

डिचोली: दोन दिवसांपूर्वी एका मुलाची अमानुषपणे झालेली हत्या धरून गेल्या दहा महिन्यात डिचोली पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात खुनाची चार प्रकरणे घडली आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे दहा महिन्यात जे चार खून झालेले आहेत. त्यात दोन मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. तर मृत्यू झालेल्या अन्य एका महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा अद्याप उलगडा झालेला नाही.
गेल्या सोमवारी (ता. १६) अंगावर शहारे आणणारी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना डिचोलीत घडली आहे. जन्मदात्या बापानेच स्वतःच्या १४ वर्षीय मुलाची निर्दयी आणि अमानुषपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाला यमसदनी पाठवून पित्यानेही स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना घडण्यापूर्वी गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या १५ तारखेला म्हावळींगे येथे घडलेल्या तीन वर्षीय चिमुकल्या मुलीच्या खून प्रकरणामुळे डिचोलीत प्रचंड खळबळ माजली होती.
आईच्य प्रियकराच्या मदतीने आईनेच पोटच्या तीन वर्षीय मुलीचा अत्यंत निर्दयीपणे गळा घोटला होता. या खूनप्रकरणी ‘त्या’ दुर्दैवी चिमुकल्या मुलीची आई नागम्मा रवी व्ही. आणि तीचा प्रियकर नितीशकुमार पुजारा यांच्यासह अन्य एका संशयिताला पोलिसांनी शिताफिने अटक केली. पोटच्या गोळ्याचा अमानुषपणे हत्या करण्याच्या या दोन्ही प्रकरणांमुळे तर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
गेल्या २५ जुलै रोजी न्यूवाडा-वाठादेव येथे रबिया हवंगी या २५ वर्षीय विवाहित महिलेची दिवसाढवळ्या निर्दयीपणे हत्या करण्याची घटना घडली होती. पती मैनुद्दीन हवंगी याने तलवारीचे सपासप वार करुन रबिया हिचा खून केला होता. खुनाच्या घटनेनंतर शरण आलेल्या मैनुद्दीनला पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपी सध्या कोठडीची हवा खात आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात भर शहरात लक्ष्मी भिकाजी शिरोडकर या महिलेचा खून झाला होता. या खूनप्रकरणी मृत लक्ष्मी हिचा साथीदार रमेश तेली याला पोलिसांनी त्वरित अटकही केली.
गेल्या वर्षी २ डिसेंबर रोजी कारापूर येथील वासंती सालेलकर ही अविवाहित महिला राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आली होती. विजेचा शॉक लागून वासंती हिचा मृत्यू झाल्याचे शवचिकित्सा अहवालात स्पष्ट करण्यात आले असले, तरी हा घातपाताचा प्रकार असल्याचा नातेवाइकांचा संशय आहे. वासंती हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी करीत कारापूरहून डिचोली पोलिस स्थानकापर्यंत भव्य मशाल मोर्चाही काढण्यात आला होता. हे मृत्यू प्रकरण अजूनही गुलदस्त्यात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.