खरी कुजबुज: गोव्यात बीच बघायचे की ब्रेकिंग न्यूज?

Khari Kujbuj Political Satire: गोवा एकेकाळी समुद्रकिनारे, फेणी आणि पर्यटनासाठी ओळखला जायचा. आता मात्र गोवा नेमका कशासाठी चर्चेत आहे, हेच अनेकांना कळेनासे झाले आहे.
Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबुजDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात बीच बघायचे की ब्रेकिंग न्यूज?

गोवा एकेकाळी समुद्रकिनारे, फेणी आणि पर्यटनासाठी ओळखला जायचा. आता मात्र गोवा नेमका कशासाठी चर्चेत आहे, हेच अनेकांना कळेनासे झाले आहे. कुणी इथे येऊन व्यवहार ठरवतो, कुणी गुप्त बैठका घेतो, कुणी आपले हिशेब चुकते करतो, तर कुणी एखादे गूढ मागे ठेवून निघून जातो. आणि शेवटी चर्चा होते ती गोव्याचीच! आता एका दुसऱ्या राज्यातील मंत्र्यांच्या माजी चालकाच्या संशयास्पद मृत्यूची चर्चा रंगली आहे. नेमके काय घडले, विष होते की अफवा, हे तर वैद्यकीय अहवालच सांगेल; पण सोशल मीडियाच्या न्यायालयाने निकाल आधीच राखून ठेवला आहे. गोव्याची अवस्था अशी झाली आहे की, बाहेरचे लोक आपापली पटकथा घेऊन येतात, शूटिंग करून जातात आणि चित्रपटाचे पोस्टर मात्र गोव्याच्या नावाने झळकते. त्यामुळे आता पर्यटकही विचार करू लागले असतील. ‘गोव्यात यायचे म्हणजे बीच बघायचे की ब्रेकिंग न्यूज?’ खरे काय, खोटे काय, हे तपास ठरवेल; पण गोव्याची ओळख पुन्हा पर्यटनाने व्हावी की सनसनाटी घटनांनी, हा प्रश्न मात्र समुद्राच्या लाटांसारखाच पुन्हा-पुन्हा किनाऱ्यावर येऊन धडकत आहे. ∙∙∙

कृषी क्षेत्राला नवी दिशा!

प्रसिद्धीपासून दूर राहून कामगिरीने ठसा उमटवणारे अधिकारी म्हणून नव्याने नियुक्त कृषी संचालक चंद्रहास देसाई यांच्याकडे अपेक्षेने पाहिले जात आहे. फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना त्यांनी मंडळाला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवल्या आणि त्यात यशही मिळवले. नियोजनबद्ध कामकाज, दूरदृष्टी आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे त्यांनी कृषी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. आता कृषी संचालक म्हणून गोव्यातील शेती आणि कृषी उत्पादनाला चालना देणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे तसेच राज्याला कृषी उत्पादनात अधिक स्वयंपूर्ण बनविणे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ शेतकरी आणि कृषी क्षेत्राला होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मंत्री रमेश तवडकर यांनीही त्यांचे कौतुक केले आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: शंभर कोटींचा 'तो' आरोप काँग्रेसवरच उलटणार? गिरीश चोडणकरांच्या वक्तव्याने गोव्याच्या राजकारणात खळबळ!

नजर पार्सेकरांकडे!

राजकारणात वाढदिवस म्हणजे केवळ केक कापण्याचा कार्यक्रम नसतो; कधी तो नवीन राजकीय अध्यायाचाही शुभारंभ ठरतो. म्हणूनच माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या वाढदिवसाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्यावेळी मोठी घोषणा होणार; पण ती नेमकी कोणती? घरवापसीची, नव्या समीकरणांची की फक्त इच्छुकांना गोंधळात टाकणारी? भाजपमध्येही चर्चा, विरोधकांतही चर्चा. राजकारणाचे कोडे असे की, उत्तर जाहीर होईपर्यंत प्रत्येकाचे अंदाजच बरोबर असतात! आता पाहायचे, वाढदिवसाला फुगे जास्त पेटणार की राजकीय चर्चांची ठिणगी पडणार? ∙∙∙

इसापनीती-लोकशाहीचे मर्म!

राज्य मोठे नव्हते. लहानच. निवडणूक जवळ आली की वावटळीने उलथापालथ होते, तशी व्हायची. एरव्ही दरवर्षी वाढदिनी घरी नसणार, असे सांगणारे नेते धुमधडाक्याने पंगती वाढत. मीच जिंकणार, असे एका मतदारसंघात सातजण सांगू लागायचे. कुठल्या पक्षातून हे त्यांनाच माहीत नसायचे. अंतर्गत कलह सुरूच असायचे. कॅप्टन व्हायची हौस खूपजणांना. आंदोलने, असंतोष यांचा भडका असायचा. वाटायचे, यंदा सरकार पडणार. सेफोलॉजिस्ट अंदाजांवर पुस्तके लिहायचे. ती वाचून लोकमत बदलेल म्हणून सत्ताधारी टरकून असायचे. टीव्ही चॅनलांचे (यूट्यूब) पीक तरतरून यायचा. जीविका चालायची. पाणीच नसलेल्या ठिकाणी पूल बांधणार, असे आश्वासन जाहीरनाम्यावर पाहून मतदार कपाळावर हात मारायचे. नॅरेटीव्ह, एकगठ्ठा मते, ध्रुवीकरण अशा जड शब्दांचे बुडबुडे भाषणातून नाचायचे. मत मारून नागरिक आतल्या आत ‘फुगार’ व्हायचे. सार : लोकांनी लोकांसाठी चालविलेली तानाशाही, माफ करा, लोकशाही फार-फार पवित्र असते. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: राजकारणात खळबळ! सासष्टीतील मतं फोडण्यासाठी भाजपकडून 100 कोटींची तरतूद; गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप

आता ऑन नावेली ग्राऊंड!

बऱ्याच वर्षांपूर्वी प्रतिमा कुतिन्हो या युवा काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत होत्या, त्यावेळी त्यांच्याविरोधात वालंका आलेमाव या उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी विजय सरदेसाई यांनी प्रतिमा यांना खंबीर पाठिंबा देत निवडूनही आणले होते. त्यावेळी प्रतिमा विरुद्ध वालंका यांच्यातील या लढतीला लोकांनी ‘ऑन फातोर्डा ग्राऊंड’ असे म्हटले होते. आता प्रतिमा कुतिन्हो या आज पुन्हा काँग्रेस पक्षात वापसी करत आहेत आणि यावेळीही त्यांच्याविरोधात कोण आहेत तर वालंका आलेमाव. प्रतिमा आणि वालंका यांच्यातील लढत ‘ऑन नावेली ग्राऊंड’ होणार का? ∙∙∙

‘मूह में राम, बगल में छुरी’

मडगाव येथील राम मंदिर व आयोध्येतील राम मंदिर यांच्यात जमीन-आसमानाचा फरक आहे. मडगावातील राम मंदिर सर्वांनी स्वखर्चाने उभारले आहे. त्यामागे त्याग, भक्ती व प्रामाणिकपणा आहे; पण अयोध्येतील मंदिरामध्ये लूट सुरू आहे. हा प्रकार म्हणजे ‘मूह में राम बगल में छुरी’ असा आहे, असे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले. काहीजण अंधभक्त झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात काय घडत आहे, याची शहानिशा करण्यास कोणी जात नाही. असे प्रकार होता कामा नयेत, असेही सरदेसाई सांगतात. आयोध्या येथील राम मंदिराबद्दल लोकांमध्ये अढळ श्रद्धा आहे. असे जे प्रकार उघडकीय येत आहेत त्यामुळे ही श्रद्धा ढळणार तर नाही ना? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: खरी कुजबुज; अमित पालेकर कोणता झेंडा घेणार?

टेम्पररी कर्मचारी गणवेशात हजर, पण...

कित्येकवेळा कमी स्तरावरील कर्मचारी इमानेइतबारे काम करतात. मात्र, मोठ्या हुद्यावरील कर्मचाऱ्यांना शिस्तीचे सोयरसुतक नसते. आता मडगाव पालिकेचेच उदाहरण घ्या. दामोदर शिरोडकर हे नगराध्यक्ष असताना मडगाव पालिकेत रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना टेम्पररी दर्जा देण्यात आला होता. त्यांना त्यावेळी अट घालण्यात आली होती, ती म्हणजे १ जुलैपासून त्यांनी गणवेश घालून कामावर यावे. त्याप्रमाणे काल हे कर्मचारी गणवेश घालून कामावर हजर झाले. पालिका युनियनचे अनिल शिरोडकर यांच्यासमवेत त्यांनी फोटोही काढला. एका बाजूने हे टेम्पररी कर्मचारी गणवेशात आले असताना पालिकेत कायमस्वरूपी कामात असलेले मात्र विनागणवेश वावरत होते. यावर कुणी लक्ष देणार का? ∙∙∙

उत्तर गोवा पोलिस अधीक्षक पाहतात वाट...

पेडणे न्यायालयाने याच महिन्यात एका प्रकरणात मांद्रे पोलिसांच्या कामकाजावर चांगलेच ताशेरे ओढले. त्यानंतर म्हणे उत्तर गोव्याच्या पोलिस अधीक्षकांनीही वेळ न दवडता, ‘नेमकी चूक कुठे झाली? न्यायालयाने असे का म्हटले? पुढे काय सुधारणा करणार?’ याचा सविस्तर अहवाल पाठविण्याचे पत्र मांद्रे पोलिसांना धाडले. पत्र तर जूनच्या पहिल्याच आठवड्यात गेले म्हणे... पण त्याचे उत्तर मात्र अजूनही ‘पोस्टात अडकले’ की ‘विचाराधीन’ आहे, हे कुणालाच समजेनासे झाले आहे. जून महिना संपत आला, तरी उत्तराचा पत्ता नाही. त्यामुळे गावात मिश्कील चर्चा रंगली आहे. न्यायालयाच्या निरीक्षणांपेक्षा उत्तर लिहिणे अधिक कठीण ठरले की काय? की अजूनही योग्य शब्दांची जुळवाजुळव सुरू आहे? ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Indian Politics: काही पक्ष फुटतात, काही का टिकतात?

एक दिवस धीर धरा!

३० जूननंतर आम्ही आमचे पुढील प्लॅन्स जाहीर करू, असे यापूर्वी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी म्हटले होते. काल १ जुलै रोजी ही मुदत संपली. त्यामुळे विजय सरदेसाई यांचे पुढील प्लॅन जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी सरदेसाई यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी आपले प्लॅन्स काही सांगितले नाहीत; पण एक दिवस धीर धरा, असे ते म्हणाले. म्हणजे आज गुरुवारी ते काहीतरी सांगणार हे नक्की! काय बरे सांगणार विजय आज? ∙∙∙

आपण कधी धडा शिकू?

गोव्यात सध्या धुवॉंधार पाऊस पडत आहे. झाडांची मुळे व माती मऊ झाल्यावर वृक्ष कोसळतात. रहदारी चालताना रस्त्याच्या बाजूचे वृक्ष उन्मळून पडले तर भीषण दुर्घटना होऊ शकते. काल मुंबईत चेंबूर प्रांतात पावसामुळे एक वृक्ष शालेय बसवर पडला. एक मृत्यू, ११ जखमी हॉस्पिटलात. आम्ही धडा शिकणार का? वृक्षांचे वय, मुळांचा मातीतील विस्तार, इमारतीपर्यंत असलेला प्रसार, झाडांचे स्वास्थ्य याचे ऑडिट घ्यावे, असे कधी वाटले का? जीवितहानी होऊन मोठी दुर्घटना झाल्यावर आपले डोळे उघडतात. झाडे काही स्मार्ट नसतात. स्मार्ट सिटीत असो वा रस्त्यानजीक वा गावात. झाडांचा अंत कधी, केव्हा? यावर कुणाचेच नियंत्रण नसते. गोव्यात जीव वाचवायला आपणच धडा घेऊन शिकले पाहिजे, अशी चर्चा चालली होती. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: आप कार्यकर्त्यांनी फोंड्यात मगोपला दाखविले काळे झेंडे, शाब्दिक चकमक; काही काळ तणावाचे वातावरण

सिद्धेश भगत यांची चर्चा?

सिद्धेश भगत यांनी सोमवारी चक्क मुंबई गाठून महाराष्ट्र राज्य पावसाळी अधिवेशनात उपस्थित राहून तेथील अधिवेशन जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सध्या भगतबाब कुठल्या राजकीय पक्षात नाहीत. मात्र, त्यांचे गोव्यासह शेजारच्या राज्यातील विविध पक्षांशी कनेक्शन आहे. आम आदमी पक्षाचे युवा विभागाचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. मात्र, नंतर त्यांनी ‘आप’ला रामराम ठोकला. नावेली मतदारसंघातून यावेळी विधानसभा निवडणूक लढवून आमदार बनण्याची त्यांची मनीषा आहे. विविध राजकीय पक्षांच्या आपण संपर्कात आहे, असे ते खासगीत सांगतातही. मात्र, नेमका कुठला पक्ष, याचा थांगपत्ता लागू देत नाहीत. मुंबईला भेट दिल्याने सिद्धेशराव आपली नवी राजकीय इनिंग्स खेळण्याच्या तयारीला लागले आहेत, एवढे मात्र नक्की. ∙∙∙

‘आयडी’ची स्थिती!

बऱ्याच काळाच्या उसंतीनंतर सध्या पाऊस सुरू झाला असला तरी फोंड्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. फोंडा पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्र्यांनी फोंडा उपजिल्हा अर्थातच आयडी इस्पितळाला सर्व सुविधा देऊ, असे जाहीर केले होते. मात्र, आता दोन महिने उलटले तरी ‘आयडी’ची स्थिती तशीच असल्याने हा कळीचा मुद्दा धरून सुरवातीला काँग्रेस पक्षाने आवाज उठवला आणि काँग्रेस पक्षाची री ओढत आता आम आदमी पक्षानेही आवाज करीत समस्या दूर करा, अशी मागणी करणारे निवेदन दिले. आता या निवेदनाचा कितपत फायदा होईल, हे माहीत नाही; पण ‘आयडी’ला दोन महिन्यांत सर्व सुविधा उपलब्ध होतील आणि हे आधीच ठरले आहे, असे वैद्यकीय अधीक्षकच सांगत आहेत. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: 'गोवा फॉरवर्ड-भाजप युतीच्या बातम्या फक्त अफवा', मतदारांची दिशाभूल करणाऱ्यांना आमदार सरदेसाईंनी सुनावले

कौतुक आयोजनाचे...

फोंड्यातील सहकार खाते आणि थ्रिफ्ट सोसायटीने आयोजित केलेल्या कृषी सन्मान दिवस कार्यक्रमात सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजक थ्रिफ्ट सोसायटी आणि सहकार खात्याचे कौतुक केले. विशेष म्हणजे सहकार खात्याच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झाल्याने कार्यक्रमाला एक वेगळीच किनार लाभली. नीटनेटक्या आयोजनामुळे मन प्रसन्न होते, असे सांगताना एखादा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अशा प्रकारचे नेटके आयोजन महत्त्वाचे ठरते, असे सहकारमंत्र्यांनी सांगितल्यावर आयोजकांची कॉलर ताठ झाली. सुभाषभाऊ नेहमीच चांगल्याचे कौतुक करतात, हे सर्वश्रुत आहे. मात्र, अशा कौतुकामुळे आयोजकांचा हुरूप वाढतो, जो इतरांसाठीही प्रेरणा ठरू शकतो. बरोबर ना..! ∙∙∙

उदंड जाहली आरोग्य शिबिरे!

सध्या फोंड्यात मोफत आरोग्य शिबिरांचे पीकच आले आहे. दर रविवारी एखादे तरी मोफत आरोग्य शिबिर असतेच. आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून ही आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत, हे उघडच आहे. ते ठिक आहे; पण सध्या फोंड्यात आरोग्याला पूरक वातावरण आहे, असे कोठेच दिसत नाही त्याचे काय? सगळीकडे दुर्गंधी पसरलेली दिसत आहे. त्यात परत फोंड्याच्या उपजिल्हा इस्पितळातही अनेक त्रुटी डोके वर काढत आहेत. या सगळ्या समस्या सोडवून या समाजकार्यकर्त्यांनी आरोग्याला पूरक असे वातावरण शहरात निर्माण केले तर अशा आरोग्य शिबिरांची गरजच भासणार नाही, असे फोंड्यातील लोक बोलायला लागले आहेत. शेवटी ‘प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्यूअर’ असे जे इंग्रजीत म्हटले आहे, ते उगाच नाही. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: शंभर कोटींचा 'तो' आरोप काँग्रेसवरच उलटणार? गिरीश चोडणकरांच्या वक्तव्याने गोव्याच्या राजकारणात खळबळ!

विद्यापीठाची जादुई करामत!

‘बीए’ पदवी निकाल एकदाचा आला; परंतु काही गफलती घेऊनच. कॉलेजमध्ये मुलांना प्रकल्पाला १०० पैकी ७५ पडले होते, ते गुण विद्यापीठात पाठवल्यावर निकालपत्रात ५० कसे झाले? हा चमत्कारिक धक्का मुलांना बसला. ग्रस्त विद्यार्थ्यांनी कॉलेजात व नंतर विद्यापीठात जाऊन याची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. कॉलेजकडे आपण पाठवलेले प्रकल्पाचे गुण आहेत. गुणपत्रिकेत आणि या मूळ गुणांत फेरफार आहे. त्रस्त विद्यार्थ्यांनी फेरतपासणीसाठी अर्जही केले आहेत. सरासरी ५० खाली गुण मिळणाऱ्यांना ७५वर गुण कसे मिळाले, हा दुसरा धक्का होता. कोकणीत अशा विचित्र घटनांना ‘नखलामी’ म्हणतात. प्राप्त परीस्थितीत, कुजबुज इफेक्ट असो की इतर परिणाम, ‘एमए’ प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना तात्पुरती ओळखपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची चर्चा आहे. ∙∙∙

सुधीरभाईंची दुहेरी कसरत..

म्हापशात सध्या सुधीर कांदोळकर यांच्या प्रयत्नांना परमेश्वर पावणार का? याबाबत लोकांत चर्चा सुरू आहे. दोनदा पराभव झाल्यावर भाईंचे पाय भाजपच्या नेत्यांकडे जरा जास्तच वळायला लागले होते. त्यामुळे भाई आता भाजपमध्ये जाणार, अशा गप्पा म्हापशात रंगल्या होत्या; पण निवडणुका जवळ आल्यावर भाऊंना काँग्रेसप्रेमाचा उमाळा आला आहे. आता भाई ठामपणे सांगत आहेत की, मी कुठेच जात नाही, काँग्रेसची उमेदवारी मलाच मिळणार! म्हणजे तिकडे भाजपची डाळ शिजली नाही, म्हणून पुन्हा काँग्रेसचा हात धरला की काय? अशी मिश्‍कील चर्चा लोक करत आहेत. आधी भाजप नेत्यांसोबत उठबस करायची आणि आता काँग्रेसचे एकनिष्ठ असल्यासारखे बोलायचे; भाईंची ही कसरत बघण्यासारखी आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com