Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: काँग्रेसचा 2027 साठी मास्टरस्ट्रोक! 'आरजी'चा पत्ता कट, गोवा फॉरवर्डशी जमवणार जवळीक; ठाकरे, निंबाळकरांशी लवकरच चर्चा

2027 Goa Assembly Elections Congress Strategy: काँग्रेसच्‍या नेतृत्‍वाने २०२७ च्‍या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू करण्‍याचे निश्‍चित केले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: नुकत्‍याच झालेल्‍या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत दहा जागा मिळाल्‍याने काही अंशी समाधानी झालेल्‍या प्रदेश काँग्रेसच्‍या नेतृत्‍वाने २०२७ च्‍या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू करण्‍याचे निश्‍चित केले आहे. त्‍याचवेळी विधानसभा निवडणुकीत रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाला (आरजीपी) वगळून आणि गोवा फॉरवर्डला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्‍याचा विचारही त्‍यांच्‍याकडून सुरू असल्‍याची माहिती पक्षाच्‍या वरिष्‍ठ सूत्रांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

सत्ताधारी भाजपला (BJP) जिल्‍हा पंचायत निवडणुकीत हरवण्‍यासाठी काँग्रेस-गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी या तीन पक्षांची युती घडवून आणण्‍याचे प्रयत्‍न गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांच्‍यासह काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्‍टन डिकॉस्‍टा यांनीही केले होते. पण, युती करण्याचे निश्‍चित झाल्‍यानंतर केवळ सांताक्रूझच्‍या जागेवरून काँग्रेस-आरजीपीच्‍या नेत्‍यांमधील जागा वाटपाची चर्चा फिस्‍कटली. त्‍यामुळे ‘आरजीपी’ने तडकाफडकी स्‍वतंत्ररित्‍या निवडणूक लढवण्‍याचा निर्णय घेतला.

‘आरजीपी’चे अध्‍यक्ष मनोज परब यांच्‍या या निर्णयाचा काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीला जिल्‍हा पंचायत निवडणुकीत कितपत फटका बसतो, याकडे काँग्रेस नेत्‍यांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु, त्‍याचा फारसा फटका न बसल्‍यामुळे ‘आरजीपी’ला बाजूला ठेवून आणि गोवा फॉरवर्डलाच सोबत घेऊन आगामी विधानसभा निवडणूक लढण्‍याचा विचार काँग्रेसच्‍या स्‍थानिक नेतृत्‍वाने केला आहे. याबाबत ते लवकरच प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्‍यासोबत चर्चा करणार असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

स्‍थानिक नेतृत्‍वाशी लवकरच चर्चा : ठाकरे

जिल्‍हा पंचायत निवडणुकीत प्रदेश काँग्रेसच्‍या (Congress) जागा वाढल्‍यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांचे मनोधैर्य निश्‍चित वाढले आहे. त्‍याचा फायदा पुढील काळात घेऊन पक्ष संघटना बळकटीवर अधिकाधिक भर देण्‍यात येणार असल्‍याचे प्रभारी माणिकराव ठाकरे म्‍हणाले.

विधानसभा निवडणुकीसाठी तेरा महिने शिल्लक आहेत. त्‍यामुळे बूथ संघटना आणखी मजबूत करणे, प्रमुख पदाधिकाऱ्यांना जोमाने कामाला लावणे, सरकारच्‍या जनविरोधी धोरणांवर आक्रमकपणे आवाज उठवणे आणि अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्‍याचे ध्‍येय आम्‍ही ठेवले असून, त्‍याची सुरुवात लवकरच होणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

भाजपला पराभूत करण्‍याच्‍या उद्देशानेच आम्‍ही ‘आरजीपी’सोबतही युती करण्‍यास तयार होतो. परंतु, मनोज परब यांनी शेवटच्‍या क्षणी नकार दिल्‍याने आम्‍ही गोवा फॉरवर्डला सोबत घेऊन गेलो. भविष्‍यातील युतीचा निर्णय स्‍थानिक नेतृत्‍वाशी चर्चा करूनच घेतला जाईल, असेही त्‍यांनी सांगितले.

