

पणजी: गोव्याच्या राजकारणात आगामी 2027 च्या विधानसभा निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी निवडणुकीच्या रणनीतीबाबत एक अत्यंत महत्त्वाचे आणि धाडसी वक्तव्य केले. "मी 'फ्रेंडली फाईट' (मैत्रीपूर्ण लढत) या संकल्पनेवर अजिबात विश्वास ठेवत नाही. आम्ही निवडणुका केवळ लढवण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढवतो," अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.
आलेमाव यांनी यावेळी 2017 च्या विधानसभा निवडणुकीच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, 2017 मध्ये काँग्रेसने 'फ्रेंडली फाईट'चा प्रयोग करुन पाहिला, परंतु तो पूर्णपणे अपयशी ठरला. मैत्रीपूर्ण लढतीमुळे मतांचे विभाजन होते आणि त्याचा थेट फायदा विरोधी पक्षांना मिळतो, हा अनुभव पक्षासाठी वेदनादायी होता. 2027 च्या निवडणुका आता जवळ येत असताना पुन्हा तीच जुनी चूक करणे पक्षाला परवडणारे नाही. त्यामुळे यावेळेस पक्ष अधिक गांभीर्याने आणि कोणत्याही संभ्रमाशिवाय मैदानात उतरणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
विरोधी पक्षनेत्यांनी पक्षात एकजूट असण्याच्या गरजेवर विशेष भर दिला. "पक्षातील नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी सर्व मतभेद विसरुन एकत्र लढणे गरजेचे आहे. मागील काळात काय चुकले, कुठे उणिवा राहिल्या आणि असे कोणते अंतर्गत घटक होते जे पक्षाच्या ध्येयधोरणांशी सहमत नव्हते, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे," असेही ते म्हणाले. काँग्रेस पक्ष आता या सर्व मुद्द्यांवर सखोल आत्मचिंतन करणार आहे. ज्या अंतर्गत घटकांमुळे पक्षाच्या प्रतिमेला किंवा निकालाला धक्का पोहोचला, त्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आलेमाव यांच्या मते, निवडणुकीत 'मैत्रीपूर्ण' असे काहीही नसते. राजकीय मैदानात उतरल्यानंतर प्रतिस्पर्ध्याला पराभूत करणे हेच एकमेव उद्दिष्ट असायला हवे. 2027 मध्ये जनतेला सक्षम आणि भक्कम पर्याय देण्यासाठी काँग्रेसला (Congress) आपली रणनीती स्पष्ट ठेवावी लागेल. मित्रपक्षांसोबतच्या जागावाटपाच्या चर्चेतही आता काँग्रेस 'फ्रेंडली फाईट'च्या नावाखाली माघार घेण्यास तयार नसेल, हेच आलेमाव यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे. या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी काळात गोव्याच्या राजकारणात नवीन समीकरणे पाहायला मिळू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.