. हा एक कलमी कार्यक्रम कोकणी नाटकाला लागलेली साहित्यचौर्याची रोगट कीड समूळ नायनाट करण्यासाठी योजिली आहे, अशी माहिती मिळाली. पोलखोल होईल म्हणून काहींनी घाबरून दक्षता घेतली आहे. हा भंडाफोड, लढा काही विद्यावान निस्वार्थ स्कॉलरनी चालवला असल्याने लवकरच कॉपी-कोकणी नाटकांची सविस्तर यादी मूळ कृतींच्या माहितीसहीत घोषित होणार असल्याचीही चर्चा आहे. दंभाची स्वच्छता बरीच. चौर्यमार्गाने केला दुडू, आता मागे लागलाय उच्चप्रतीचा झाडू.

अकादमीवर तीव्र टीकास्त्र

कोकणी अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार गेल्या वर्षी नाकारून एका ज्येष्ठ साहित्यिकाने भला मोठा लेखही लिहिला होता. फक्त पत्रकार परिषद बाकी होती. यंदा त्याने निबंधासाठी पुरस्कार घेतला. गेल्या वर्षीच्या स्टंटबाजीचे कारण समजत नाही. हे पुरस्कार म्हणजे अनागोंदी कारभार व ढिसाळ बजबजपुरी, अशी टीका होत आहे. परीक्षकांची नावे जाहीर न करण्याचे कारण म्हणजे आपल्याला हवे ते परीक्षक अध्यक्षांनी ठेवले. आपल्या खासगी संस्थेच्या बिनसाहित्यिक अध्यक्षाला एक परीक्षक म्हणून नेमले. अकादमीच्या कार्यकारिणीच्या सदस्यांना परीक्षक नेमून निकाल, विजेते हवे तसे फिरवले. इथे गुणवत्तेला वाव नाही. मदतनीस चालक सदस्यांनी कॉकपीटमधे जाऊन विमान चालवावे तसे सदस्यच परीक्षक बनतात. निस्वार्थीपणे कोकणीची सेवा करणारे खूप लोक आहेत. बंगळुरूत एस.एम. कृष्ण राव आहेत, ज्यांनी शेकडो पुस्तके कन्नडमध्ये अनुवादीत केली आहेत. गोव्यातही आहेत हयातभर सेवा करणारे. अध्यक्षांना माहीत आहे काय ही दादागिरी?

वेरेकरांचा दळवींना टोला!

फोंड्यात सध्या पाणीबाणी उद्भवू लागली आहे. बहुतांश भागात पाण्याची समस्या भेडसावू लागल्याने नागरिकच पाणीपुरवठा खात्याच्या कार्यालयावर मोर्चा आणू लागले आहेत. दुर्गाभाट तळे भागातील नागरिकांनी अनियमित पाणीपुरवठ्याची समस्या घेऊन संबंधित अधिकाऱ्याला घेराव घातला. मात्र, यावेळी या लोकांसमवेत स्थानिक भाजपचे नेते तथा नगरसेवक विश्‍वनाथ ऊर्फ अपूर्व दळवी उपस्थित होते. नेमके याच गोष्टीकडे लक्ष वेधताना फोंड्यातील काँग्रेसचे नेते राजेश वेरेकर यांनी तोफ डागली आहे. भाजपचे सरकार गेली पंधरा वर्षे सत्तेत आहे आणि लोकांना चोविस तास पाणीपुरवठ्याच्या भाजप सरकार मारत आहे; पण इथे मात्र भाजपचा एक पदाधिकारी पाण्यासाठी आंदोलन करतो आहे, हे कशाचे लक्षण आहे, असे वेरेकर यांनी विचारून दळवी यांनी भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे मान्य करून राजीनामा द्यावा. आम्ही काँग्रेसवाले अपूर्व दळवींना आंदोलनासाठी पाठिंबा देऊ, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आता बोला..!

चर्चा ‘त्या’ पोलिस अधीक्षकाची

अलीकडे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची वेगळीच चर्चा रंगली आहे. फोन केला तर उचलला जात नाही, मेसेज केला तर उत्तर नाही आणि मिस्ड कॉल पाहून परत फोन करण्याचीही तसदी घेतली जात नाही, अशी पत्रकारांमध्ये चर्चा सुरू आहे. पत्रकार हे वैयक्तिक गप्पा मारण्यासाठी नव्हे, तर नागरिकांपर्यंत अचूक आणि अधिकृत माहिती पोहोचवण्यासाठी संपर्क साधत असतात. मग अधिकृत क्रमांक फक्त शोभेपुरता आहे की संवादासाठी, असा प्रश्न उपस्थित होतो. जर माहिती देणाऱ्यांशीच संवाद होत नसेल, तर सामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींचे काय? की आता अधिकृत क्रमांकावरही ‘सायलेंट मोड’च कायमस्वरूपी सुरू आहे, अशी चर्चा रंगू लागली आहे.

राजकीय वरदहस्तामुळे

वीज खात्याने धडाकेबाज कारवाई केल्याचे चित्र निलंबन सत्रातून उभे केले. असे असले तरी डिचोली कार्यक्षेत्रात अपघात होऊनही तेथील साहेबाला साधी नोटीसही जारी करण्याचे धाडस खात्याचे धुरीण दाखवू शकलेले नाहीत. राजकीय वरदहस्तामुळे एकदा वर्षाची व त्यानंतर सहा महिन्यांची सेवा मुदतवाढ पदरात पाडून घेतलेला तो साहेब कोणालाच घाबरत नाही. आताही कारवाईवेळी त्याला कारणे दाखवा नोटीस दाखवण्याचे धाडस वीज खाते चालवणाऱ्यांना झालेले नाही. यामागे ‘त्या’ साहेबावर आपल्या आशीर्वादाचे छत्र धरणाऱ्या मोठ्या राजकीय

वाढदिवसाच्या तोंडावर चर्चा घोटाळ्याची!

औद्योगिक विकास खात्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांचा उद्या २ ऑगस्ट रोजी वाढदिवस. या वाढदिवसाच्या अगोदर आता औद्योगिक विकास महामंडळातील घोटाळा एका स्थानिक यूट्यूब वाहिनीने समोर आणला आहे. औद्योगिक वसाहतीतील रस्त्यातील खड्डे भरण्यापासून ते महामंडळाचा लोगो व संकेतस्थळ तयार करण्यावर लाखो रुपयांची उधळण कशी गेली गेली आहे, हे लोकांसमोर त्यांनी आणले आहे. महामंडळातील हा सर्व गौडबंगाल कोणाच्या मर्जीने सुरू आहे किंवा कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, यामागे खात्याचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे चॅनलचे म्हणणे आहे. या महामंडळाला चेअरमन आहे, त्याशिवाय या खात्याचे मंत्री गुदिन्हो फार ॲक्टिव्ह आणि मंत्रिमंडळातील वजनदार मानले जातात. त्यामुळे वाढदिवसाच्या तोंडावर हा घोटाळा पुढे आल्याने त्याची चर्चा होणारच; पण दोन दिवस सुट्टी असल्याने लोक हा विषय किती गंभीरपणे घेतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

चर्चा थिवी मतदारसंघाची..