युतीचा निर्णय चर्चेनंतर

जिल्‍हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसच्‍या जागा चारवरून दहापर्यंत गेल्‍याने पक्षाच्‍या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. त्‍यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच करण्‍याचा निर्णय आम्‍ही घेतला आहे. गोवा फॉरवर्डची सध्‍या काँग्रेससोबत युती आहे. त्‍यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आम्‍ही गोवा फॉरवर्ड पक्षालाच सोबत घेऊन जाणार आहोत. इतर पक्षांसोबतच्‍या युतीचा विचार वरिष्‍ठांशी चर्चा करून योग्‍यवेळी घेतला जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना स्पष्ट केले.

आमदारांपेक्षा कार्यकर्त्यांच्‍या मताला महत्त्‍व देण्याचा निर्णय

१. नुकत्याच झालेल्या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत ‘आरजीपी’ने अखेरच्‍या टप्‍प्‍यात युतीमधून माघार घेतल्‍याने काँग्रेसच्‍या अनेक नेत्‍यांमध्‍ये संताप पसरलेला असतानाच, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार एल्‍टन डिकॉस्‍टा यांच्‍याकडून मात्र अजूनही भाजपला पराभूत करण्‍यासाठी ‘आरजीपी’ला युतीमध्ये सामावून घेण्‍याची मागणी होत आहे. आरजीपीमुळे युती बळकट होईल, असा त्यांचा होरा आहे. परंतु, बहुतांश नेत्‍यांकडून ‘आरजीपी’ ही भाजपची ‘बी’ टीम असल्‍याचाच दावा होत आहे.

२. २०२७ च्‍या विधानसभा निवडणुकीपर्यंत मतांच्‍या विभाजनासाठी भाजपला ‘आरजीपी’चे स्‍थान काही प्रमाणात राखून ठेवायचे होते. त्‍यामुळेच सांताक्रूझ आणि सेंट लॉरेन्‍सच्‍या दोन जागा भाजपने जाणीवपूर्वक गमावल्‍या. या दोन मतदारसंघांतील भाजप उमेदवारांना मते देऊ नका, ‘आरजीपी’च्‍या उमेदवारांना द्या, असा प्रचार मंत्री बाबूश मोन्‍सेरात यांनी केल्‍याचेही काँग्रेसच्‍या कार्यकर्त्यांचे मत आहे. त्‍यामुळेच ‘आरजीपी’ला सोबत घेण्‍यास त्‍यांच्‍याकडून विरोध होत आहे.

३. पक्षाचे भवितव्‍य भावी काळात अबाधित ठेवण्‍यासाठी आणि विधानसभा निवडणुकीत दर्जेदार कामगिरी करण्‍यासाठी आमदारांच्‍या मतांपेक्षा कार्यकर्त्यांच्‍या मताला अधिक महत्त्‍व देण्‍याचा निर्णय घेतच नेतृत्‍वाने ‘आरजीपी’शिवाय विधानसभा निवडणुकीचा सामना करण्‍याचा विचार सुरू केल्‍याचेही सूत्रांनी सांगितले.

४. जिल्‍हा पंचायत निवडणुकीच्‍या माध्‍यमातून प्रदेश काँग्रेसने स्‍वत:ला चाचपडून पाहिले आहे. यात लोकांच्‍या मनात काँग्रेसच असल्‍याचे अनेक अर्थांनी सिद्ध झाले आहे. त्‍यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षाला अधिकाधिक बळकट करण्‍याच्‍या दृष्‍टीने काम केले जाणार आहे. त्‍यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांना कामाला लावण्‍याचा आणि पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्‍याचा निर्णय प्रदेशाध्‍यक्ष पाटकर यांनी घेतल्‍याचेही सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Winter Session 2026: "आधार कार्ड म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही!" मुख्यमंत्री सावंतांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं; मतदार यादीतून गैर-नागरिकांची नावं हटवणार

Indian Army: भविष्यातील युद्धांसाठी भारतीय सेना सज्ज! 'फ्युचर रेडी' फोर्स म्हणून जगात ठरणार वरचढ, लष्करप्रमुखांनी शत्रूंना दिली तंबी VIDEO

Khelo India Beach Games 2026: गोव्याची कामगिरी सुधारली, खेलो इंडिया बीच गेम्समध्ये एका सुवर्णासह चार पदके

Goa Winter Session 2026: अंधार दूर होणार, प्रकाश येणार! वीज जोडणीसाठी लवकरच नवा अध्यादेश, हायकोर्टाच्या बंदीनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

America Iran Tension: "यावेळी गोळीचा निशाणा चुकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांना इराणची खुली धमकी; सरकारी टीव्हीवर हत्येच्या प्रयत्नाचे फोटो दाखवल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT