

मडगाव: गोमंतकीयांना २४ तास पाणी पुरवठ्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले असले तरी अजूनही काही ठिकाणी अवघे काही तासच नळाला पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे लोकांच्या तक्रारीही वाढल्या आहेत. २०२२ पासूनची आकडेवारी पाहिल्यास सासष्टी तालुक्यात सर्वांत जास्त म्हणजे २६८२ तक्रारी पाणी खात्याकडे नोंद झाल्या आहेत.
सासष्टी तालुका हा गोव्यातील सर्वांत जास्त लोकसंख्येचा तालुका असून या तालुक्यात राय, राशोल, कुडतरी, नुवे आणि नेसाय या भागातून पाण्याबाबत जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत. पाणी पुरवठा खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी याबाबत विधानसभेत उत्तर दिले आहे. त्यानुसार या तक्रारींपैकी बहुतेक पाणी पुरवठ्याबाबत नसून अन्य कारणांमुळे झालेल्या आहेत. यामध्ये वीज नसल्यामुळे पाणी पुरवठा बंद होणे, पाण्याची गळती व पाईपलाईन फुटल्यामुळे पुरवठ्यावर परिणाम होणे, तसेच वीज खात्याने घेतलेल्या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा थांबणे याबाबतच्या तक्रारी आहेत.
विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना, गोव्यातील एकूण नळधारकांपैकी ५३.०५ टक्के नळधारकांना दिवसाला एक ते आठ तास पाणी मिळते. काही ठिकाणी नळाला पाणी येण्याचे प्रमाण दोन तासापेक्षाही कमी आहे. एकूण ९.४ टक्के ग्राहकांना दिवसाला चार तासापेक्षा कमी पाणी मिळते.
बार्देश तालुक्यात चार तासापेक्षा कमी पाणी मिळण्याचे प्रमाण सर्वाधिक असून वेरे, रेईश मागूश आणि सांगोल्डा या भागांना अधिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. या भागात काही ठिकाणी दोन दिवसांतून एकदा पाणी उपलब्ध होते. या तालुक्यात मागच्या चार वर्षांत पाणी पुरवठ्याबाबत ९९६ तक्रारी पाणी खात्याकडे दाखल झाल्या आहेत.
तिसवाडी, सत्तरी आणि पेडणे या तालुक्यांनाही पाण्याची समस्या सतावत असून या तालुक्यात काही ठिकाणी दिवसाला फक्त तीन तासच नळाला पाणी उपलब्ध असते.
गोव्यातील काही भागांमध्येच २४ तास पाणी उपलब्ध असून त्यात काणकोण आणि सांगे नगरपालिका क्षेत्र, मुरगाव तालुक्यातील केळोशी व वेळसाव, केपे तालुक्यातील काही गाव आणि मडगाव शहर यांचा समावेश आहे, जिथे पूर्णवेळ पाणी पुरवठा उपलब्ध आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.