सध्या फोंड्याला आमदार नसल्यामुळे या मतदारसंघातील लोकांची अवस्था असूनी `नाथ मी अनाथ’ अशी झाल्यासारखी दिसत आहे, अशा परिस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतच फोंडावासियाना आधार वाटायला लागले आहेत. विरोधक काहीही म्हणो, पण मुख्यमंत्र्यांचे फोंड्यावर बारीक लक्ष असल्याचे दिसून येत आहे. त्यांचे फोंड्यात येणेही आता वाढले असून त्यामुळे अनेक विकास कामांना गती मिळताना दिसायला लागली आहे. येत्या सहा महिन्यात यातली बरीच कामे मार्गाला लागणार असल्याचेही सांगितले जात आहे. आता मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त असल्यावर काही कठीण नाही म्हणा. काही का असेना, पण रवी नाईकांच्या निधनानंतर किनारा सुटलेल्या नावे सारखी अवस्था झालेल्या फोंड्यात सध्या तरी मुख्यमंत्री ‘नायक’ ठरताना दिसत आहेत. हे आम्ही नाही बोलत हो, फोंडेकरच असे बोलताना दिसत आहे. आता बोला. ∙∙∙
पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ‘माझी इंग्रजी चांगली नाही...’ अशी नम्र सुरुवात करणाऱ्या पेलेंनी पुढच्याच क्षणी इंग्रजी बोलणे मात्र टाळले नाही आणि नेमकी तिथेच सगळ्यांचे लक्ष वेधले गेले! समुद्रकिनाऱ्यावर काम करताना विदेशी पर्यटकांशी संवाद साधावा लागतो, त्यामुळे मोडक्या-तोडक्या इंग्रजीत का होईना, बोलण्याची सवय लागल्याचे त्यांनी सांगितले. अनुभवातून शिकत असल्याचेही ते सहजपणे म्हणाले आणि शिक्षणाचे महत्त्वही अधोरेखित केले. ‘इंग्रजी जमत नाही’ असे म्हणणारे पेले पत्रकारांच्या प्रश्नांना सराईतपणे इंग्रजीतूनच उत्तरे देताना दिसले! ‘फिशरमन पेले’ सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. २१० किमी अंतर पार करणाऱ्या मुंबईच्या एका जलतरणपटूला प्रोत्साहन देण्यासाठी ते खास पणजीत आले होते; मात्र त्यांच्या भेटीपेक्षा त्यांच्या इंग्रजीचीच जास्त चर्चा रंगली, हेच खरे! ∙∙∙
‘परीक्षकांना पन्नास हजार प्रत्येकी’ या कला अकादमी संबंधित लाच प्रकरणाची परिणती काय तर त्यात गुंतलेल्या दोघा दिग्गज पदाधिकाऱ्यांपैकी एकाची पुन्हा फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरमध्ये परत पाठवणी केली आहे; पण त्याचबरोबर बक्षीस म्हणून त्याला काणकोण येथील रवींद्र भवनचाही चार्ज दिला गेला आहे. गुन्हे करा आणि मस्तपणे त्याचा आनंद घेत राहा, हेच कला अकादमीचे त्यांच्या कर्मचाऱ्यांप्रति धोरण आहे काय, असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशी ही करणी आहे. दुसऱ्या पदाधिकाऱ्याला तर समाज माध्यमांवरून नैतिकतेचे आणि सभ्यतेचे धडे देण्यासाठी मोकळे सोडले गेले आहे. स्पर्धेच्या तीनही परीक्षकांनी कला अकादमीच्या या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी निकालाच्या रात्री काय दिवे लावले होते, याचा अहवाल महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाला सादर केला आहे. कला अकादमीने (खरे तर गोवा कला आणि सांस्कृतिक संचालनालयाने देखील) तो अहवाल त्यांच्याकडून मागवून घ्यायला हवा होता. मात्र, राजकीय पक्षांना सोयीचे असलेले गुन्हेगार कसे निगरगट्टपणे पोसले जातात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. मग ते सांस्कृतिक गुन्हेगार का असेना! ∙∙∙
मडगाव पालिकेत एक वजनदार कंत्राटदार आहे. पालिकेची बहुतेक कामे त्याच्याच पदरी पडतात. या मागे फिक्सिंग आहे, असा आरोप अनेकदा होत असतो खरा, मात्र तसे ठोस पुरावेही काही नाही म्हणा. आता सांगायचा मुख्य मुद्दा म्हणजे या कंत्राटदाराला एक सव्वास सव्वा शेर मिळाला. त्याने आपल्या दुकानाची दुरुस्ती या ठेकेदाराकडून विनामोबदला करून घेतली. त्या दुकानदाराचे राजकीय वजन असल्याने खिशाला कात्री न लावता त्यांनी आपले काम करून घेतले. त्या कंत्राटदाराने पडत्या फळाची आदेश पाळून त्याचे काम करून दिले. आता अन्य दुकानदार स्वतःच्या नशिबाला दोष देत गोपाळा गोपाळा म्हणून आपली व्यथा मांडीत आहेत. ∙∙∙
मिराबाग बंधारा प्रकरणात गोवा विधानसभेत फलक फडकवून गोंधळ घातल्याप्रकरणात, माजी बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांच्यासह पाच जणांना चांगलंच महागात पडल्याचे दिसते. पोलिसांनी या प्रकरणी अखेर पाऊसकरांसह पाच जणांविरुद्ध न्यायालयात ३०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आंदोलकांनी विधानसभेत घोषणाबाजी करून सरकारविरोधात जो ‘लाईव्ह शो’ केला होता, त्याचा शेवट आता कायदेशीर कारवाईने झाला आहे. पाऊसकर यांनी आधीच २०२७ ची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. अशातच हे आरोपपत्र दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राजकीय जाणकारांच्या मते, या आरोपपत्रामुळे पुढील ७-८ महिने पाऊसकर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतील. ही चर्चा त्यांच्यासाठी फायद्याची ठरेल की तोट्याची, हे येणारा काळच सांगेल; पण सध्या तरी ते ‘प्रसिद्धीच्या झोतात’ आले आहेत हे मात्र नक्की! ∙∙∙
पत्रकार परिषदेत मात्र काही बडे पोलिस अधिकारी इतके गोड बोलतात, की पाहणाऱ्यांना वाटावे, ही तर मैत्रीच जुळली! “कधीही फोन करा” अशा स्मितहास्यासह दिलेल्या सूचनांमुळे पत्रकारही खुश. पण खरी गंमत तर त्यानंतर सुरू होते. कारण पत्रकार परिषद संपताच, तेच “कधीही फोन करा” म्हणणारे अधिकारी फोनच्या बाबतीत मात्र जणू “साइलेंट मोड”वर जातात! अधिकृत क्रमांकावर कॉल केला, की तो कॉल सरळ दुर्लक्षित होतो. त्यातही एका ठराविक पोलीस अधीक्षकाची चर्चा रंगली आहे. म्हणे ते आयपीएस अधिकारी गोव्याबाहेरचे, आणि फोन उचलण्याच्या बाबतीत तर अगदी “आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यस्त” असल्यासारखे! पत्रकारांचे कॉल म्हणजे जणू काही त्यांच्या फोनला “नेटवर्कच नाही” असं वाटावं. आता पत्रकारांमध्ये मिश्कील चर्चा अशी रंगली आहे की, पत्रकार परिषदेतली मैत्री ही फक्त “स्टेजपर्यंतच मर्यादित” असते का? आणि बाहेर पडताच ती मैत्री थेट “आउट ऑफ कव्हरेज एरिया”मध्ये जाते का? एकंदरीत, “फोन करा” ही सूचना खरी असते… पण “उचलला जाईल” याची गॅरंटी मात्र कुठेच दिलेली नसते! ∙∙∙
सावर्डे मतदारसंघातील लोक स्वतःला कितीही पिचलेले खाणग्रस्त म्हणू द्या, पण जेव्हा कुठलीही निवडणूक आली, तर या मतदारसंघातून संभाव्य उमेदवारांची भरती येते, ती काही औरच असते. आताचेच पाहा ना. विधानसभा निवडणुकीसाठी दहा महिने तरी बाकी आहेत, पण पाच सहा उमेदवार बोहल्यावर चढण्यास सज्ज असलेले दिसतात. त्यात युवा नेते संकेत आर्सेकर आणि नामांकित डॉ. मिलिंद देसाई यांचाही समावेश होता. दोघांनी आपल्या परीने कामालाही सुरवात केली होती. पण आता कळते, की त्या दोघांनी समझोता केला आहे. ते दोघेही एकत्र आले आहेत. उद्या रविवारी या दोघांनी मिळून कुडचडे येथे एक आरोग्य शिबिरही आयोजित करून आम्ही एकत्र याचे जणू ऐलान केले आहे. आता दोन तरुण तुर्कांची जोडी सावर्डेतील राजकारणातील अर्कांना भारी पडणार नाही ना? ∙∙∙
कामगार हा सध्याच्या युगात प्रत्येकासाठी महत्त्वाचा घटक असून गोव्यातील मूळ कामगारांनी आपले लक्ष नोकरीकडे वळवल्याने गोमंतकीयांना प्रत्येक कामासाठी स्थलांतरित कामगारांवर अवलंबून रहावे लागते. कचरा व्यवस्थापन, वीज उपकरणे, रंगकाम, गवंडी, शेती बागायत सारखी कामे त्यांच्याशिवाय होत नाहीत. या उन्हाळ्याच्या दिवसात घरावरील कौले बदलण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी सुद्धा या स्थलांतरित कामगारांवर विसंबून रहावे लागत आहे. तरीसुद्धा लोक या कामगारांवर वैतागतात, त्यांना योग्य मजुरी देण्यास हात मागे घेतात. सरकारी, खाजगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तर आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी आंदोलने करावी लागतात. मात्र कामगार दिनाच्या दिवशी त्यांचा उदो उदो केला जातो. हा उदो उदो मनापासून केला जातो का? केवळ उपचार म्हणून केला जातो का? हे प्रश्न मात्र अनुत्तरीत राहतात हे खरे. ∙∙∙
आता नागरिक पाण्याची बाटली विकत घेऊन पाणी पितात. परंतु आपण हॉटेलमध्ये गेलो आणि जर गरम पाणी मागितले. त्यावर जर पैसे आकारले, तर नवल वाटू नये. मागे सिलेंडर तुटवड्यामुळे काही हॉटेलमध्ये गरम पाणी देणेच बंद केले होते, काहींनी या काळात पदार्थांच्या दरातही वाढ केली, परंतु सध्या व्यावसायिक सिलेंडरची ज्या पद्धतीने वाढ झाली आहे ती स्थिती पाहता... ओल्यासोबतच सुके जळते तशी स्थिती होणार असल्याचे दिसून येत आहे. ∙∙∙
विधानसभा निवडणूक जवळ आली असल्याने की काय ते माहीत, पण सगळेच राजकारणी सध्या सोशल मीडियावर भलतेच सक्रिय झाले आहेत. नावेली मतदारसंघातील सिद्धेश भगत हे त्यापैकी एक. सध्या ते एक एक विषय घेत त्यावर सोशल मीडियातून आपली टिप्पणी करतात. काल कामगार दिनानिमित्त साधून त्यांनी नावेली येथील एका बेकरीला भेट देऊन तिथे कामगार कसे काम करतात, त्याची पाहणी केली. त्यांचे काम लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सिद्धेशराव चक्क पोदेर बनले. त्यांनी आपला हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. यातून त्या कामगारांना प्रसिद्धी मिळणार की स्वतः सिद्धेशरावांना ते मात्र पाहावे लागणार आहे. ∙∙∙
राज्यातील काही शाळांतील शिक्षक आपल्या शाळा वाचविण्यासाठी गावागावांत विद्यार्थी शोधत फिरताना दिसतात. ग्रामीण भागातील काही सरकारी शाळा व लहान शाळांतील शिक्षकांपुढे शाळा वाचविण्याचे मोठे आव्हान आहे. आता महाविद्यालयातील शिक्षक व इतर कर्मचारीही आपले महाविद्यालय बंद पडणार, या भीतीने विद्यार्थी शोधायला गावागावात फिरताना पाहायला मिळतात. बारावी झालेले विद्यार्थी आपल्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश घेतात. शिवाय खासगी महाविद्यालये व खासगी विद्यापीठे गोव्यात आल्यामुळे ग्रामीण भागातील महाविद्यालयात विद्यार्थी मिळणे कठीण बनले आहे. स्वतः कधीही गावात न फिरलेले शिक्षक आता घराघरांत जाऊन आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना व पालकांना गळ घालताना दिसतात. स्ट्रगल फॉर एक्झिस्ट्न्स म्हणतात, ते असे. ∙∙∙
मराठी-हिंदी नाटककार, पटकथालेखक, अभिनेते आणि चित्र-नाट्य दिग्दर्शक अभिराम भडकमकर होतकरू कोकणी नाटककारांना पर्वरीतल्या कार्यशाळेत मार्गदर्शन करत आहेत. गोवा कोकणी अकादमीची तीन दिवसांची ही कार्यशाळा आज संपणार. भडकमकर हे लेखन, दिग्दर्शन कार्य खूप मोठे. त्यांची सीता ही कादंबरी अप्रतिम आहे. त्यांच्याविषयी व पुस्तकांविषयी सहभागी लेखकांना कितपत ठाऊक आहे, हा विचार सोडून द्या. परंतु किडलेल्या कोकणी नाट्य चळवळीची मरगळ दूर करायला असेच वैद्य लागतात. तिशेक लेखक शिबिरात शिकत आहेत. त्याचा फायदा ५१व्या कोकणी नाट्य स्पर्धेत आणि इतर नाट्य संहितांच्या सुधारणेत कितपत होतो हे दिसेलच लवकर. तूर्त आशा करूया, की लवकरच मॉन्सूनोत्तर हंगामात मौलिक कोकणी नाटकांचे पीक तरतरून येईल. ∙∙∙
राज्यात कमी कालावधीत दुप्पट पैसे वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आपली आयुष्यभराची पुंजी नागरिक कशा प्रकारे भुरट्यांच्या अमिषाला भूलून त्यांच्या स्वाधीन करतात याचा वृत्तांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांनीच मांडला. शीता पुढे मीठ घाण्याच्या वृत्तीचे लोण आता क्रिप्टो आणि एविएटर सारख्या डिजिटल मायाजालाच्या स्वरूपात गाव पातळीवर पसरले आहे. तरुणाई यात गुरफटली असून या जाळातून बाहेर पडणे कठीण होत आहे. यावर आळा घालायचा तरी कसा? झाकली मूठ सव्वालाखाची अशी स्थिती आहे, परंतु यावर आत्ताच कठोर पावले उचलली नाहीत, तर काळ धोक्याचा आहे. सायबर गुन्हे शाखा अधिक सशक्त करावीच लागणार, अन्यथा सूज्ञास अधिक सांगणे न लगे! ∙∙∙
बाजारात आंबे, केळी, कलिंगड दाखल झाल्यानंतर अन्न व औषध पुरवठा खाते (एफडीए) खडबडून जागे होत होते. मागील वर्षी एफडीएकडून जेवढ्या आंबे, केळी व कलिंगडावर म्हापशात जेवढ्या कारवाया झाल्या, तेवढ्या यावर्षी झालेल्या नाहीत, असे म्हणावे लागेल. म्हणजेच ग्राहकांनी बाजारात आलेले आंबे, केळी व कलिंगड खाण्यायोग्य असल्याचा ‘एफडीए’ने दाखलाच दिला की काय? असा प्रश्न राहून राहून पडल्याशिवाय राहत नाही. एफडीएने यावर्षी हॉटेलधारकांवर ज्या पद्धतीने कारवाया केलेल्या आहेत, त्या पाहता त्यांचे कौतुक करायला हवे. परंतु फळांबाबत कारवाई झाली की त्याची दखलही प्रसारमाध्यमे घेत आली आहेत. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंबे दाखल झाले आहेत, त्या आंब्यांना वासच नाही, त्यामुळेच संशयाची पाल चुकचुकणारच. येथे ‘एफडीए’चा उल्लेख केल्यामुळे येत्या काही दिवसांत कारवाया झालीच तर या उताऱ्याचा परिणाम मानावा लागेल. ∙∙∙
१ एप्रिलपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली. ३० एप्रिल हा शेवटचा दिवस झाला. आता परत शाळा जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होतील. एप्रिल महिन्यात मुलांना काही शिकायला मिळाले का? या तीस दिवसांत पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी सुद्धा गंभीररीत्या घेतलेले दिसत नाही. विद्यार्थ्यांच्या वह्या पाहिल्या तर त्या कोऱ्याच दिसतात. दर दिवशी चार ते पाच विषयांचे तास होते. पण प्रत्येक तास मुलांना मोकळाच मिळायचा. याचे कारण शिक्षकांची गैरहजेरी. गैरहजेरीचे कारण जनगणना. एकदा का विद्यार्थ्यांना, पालकांना मोकळे तास मिळतात कळल्यावर शाळेत जायचे तरी कशाला? त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या रोडावली होती. भविष्यात सरकार, शिक्षण खात्याकडून याचा विचार होईल का? ∙∙∙
दरोडा घालायचा म्हणजे चित्रपटातल्यासारखी प्लॅनिंग, मोठे बजेट, भारी गाड्या, असं काहीतरी असतं, असे आपण समजत होतो. पण राज्यात तर सगळी कहाणीच वेगळी निघाली! केवळ ४ हजार रुपयांत “रेकी स्पेशालिस्ट” तयार करून दरोडा टाकण्याचा प्लॅन राबवला गेला म्हणे. आता एवढ्या कमी बजेटमध्ये “प्रोजेक्ट दरोडा” उभा करणाऱ्यांची कल्पकता पाहून काही जण तर थक्कच झाले आहेत. लोक म्हणतात, एवढ्या पैशांत आजकाल नीट मोबाईलही मिळत नाही आणि येथे माणसं तयार करून रेखी करून घेतली जाते! म्हणजे हा “लो-कॉस्ट, हाई-रिस्क” स्टार्टअपच म्हणायचा का? काही जण तर मिश्किलपणे म्हणू लागले आहेत, की दरोडेखोरांनी जणू “बजेट फ्रेंडली क्राइम मॉडेल”च सुरू केलं आहे. अखेर दरोडेखोर मिळाले, त्यामुळे बाकी काहीही असो, पण या दरोड्याने एक गोष्ट मात्र सिद्ध केली, क्राइममध्येही “किफायतशीर योजना” आखली, तर शेवटी तोटा होण्याची शक्यता जास्तच असते! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.