विधानसभा निवडणुकीला अजून थोडा वेळ असला, तरी बार्देशात राजकीय पटावरचे डावपेच आधीच सुरू झाले आहेत. सध्या कोणी मतदारांची मनधरणी करण्यात व्यस्त, तर कोणी विरोधातल्यांची मनधरणी करण्यामध्ये! ही गोष्ट आहे, थिवी मतदारसंघाची. थिवीत काँग्रेसकडे तसा खास चेहरा नाही; पण राजकीय चर्चा अशी आहे की, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष ॲड. शशांक नार्वेकर थिवीचे उमेदवार होऊ शकतात. विशेष म्हणजे, त्यांना ही उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसचे एक माजी मंत्री प्रयत्न करत आहेत आणि या माजी मंत्र्यांनी मतदारसंघात कामाला सुरवात केल्याची माहिती आहे. असे असले तरीही, काल-परवापर्यंत ॲड. नार्वेकर हे म्हापशातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केले जात होते आणि आता त्यांना थिवीच्या रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. किंबहुना त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता नार्वेकर नक्की थिवीतून लढतात की म्हापशातून, हे तर वेळच आली की कळेलच; पण कुणाची राजकीय मनीषा आणि कुणाची आमदार बनण्याची इच्छा कुणाला कुठे नेऊन पोहोचवते, हा खेळ मात्र मतदारांसाठी खूपच रंजक ठरणार आहे!

कारवाईचे सातत्य कधी!

राजधानी पणजीतील दुकानांवर छापे टाकण्याचे ‘एफडीए’चे हे धाडस कौतुकास्पदच; पण हा स्वच्छतेचा साक्षात्कार फक्त अधूनमधून छापे टाकतानाच का होतो? उरलेल्या दिवसांत हीच हॉटेल्स आणि फास्ट फूड केंद्रे कोणाच्या आशीर्वादाने सुरू राहतात, हा खरा प्रश्न आहे. छापे, फोटो, प्रसिद्धीपत्रके आणि इशारे यापलीकडे जाऊन परवाने रद्द करणे, दंड वसूल करणे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली तरच ग्राहकांचा विश्वास वाढेल. अन्यथा ‘आज छापा, उद्या पुन्हा जुनीच वाट’ अशी परिस्थिती कायम राहील आणि स्वच्छतेपेक्षा दिखाऊ कारवाईच जास्त शिजत राहील.

काळजीचे ढग

राज्यात यंदा पावसाचा तुटवडा जाणवत असला तरी दक्षिण गोव्यातील काही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. मात्र, उत्तर गोव्यातील प्रमुख धरण असलेले अंजुणे धरण अजून अर्धे भरायचे बाकी आहे. जोपर्यंत हे धरण भरत नाही, तोपर्यंत तरी राज्याचा पाण्याचा प्रश्‍न मिटला, असे म्हणता येत नाही. साळावली धरण भरल्याने राज्याची पाण्याची चिंता मिटली, असे समजत काहीजण अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत. काहींनी तर ‘भिवपाची गरज ना’, असे स्टेटसही ठेवले आहेत; परंतु जर योग्य प्रमाणात काळे ढग बरसले नाही, तर मात्र काळजीचे ढग अधिक दाटू शकतात, याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे.

बाबूश ठरवतील तोच उमेदवार!

दोन-तीन दिवसांपूर्वी सांताक्रूझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांचा वाढदिवस झाला. यावेळी काही कामांच्या कोनशिला बसविल्या आणि काही कामांचा शुभारंभ केला. सांताक्रूझमधून रुडाॅल्फ काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले आणि काही दिवसांनी भाजपमध्ये जो आमदारांचा गट गेला, त्याचे ते एक वाहक ठरले. सांताक्रूझचा विकास करण्यासाठी आपण भाजपमध्ये गेल्याचे भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले होते. आता काही महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत, त्यांना भाजप उमेदवारी देणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था निर्माण केली की ती झाली, याचे उत्तर त्यांनाच शोधावे लागेल; परंतु महसूलमंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पुन्हा सांताक्रूझमध्ये लक्ष घातले आहे आणि त्यांनी पक्षाचे कार्यालय सुरू करण्यासाठी पावलेही उचलली आहेत. त्याचबरोबर त्यांनी भाजपचा उमेदवार प्रथमच सांताक्रूझमध्ये निवडून येणार, अशीही मल्लिनाथी केली आहे. त्यामुळे सांताक्रूझमधील भाजपचा उमेदवार बाबूशच ठरवणार, हे स्पष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT