Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Corchorem Drugs Case: धक्कादायक!कुडचडे बनतेय ‘ड्रग्‍स-हब’; पोलिसांच्या दुर्लक्षपणाने खाद्यपदार्थांच्‍या गाड्यांवरही मिळतोय गांजा

विद्यार्थी, तरुण नशेच्‍या विळख्‍यात

गोमन्तक डिजिटल टीम

Corchorem Drugs Case बेकायदेशीर खनिज व्‍यवसाय आणि बेकायदेशीर वाळू उपसा यामुळे यापूर्वीच बदनाम झालेले कुडचडे आता पुन्‍हा एकदा ‘कुख्‍यात’ या व्‍याख्‍येत जाऊन बसले आहे. या शहरात गांजा आणि अन्‍य देशी अमलीपदार्थांचा एवढा सुळसुळाट झाला आहे की, कुडचडे या शहराची नवीन ओळख ‘ड्रग्‍स-हब’ म्‍हणून तयार झाली आहे.

या शहरात अगदी खाद्यपदार्थांच्‍या गाड्यांवरही गांजा मिळू लागला असून अनेक विद्यार्थी आणि युवक नशेच्‍या विळख्‍यात सापडले आहेत. शहरात ड्रग्‍स मिळण्‍याचे अड्डे एका बाजूने वाढत असताना मागच्‍या सहा महिन्‍यांत कुडचडे पोलिस स्‍थानकात फक्‍त एका ड्रग्‍ससंदर्भातील गुन्‍ह्याची नोंद झाली आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, बेळगावातून हा गांजा मोलेमार्गे गोव्‍यात आणला जात असून तो प्रामुख्‍याने कुडचडे शहरात विकला जातो. गोव्‍यात बहुतांश गांजा ओडिशा, मेघालय या उत्तर भारतातील राज्‍यांतून तर जवळच्‍या कर्नाटक व महाराष्‍ट्र या भागातून येत असतो.

ओडिशा आणि मेघालय या थंड जागेत तयार होणाऱ्या ‘शिलावती’ या नावाने ओळखल्‍या जाणाऱ्या गांजाला मागणी जास्‍त असते. हा गांजा गाेव्‍यात अन्‍य ठिकाणी सहज मिळत नाही. पण कुडचडेत तो मुबलक प्रमाणात उपलब्‍ध असल्‍याचे सांगितले जाते.

काहीसा महाग असलेला; पण नशेसाठी चांगला, अशी समज असलेला साताऱ्यातून येणारा ‘ग्रीन’ हा गांजाही कुडचडेत सहजपणे मिळतो. पूर्वी तंबाखू घालून सिगारेट तयार करण्‍यासाठी कागद मिळायचा. याच कागदाचा वापर गांजा सेवनासाठी केला जातो. अर्धा तंबाखू, अर्धा गांजा अशा मिश्रणाने ही सिगारेट तयार केली जाते.

पेडलर, पोलिस दोघेही मालामाल

पेडलर्स जी 5 ग्रॅमच्‍या गांजाची पुडी विकतात तिचे प्रत्‍यक्षातील मोल 300 रुपयांच्‍या आसपास असते. ही पुडी 700 रुपयांना विकली जाते. त्‍यामुळे त्‍यावर दुप्‍पट फायदा मिळतो. असा हा पैसा खोऱ्याने ओढणारा धंदा असल्‍याने युवक त्‍याकडे आकर्षित होत आहेत.

या धंद्यात असलेल्‍या कित्‍येकांनी आता आलिशान गाड्या घेऊन फिरण्‍यास सुरू केले आहे. त्‍यांच्‍याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांना वेळोवेळी घसघशीत हप्‍ता जात असल्‍याने पोलिसही मालामाल झाले आहेत, असे सांगण्‍यात येते.

टेहळणीनंतर पुरवठा :

पूर्वी गांजा विकत घेण्‍यासाठी लोक पेडलर्सकडे यायचे. मात्र, आता पद्धती बदलली आहे. गांजा पाहिजे म्‍हणून फोन केल्‍यानंतर त्‍या गिऱ्हाईकाला अमुक ठिकाणी तो न्‍यायला ये, असे सांगितले जाते. कदाचित तो पोलिसांचा खबऱ्या असू शकेल. यासाठी आधी त्‍याची टेहळणी करून झाल्‍यावर जर कुठली शंका नसेल तरच त्‍याला हा माल दिला जातो.

फक्‍त 5 ग्रॅम गांजाची एक पुडी

कुडचडेत येणारा गांजा हा किलोच्‍या संख्‍येने येत असला तरी स्‍थानिक युवक हा गांजा साफ करून 5 ग्रॅमच्‍या पुड्या तयार करून तो विकतात. यामागचे कारण असे की, कुणाकडेही जर गांजा मोठ्या प्रमाणात सापडला तर त्‍याच्‍यावर पोलिस कारवाई होऊ शकते. पण ५ ग्रॅमचा गांजा सापडल्‍यास कायद्याने त्‍यावर खास कारवाई होऊ शकत नाही. यासाठीच ही खबरदारी घेतली जाते.

संपूर्ण कुडचडे शहर गांजाच्‍या विळख्‍यात आलेले आहे. हा गांजा कुठे मिळतो, हे पोलिसांना माहीत आहे. मात्र, त्‍याकडे कानाडोळा केला जात आहे.

वाममार्गाने येणारा हा पैसा शहराच्‍या अधोगतीला कारणीभूत ठरत आहे. शहरात हे सर्व चालू आहे, हे माहिती असूनही स्‍थानिक लोकप्रतिनिधी त्‍याकडे दुर्लक्ष का करतात, हेच कळत नाही.

- बाळकृष्‍ण होडारकर, माजी नगराध्‍यक्ष, कुडचडे

ड्रग्‍सकडे कुडचडेतील अनेक तरुण आकर्षित होऊ लागले असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तो जवळ येऊन पोहोचला आहे. यावर आताच अंकुश ठेवला गेला नाही तर कुडचडेतील येणारी पिढी बरबाद होऊ शकते. पोलिसांकडून कारवाई होत नाही, ही गोष्‍ट खरी आहे. त्‍यामुळे आता पालकांनाच आपल्‍या मुलांवर लक्ष ठेवून ते या वाममार्गाला लागणार नाहीत, हे पाहावे लागेल.

- प्रदीप काकोडकर, अध्‍यक्ष, शाळा व्‍यवस्‍थापन समिती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT